१
सायकलिंगसाठी मी सकाळी तसा उशीरा जातो. म्हणजे जेव्हा पूर्णपणे उजाडलेले असते तेव्हा ! बरेच लोक अगदी पहाटेच्या वेळी सायकलिंगसाठी बाहेर पडतात. मला अजून तरी ते जमलेलं नाही. इथे दिवसाढवळ्यासुद्धा सायकल चालवताना जीव मुठीत घालून जावं लागतं तर पहाटेच्या अंधाराची काय कथा!
सकाळच्या वेळी पुण्याचं एक संमिश्र चित्र बघायला मिळतं. सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे एकीकडे धुक्याची चादर लपेटून बसलेलं(की झोपलेलं ?) पुणं दिसतं ते इथल्या बंद दुकानांमधून किंवा पुणेकरांच्या स्वेटर-शाल-कानटोपी-मफलर-स्कार्फ या कडेकोट बंदोबस्ताच्या पेहरावातून किंवा तुलनेनं सकाळच्या वेळच्या कमी असलेल्या गर्दीतून ! क्वचित कुठेतरी शेकोटी पेटलेली दिसते तर काही ठिकाणी भर रस्त्यावर आंघोळीचं पाणी पातेल्यात ठेवून ते लाकडावर गरम करायला ठेवलेलंही बघायला मिळतं. तर दुसरीकडे पेपरवाले, दूधवाले, हातगाड्यांवरून भाज्या विकणारे भाजीवाले, हातगाडीवर स्नॅक्स सेंटर चालवणारे आणि त्यांच्या अवतीभोवती गर्दी करून नाश्त्याचा आस्वाद घेणारे (बहुतांशी पुण्याबाहेरचे, पुण्यात शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी!) अशांची लगबग दिसते. यामुळे सकाळीसकाळी सुद्धा पुणे कामाला लागलेलं बघायला मिळतं.
या सगळ्यांबरोबर आणखी एक श्रमिक वर्ग बघायला मिळतो तो म्हणजे स्वच्छता कर्मचारी! वाढत्या शहराबरोबर सगळ्यात जास्त वाढ कशाची होत असेल तर ती कचऱ्याची !
विशेषतः सकाळी जागोजागी ही अशीच चित्रं दिसतात. तरी पुणे महापालिकेच्या स्वच्छ शहर अभियाना अंतर्गत या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खूप सारे कर्मचारी बऱ्यापैकी मनापासून काम करताना दिसतात. इतकं की पुण्याला देशातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत बक्षिसं सुद्धा मिळाली आहेत. पण कचऱ्याचा प्रश्नच इतका मोठा आहे की महापालिकेच्या प्रयत्नांना जोड म्हणून काही व्यक्ती/ सामाजिक संस्था देखील या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या आहेत आणि त्यांच्या गाड्यादेखील सकाळी कचरा वेचण्यासाठी फिरत असतात
पण कचऱ्याचा प्रश्न कधीतरी उग्र स्वरूप धारण करणार असं राहून राहून वाटतं.
२
सध्याच्या पुण्याचे कोणी ड्रोनद्वारे फोटो घेतले तर मोठ्या झाडांची हिरवळ कितपत दिसेल माहित नाही पण हे असं चित्र मात्र हमखास दिसेल-
प्रचंड वेगाने एका महानगराच्या दिशेने झेपावणाऱ्या शहराचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे स्कायलाईनवर दिसणाऱ्या या बांधकामांच्या खुणा! अहो शेवटी विकास विकास म्हणजे तरी काय हो! हा असाच असायचा ना! रेडिओवरील सुप्रसिद्ध समालोचक सुशील दोशी यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य होतं -"आसमान में बादल और नीचे कपिलदेव ! " तसंच काहीसं म्हणता येईल- आसमान में बिल्डिंग कन्स्ट्रक्शन और नीचे सब जगह खड्डे ! सध्या पुणे म्हणजे एक work in progress चं उत्तम उदाहरण झालं आहे-
गेली काही वर्षं पुणेकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे मेट्रो ! यामुळे पुण्याचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. मी मेट्रोच्या विरोधात आहे असं नाही पण मेट्रो आली म्हणजे सार्वजनिक आणि एकंदरीतच पुण्याचे वाहतुकीचे प्रश्न सुटणार आहेत असं चित्र उभं केलं जातं ते मला पटत नाही. पुण्यात मध्यंतरी बस वाहतूक सुधारण्यासाठी बीआरटीचा प्रयोग करण्यात आला पण तो सपशेल फसला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम असावी हे तत्वतः कोणीही मान्य करेल पण प्रॅक्टिकली ते अंमलात आणणं हे अतिशय अवघड आहे. पुणेकरांना स्वतः च्या वाहनांनी प्रवास करायची सवय आहे ती अचानक बदलून सार्वजनिक वाहतूक वापरणं याला वेळ तर नक्कीच लागणार आहे. मेट्रोच्या बाबतीत अर्थात हा प्रश्न आत्ता गैरलागू आहे कारण आत्ता कुठे ती येऊ घातली आहे. पण तिने त्याआधीच पुण्याच्या रस्त्यांचा, प्रसिद्ध लॅन्डमार्क्सचा ताबा घेतला आहे. आता हेच पहा ना -पुणे महापालिकेची इमारत मेट्रोच्या बांधकामामागे कशी झाकली जात आहे-
हा फोटो गरवारे महाविद्यालयाजवळचा आहे. महाविद्यालयाच्या इतक्या जवळून मेट्रो जाणार आहे की विद्यार्थ्यांचा एक पाय मेट्रोत आणि एक वर्गात असंही करता येऊ शकेल!
