Saturday 6 July 2013

आज … तळजाईवर. . .



 
     Painted Francolin


आज खूप दिवसांनी तळजाई टेकडीवर गेलो. एखाद्या वारकऱ्याला जशी विठ्ठल भेटीची आस  लागते … अगदी तेवढ्या तीव्रतेने नाही तरी त्याच जातकुळीतील ओढ मला तळजाईकडे  घेऊन जाते. तिथे असं नेमकं काय आहे हे शब्दांत सांगणे अवघड आहे. पण मला वाटतं की शहरात राहूनही दाट झाडी, हिरवळ, विस्तीर्ण जागा आणि मुख्य म्हणजे इथले पक्षी यामुळे एका छोटेखानी जंगलात गेल्यासारखं वाटतं. आणि दरवेळी काहीतरी नवीन हाती लागतं ज्यामुळे इथे पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. 



आज गेल्या गेल्या आमचं स्वागत पावश्याने त्याच्या ' पेरते व्हा ' ह्या signature call ने केलं. एकीकडे हा आवाज चालू असताना दुसरीकडून Painted Francolin ने जुगलबंदी चालू केली. यातच मध्ये मोरांची केकावली ऐकू येऊ लागली. तिकडे सातभाई यांचे "बायका किटी पार्टीत जशा गलका करून हसतात तसे " हसणे चालू झाले.( लोकहो ही उपमा मी दिलेली नाही तर ती  सुप्रसिद्ध पक्षी तज्ज्ञ किरण पुरंदरे यांनी आमच्या पक्षी निरीक्षणाच्या सुरवातीच्या काळात आम्हांला सांगितलेली होती.) या आवाजात आणखी भर टाकली ती होल्याच्या आवाजाने! यातून एक वेगळीच सरमिसळ तयार झाली. शहरातील चित्रविचित्र आवाजांना, गोंगाटाला सरावलेल्या कानांना हा बदल छान वाटला. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की एक मोर सोडल्यास यातील कुठल्याही पक्ष्याचा आवाज सुमधुर नाही. आणि मोराचा तरी कुठे एवढा श्रवणीय call असतो ? पावशा आणि Francolin च्या आवाजाने तर सगळा परिसर दुमदुमून गेला. या जुगलबंदीत असं वेगळं काय होतं ?त्यांचे शब्दात वर्णन करणे शक्य नाही. त्यासाठी ह्या लिंकचा आधार घेतो…आधी Francolin चा आवाज ऐका आणि मग पावशाचा...




 

      पावशा ( Hawk Cuckoo )

मला वाटतं की यात एक  होती एक आश्वासकता… दर  वर्षी याच दिवसात त्यांचे इथे येणे आणि गाणे हे निसर्गचक्र अजूनतरी व्यवस्थित चालू असल्याचे लक्षण आहे. 

अशा 'तुका म्हणे होई मनाशी संवाद . . . आपुलाची वाद आपणांसी' अवस्थेची शक्यता असताना नेमकी ही स्थिती भंग पावते कारण कोणाच्यातरी मोबाईल वर जोरात गाणी लावलेली असतात.आणि तो फोन हातात घेऊन तो माणूस तुमच्या शेजारून जातो.       मी कितीही जरी गाण्यांचा शौकीन असलो तरी अशा वेळी मला ती अस्थानी वाटतात. एकतानता बिघडवणारी वाटतात. अर्थात आपण कोणाला काही बोलू शकत नाही किंवा ती गाणी ऐकण्यापासून थांबवू शकत नाही.मनात या पक्ष्यांच्या आवाजाची प्रतिमा साठवून परतीच्या वाटेला  लागलो. . . 

(सूज्ञांस सांगणे न लागे की हे फोटो अथवा व्हिडीओ माझे नाहीत. माझ्या लिखाणाला एक दृक-श्राव्य परिमाण देण्याचा तो एक छोटा प्रयत्न !)

No comments: