पुण्यात क्रीडा संस्कृती चांगली रुळली आहे. क्रिकेट सोडून बाकीच्या खेळांसाठी देखील सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. पुण्याची हवा अजून तरी तशी बरी असल्यामुळे सर्वसाधारण पुणेकर सकाळच्या वेळी व्यायामासाठी टेकड्या, बागा, जिम गाठतो. उत्साही लोक मॅरेथॉन सारख्या क्रीडाप्रकारात सहभागी होतात. पुण्यापासून सिंहगड जवळच असल्यामुळे तिथे नियमितपणे जाणारे हजारो लोक आहेत. पुण्यात २०१० साली कॉमनवेल्थ युथ गेम्स भरवण्यात आल्या. त्या नंतर वेगळ्याच कारणाने गाजल्या. परंतु पुण्यात या आणि आधीदेखील स्पर्धा झाल्यामुळे खेळांसाठीचे इन्फ्रास्टक्चर चांगलं उभं राहिलं आहे. आता यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे किती खेळाडू निर्माण झाले हा एक वेगळा विषय आहे. पण पुणेकरांना खेळात रुची आहे एवढं नक्की! म्हणूनच जागोजागी खेळांविषयक भित्तीचित्रं. बोर्ड्स, पुतळे दिसून येतात. उदाहरणार्थ हे नेहरू स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ आहे-
यातला संदेश विचार करायला लावणारा आहे हे नक्की!
वरील भित्तीचित्रं अप्सरा टॉकीज ते मार्केटयार्ड या नव्याने बांधलेल्या फ्लायओव्हर खाली बघायला मिळतात.
तर हे आणि असेच लक्षवेधक बोर्ड राजाराम पुलावर पाहायला मिळतात. सॅलिसबरी पार्क येथील गुल पूनावाला उद्यानाबाहेर तर सूर्यनमस्काराच्या वेगवेगळ्या आसनांचे पुतळे नुकतेच बसवण्यात आले आहेत. तसंच त्या पुतळ्यांखाली त्या त्या आसनाची माहितीही देण्यात आली आहे-
आपण सायकलिंग करत असताना एक रस्ता पकडतो पण ऐनवेळी आपल्याला दुसराच कुठलातरी रस्ता खुणावतो आणि आपण आपली ठरवलेली वाट सोडून देतो. मात्र हा नवीन रस्ताही तेवढाच इंटरेस्टिंग आणि थ्रिलिंग असतो. असंच काहीसं माझं या सध्याच्या ब्लॉग्स विषयी झालं आहे. आत्तापर्यंत जे काही फोटो पोस्ट करून झाले आहेत त्यापेक्षा आता काहीतरी वेगळं सुचतंय. आणि जे सुचतंय ते सगळं फोटोंमधून व्यक्त होईल का नाही याबद्दल मला थोडीशी शंका आहे. त्यामुळे यापुढे कदाचित थोडे कमी फोटो आणि जास्त लिखाण असं होईल असं दिसतंय !
कारण मला पुण्यातील फक्त सुशोभित चौक किंवा जागोजागीचे म्युरल यांचे फोटो दाखवून थांबायचं नाही.
आपण असं म्हणू शकतो की यापुढे मला सायकलिंग करताना पुण्याबद्दल आलेले विचार शब्दबद्ध करायचा प्रयत्न करणार आहे.
ही आमच्या पुण्याची सुप्रसिद्ध मुठा नदी ! हा फोटो मी भिडे पुलावरून काढला आहे. कोणाला हे डबकं वाटेल म्हणून मी म्हात्रे पुलावरून आणखी एक फोटो काढला आहे ज्यात नदीचं खळाळतं(!) पाणी दिसतंय-
खरं तर कुठलीही नदी ही निसर्गाचा एक महत्त्वपूर्ण घटक असते जिच्यात एक स्वतंत्र परिसंस्था सामावलेली असते आणि तिचा प्रवाहही नैसर्गिक असतो. पण अलीकडच्या अनेक नद्यांप्रमाणे आमच्या या नदीला स्वतंत्र अस्तित्व नाही. तिच्यात पाणी कधी आणि किती 'सोडायचं' हे वरून ठरतं. वरून म्हणजे खडकवासला आणि पानशेत धरणांच्या पाण्याच्या साठ्यावरून ! म्हणजे पर्यायाने तिचं नियंत्रण वा तिची सूत्रं पाटबंधारे विभागाकडे असतात. पुण्यात नदी अशीच असायची हे आता पुणेकरांनी नाईलाजाने का असेना पण स्वीकारलं आहे. पुणेकरांसाठी या नदीचे महत्त्वाचे फायदे पुढीलप्रमाणे -
१) सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचं अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन ( तेही पाटबंधारे खात्याने पाणी सोडल्यावर !)
२) जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा - राजापूरची गंगा हा एक निसर्गाचा चमत्कार समजला जातो आणि म्हणून ती जेव्हा अवतरते तेव्हा तिचं लोकांना काय ते अप्रूप असतं ! आम्हां पुणेकरांसाठी तितकाच कौतुकाचा भाग म्हणजे वर्षातले ३-४ दिवस जेव्हा आमच्या या नदीला पूर येतो ! सगळ्यात आधी भिडे पूल पाण्याखाली जातो आणि या पुराच्या अलौकिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आणि हे विहंगम दृश्य कॅमेराबंद करण्यासाठी उत्साही पुणेकर लकडी पुलावर गर्दी करतात !
३) वरील दोन्ही फायदे हे सीझनल झाले. पण बारमाही फायदा एकच - नदीत निर्माल्य टाकणे ! पुणेकर बहुदा क्राईम पॅट्रोल कार्यक्रम जास्त बघत नसावेत. नाहीतर हेच बघाना -
-हे असे पुरावे मागे ठेवले असते का पुणेकरांनी? की आपण असं म्हणू या - पुणेकर किती पर्यावरणप्रेमी आहेत ! निर्माल्य (bio degradable!) नदीत टाकतात पण चुकूनसुद्धा प्लास्टिक नदीत टाकत नाहीत !
आमच्या या नदीमुळेच पुण्याचं एक unsaid विभाजन झालं आहे- नदीच्या अलीकडंच आणि नदीच्या पलीकडचं पुणे ! या दोन पुण्यांना जोडणारे अनेक पूल आहेत- लकडी, म्हात्रे, संगम, गाडगीळ, भिडे, झेड ब्रिज इ. पण आम्हां नदीच्या अलीकडे राहणाऱ्यांना उगीचच वाटतं की पलीकडच्यांना नदी ओलांडून इथे यायला फारसं आवडत नाही. अर्थात याला अपवाद आहेत- सणासुदीच्या काळात, विशेषतः गौरी-गणपती, नवरात्र-दसरा आणि दिवाळीत मात्र सगळं पुणं, ज्याला आम्ही गावात म्हणतो, तिथे खरेदीसाठी लोटतं. आणि हे नदीच्या पलीकडचं पुणं म्हणजे तरी काय- बहुतांश शनिवार, बुधवार, नारायण, सदाशिव, नवी या पेठांमधल्या लोकांनी स्थानिक स्थलांतर करून कोथरूड नावाचं उपनगर वसवलं ते! पूर्वी नदीकाठालगत मनुष्य वस्ती होते आणि त्यातूनच संस्कृती उगम पावते असं म्हटलं जायचं. पुण्यात औद्योगिकरणानंतर टाटा- बजाज आणि अम्युनिशन फॅक्टरीमुले एक श्रमिक संस्कृती निर्माण झाली. नंतर आय टी क्षेत्रातही पुण्याने आघाडी घेतल्यावर नदीच्या पलीकडे हिंजवडी आणि या बाजूला खराडी -मगरपट्टा सिटी हे भाग विकसित झाले आणि त्यांच्या आजूबाजूला पुणे विकसित होत गेले आणि शहराचा चौफेर विस्तार झाला. आता पुण्याच्या सीमा इतक्या दूरवर गेल्या आहेत की पुणे आणि मुंबई मिळून एक शहर होईल की काय असं वाटतंय ! पेठांमधून स्थानिक स्थलांतर केलेल्यांच्या पुढच्या पिढीने तर देशाच्या सीमा ओलांडल्या आणि बहुतांश उच्चभ्रू घरांमधली मुलं अमेरिका-कॅनडा, ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, इंग्लंड, मध्य-पूर्वेतील देश इत्यादी ठिकाणी greener pasture साठी गेली. आणि इथे मागे राहिले आधीच्या पिढीतले ! पुणे पुन्हा एकदा पेन्शनरांचे शहर ओळखले जाऊ लागले असं म्हणत असतानाच दुसरीकडे विदर्भ-मराठवाडा आणि परराज्यांतून मोठ्या संख्येने तरुण पिढी शिक्षण आणि नॊकरीच्या शोधार्थ इथे आली. पुणेकरांच्या हेकेखोर स्वभावाबद्दल खूपदा बोललं जातं. पण पुण्यात आलेल्या या सर्वांना पुणेकरांनी संपूर्णपणे सामावून घेतलं आहे. इतकं की हे सगळेच पुण्यात चांगलेच मिसळून गेले आहेत. त्यामुळे पुणे एक तरुण, उत्साही शहर बनले आहे. तसंच चांगल्या संधीसाठी जे पुण्याबाहेर गेले आहेत त्यांनादेखील पुणे मनातल्या कप्प्यातून आपल्याबरोबर त्या त्या ठिकाणी नेलं आहे. अशाप्रकारेदेखील पुण्याचा विस्तारच झाला आहे असं म्हणता येईल!
(क्रमश:)
No comments:
Post a Comment