Wednesday 2 January 2019

आठवण डॉ रमेश बिडवे यांची...

आज सोसायटीत फिरताना सुबाभळीची झाडं दिसली. झाडाच्या टिपिकल चॉकलेटी शेंगा अगदी लांबूनही ओळखू येतात. अलीकडे सोसायटीत माणसं बोलावून गुलमोहोर सारखी झाडं तोडली जात आहेत. आधीचे एक निष्पर्ण झाड तोडून त्याचा फक्त एक खोड ठेवण्यात आला आहे. सकाळच्या वेळेत त्या झाडावर थोडा वेळ पोपटांची लगबग आणि काही वेळा राखी धनेश चिरक्या आवाजात ओरडताना ऐकू यायचे. ते आता कुठे जातील कोण जाणे! आमच्या सोसायटीत गुलमोहोर, नीलमोहोर यासारखी परदेशी झाडं आहेत. तसंच अशोकाची पण झाडं आहेत. आज फिरत असताना का कोण जाणे अचानक डॉ रमेश बिडवे यांची खूप आठवण आली.
मी त्यांच्या 'विहंगमित्र' या संस्थेचा पक्षी निरीक्षणाचा छोटासा अभ्यासक्रम फार पूर्वी म्हणजे १९८६-८७ मध्ये केला होता. तेव्हा ते आणि किरण पुरंदरे यांनी आम्हाला वेगवेगळ्या फील्ड ट्रिप ना नेऊन पुणे आणि आसपासच्या भागातल्या पक्ष्यांची छान माहिती सांगितली होती. पक्षिनिरिक्षणातली गोडी या दोघांनी लावली जी अजूनही कमी अधिक प्रमाणात टिकून आहे.
एकदा डॉ बिडवे आमच्या सोसायटीत आले होते. त्यावेळी अशीच सगळी झाडं होती. मला तेव्हा वाटलं होतं की ते इतकी हिरवळ बघून खुश होतील. पण त्यांनी अगदी नाराजीचा सूर काढला होता - "पक्ष्यांच्या दृष्टीनं ही झाडं एकदम निरुपयोगी! या परदेशी झाडांवर कुठलाच पक्षी घरटं बांधत नाही. शिवाय या झाडांची मुळं खूप कमजोर असतात. त्यामुळे दिसायला यांची फुलं आकर्षक दिसली तरी जरा जोराचा वारा आला की ही झाडं पडू शकतात." त्यांच्या या बोलण्याने तेव्हा मी अवाक् झालो होतो. पण हळूहळू ते म्हणाले त्याची प्रचिती येऊ लागली. वळवाच्या पावसात सोसाट्याचा वारा आला की या झाडांच्या फांद्याच नव्हे तर मुळासकट झाड उन्मळून पडणं हे आमच्या सवयीचं झालं.
डॉ बिडवे यांच्या बोलण्यात एक अनौपचारिक सहजता असे. ते मनमोकळ्या स्वभावाचे होते. ते नेहमीच कुठल्याही बारीक सारीक शंकांचं निरसन करत. ते फक्त पक्षी निरीक्षक नव्हते तर निसर्ग संवर्धनाच्या कार्यात त्यांचा मोठा वाटा होता.
२००५ डिसेंबर अखेरीला अंदमानला आलेल्या त्सुनामी लाटेत ते आणि पुण्यातलेच डॉ राजेश खनाडे बेपत्ता झाले. अतिशय चटका लावणारी ही घटना होती. त्यांचं हे असं बेपत्ता होणं ही एकूणच निसर्ग संवर्धनाच्या चळवळीची सुद्धा मोठी हानीच होती. डिसेंबर अखेरीला हमखास डॉ. बिडवे यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही!

No comments: