Thursday, 28 September 2023

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सुलभाताई तेरणीकर !


सुलभाताई तेरणीकर

हिंदी सिनेमा आणि विशेषतः सिनेसंगीताची आवड असणाऱ्या मराठी वाचकांना सुलभाताई तेरणीकर हे नाव निश्चितच माहित असतं. विशेषतः पुण्यात या विषयावर झालेल्या कार्यक्रमांत त्यांचे रोचक भाषण झालेले असते, त्यांनी अशा कितीतरी  कार्यक्रमांसाठी संहिता लिहिलेली असते. अशा कार्यक्रमांचे वृत्तांत वर्तमानपत्रांत येत असतात. त्यातूनही आपल्याला त्यांचा परिचय झालेला असतो. 'दैनिक सकाळ' 'लोकमत' आणि 'महाराष्ट्र टाइम्स' मधली त्यांची सदरं वाचून आपल्याला त्यांच्या चौफेर वाचनाचं ,गाढ्या अभ्यासाचं ,सकारात्मक जीवनदृष्टीचं ,रसिकतेचं ,सौंदर्यपूर्ण, सुसंस्कृत लेखनशैलीचं आणि उच्च अभिरुचीचं दर्शन घडलेलं असतं. त्यामुळेच त्यांना प्रत्यक्ष न भेटता देखील आपल्याला त्या सुपरिचित असतात आणि आपले त्यांच्याशी एक आदराचे नाते नकळत तयार झालेले असते. आपण जर त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली असतील तर आपण आणखी स्तिमित होतो. मी सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचे त्यांच्या सांगीतिक वाटचालीवर आधारित 'शुक्रतारा' हे पुस्तक वाचले. 

ते इतक्या वैशिष्ट्यपूर्ण  ओघवत्या शैलीत आहे की जणू वाटावे अरुण दाते आपल्याशी अनौपचारिक गप्पाच मारत आहेत. खरं सांगतो - माझ्या खूप उशिरा लक्षात आलं की या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचं शब्दांकन सुलभाताई तेरणीकर यांचं आहे ! यानंतर पुस्तकाचा परत विचार केला असता मला वाटलं की सुलभाताईंसाठी स्वतःचं लेखक असणं विसरून अरुण दाते यांच्या व्यक्तिमत्त्वाचा  पारदर्शक चेहरा वाचकांसमोर ठेवणं हे किती अवघड काम असेल ! शिवाय अरुण दाते यांच्या इंदुरी बोली भाषेचा लहजा लेखनातूनही मांडणे हेही  तितके सोपे नाही. एखादा कसलेला कलाकार जसा कोणतीही भूमिका करताना परकाया प्रवेश करतो त्यासारखंच मला हे वाटलं. 

सुलभाताई तेरणीकरांना भेटावे, निदान त्यांच्याशी पत्राद्वारे संपर्क साधावा असे मला 'म टा' मधील त्यांचे रागदारीवरील सदर वाचून खूपदा वाटले होते. याचं कारण म्हणजे या सदरातून त्यांनी केवळ शास्त्रीय संगीतच नव्हे तर त्यावर आधारित हिंदी-मराठी गाण्यांचा सुंदर मागोवा घेतला होता. त्यातलंच एक उदाहरण दिल्याशिवाय मला राहवत नाही -

' चित्रपटसंगीतातला खमाज पैंजणपावलांनी येणारा, मुग्ध प्रणयानं भारलेला आहे. संगीतकार 

मदनमोहननी दोन सुंदर गाणी लतादीदींकडून गाऊन घेतली. 'पूजा के फूल'मधलं 'मेरी ऑँखोंसे कोई नींद लिये

जाता  है 'आणि 'रिश्ते नाते' मधलं 'खनक गयो हाय बैरी कंगना'. खमाजची प्रकृती चंचल आहे असं

जाणकार सांगतात. पण संगीतकार या चंचल रागाला प्रणयिनीच्या अधीर हृदयाशी सुरांनी बांधतो आणि

मग खमाज रागाची रूपमोहिनी या गाण्यातून मनात पसरते. 

मदनमोहननी राग खमाजचं एक सुंदर 'रूप इक हसीन शाम को दिल मेरा खो गया'ला बहाल केलं आहे.

एका सुंदर संध्याकाळी आपण हृदय हरवून बसलो हा भाव खमाज रागाच्या कोणत्या स्वररचनात

गुंफलेला हे सांगता येणार नाही, पण उदास, हुरहूर लावणाऱ्या संध्याकालाच्या प्रतिमेला त्यानं हलकेच दूर

सारलं आहे.'

या एका परिच्छेदातून लेखिकेच्या अफाट सौंदर्यदृष्टीचा अंदाज आपल्याला येतो. 

