Monday, 29 February 2016

(जर्मन ) भाषा पहावी शिकून . . . (भाग २)


                                                               १
कुठलीही भाषा शिकण्यासाठी ती भाषा ऐकणे,बोलणे,वाचणे आणि लिहिणे असे चार घटक असतात. आणि या चारही घटकांसाठी चांगल्या दर्जाची साधनं उपलब्ध असतील तर ती भाषा शिकणं सोपं होऊ शकतं. मी काही काळ  जर्मन शिकत होतो त्या अनुभवातून म्हणू शकेन की जर्मन भाषेत अशी साधनं मुबलकपणे उपलब्ध आहेत.नवशिक्यांसाठी वेगळ्याप्रकारचं सुलभ साहित्य तर जशीजशी काठिण्य पातळी वाढत जाईल तसं वेगळ्या प्रकारचं साहित्य मिळतं. दृक-श्राव्य माध्यम तर आहेच पण बऱ्याच पुस्तकांबरोबर ऑडिओ सीडी मिळते, जी ऐकून त्यावर पुस्तकात प्रश्नही असतात. या सर्व पुस्तकांची  मांडणी अतिशय आकर्षक, कागद सुंदर आणि छपाई उत्कृष्ठ असते. जर्मन लोकं त्यांच्या भाषेवर खूप प्रेम करतात आणि तिचा प्रसार होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नही करतात. हेच आपल्या मराठीच्या बाबतीत म्हणता येईल का ? निदान माझ्या तरी अशी साधनं मराठीत आहेत असं पाहण्यात नाही. असो. हे थोडं विषयांतर झालं. 
Max Mueller Bhavan (MMB) आणि पुणे विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या शिकवण्याच्या पद्धतीत फरक आहे. MMB मध्ये जास्त भर जर्मनमध्ये बोलण्यावर आहे . 'तोडकं मोडकं, चुकत माकत का असेना पण तुम्ही बोला' असा तिथला दृष्टिकोन असतो. तर इथे 'आधी व्याकरण समजून घ्या, भाषेचा पाया पक्का करा  आणि मग ती बोला' असा विचार असतो. यापैकी कुठलं तरी एक चूक किंवा बरोबर असं काही नाही. आणि यावर मत मांडायचा मला अधिकार देखील नाही. एवढंच वाटतं की MMB मधून शिकलेले किंवा शिकणारे जर्मनचे विद्यार्थी हमखास ओळखू येतात. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास असतो. मग भलेही ते चुकीचं बोलत असतील. तरीही ते  रेटून बोलतात. मला माझ्या शालेय जीवनाची या निमित्ताने प्रकर्षाने आठवण झाली. मी जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलो असलो तरी आमच्या शाळेत मराठमोळं वातावरण होतं. आम्ही एकमेकांशी मराठीतच बोलत असू. त्यामुळे स्पोकन इंग्लिश मला खूपच उशिरा आलं. आणि त्यातही सुरुवातीला बोलताना ततपप होत असे. पण आजूबाजूची कॉन्व्हेंट शाळेत जाणारी मुलं 'फाड-फाड' इंग्लिश बोलत.त्यामुळे ती dashing वाटत.  पण त्यात काहीही बोलत - "Have you karofied your homework?" अशा प्रकारचं बोलत… खरंच ! 