मेट्रोच्या कामासाठी पुण्यात ही राक्षसी मशिन्स बघणं हे नित्याचं झालं आहे-
सगळीकडची बांधकामं म्हणजेच काँक्रीटचं जंगल, त्यामुळे कमी झालेली झाडं, वाढतं वायू प्रदूषण या व अशा गोष्टींमुळे पुण्याची हवा निश्चितच बदलली आहे. २०२१ मध्येच पुण्यात तब्बल ११ महिने पावसाचे होते, यावरूनच काय ते समजावे !
३
मला वडाची झाडं खूप आवडतात. त्यांचा तो ऐसपैस घेर, जमिनीत खोलपर्यंत रुजलेली मुळं त्यामुळे मजबूत झालेला पाया, इतस्ततः पसरलेल्या पारंब्या आणि त्या पारंब्यांचं देखील जमिनीत पुन्हा रुजणं हे सगळंच आवडतं. या झाडाची ऊन वारा पाऊस झेलून ही खंबीरपणे उभं राहण्याची चिकाटी मला आवडते. पुण्यात अजून तरी बऱ्याच ठिकाणी वडाची झाडं दिसतात. देशी विदेशी झाडांच्या स्पर्धेत वडाचं झाड दिमाखात टिकून आहे .
आधीच्या ब्लॉग मध्ये मी फोटो काढले आहेत ती ठिकाणंही दिली होती. पण या झाडांचा पत्ता देऊ नये असंच मला वाटतं. न जाणो हा ब्लॉग वाचून एखाद्या कार्यसम्राट विकासकाची नजर त्या झाडांवर पडायची आणि त्या झाडांच्या जागेचा कधी एकदा विकास करतो असं व्हायचं!
ही झाडं मला स्थितप्रज्ञ, ध्यानस्थ ऋषींसारखी वाटतात. लहानपणी अशा अनेक वर्षे तपश्चर्या करणाऱ्या मुनींच्या गोष्टी वाचल्या आहेत. ही झाडं मला तशीच वाटतात आणि त्यांच्या पारंब्या म्हणजे या ऋषींचा केशसंभार वाटतो.
ही अनेक पावसाळे पाहिलेली झाडं म्हणजे पुण्यातील बदलांचे, इथल्या स्थित्यंतराचे खरे साक्षीदार! अलिकडच्या काळातील पुण्याचा संपूर्ण इतिहास यांच्या समोरच घडला असणार! कितीतरी रहस्यं या झाडांच्या उदरात दडलेली असतील याची काही गणतीच नाही. शिवाय ही झाडं म्हणजे एक स्वतंत्र परिसंस्था आहे. संख्येने जेवढी ही झाडं जास्त तेवढं शहराचा वैभव ही जास्त असं म्हणायला हरकत नाही!
पण तरीही विकासाच्या अपरिहार्य रेट्यामुळे या आणि अशा अनेक झाडांवर संक्रांत येते. बऱ्याचवेळा बेसुमार कत्तल तर काही वेळा नको इतकी काटछाट या झाडांच्या वाट्याला येते.
हे झाड पाहून मनात खूप कालवाकालव झाली. केवळ मोठ्या वाहनांच्या वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून हे झाड असं निर्घृणपणे तोडण्यात आलं असावं. पण इतका मोठा घाव झेलून देखील झाडांची जगण्याची आणि उमलून येण्याची असोशी पाहून खूप छान वाटलं! एक नवी आशा देणारं हे झाड मला प्रेरणादायी वाटतं.
(समाप्त)
तळटीप:
(सायकलिंगसाठी घराबाहेर पडताना एक रस्ता डोक्यात असतो पण ऐनवेळी दुसरीच वाट खुणावते आणि मग तो नवीन रस्ता धरला जातो. सायकलवरून दिसलेले पुणे या ब्लॉग सीरिज बाबतीत माझं असंच काहीसं झालं आहे. सुरुवातीचे दोन ब्लॉग लिहिल्यावर वाटलं की आपल्याला याहून वेगळं काहीतरी सांगायचं आहे. त्यासाठी पूरक फोटोही नव्हते. मग फोटोंइतकंच लिखाणही आलं. या सीरिज मधल्या तीन ब्लॉगना माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार! सध्या इथेच थांबतो आणि पुन्हा सायकलिंग करायला लागतो!)