Monday, 23 April 2018

माझा वाचन प्रवास...

आज सुप्रसिद्ध इंग्रजी कवी आणि नाटककार विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस ( २३.४.१५६४) आणि मृत्यु् दिनही!(२३ एप्रिल १६१६). म्हणून १९९५ पासून आजचा दिवस जागतिक पुस्तक दिन  म्हणून साजरा केला जातो. या निमित्त आज माझ्या वाचन प्रवासाविषयी थोडेसे-

माझी वाचनाची आवड वयाप्रमाणे बदलत गेली. म्हणजे हे तर झालंच की सुरुवातीला ऐतिहासिक कादंबऱ्या( ना.सं.इनामदार ते शिवाजी सावंत व्हाया गो. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे) त्यानंतर युद्धस्य कथा रम्या( वि. स. वाळिंबे, वि.ग.कानिटकर इ) असा चालू झालेला प्रवास, नंतर पु. ल., व. पु. काळे या मार्गावरून होत होत एक वेगळे वळण घेऊन गेला- दलित आत्मचरित्र -'उपरा', 'बलुतं' आनंद यादव यांचं 'झोंबी' हे ही वाचलं. तर दुसरीकडे जयंत नारळीकर यांची पुस्तकेही वाचली. प्रभाकर पेंढारकरांची 'रारंगढांग' ही कादंबरीही खूप संस्मरणीय व प्रभावी वाटली.माणूस आणि निसर्ग यांच्यातीलच नव्हे तर माणसा-माणसातील संघर्षाचे छान चित्रण यात आहे. पुस्तक वाचल्यावर मी त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि विशेष म्हणजे त्यावर त्यांचं कौतुक आणि प्रोत्साहनपर उत्तरही आलं होतं. नारळीकरांनाही एक पात्र पाठवलं होतं ज्यात त्यांना मी विचारलं होतं(त्यासुमारास  त्यांचा म. टा. मध्ये 'पुराणातली वांगी' हा लेख आला होता) की आपले पूर्वज खरंच एवढे प्रगत होते का. गंमत म्हणजे माझ्याच पत्रातल्या मोकळ्या जागेत त्यांचं छोटेखानी उत्तर आलं होतं ज्यात माझ्या प्रश्नाला त्यांनी अगदी त्रोटक उत्तर दिलं होतं.  

एकीकडे इंग्लिश वाचनही चालू होतं. जेफ्री आर्चर, आयर्विंग वॉलेस, सिडनी शेल्डन, एरिक सेगल, आर्थर हेली, रॉबिन कूक पासून जॉन ग्रिशमपर्यंत माझा प्रवास झाला. त्याकाळी वाचलेले 'Jonathan Livingston Seagull' हे Richard Bach यांचे
पुस्तक नंतरच्या काळात वाचल्यावर जास्त आवडले. आपल्या शारीरिक मर्यादांच्या पलीकडे जावून Higher Purpose of Existence शोधणाऱ्या  एका समुद्रपक्ष्याची ही प्रतीकात्मक छोटेखानी गोष्ट! प्रत्येकवेळी एक नवी स्फूर्ती देणारी! अशा काही इंग्रजी पुस्तकांचा खूप प्रभाव त्याकाळी होता- Daphne du Maurier यांचे 'Rebecca', हार्पर ली यांचे 'To kill a Mocking bird'  अर्नेस्ट हेमिंग्वे यांचं 'The Old Man & the Sea' इ.

महाभारत हा माझा आवडीचा विषय आहे. पण बी आर चोप्रांच्या ढोबळ, भडक आणि साचेबद्ध शैलीतल्या महाभारताच्या सादरीकरणाचा मला तिटकाराच आहे ! इरावती कर्व्यांनी लिहिलेलं 'युगान्त' दुर्गाबाई भागवतांचं 'व्यासपर्व' आणि भैरप्पा लिखित आणि उमा कुलकर्णी अनुवादित 'पर्व' या तीन पुस्तकांमधून महाभारताचा वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून अप्रतिम वेध घेण्यात आला आहे.

खरं तर भाग्य/योग या गोष्टींवर माझा फारसा विश्वास नाही. पण एखादे पुस्तक किंवा लेखक 'भेटण्याचा' योग यावा लागतो असं मला वाटतं. अशाच प्रकारे गौरी देशपांडे('एकेक पण गळावया'), सुनीता देशपांडे ('आहे मनोहर तरी') भेटल्या आणि खूप समृद्ध करून गेल्या. अंबरीश मिश्र त्यांच्या सुरेख, प्रवाही लिखाणातून दिसले. त्यांचं 'शुभ्र काही जीवघेणे' हे पुस्तक वाचलं आणि असं वाटलं की आपण अगदी वेगळ्या आणि समृद्ध शैलीचं पुस्तक वाचत आहोत. मग त्यानंतर त्यांची सगळीच पुस्तकं (स्वतः लिहिलेली वा त्यांनी अनुवाद केलेली) एकामागोमाग करत वाचली. त्यांचे निवेदनाचे कार्यक्रम आवर्जून पाहिले आणि लक्षात आलं मिश्रांना वाचण्याइतकंच त्यांना ऐकणं हा एक अपूर्व आनंद आहे !  

मिलिंद बोकील 'शाळा' च्या आधी 'जनाचे अनुभव पुसता' मधून भेटले. पौगंडावस्थेमधल्या मुला -मुलींचं विश्व त्यांच्या भाषेत मांडणारी एक कालातीत कादंबरी असं 'शाळा' चं वर्णन करता येईल. त्यानंतर पत्ररूपाने भेटले.( मी त्यांनाही त्यांची काही पुस्तकं वाचल्यावर पत्रं पाठवली होती आणि माझ्या प्रत्येक पत्राला त्यांनी मनापासून उत्तरं दिली होती) त्यानंतर ते २-३ वेळा प्रत्यक्षही भेटले. एकदा तर मी त्यांच्या घरीही गेलो होतो. आमच्या कडच्या एका कार्यक्रमाला लोकांना भेट म्हणून मी त्यांची काही पुस्तकं निवडली होती. त्यावर त्यांची स्वाक्षरी घेतली होती. कुठलेही आढेवेढे न घेता त्यांनी ती दिली होती. अतिशय मृदू स्वभावाचे, शांत व्यक्तिमत्व ! एक लेखक म्हणून तर ते आवडलेच पण एक माणूस म्हणूनही! 

अशाच एका  बेसावध क्षणी महेश एलकुंचवार 'मौनराग' मधून भेटले. योगायोग पहा- आमच्या जर्मन शिकवणाऱ्या टीचरांनी वर्षाच्या शेवटच्या दिवशी मौनराग मधील 'देणं आणि घेणं' या विषयावरील उतारे आम्हाला वाचून दाखवले. शेवटच्या दिवसाची ती हुरहूर, भावनिकता- यातच हा विषय! छोट्या अनुभवातून खूप गहिरे अर्थ सांगणारी, एलकुंचवारांची शैली मनाला भिडली. जर्मनची परीक्षा झाल्यावर सर्वप्रथम 'मौनराग' आणून वाचले. एखादा अनुभव, त्या अनुभवाचे आपल्या मनावर उमटणारे पडसाद आणि त्याच अनुभवातून प्रतीत होणारा लेखक अशी त्रिमितीद्वारे हे पुस्तक मनात घर करून राहिले आहे. अर्थात त्यातले सगळेच अनुभव घेण्याएवढी संवेदनशीलता माझ्यात आहे असं वाटत नाही. ती कधीतरी येईल अशी आशा आहे. 











