१
माझ्या तीन वर्षांच्या जर्मन भाषा शिकण्याच्या तुटपुंज्या अनुभवाच्या जोरावर मी कुठलीही भाषा शिकू पाहणाऱ्यांसाठी काही सूचना देऊ शकतो. तुम्हांला जर भाषा शिकायची असेल तर एकही लेक्चर बुडवू नका.वर्गात जे काही शिकवतात ते लक्षपूर्वक ऐका आणि जर काही गृहपाठ दिला असेल तर तो यथाशक्ती पूर्ण करा. आम्ही हे सगळं एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे पाळलं. आठवड्यातले तीन दिवस प्रत्येकी दोन तास आम्ही असे बाजूला काढलेले होते.सहसा आम्ही लेक्चर बुडवलं नाही. एका लेक्चर मध्ये किती काय काय शिकवलं जाऊ शकतं ते आम्ही अनुभवत होतोच. जर ते बुडलं तर आपण बाकी वर्गाच्या मागे पडू आणि तो भाग समजला नाही तर त्यामुळे आपली आवड कमी होईल की काय असं आम्हांला वाटे. हे जे अभ्यासक्रमाबाहेरचे उपक्रम आम्ही केले ते लेक्चरच्या वेळात कधीच नाही. कधी सकाळी लवकर येऊन, कधी दुपारच्या मोकळ्या वेळेत तर कधी (घरच्यांचा रास्त रोष पत्करून) रविवारीही ! या सगळ्याचा निश्चितच फायदा झाला.
२
फेब्रुवारी महिना या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे लवकर संपला आणि हळूहळू परीक्षेचे वेध जाणवू लागले. इतकं सगळं चांगलं चाललेलं असताना परीक्षा कशाला असं वाटे. म्हणजे परत ते पेपर लिहिणे, मार्क मिळवणे आणि मार्कांवरून आपली योग्यता ठरवली जाणे याचा कंटाळा होता. सलग तीन तास बसून लिहिण्याची सवय गेली त्यालाही अनेक वर्षं झाली होती. पण एकदा हा कोर्स करायचा म्हटल्यावर या सगळ्यातून जाणे हे आलेच! आम्हांला एकदा वर्गात ऋचा मॅडमनी सांगितलं होतं की फक्त सर्टिफिकेट कोर्स करून काहीच उपयोग नाही. कारण या पातळीवर भाषा पूर्णपणे कशी असते याचा अंदाजच येत नसतो. फक्त भाषेची तोंडओळख होते इतकंच! पुढचे डिप्लोमा कोर्सेस करणं म्हणूनच गरजेचं होतं. अर्थात त्यांनी हे ही सांगितलं होतं की सर्टिफिकेट आणि डिप्लोमाच्या काठिण्य पातळीत खूपच फरक आहे. डिप्लोमाची ही उंच उडी सगळ्यांनाच जमेल असं नाही.
पण दोघीही शिक्षिकांनी आमच्या सर्टिफिकेटच्याच पातळीवर पुढच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिने उत्तम पायाभरणी केली होती. हे अतिशय महत्त्वाचे होते. म्हणजे त्यांनी आमच्यात जर्मन भाषेबद्दल आवड निर्माण तर केलीच शिवाय कुठलीही गोष्ट अशी नव्हती की जी आम्हांला समजली नव्हती. किंबहुना ती गोष्ट समजेपर्यंत त्यांनी खूप प्रयत्न केले. आम्हांला आधी विशेषणं हा प्रकार जड जात होता. तर त्याचा सराव व्हावा म्हणून मृण्मयी मॅडमनी आम्हांला जवळपास ५०० वाक्यं दिली होती. दोघींनी मागील अनेक वर्षांच्या प्रश्नपत्रिका वर्गात सोडवून घेतल्या होता. तोंडी परीक्षेचा सरावही करून घेतला होता. या सगळ्यातून परीक्षेत काय असणार आहे याचा अंदाज बांधता आला. परीक्षेच्या दृष्टिने मनाची तयारी होऊ लागली आणि अशातच वर्षाचं शेवटचं लेक्चर आलं.
३
ऑगस्ट पासून सुरु झालेली ही स्वप्नवत वाटचाल आता मार्च मध्ये शेवटाकडे आली. पुढे काय होणार याचा आता काहीच अंदाज बांधता येत नव्हता. परीक्षेत डिप्लोमाला प्रवेश मिळवण्याइतके मार्क मिळाले तरच हे भाषा शिकायचं चालू राहणार अन्यथा नाही. गेल्या अनेक महिन्यांत सगळ्याचीच सवय झाली होती. भाषा शिकण्यासाठी वेळ राखीव ठेवलेला असणं, ती शिकणं, रानडे इन्स्टीट्यूटचं छान वातावरण, इतक्या महिन्यात सगळ्यांशी झालेली मैत्री हे सगळं आता संपणार असे वेगवेगळे विचार मनात असताना शेवटच्या लेक्चरला सुरुवात झाली. मृण्मयी मॅडमनी आधी आम्हांला काही शंका आहेत का असं विचारलं आणि त्या दूर केल्यानंतर त्या म्हणाल्या की शिकवण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव होता आणि आमची batch त्यांच्यासाठी पहिलीच होती. हे त्या आधीही एक दोनदा म्हणाल्या होत्या. पण आम्हांला वर्षभरात फारसं कधीच जाणवलं नाही की त्या नवख्या आहेत. पहिली batch असल्यामुळे त्यांच्या मनात आम्हां सर्वांबद्दल एक वेगळे स्थान असावे. आणि त्या म्हणाल्या- "मी आता तुम्हांला महेश एलकुंचवार यांच्या 'मौनराग' या पुस्तकातला एक लेख वाचून दाखवते." हे अगदीच अनपेक्षित होतं. जर्मन भाषेच्या अभ्यासक्रमाचा शेवट आणि तो झाला महेश एलकुंचवारांच्या लेखाच्या अभिवाचनाने ! आणि या निमित्ताने मला असे अवचित महेश एलकुंचवार भेटले ! (या आधी मी त्यांचं काहीच वाचलेलं नव्हतं इतकी माझी साहित्यिक अभिरुची लाजिरवाणी होती.पुढे ते त्यांच्या इतर कलाकृतींमधून भेटत राहिले. आणि शब्दांमधून अर्थ आणि नाद आणि दृश्यं पोचवणाऱ्या लेखकाची ओळख झाली.) आधीच वातावरण भारलेलं होतं, एक अनामिक हुरहूर होती आणि मॅडम शांत स्वरांत एलकुंचवारांच्या शब्दांतून आमच्यासमोर एक अद्भुत चित्र मांडत होत्या.
