Saturday 20 January 2024

आर डी बर्मन, लता आणि गाण्यातले भाव...

१ 

 




  (४ जानेवारी २०२४,संगीतकार आर डी बर्मन यांचा तिसावा स्मृतीदिन ! त्यानिमित्त लिहिलेला हा ब्लॉग !)

 आर डी यांच्यावर ४ जानेवारी २०१९ ला शेवटचं लिहिलं होतं. त्यानंतर तब्बल ५ वर्षांनी पुन्हा लिहित आहे!  म्हणजे त्यानंतर ब्लॉग लिहिले पण इतर विषयांवर( सायकलिंग, फोटोग्राफी, पुस्तक परीक्षण, वाढदिवस विषयक इ ) पण का कोण जाणे गाणी/संगीत या विषयी लिहिलं गेलं नाही. या मधल्या चार-पाच वर्षांच्या काळात पुलाखालून अर्थातच बरंच पाणी वाहून गेलं आहे.मुख्य म्हणजे आज लता मंगेशकर हयात नाहीत. परंतु त्यांनी करून ठेवलेल्या अफाट सांगीतिक कामाचं थोडंफार अवलोकन करायला देखील, माझ्यासारख्या सर्वसामान्य संगीतप्रेमीला हा जन्म पुरायचा नाही ! हा ब्लॉग म्हणजे त्याच प्रयत्नांचा एक छोटा भाग ! (आर डी बर्मन आणि लता मंगेशकर यांच्या विषयीचा माझा आधीचा ब्लॉग वाचायचा असल्यास त्याची लिंक इथे देत आहे-  https://rajeshpusalkar.blogspot.com/2019/01/blog-post.html ) 

मागच्या ब्लॉगमध्ये आर डी आणि लता यांच्या गाण्यातील मेलडी हा विषय घेऊन त्यावरील गाण्यांविषयी लिहिलं होतं. यावेळीही मेलडीवर लिहीनच परंतु पुढील गाण्यांतील  मला उमजलेल्या भाव-भावनांविषयी देखील लिहिणार आहे. आर डी बर्मन यांच्या संगीतावर अनेक आक्षेप घेतले जातात. वेगवेगळे रिदम पॅटर्न, वेगवेगळे साउंड्स यांच्या प्रायोगिक वापराच्या नादात त्यांच्या  गाण्यांतील भाव मागे पडतात हा त्या आक्षेपांपैकी एक असावा ! कदाचित या ब्लॉगमधून  त्यावर देखील लिहायचा प्रयत्न करणार आहे. मागील ब्लॉग प्रमाणेच या ब्लॉग मध्ये देखील केवळ सोलो गाण्यांचाच विचार केला आहे . (कदाचित डुएटस साठी एक वेगळा ब्लॉग लिहीन याची ही प्रस्तावना आहे असं वाचकांना वाटू शकेल !  आत्ताच्या घडीला त्याबद्दल सांगता येणार नाही पण आर- डी -लता मंगेशकर डुएटस हा  खरोखरच एका वेगळ्या ब्लॉगचा विषय आहे हे नक्की . )