मग त्यांचं 'वाडा चिरेबंदी' वाचलं. मी ते नाटक पाहिलेलं नाही पण पुस्तक वाचूनही ते माझ्या डोळ्यासमोर पूर्णपणे उभं राहिलं. इतकं की आता मला प्रत्यक्ष नाटक बघून माझ्या डोळ्यासमोरचं

चित्र भंग पावेल किंवा काय अशी भीती वाटते !
अशा योगांमुळे एक झालं आहे की पूर्वग्रहांमुळे अनेक पुस्तकांना आणि लेखकांना मी option ला टाकले होते. ते आता होणार नाही. कधीतरी जी.ए. कुलकर्णी ही वाचीन असं म्हणतो! अजून पुस्तकं वाचायची यादी खूपच मोठी आहे- नव्या पिढीतल्या मराठी लेखकांची पुस्तकं फारशी वाचलेली नाहीत. ती वाचायची आहेत. युवाल नोआ हरारीची दोन्ही पुस्तकं वाचायची आहेत. शिवाय हारुकी मुराकामी आहेच ! अलीकडे मोबाईल फोनमुळे मात्र वाचन मागे पडत चाललं आहे. ते प्रयत्नपूर्वक सुरु करायचं आहे. त्यासाठी आजच्या पुस्तक दिनासारखा योग्य दिवस दुसरा कुठला असणार? फक्त आता रात्र थोडी सोंगे फार अशी अवस्था आहे!

ता. क. १ : वरील लेख पुन्हा वाचला असता आणखी काही पुस्तकांचा उल्लेख करावासा वाटतो. यात प्रामुख्याने Deborah Ellis लिखित 'The Breadwinner' या पुस्तकाचा समावेश होईल. म्हटलं तर कादंबरी आणि म्हटलं तर सत्य घटनांवर आधारित असं हे पुस्तक! अफगाणिस्तान मधील तालिबानी राजवटीमुळे निर्माण झालेल्या अशांत अस्थिर आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जीव धोक्यात घालून झुंज देणार्‍या परवाना या लहानग्या मुलीची प्रेरणादायी कथा म्हणजे 'The Breadwinner'! प्रत्येकाने आवर्जून अशासाठी वाचावी की आपण आपल्या छोट्या छोट्या समस्यांबद्दल इतकं रडगाणं गात असतो की आपल्याला जगात काय प्रसंगांतून लोक जात असतात आणि तरीही ते हार मानत नाहीत याचा अंदाज यावा!
भारत-पाकिस्तान फाळणी वर आधारित 'A train to Pakistan' हे खुशवंत सिंग लिखित पुस्तक तर याच विषयावर गुलजार यांची 'Two' ही कादंबरी यांचा इथे फक्त उल्लेख करतो कारण यावर मी एक स्वतंत्र ब्लॉग लिहिला आहेच! 

ता.क. २- 
युवाल नोआ हरारी यांची 'Sapiens' आणि ' Homo Deus' ही दोन्ही पुस्तकं वाचून झाली आहेत. मानवी इतिहासातील घटना आणि संकल्पनांचा रंजक, उद्बोधक आणि विचारप्रवर्तक आढावा या पुस्तकांमधून घेण्यात आला आहे. तसंच भविष्यकाळाचा वेध आणि त्यातील समस्यांच्या दाहकतेबद्दल देखील हरारी विवेचन करतात. 
या शतकातील ही महत्त्वाची पुस्तकं प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी आहेत. या पुस्तकांचा मराठी अनुवाद देखील उपलब्ध आहे.

हारूकी मुराकामी यांची Norwegian Wood ही कादंबरी आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते ज्यात Pathos आहे. कादंबरी मनात खूप काळ घर करून राहते.

माझा मित्र डॉ श्रीरंग ओक याला कसं कळलं माहित नाही पण मला त्याने मला  जी ए कुलकर्णी  यांच्या पुस्तकांचा संच भेट दिला आहे आणि आता त्यातील पुस्तकं वाचायला सुरुवात केली आहे. त्यांची व्यक्ती चित्रण करण्याची हातोटी विलक्षण आहे. व्यक्ती, तिची परिस्थिती आणि या दोहोंमधील द्वंद्व आणि पुष्कळदा परिस्थितीचाच होणारा विजय या गोष्टी वाचल्यानंतर एक अस्वस्थता निर्माण होते.

