Thursday, 8 November 2018

ऋण गाईन आवडी !(पु. ल. देशपांडे जन्मशताब्दीच्या निमित्ताने )


पु ल देशपांडे (जन्म -०८. ११. १९१९)
आजपासून  पु. ल. देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतंय. त्यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. पु. ल. लेखक होते, नाटककार होते, अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार, गायकही होते. कथाकथन करणारे,  अग्रगण्य स्टॅन्ड अप कॉमेडियन होते. पु. ल. परफॉर्मर होते. ते बहुरूपी, बहुआयामी होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा या सगळ्याहून  अधिक मोठा पैलू म्हणजे त्यांचं दातृत्व ! पु. ल. महाराष्ट्राचे लाडके दैवत होते. तेव्हा या सर्व पैलूंवर या कार्यक्रमांच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रकाशझोत पडेल. आपण एखाद्या व्यक्तीला दैवताचा दर्जा दिला की तिची फारशी चिकित्सा करत नाही. सुनीताबाई देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी' हे आत्मचरित्र येईपर्यंत पु. लंच्या बाबतीतही हेच झालं. त्यानंतर मात्र पु. लंच्या  साहित्याबद्दल  वेगवेगळे मतप्रवाहही चर्चेत येऊ लागले. २००० साली त्यांचं निधन झालं. त्यांनतर त्यांचं साहित्य कालातीत आहे का, त्यांनी फक्त मराठी मध्यमवर्गाबद्दलच लिहिलं, त्यांच्या विनोदाची जातकुळी वगैरे बद्दल टीकात्म बोललं  जाऊ लागलं. सचिन कुंडलकर यांच्या एका सिनेमात तर पु. ल. देशपांडे आवडण्याबद्दल एक टिंगलीचा सूरही होता.  अशी चिकित्सा जरूर व्हावी. कारण चिकित्सा करण्याएवढे रेलेव्हंट ते आजही वाटतात असा त्याचा अर्थ मी घेतो. आमच्या सारख्या आज ४०-५० वर्ष वय असणाऱ्या लोकांची अख्खी पिढी पु. लं नी समृद्ध केली. आम्हांला हसवलं. आमच्या आणि आमच्या आधीच्या काळातील जगण्यातल्या विसंगती दाखवल्या. हसता हसता अंतर्मुखही  केलं. त्यांच्या विविध क्षेत्रातील मुशाफिरीचे अनुभव आमच्यासमोर मांडले. तेव्हा आजचा दिवस त्यांचं हे ऋण मानण्याचा ! स्मरण रंजनाचा! चिकित्सा वगैरे नंतर होतच राहील !

पु. लं बद्दल इतकं लिहिलं गेलं आहे की त्यात मी आणखी नवी भर काय  घालणार? 
पु. लं चं दातृत्व खूप वाखाणण्याजोगं आहे. अवघ्या महाराष्ट्राने त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्या प्रेमाची परतफेड पु. लं नी अशाप्रकारे केली. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र  बाबा आमटे यांचं आनंदवन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यासारख्या सामाजिक संस्थांना त्यांनी दिलेलं दान आजही त्यांच्या कार्याला बळ देत आहे. 
एवढं दैवत बनलेली व्यक्ती सहसा  राजकीय भूमिका घेत नाही. कोणती ही एक भूमिका घेतली तर त्याविरोधी विचारसरणी असलेले वाचक/श्रोते दुखावतील/दुरावतील असे हिशेब त्यामागे असतात. पण पु. लं नी असं केलं नाही. आणीबाणी विरोधी आंदोलनात ते बिनीचे शिलेदार होते. विचार स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात दुर्गा भागवत यांच्या बरोबरीने त्यांनी आंदोलन केलं. 

मला वाटतं की पु. ल. एक रसिक गुणग्राहक होते. पारखी होते. आता हेच बघा ना... पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. वसंतराव देशपांडे हे कोणी मोठे गायक होण्याआधीपासून पु. लं नी त्यांचे गुण हेरले होते. त्यांच्या घरी या सर्व गायकांचं येणं-जाणं होतं. त्यांच्या घरी या सगळ्यांच्या मैफिलीचे किस्सेही आपल्याला माहीत आहेत. त्यांच्या गायनातून मिळणारा स्वर्गीय आनंद पु. लं. नी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवला आणि मग rest, as they say is History! या सर्व गायकांबरोबरची त्यांची मैत्रीही विलोभनीय होती. पु. लं मध्ये एक सहजता होती. या गायक कलाकारांना अशा मैफिलींमध्ये हार्मोनियमची साथ ते सहज करत. आपण स्वतः लेखक, कलाकार असल्याचा कुठलाही बडेजाव त्यात नसे. किंवा फक्त हार्मोनियम वादनाची दुय्यम भूमिका घेण्यात त्यांना कमीपणाही वाटत नसे. 
हीच गुणग्राहकता मला आणखी एका बाबतीत दिसते. पु. लं नी रवींद्रनाथ टागोर यांचं साहित्य शांतीनिकेतन मध्ये राहून, अभ्यास करून मराठी लोकांपुढे मांडलं. बंगाली साहित्य-संस्कृतीचं एक वेगळंच विश्व त्यामुळे आपल्यापुढे खुलं झालं. एका आनंदयात्रीने दुसऱ्या आनंदयात्रीला केलेला तो सलामच म्हटला पाहिजे !  
१९७८ साली मराठी साहित्यविश्वात 'बलुतं' या दया पवारांच्या आत्मचरित्राने खळबळ निर्माण झाली. पण साहित्यातल्या या नवा प्रकाराला, दलितांच्या अभिव्यक्तीला पु. लं नी मात्र पाठबळ दिलं. तीच गोष्ट आनंद यादव यांच्या 'झोंबी' ची आणि एका वेगळ्या शैलीतल्या 'कोसला' ची ! पु. लं च्या एन्डॉर्समेंट मुळे या साहित्यकृतींकडे लक्ष वेधलं गेलं. 

मला पु. लं ना प्रत्यक्ष परफॉर्म करताना बघण्याचं भाग्य लाभलं नाही. बटाटयाची चाळ, वाऱ्यावरची वरात  किंवा त्यांचं कथाकथन हे सर्व मी दूरदर्शनवर पाहिलं आहे. त्यांचा 'देवबाप्पा'हा चित्रपट आमच्या लहानपणी पुण्यातल्या अलका टॉकीज ला लागला होता. १९५२-५३ च्या चित्रपटाला ७० च्या दशकातही भरपूर मोठी रांग होती. इतकी की आम्हांला त्याची तिकिटं मिळालीच नव्हती! १९९३ साली आलेला 'एक होता विदूषक' हा पु लं चा पटकथा आणि संवाद असलेला चित्रपट पाहिला होता. लक्ष्मीकांत बेर्डेची कदाचित एकमेव गंभीर भूमिका असलेला चित्रपट ! त्यांची सुप्रसिद्ध नाटकंही बघता आली नाहीत. मात्र त्यांनी रूपांतर केलेलं रशियन नाटक(द लास्ट अपॉइंटमेंट ) 'एक झुंज वाऱ्याशी' हे बघितलं होतं. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, सयाजी शिंदे, गौरी केंद्रे असे कलाकार होते. एका सर्वसामान्य माणसाचा अन्यायाविरोधातला राजकीय व्यवस्थेविरोधातला संघर्ष असं नाटकाचं कथानक होतं. तत्त्वनिष्ठ सर्वसामान्य माणूस आणि स्खलनशील राजकारणी या दोन वृत्तींमधला संघर्ष छान मांडण्यात आला होता. 

पु. लं ना काही कार्यक्रमांत प्रत्यक्ष बघण्याचा योग मात्र जुळून आला . चतुरंग प्रतिष्ठान तर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी रुपारेल कॉलेजच्या भव्य प्रांगणात कार्यक्रम झाला होता. पुरस्कार प्रदान करण्याआधी पं. बिरजू महाराज यांचे कथक नृत्य आणि त्याला झाकीर हुसेन यांची तबला साथ असा कार्यक्रम होता. त्यावेळी पु. ल. दोघांनाही अगदी भरभरून दाद देत होते. प्रसंगी अगदी स्वतः उभे राहून !हे चित्र माझ्या डोळ्यासमोर जसंच्या तसं आहे. 
बऱ्याच वर्षांपूर्वी एका पुस्तक प्रदर्शनात अचानक पु. ल. आणि सुनीताबाई देशपांडे भेटले होते. खरं तर माझ्याकडे ऑटोग्राफ बुक वर दोघांचीही सही होती.
तरीही असं वाटलं की त्यांच्या एखाद्या पुस्तकावर त्यांची सही घ्यावी. म्हणून मी 'अपूर्वाई' पुस्तक घेऊन त्यांच्याकडे गेलो. तर आश्चर्य म्हणजे त्यांनी सही द्यायला थोडीशी नाख़ुशी व्यक्त केली. म्हणाले -" माझा हात आता कापतो. त्यामुळे अक्षर नीट येणार नाही." तरीही मी त्यांना पुन्हा विनंती केली. आणि थरथरत्या हाताने त्यांनी सही केली जी खरंच त्यांच्या नेहमीच्या सहीपेक्षा खूपच वेगळी दिसत होती. मला खूपच वाईट वाटलं. आपण उगीच त्यांना सहीचा आग्रह केला असं वाटून गेलं. पण कसं कोण जाणे नंतर हे पुस्तक माझ्याकडे राहिलंच नाही. कोणीतरी ते नेलं आणि परत आणून दिलंच नाही!
माझ्या मनात कायमचा कोरला गेलेला एक प्रसंग आहे. तो म्हणजे सुनीताबाई देशपांडे यांना कोठावळे पुरस्काराच्या समारोहाचा ! 'आहे मनोहर तरी' या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात मे  महिन्यात देण्यात आला होता. नारायण पेठेतल्या मॅजेस्टिक दुकानाच्या गच्चीवर हा कार्यक्रम झाला होता. कार्यक्रमाला वसंत कानेटकरांचं सुंदर अध्यक्षीय भाषण झालं होतं. आणि विशेष म्हणजे संपूर्ण भरलेल्या त्या गच्चीत पु. ल. प्रेक्षकांमध्ये खाली बसून होते. सगळ्यांनी त्यांना कितीतरी वेळा आग्रह केला. पण ते म्हणत राहिले- आजचा दिवस सुनीताचा ! कायम प्रकाशझोत मिळाला तरीही त्याची हाव कमी न होणाऱ्या काही कलाकारांच्या तुलनेत पु. लं चं हे वागणं अगदी उठून दिसलं !