Wednesday 31 October 2018

'चि. सौ. कां रंगभूमी: एक अविस्मरणीय नाट्यानुभव !



(माझे मामा श्री यशवंत देवस्थळी हे लार्सन अँड ट्युबरो या नामांकित कंपनीचे माजी प्रमुख वित्तीय अधिकारी तसेच कॉर्पोरेट जगतातले एक सन्माननीय नाव ! त्यांना गाण्याची अतिशय आवड आणि कला क्षेत्रांत विशेष रस!  २०१५ साली ते सचिन कुंडलकर दिग्दर्शित 'राजवाडे अँड सन्स' या एका  मोठी स्टार कास्ट असलेल्या चित्रपटाचे निर्माते होते. आणि आता १९ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबईत झालेल्या ''चि. सौ. कां रंगभूमी' या नाटकाद्वारे त्यांनी नाट्यक्षेत्रात पदार्पण केलं आहे. पुण्यात या नाटकाचा १० ऑक्टोबर ला प्रयोग झाला. त्याचाच हा अनुभव!).... 

दिनांक १० ऑक्टोबर रोजी मराठी रंगभूमी आणि रसिकराज यांच्या 'चि. सौ. कां रंगभूमी' या नाटयरूपी 'लग्नाला' हजर राहण्याचा योग आला. लेखिका- दिग्दर्शिका संपदा जोगळेकर कुळकर्णी यांची शालीन, मार्दव असलेली शब्द 'संपदा', तिला लाभलेली श्री. अनंत पणशीकरांची नाट्य 'संपदा' आणि चोखंदळ श्री. यशवंत देवस्थळी यांची अर्थ 'संपदा' असा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला! मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचा धावता आढावा घेणारं हे नाटक उत्कृष्ट निर्मिती मूल्य असलेलं आहे. ही परंपरा सादर करण्यासाठी रंगभूमी आणि रसिकराज यांच्या लग्नाच्या गोष्टीची सुंदर गुंफण लेखिका-दिग्दर्शिका संपदा जोगळेकर कुळकर्णी यांनी केली आहे . अनुभवी आणि कसलेले राहुल मेहेंदळे आणि स्वतः संपदा जोगळेकर कुळकर्णी सोडल्यास यात तसे नवोदित कलाकार आहेत. पण प्रत्येकानेच आपआपला ठसा सुंदररीत्या उमटवला. 
विशेष उल्लेख करावासा वाटतो सर्व गायक कलाकारांचा ! नचिकेत लेले, अवधूत गांधी, शमिका भिडे आणि केतकी चैतन्य या सगळ्यांनीच गाणी छान म्हटली. बालगंधर्व रंगमंदिरात 'प्रत्यक्ष' बालगंधर्व अवतरले आणि त्यांनी अप्रतिम नाट्यगीते गायली हे फार भारी वाटलं. 

अवधूत गांधी यांच्या आवाजाची फेक जबरदस्त आहे. जरी माईक नसता तरीही त्यांचा आवाज शेवटच्या रांगेत सहज पोचला असता! त्यांचा मुद्राभिनय ही मस्त! या गायकांचं वैशिष्ट्य म्हणजे गाणी सादर करतानाचा अभिनय आणि त्याच वेळी गाण्यांतून व्यक्त होणारे भाव या दोन्ही बाबतीत ते सरस ठरले. याची दोन उदाहरणे देता येतील. संगीत स्वरसम्राज्ञी मधील 'कशी केलीस माझी दैना' हे गाणं सादर करतानाचा शमिका भिडे यांचा अभिनय आणि त्या गाण्यातून व्यक्त होणारी expressions छानच होती. तसंच संगीत शारदा मधलं 'मूर्तिमंत भीती उभी' हे गाणं आर्ततेने सादर करणाऱ्या केतकी चैतन्य यांनी नंतर लगेचच 'म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान' हे एकदम वेगळ्याच मूडचं गाणं सादर केलं. केतकी चैतन्य यांनी ज्योत्स्ना भोळे यांचं 'बोला अमृत बोला' हे गाणं सुंदर म्हटलं . खरं तर ते गाणं खूप अवघड आहे. त्यात खूप हरकती, मुरकी, ताना आहेत. पण ज्योत्स्ना भोळे यांची आठवण येईल एवढ्या सहजतेने त्यांनी ती म्हटली. सुहास चितळे (तबला) आणि केदार भागवत (ऑर्गन) यांची साथसंगतही गाण्यांमध्ये रंग भरणारी होती. 
अमोल कुलकर्णी यांचा तळीरामाचा प्रवेश, तसेच मोरूची मावशीही उत्तम! शर्वरी कुळकर्णी यांची ही पदार्पणाची भूमिका आहे असं अजिबात वाटत नाही इतका त्यांचा अभिनय सहज आणि आत्मविश्वासपूर्वक होता . तसंच अनिरुद्ध देवधर यांचा लोकनाट्याला साजेसा अभिनय होता. 

या नाटकाचा मला आणखी आवडलेला एक भाग म्हणजे ज्या नाटकांमधली गाणी अथवा प्रवेश सादर करण्यात आले आहेत त्या सर्व नाटककार आणि दिग्दर्शक, गीतकार संगीतकार यांना श्रेय देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या कोणाला ती नावं माहीत नसतील त्यांना ती समजू शकतात. नाटकासारख्या माध्यमात इतर कुठल्याही डिजिटल दृश्य माध्यमाचा उपयोग करू नये असं मला वाटतं.(उदा. चित्रफीत, LCD प्रोजेक्टर वगैरे) या नाटकातदेखील या माध्यमाचा वापर टाळून ही श्रेयनामावली आपल्यासमोर अनोख्या पद्धतीने सादर होते. या श्रेयनामावलीमुळे हे नाटक फक्त स्मरणरंजन न राहता रंगभूमीचा इतिहास आपल्यापर्यंत पोचवतं. म्हणूनच आजच्या तरुण पिढीने हे नाटक आवर्जून बघावं असं वाटतं. 
सध्याच्या एकूणच मराठी रंगभूमीची स्थिती कशी आहे याचा माझा अभ्यास नाही. पण मला वाटतं मुंबई-पुण्याबाहेरचं चित्र फारसं आशादायक नसावं. आणि पुण्या-मुंबईतही सगळं काही आलबेल असावं असं वाटत नाही. त्याला कारणं वेगवेगळी असतील. अर्थात ही काही आजचीच परिस्थिती आहे असंही नाही. 'चि. सौ. कां. रंगभूमी' या नाटकातदेखील रंगभूमी आणि रसिक यांच्यातील बेबनावावर सविस्तर भाष्य आहे. ग्रामोफोन, रेडिओ, चित्रपट यासारखी अनेक प्रलोभनं( किंवा पर्याय म्हणू या) उपलब्ध झाल्यामुळे प्रेक्षकांचा ओढा रंगभूमीकडे कमी होऊ लागला असं नाटकात सूचित करण्यात आलंय .त्यात आता भरीला टीव्ही मालिका, क्रिकेटच्या सामान्यांचं टीव्हीवर प्रक्षेपण हेही आहेच! खरं तर नाटक हे एक अतिशय सशक्त माध्यम आहे. रंगभूमीच्या मर्यादित अवकाशात देखील अनेक शक्यता दडलेल्या असतात आणि लेखक त्या अवकाशाचा उपयोग वैविध्यपूर्णरीत्या करू शकतो. कालानुरूप मराठी रंगभूमीने देखील बाह्य स्वरूपापासून ते कथा-संकल्पनेपर्यंत बदल करून अक्षरश: कात टाकलेली आहे. मराठी रंगभूमीची गौरवशाली वाटचाल पुढेही चालू राहण्यासाठी लोकाश्रयाची गरज कधी नव्हे इतकी आता आहे आणि 'चि. सौ. कां. रंगभूमी' या नाटकातून मिळालेला हा संदेश मला खूप महत्त्वपूर्ण वाटतो .

1 comment:

Viv said...

Nice write-up!