मला जरी त्यांना भेटावंसं वाटत होतं तरी ते कसं करता येईल याबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नव्हती. किंवा कोणीही परिचित नव्हते जे मला आणि त्यांना ओळखत होते. नंतर मात्र एका अतिशय अपूर्व योगायोगामुळे माझा आणि सुलभाताईंचा परिचय झाला. हे घडलं सध्याच्या व्हर्चुअल जगामुळे ! म्हणजेच व्हाट्सअँप मुळे !आणि याचं  संपूर्ण श्रेय जातं आमच्या या संगीत विषयक ग्रुप्सचे ऍडमिन श्री. विवेक पाध्ये यांना! मी ज्या संगीत विषयक समूहांमध्ये होतो तिथे सुलभाताई तेरणीकर याही जोडल्या गेल्या आणि व्हाट्सअँप just came alive! 

३ 

सुलभाताईंना सिनेसंगीताचा विश्वकोश का म्हणतात हे त्यांच्या समूहावरील अभ्यासपूर्ण पोस्टवरून लगेचच लक्षात आलं. पण यात वेगळेपण हे जाणवलं की त्यांच्याकडे केवळ माहितीचा खजिना नाही तर त्यामागे विचारांचं एक अधिष्ठान आहे. त्या कलाकाराची कलाकृती बघतात आणि त्या कलेचं  रसग्रहण करतात. त्या कलाकाराच्या वैयक्तिक, खाजगी आयुष्याबद्दल कधीही बोलत नाहीत. दुसरं म्हणजे त्यांना  कोणत्याही कलाकृतीमधील (मग ते एखादं गाणं असो वा सिनेमा ) सौंदर्यस्थळं कोणती हे बरोबर माहित असतं. आणि तिसरा तेवढाच महत्त्वाचा भाग म्हणजे अतिशय मोजक्या आणि अचूक शब्दांत त्या याविषयी मांडणी करतात. त्यांच्या लिखाणात कुठेही फाफटपसारा नसतो.  त्यांचं भाषिक सौंदर्य सहजसुंदर आणि अफाट आहे. त्यात कुठलाही कृत्रिमपणा नाही.  आम्हांला शाळेत असताना इंग्रजी विषयात precis writing हा एक भाग होता. दिलेल्या परिच्छेदाचे सर्व महत्त्वपूर्ण मुद्दे थोडक्यात मांडणे त्यात अपेक्षित होते. ते मला कधी जमलं नाही. पण सुलभाताईंच्या पोस्ट वाचल्यावर नेमकं लिखाण म्हणजे काय असतं याचा वस्तुपाठच मिळाला ! सुलभाताईंबद्दल आणखी एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे त्या कायमच accessible /approachable आहेत. आपण सेलिब्रिटी आहोत, सुप्रसिद्ध लेखिका आहोत याचा कोणताही बडेजाव/तोरा त्या मिरवत नाहीत. त्यांना इतक्या वेगवेगळ्या विषयांमध्ये रुची आणि गती आहे की याची तुलना फक्त दुर्गाबाई भागवत यांच्या अफाट व्यासंगाशी करता येईल! एकूणच संगीत क्षेत्र सोडल्यास फुलं/झाडं/निसर्गसौंदर्य इथपासून ते कविता/साहित्यापासून  ते अगदी पाककला अशा सर्व विषयांवर त्यांचे मार्मिक विचार असतात. आणि या चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होतात. सुलभाताईंना विनोदाचे अजिबात वावडे नाही उलट त्या कित्येकांची छान फिरकीही घेत असतात.  

४ 

यथावकाश सुलभाताई आणि त्यांच्या 'Beyond Entertainment' या संस्थेच्या  वंदना कुलकर्णी, उस्मान शेख आणि अनघा कोऱ्हाळकर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विवेक पाध्ये व्यवस्थापक असलेल्या राजलक्ष्मी सभागृह (कोथरूड ) येथे हिंदी सिनेसंगीतावर आधारित अनेक दृक श्राव्य कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा योग आला आणि या निमित्ताने  सुलभाताईंना प्रत्यक्षही अनेक वेळा भेटता आले. हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्ण काळाविषयी वेगवेगळ्या थीम्स घेऊन केलेले हे सर्व कार्यक्रम अविस्मरणीय होते. सुलभाताई यात त्या त्या थीमप्रमाणे त्या त्या गाण्यांवर/ संगीतकारावर त्यांच्या नेहमीच्या शैलीत बोलतात आणि ही मूळ  गाणी आपल्याला ऐकवली/दाखवली जातात,  असं या कार्यक्रमांचं सर्वसाधारण स्वरूप आहे. अशा कार्यक्रमांमधून सुलभाताईंचे या सुवर्णकाळाविषयीचे विचार सविस्तरपणे ऐकायला मिळतात आणि त्यांचा प्रेक्षकांशी अनौपचारिक संवाद हा एक वेगळाच आनंद देऊन जातो. या कार्यक्रमांतून जाणवलं की त्यांना संगीतकार जयदेव, अनिल विश्वास, सी रामचंद्र यांच्या सांगीतिक समज आणि कारकिर्दीविषयी विशेष ममत्व आहे आणि त्यावर विचार करता खरोखरच लक्षात आलं की या तिघांचंही संगीत माधुर्यपूर्ण आणि पथदर्शी होतं. लता मंगेशकर हा सुलभाताईंचा हळवा कोपरा! केवळ एक गायिका म्हणूनच नव्हे तर त्यांना लता मंगेशकर यांचा ३० वर्षांहून अधिक काळ प्रत्यक्ष सहवासही  लाभला आहे. आमच्या दैवत असलेल्या लता मंगेशकरांना प्रत्यक्ष भेटलेल्या सुलभाताई म्हणजे आमच्यासाठी पंढरीची वारी अनेक वेळा केलेल्या वारकरीच जणू! म्हणूनच लता मंगेशकर यांच्यावर सध्याच्या काळात पुस्तक लिहिण्याचा जर कोणाला अधिकार असेल तर माझ्यामते तो केवळ सुलभाताईंना आहे आणि त्या लता मंगेशकरांच्या देदिप्यमान सांगीतिक कारकिर्दीला  पूर्ण न्याय देतील याविषयी मला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे मी  या ब्लॉगच्या निमित्ताने सुलभाताईंना लता मंगेशकरांवर एक पुस्तक लिहावं अशी विनंती करत आहे. 