'. . . . . पुष्कळदा देणारा कोण व घेणारा हेही कळत नाही.देणारा व घेणारा एकच होतात. एकातच एकाच वेळी देणाराही असतो आणि घेणाराही. देणारा श्रीमंत असतोच; पण खुलेपणाने घ्यायलाही तितकेच श्रीमंत मन लागते. काही घेताना, संकोच वाटावा इतके लहान आपण कधीच नसतो व ते नाकारावे एव्हढे मोठेही. आपण फक्त 'असलो' की देणेघेणे दुसऱ्या कशाने कलुषित होत नाही. प्रसन्न आनंद फक्त उरतो.'
हे विलक्षण होतं.या अभिवाचनातून मॅडमनी आमचा सर्टिफिकेटच्या कोर्सला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. तो एक सर्वसामान्य कोर्स न राहता ती एक ज्ञानसाधना झाली ज्यात आम्ही सर्व सहभागी होतो.
'. . . . . देण्याघेण्यातून हे सगळे निघाले व कुठून कुठे आलो. मला खूप जणांनी दिले व खूप दिले. पण माझ्या विद्यार्थ्यांनी मला जे दिले त्याला तोड नाही. आपण मोलाचे काही देत आहोत हे त्यांना त्या भाबड्या वयात कळतही नसणार. त्यांना प्रश्न पडत व त्यांनी ते माझ्याजवळ आणून ठेवले के त्यांची उत्तरे शोधता शोधता मी श्रीमंत होऊन जाई.'
देणारा(शिक्षक) आणि घेणारा(विद्यार्थी) यांच्या नात्यात खूप अंतर असते असं नाही. किंबहुना त्यांच्या भूमिकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. नकळतपणे विद्यार्थी काही वेळा शिक्षक होऊन जातो. शिक्षक-विद्यार्थी नात्यामधलं हे सुंदर अद्वैत त्यादिवशी पुन्हा अनुभवलं. आणि वर्षभर मॅडमनी कोणत्या भूमिकेतून आम्हांला शिकवलं हे दिसून आलं. तसंच आमच्या नकळतपणे आमच्याकडूनही त्यांना शिकायला मिळालं असेल/नसेल, पण त्याबद्दलची त्यांची कृतज्ञतेची भावना विलक्षण होती.
एकूणच हे सगळं उत्कट होतं. या प्रसंगाचं वर्णन शब्दांत पूर्णपणे मांडण्याएवढी माझ्याकडे शब्दसंपदा आणि प्रतिभा नाही. पण मन अगदी भरून आलं. माझ्या आयुष्यात आपलं जगणं सार्थकी लागलं असं म्हणण्याजोगे खूप कमी प्रसंग आले. आणि त्यातले बरेचसे मला काहीतरी शिकताना जाणवले होते. माझ्या मावशीकडे (कै. शोभना वाकणकर) लहानपणी मी गाणं शिकायला जात असे. तेव्हा एकदा ती भैरव राग गात होती. मीही थोडंसं म्हणत होतो. त्यावेळी एका वेगळ्याच विश्वात आम्ही होतो. टिळक रोडसारख्या गजबजलेल्या ठिकाणी असूनही मला बाकी कुठलाच आवाज येत नव्हता. ही गाण्यातून मिळणारी समाधीवस्था एकदाच अनुभवली. पण कायमचीच लक्षात राहिली. तसंच पुढे डॉक्टर विक्रांत महाजन यांच्याकडे होमिओपथीचे प्रशिक्षण घेत असताना sensitivity training साठी त्यांनी 'इजाजत' सिनेमा दाखवून त्यावर ग्रुप डिस्कशन घेतलं होतं. सिनेमा तर त्या आधीही पहिला होता पण तो जेवढा आणि जसा त्या चर्चांमधून समजला तेवढा पूर्वी नव्हताच कळला. या अनुभवांच्या तोडीचाच हा अभिवाचनाचा प्रसंग होता. कोर्सच्या शेवटच्या दिवशी मॅडमनी दिलेली ही भेट आयुष्यभर स्मरणात राहील. . .
(समाप्त)
(आमच्या सर्टिफिकेट कोर्सपुरतं इतकं लिहिलं जाईल असं वाटलं नव्हतं. पण पुढचे कोर्सेस ही छान होते. त्याबद्दलही पुढेमागे लिहीनच. पण सध्या इथेच थांबतो)