                                                                २
                                                                
आठवडयातून तीन दिवस प्रत्येकी दोन-दोन तास (आमचा सकाळचा वर्ग होता) असा आमचा कोर्स होता. त्यापैकी एक लेक्चर ऋचा मॅडम घेत तर मृण्मयी मॅडम दोन घेत. दोघींमध्ये चांगलं सामंजस्य आणि समन्वय होता. त्यांची शिकवण्याची पध्दत थोडी वेगळी होती. मृण्मयी मॅडम कटाक्षाने जर्मन मध्ये बोलत तर ऋचा मॅडम सुरुवातीला आम्हांला जड जाऊ नये म्हणून इंग्रजीतूनही बोलत. अंकलिपी, मुळाक्षरांपासून आमचा भाषेचा प्रवास सुरु झाला. शिवाय जर्मन भाषेत गुड मॉर्निंग वगैरे हे ही शिकवलं गेलं. मग काही मूलभूत क्रियापदं शिकवली गेली.
तेव्हा असं जाणवलं की भाषा शिकवणाऱ्या शिक्षकाला इतर अनेक कलांचं अंग असणं गरजेचं आहे. विशेषत:नवशिक्यांना शिकवताना देहबोली, अभिनय,हेसुद्धा महत्त्वाचे ठरतात. आता हेच पहा ना- kommen (येणे) आणि gehen (जाणे) याचा अर्थ समजावून सांगताना मृण्मयी मॅडम यांनी वर्गाच्या आत आणि बाहेर असं आम्हांला करून दाखवलं. हे ही ठीक होतं. पण lachen (हसणे) आणि weinen (रडणे) हे ही दाखवलं. अगदी जसं लहान मूल रडताना डोळे चोळून रडतं तसं! नंतर हळूहळू क्रियापद चालवणे हा प्रकार सुरु झाला. कर्ता, कर्म, क्रियापद म्हणजे काय हे समजण्याची अशी मुळापासून सुरुवात झाली. पहिल्याच महिन्यात आमच्यासाठी एक Welcome Party होती. त्यावेळी आम्हांला प्रथमच डॉक्टर मंजिरी परांजपे, ज्या या सर्व अभ्यासक्रमांच्या समन्वयक होत्या, यांचं जर्मन मधून भाषण ऐकण्याची संधी मिळाली. कळलं अर्थातच काही नाही पण ऐकायला खूप छान वाटलं. कुठलाही कागद समोर न घेता त्यांनी घेतलेला मागील वर्षाचा आढावा (हे इंग्रजीत होतं) प्रभावित करून गेला. आमचे सर्व शिक्षक डॉक्टर परांजपे मॅडम यांच्याच मार्गदर्शनात शिकलेले होते. त्यामुळे सर्टिफिकेट पासून ते advance डिप्लोमा पर्यंत प्रत्येक शिक्षिका त्यांच्याविषयी नेहमीच आदराने बोलत. 
मला वाटतं की एखादी नवी भाषा शिकायची असेल तर ती नेहमीच एका ग्रुपमध्ये शिकावी. एकट्याने शिकली तर ती शिकवणी होईल. शिकणं होईल का हे सांगता येणार नाही. कारण ग्रुप मधल्या प्रत्येकाची विचाराची पद्धत वेगळी, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी, शब्दसंपदा वेगळी. या सगळ्याचा नक्कीच आपली भाषा सुधारण्यासाठी उपयोग होतो. शिवाय तसं बघितलं तर प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणात चुका करूनच शिकत असतो. आपण बोलताना किंवा लिहिताना चुकणार तर नाही ना याची एकदा भीती बाळगायचं सोडून दिलं की मग शिकणं सोपं होतं. आमच्या वयामुळे आमच्यावर हे दडपण जास्त होतं. पण माझा मित्र विवेक बरोबर असल्यामुळे हळूहळू माझीही भीड चेपली. त्याला कुठली शंका आली की तो नि:संकोच विचारत असे. आणि सर्वच शिक्षक कुठलाही कंटाळा न करता वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यांच्याच शंकांचं निरसन करत.लेक्चर्स मध्ये बऱ्याच वेळा धमाल असे. कधी गटा- गटात तर कधी जोडीदाराबरोबर राहून वेगवेगळ्या activities द्वारे शिकवलं जाई. हसत खेळत आम्ही शिकत होतो. या सगळ्यामुळे भाषा हळूहळू कळू लागली आणि आवडूही लागली.
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           (क्रमश:)

No comments: