(आज तिथीप्रमाणे आमच्या बाबांना जाऊन २ वर्षे झाली.(हरतालिका २०१८) तारखेनुसार १२.९.२०१८..
परवा सहज खण आवरत असताना बाबांच्या पंचाहत्तरीनिमित्त मी लिहिलेलं टिपण सापडलं. आजचा ब्लॉग म्हणजे हेच टिपण ! आज परत सगळं वाचताना बऱ्याच आठवणी मनात गोळा झाल्या. पण एक समाधानही वाटलं. आपल्या मनातल्या भावना बाबांपर्यंत पोचवता आल्या याचं ! अर्थात सगळंच काही फक्त शब्दांत ( आणि शब्दानेच) व्यक्त करता येत नाही हेही तितकंच खरं !)
१४.०२. २००९
कुठल्याही व्यक्तीच्या स्वभावाचं नेमक्या शब्दांत वर्णन करणं हे सोपं काम नाही. त्यातही आपल्या वडिलांबद्दल बोलायचं तर अजूनच अवघड ! कारण आपल्याला त्यांचा खूप वर्षांचा सहवास असतो, असंख्य घटना घडून गेलेल्या असतात. त्यामध्ये कळत-नकळत,प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे आपलाही सहभाग असतो. म्हणून वस्तुनिष्ठपणे बघणं थोडं अवघडच जातं. तरीही आज आमच्या बाबांच्याविषयी काही ठळक गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात-
आमच्या बाबांच्या दिवसभरात करायच्या प्रत्येक गोष्टींमध्ये, कृतींमध्ये एक प्रकारचा क्रम आहे, ठराविकता आहे, सातत्य आहे , नियमितता आहे. अमुक एक गोष्ट झाली की त्यानंतर पुढची करायची गोष्ट ठरलेली! एक प्रकारच्या rhythm आणि पॅटर्नप्रमाणे ते सगळ्या गोष्टी करतात. अगदी सकाळी दात घासताना होणाऱ्या आवाजापासून ते एकामागोमाग करत जाणाऱ्या प्रत्येक कामांमधून हे दिसून येतं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत नीटनेटकेपणा, स्वच्छता आणि टापटीप आहे. घरी घालायच्या कपड्यांनासुद्धा ते स्वतः इस्त्री करतात आणि मगच घालतात. आणि या सर्व गोष्टी करायचा त्यांना आळस अजिबात नाही. अतिशय meticulously ते या गोष्टी करत असतात. "Everything in its proper place" हे त्यांचं आवडतं वाक्य आहे. आणि ते तसं व्हावं यासाठी ते स्वतः खूप झटतात. पण इतरांनीही त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे वागावं असा मात्र त्यांचा आग्रह नसतो. त्यांचं अक्षरही इतकं छान ठसठशीत आणि स्पष्ट आहे की अगदी बघत राहावं! संपूर्ण कागदावर कुठंही खाडाखोड नाही. कुठलंही काम करण्याची त्यांची एक पद्धत आहे, त्यांनी त्यासाठी एक व्यवस्था तयार केली आहे. (आमच्याकडे अगदी वर्तमानपत्राच्या बिलांसाठी फाईल केलेली आहे आणि अजूनही वर्षानुवर्षांची बिलं त्यात सहज सापडतील !)
या सगळ्यातून एक शिस्तबद्ध आयुष्य त्यांनी घडवलं आहे. अशा कामांचा त्यांना कधी कंटाळा आलेला मी तरी पाहिलेला नाही. या disciplined आयुष्याचा त्यांना डायबेटिसशी लढा देताना खूप उपयोग झाला आहे असं मला वाटतं. १९६० च्या दशकात त्यांच्या या आजाराचं निदान झालं. त्यावेळी त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं-"Consider Diabetes as your friend!It is going to stay with you for a lifetime!" त्यानंतर आमचे बाबा डायबेटिसशी कधी झगडले नाहीत, त्याला कधी deny केलं नाही, इतर कुठल्या पावडरी-चूर्ण-अर्क यांच्या आहारी कधी ते गेले नाहीत. तेव्हापासून निमूटपणे, विनातक्रार न चुकता दररोज दोनदा इन्शुलिन घेत आहेत. आणि इन्शुलिनच्या वेळा काटेकोरपणे सांभाळत प्रमाणबद्ध आहार घेत आहेत. यालाही आता ४०-४५ वर्षं होऊन गेली ! या शिस्तीमुळेच डायबेटिसला त्यांनी बऱ्यापैकी आटोक्यात ठेवलं आहे. मधूनमधून त्याने डोकं वर काढलेलं आहे पण त्यावरही बाबांनी यशस्वी मात केली आहे.
आमच्या बाबांना त्यांच्या लहानपणापासूनच खूपच स्ट्रगल करावा लागला आहे. त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षीच त्यांची आई गेली. त्यानंतर ते आणि इतर भावंडे देखील त्यांच्या आत्यांकडे राहून शिकली. बाबांना तिथे शारीरिक कष्टाची बरीच कामं करावी लागली. तिथंही परिवार मोठा त्यामुळे खाण्यापिण्याची तशी आबाळच झाली ! या सर्व परिस्थितीचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर कायमचा परिणाम झाला आहे. ते तसे अबोल आणि संकोची स्वभावाचे आहेत. त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी देखील त्यांना सन्मानाची/बरोबरीची वागणूक मिळाली नाही तरीही ते तिथे निष्ठेने काम करत राहिले. त्यांच्या या खासगी नोकरीतून निवृत्त झाल्यावर आता कुठे ते थोडेसे निवांत झाले आहेत.
आजच्यासारखे 'सुजाण पालकत्व' किंवा 'Parenting' हे शब्दही ज्यावेळी फारसे प्रचलित नव्हते त्या काळापासून आम्ही त्याप्रकारच्या Parenting मुळे समृद्ध झालो. नोकरीच्या किंवा इतर कुठलाही ताणाचा बाबांनी आमच्यासमोर कधीही उल्लेख केला नाही किंवा कधीही चिडचिड केली नाही. आम्हांला कधीही (आई-बाबा दोघांनीही) मारलं नाही. माझे कमी मार्क पाहून कधी माझी शाळा घेतली नाही! आम्हांला जे शिक्षण घेण्याची आवड होती ते त्यांनी आम्हांला घेऊ दिलं. करिअर बद्दलच्या त्यांच्या इच्छा-अपेक्षा आमच्यावर लादल्या नाहीत. शिक्षणाव्यतिरिक्त इतर छंद जोपासण्यासाठीही प्रोत्साहन दिलं.
याच अनुषंगाने असं सांगता येईल की आई-बाबांना मी कधीही तार स्वरात एकमेकांशी बोलताना ऐकलेलं नाही. मतभेद असले तरी ते आमच्यादेखत कधी त्यांनी व्यक्त केले नाहीत. तसंच त्यांनी त्यांची मतं (राजकीय/सामाजिक इ ) आमच्यावर कधीच लादली नाहीत. म्हणूनच बाबा जरी सश्रद्ध असले तरी मी माझी नास्तिकता जपू शकलो. माझ्या या मतांबद्दल त्यांनी कधी नाराजी व्यक्त केली नाही किंवा मला माझी मतं जबरदस्तीने, वादविवादाने बदलायला लावली नाहीत. घरातल्या या स्वातंत्र्याचा, मोकळ्या वातावरणाचा आम्हांला खूपच फायदा झाला. आमची मतं स्वतंत्रपणे बनवण्याची सवय यातून आम्हांला लागली.
या आणि अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. खरं तर आपल्या आई-वडिलांबद्दलच्या या गोष्टी इतक्या औपचारिकपणे लिहाव्या का? काही गोष्टी न बोलता/न लिहिता समजून घेण्याच्या/फील करण्याच्या असतात असं मलाही वाटत होतं. पण बाबांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचं निमित्त साधून एका बैठकीत जे मनात आलं ते लिहून काढलं इतकंच !