२ 

१) आजा पिया तोहे प्यार दू - बहारों के सपने (१९६७) - 

https://youtu.be/T1FcSe-J2HQ?si=I39eBq6gIHNFgH3B 

या गाण्याच्या सुरुवातीच्या चार ओळी लता मंगेशकरांच्या  मृदू आवाजात, कोणत्याही वाद्यांशिवाय आहेत. गाणं तसं नायकाला address करणारं आहे. म्हणून कदाचित त्यात छोटे छोटे फ्रेजेस आहेत - आजा पिया / तोहे प्यार दू/ गोरी बैय्या/ तोपे वार दू ... यात 'गोरी बैय्या' नंतर किंवा 'किस लिये  तू' नंतरचा सूक्ष्म ठहराव लक्षवेधी आहे. कथानकात नायक राम (राजेश खन्ना ) परिस्थितीशी झुंज देता देता  एका क्षणी पराभूत मनोवस्थेत असताना नायिका /त्याची प्रेमिका गीता (आशा पारेख ) त्याच्यासाठी हे गाणं गात आहे असा प्रसंग असावा. तिला तिच्या प्रेमाविषयी एवढा विश्वास आहे की तिला वाटतंय की  त्या जोरावर रामला त्या परिस्थितीशी लढण्याचं बळ मिळेल. संपूर्ण गाण्याच्या शब्दांत  एक सकारात्मकता आहे, आशा आहे आणि एक भावनिक आवाहन आहे. गाण्याचा हा मूड लता मंगेशकर यांनी सुरवातीपासूनच सुरेख पकडला आहे. 'गोरी बैय्या तोपे वार दू' 'थके हुए इन हाथों को दे दे मेरे हाथ में ' यातून शरीर स्पर्शाचेही आवाहन आहे(healing touch या अर्थाने )  पण ते आर्जव आहे आणि त्यात कुठेही आव्हान नाही. हा प्रसंग आणि त्यासाठीचे मजरुहसाहेबांचे शब्द योग्यरीत्या समजून उमजून ही चाल हा समतोल साधते. स्पर्शातून इथे प्रोत्साहन अभिप्रेत आहे - 'अवघड कठीण काळ असला तरीही यावर तू मात करू शकशील' 'तुझा मार्ग खडतर आहे हे मलाही कळतंय पण या मार्गावर तुझ्याबरोबर मीही तुझी साथ सदैव करत आहे..' ही  उमेद जागवणारं प्रोत्साहन ! म्हणूनच  या गाण्यासाठी लता मंगेशकरांची निवड योग्य ठरते. या संपूर्ण गाण्यात गिटार आणि बासरी लता मंगेशकर यांच्या जवळपास बरोबरीने साथ करतात - जणू काही त्या शाश्वत प्रेम आणि विश्वासाचंच प्रतीक असाव्यात ! जोडीला संतूर आणि सॅक्सोफोन देखील समर्थ आणि समर्पक आहेत. पण कुठलेही वाद्य लता मंगेशकर यांच्यावर कुरघोडी करत नाही. म्हणूनच हे  सॉफ्ट आणि रोमँटिक गाणं श्रवणीय वाटतं .  

२) क्या जानू सजन होती है क्या गम की शाम -  बहारों के सपने (१९६७) - 

https://youtu.be/Sd0sHdeVkMA?si=_rzR92Rh4QxZbPti 

'बहारों के सपने' हा एक कृष्ण धवल सिनेमा आहे परंतु या सिनेमातील हे एकमेव गाणं रंगीत आहे कारण हे एक स्वप्नगीत आहे आणि आपली स्वप्नं रंगीबेरंगीच असतात ! पण या गाण्यात आर डी ने एक अभिनव प्रयोग केला आहे. यात मी फार काही नवीन सांगतोय अशातला भाग नाही - यात भारतातला कदाचित पहिला व्हॉइस-ओव्हर- व्हॉइस हा प्रयोग करण्यात आला आहे. हा प्रयोग तेव्हा नवीन असल्यामुळे लोकांना या गाण्यातला दुसरा आवाजही लता मंगेशकरांचा आहे यावर विश्वास बसायचा नाही. काहींना तर हा आवाज उषा मंगेशकरांचा वाटला होता ! पण हा असा प्रयोग का केला असावा ? खरं तर हिंदी सिनेमांत स्वप्नगीतांची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. (आठवा- 'आवारा' मधील 'घर आया मेरा परदेसी', 'प्यासा' मधील 'हम आपकी आँखों में' 'गुमनाम' मधील 'हम  काले है तो क्या हुआ दिलवाले है' इ) या गाण्यांत नेत्रदीपक आणि भव्यदिव्य सेटस, तो टिपिकल पांढरा धूर वगैरे बघायला मिळतो. आर डी च्या 'क्या जानू सजन' ने  हा ठराविक साचा न स्वीकारता त्यात बदल केला. स्वप्नं म्हणजे कल्पनांची भरारीच असते. जर ती रंगीबेरंगी असू शकतात तर त्यात हे असे overlapping आवाज का असू नयेत? ध्वनी-प्रतिध्वनीचा हा खेळ स्वप्नात जास्त उठून दिसेल या विचाराने हा वेगळा परिणाम गाण्यात वापरण्यात आला असावा. स्वप्नगीत असल्यामुळे गाण्याच्या सुरुवातीला एक गूढरम्य वातावरणनिर्मिती आहे- लता मंगेशकरांचा आलाप आणि त्या जोडीला गिटार आणि व्हायोलिनचा वापर यातून ते साधलं आहे. वरील गाण्याप्रमाणे याही गाण्यात गिटार आणि बासरी यांची सातत्याने साथ आहे शिवाय जोडीला स्ट्रिंग सेक्शन (व्हायोलिन) जबरदस्त आहे. कडव्यातील  पहिली ओळ दोनदा आहे. ती ओळ दुसऱ्यांदा सुरु होण्याअगोदर गिटारचा छोटा तुकडा केवळ अप्रतिम! पहिली ओळ दुसऱ्यांदा म्हणताना   व्हॉइस -ओव्हर- व्हॉइसचा वापर आहे आणि हे दोन्ही कडव्यांच्या वेळी आहे. गाण्याचा मूड जेवढा आर डी -लता यांना  पकडता आला आहे,  तेवढा तो चित्रीकरणात (सुप्रसिद्ध जाल मिस्त्री असूनही !) आणि दिग्दर्शनात(नासीर हुसैन)  यांना  जमला  नाही असं मला वाटतं. 