५ 

ही खात्री असण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सुलभाताईंचं 'चंदेरी आठवणी' हे पुस्तक! जानेवारी ते डिसेंबर १९९८ या काळात 'दैनिक सकाळ'च्या कलारंजन पुरवणीमध्ये सुलभाताईंनी याच नावाचं सदर लिहिलं होतं, त्यावर आधारित हे पुस्तक आहे. हिंदी सिने-संगीताच्या जुन्या काळातल्या कलाकारांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या गतस्मृतींना उजाळा देणारं हे सदर लोकप्रिय झालं आणि त्यावरील पुस्तक देखील! पण या सदर/पुस्तकामागे सुलभाताईंचे कष्ट लक्षात घेतले तर असं वाटतं की तो संपूर्ण काळ म्हणजे त्यांच्यासाठी एक ध्यासच होता ! १९९८ चा काळ म्हणजे-त्यावेळी ना मोबाईल ना कम्प्युटर ! पुण्याहून मुलाखती घेण्यासाठी मुंबईला जायचं


 -आणि तेव्हा प्रवासाची साधनंही कमीच होती. या कलाकारांचे नंबर /पत्ते मिळवायचे/शोधायचे...ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता त्यांच्या घरी जाऊन मुलाखती घ्यायच्या... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मुलाखती रेकॉर्डही केल्या जात नव्हत्या. त्यामुळे केवळ मेंटल नोट्स वर आधारित मुलाखती लक्षात ठेऊन पुण्याला येऊन त्यावर संस्करण करून ते वेळेत प्रकाशित करायचं... आणि लगेच पुढच्या कलाकाराच्या मुलाखतीची तयारी करण्यासाठी नॅशनल फिल्म आर्काइव्जच्या ग्रंथालयात जाऊन अभ्यास करायचा! हे सगळं घरच्या जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळून! मनात ध्यास असल्याशिवाय हे होणे शक्य नाही! मुलाखत घेतलेल्या कलाकारांची यादी अक्षरश: डोळे दिपवणारी आहे- अभिनेत्री श्यामा पासून संगीतकार ओ पी नय्यर ते गायिका सुमन कल्याणपूर, सुलोचना पासून मजरूह सुलतानपुरी ते शोभना समर्थ यांच्यापर्यंत .... या सर्व लोकांना बोलतं करून त्यांच्याकडून या सुवर्ण काळाची माहिती /आठवणी आपल्यापर्यंत पोचवून सुलभाताईंनी एक महत्त्वाचे दस्तावेजीकरण केलं आहे. 

 

एक ऑक्टोबर २०२३ रोजी सुलभाताई वयाची ७४ वर्षे पूर्ण करून पंचाहत्तरीत पदार्पण करत आहेत.विलक्षण योगायोगाची गोष्ट म्हणजे एक ऑक्टोबर हा जागतिक संगीत दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो. शिवाय याच दिवशी ज्येष्ठ संगीतकार सचिन देव बर्मन(०१.१०. १९०६)  तसंच गीतकार आणि शायर मजरूह सुलतानपुरी(०१. १०. १९१९)  आणि मराठी भावगीतात आपले अढळ स्थान असलेले कवी ग दि माडगूळकर(०१. १०. १९१९)  यांचाही जन्म झाला.  सुलभाताईंना  माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार! त्यांचे पुढील आयुष्य समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो आणि त्यांच्याकडून या हिंदी-मराठी संगीत क्षेत्रांविषयी असेच मोलाचे कार्य घडो यासाठीही शुभेच्छा!