ता.क.३ - सध्याच्या नवीन लेखकांपैकी गणेश मोरसे लिखित 'झुंड', बालाजी सुतार लिखित 'दोन शतकांच्या सांध्यांवरील नोंदी'  आणि मनोज बोरगावकर लिखित 'नदीष्ट' या पुस्तकांचा इथे फक्त उल्लेख करतो. आवर्जून वाचावी अशी ही पुस्तकं आहेत. कदाचित यांवर एक स्वतंत्र ब्लॉग पुढे मागे लिहीन. तूर्त इथेच थांबतो!

6 comments:

Dr.sadanand Chavare said...

लेखन प्रवास खूप छान शब्द बद्ध केलाआहे. वाचनाचा परिघ खूपच विस्तारलेला आहे. लेख वाचून वाचनीय अशा पुस्तक लेखकाची नावे समजली. धन्यवाद .

Rajesh Pusalkar said...

धन्यवाद सदानंद.. ब्लॉग वाचून त्यावर कॉमेंट केल्याबद्दल... हा ब्लॉग वाचून प्रत्येकाने आपापला वाचन प्रवास आठवावा इतकाच या ब्लॉगचा उद्देश आहे. तू देखील अशी अनेक पुस्तकं वाचली असशील जी मला माहित देखील नसतील. त्यातूनच काय वाचावे आणि आपले किती वाचायचे राहिले आहे याचा अंदाज येईल !

dhana said...

ऐकणे हा अनुभव देखील वाचाण्या इतकाच अभूतपर्व आनंद देऊन गेला हे वाचून मला देखील मजा वाटली. तुम्ही डॉक्टर म्हणून देखील खरतर अनेक आयुष्य वाचली आहेत असं मला वाटतं. ☺️

Rajesh Pusalkar said...

ब्लॉग वाचून त्यावर कॉमेंट केल्याबद्दल मनापासून आभार!

Mugdha said...

खूपच समृध्द प्रवास आहे तुझा! वाचन ही तुझी one of the hobbies आहे! बाकीच्या पण तितक्याच बारकाईने करतोस! तुझ्या busy profession मधून एवढा वेळ कसा मिळतो? आणि नुसतं वाचून न थांबता, त्या लेखकांना त्या बद्दल लिहिणं आणि आमच्या सारख्या लोकांना वाचनाची प्रेरणा मिळावी असं लिहिणं हे कौतुक आहे!
लिहिणं as usual सहज सुंदर शैलितले!

Prashant khunte said...

रारंगढांग ही रणांगण (विश्राम बेडेकर) सारखीच मराठी भवतालाबाहेरची कादंबरी माझ्याही वाचनाच्या प्रवासात ठळक रूतलेली...अंबरिश मिश्र, सुनीता देशपांडे, गौरी देशपांडे, इरावती कर्वे, भैरप्पा यांनी मलाही खूप दिलं... उमा कुलकर्णी यांनी यु. आर. अनंतमूर्ती ची पुस्तकं ही अनुवाद केलीत,तीही खूपच समृद्ध करणारी आहेत. बोकील माझेही प्रिय लेखक. शाळा वाचताना सतत प्रकाश नारायण संत यांच्या लंपनचं भावविश्व पौगंडावस्थेत पुन्हा भेटीला आलंय असं मला वाटत होतं, तसं मी बोकिलांना एकदा सांगितलंही‌ ते हसले फक्त. नंतर त्यांच्या एका लेखातून समजलं - संत व बोकीलांची छान मैत्री होती. मग वाटलं लेखक आपल्या दिवंगत मित्राला याहून सुंदर काय भेट देवू शकतो... पुस्तकांच्या भोवतीभोवती मनाला आलेल्या या जाणीवाही वाचक म्हणून आपल्याला वर उचलतात असं वाटतं. मौनराग मधील एका लेखाचा एकपात्री प्रयोग सचिन खेडेकरांनी सुदर्शन मध्ये केलेला - अप्रतिम! असं बरच बरच आठवतंय आता ... पुस्तकांच्या अनुषंगाने.. खूप धन्यवाद पुस्तकांच्या आठवणीत रमवल्याबद्दल नि एक छान सैर घडवल्या बद्दल...