३) ना कोई उमंग है ना कोई तरंग है - कटी  पतंग (१९७१)-

https://youtu.be/HlB9ogpEk8w?si=vKQem7KEz9EF7aZ1

गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित 'कटी पतंग' या सिनेमात योगायोग आणि चमत्कारिक परिस्थिती यांची अगदी रेलचेल होती. नायिका पूनम/मधू हिला ती विधवा नसताना विचित्र परिस्थितीमुळे विधवा वेशात राहावं लागतं आणि त्यातच नायक कमल (राजेश खन्ना ) तिच्याकडे आकर्षित होतो ('मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिये जाये'... ) तिची सत्य परिस्थिती तिला सांगता येत नाही परंतु नायकाचं तिच्याकडे आकर्षित होणं तिच्या लक्षात आलं आहे (कदाचित तिला ते आवडूही लागलं आहे?) अशा कात्रीत सापडलेल्या प्रसंगी सिनेमात हे गाणं आहे. आनंद बक्षी यांनी तिच्या व्यथेचं वर्णन करणारे यथोचित शब्द लिहिले आहेत. एरवी आपण जे गाणं ऐकतो त्यावरून गाण्याच्या सुरुवातीचं संगीत अर्धवट वाटतं. मात्र वर लिंक आहे त्यात सुरवातीचं संपूर्ण संगीत आहे. त्यातील स्ट्रिंग सेक्शन च्या प्रभावी वादनातून जणू पतंग कापला गेल्याचा आणि तो भरकटत गेल्याचा भास होतो. पहिल्या कडव्यातील पहिली ओळ लता मंगेशकरांनी सलग म्हटली आहे- 'आकाश से गिरी मैं एक बार कटके ऐसे'. यातूनही हाच परिस्थितीपुढे आयुष्याचा पतंग भरकटत गेल्याचाच भाव प्रकट होतो. संपूर्ण गाण्यात पॅथॉस भरून राहिला आहे. (म्हणूनच कदाचित नटभैरव या गंभीर प्रकृतीच्या रागाची छाया  या गाण्यावर आहे ) हा पॅथॉस रिदम मधूनही जाणवतो. आपल्याला रेसो रेसो आणि तबल्याबरोबरच बॉन्गो सारख्या वाद्याचा आघातही सतत ऐकू येतो. तबला आणि हा बॉन्गो मिळून तालाचं आवर्तन पूर्ण होतं आणि यातही ठेहराव सातत्याने  असल्यामुळे दुःखाची किनार गहिरी होते. सुरुवातीलाच व्हायोलिनचा तुकडा संपल्यानंतर पियानो आणि गिटारचा एक छोटासाच तुकडा लाजवाब आहे. 'लगके गलेसे अपने बाबूलके मैं ना रोई' या नंतरचा लता मंगेशकरांचा आलाप अंगावर अक्षरश: काटा आणतो. तसंच यानंतरच्या कडव्याआधी व्हायोलिनचा एक सोलो तुकडा आहे तोही वातावरणनिर्मितीसाठी पूरकच आहे. गाण्यातील इंटरल्यूड संगीत खूप मोठं नाही कारण नायिकेला मनात साचलेल्या भावनांचा कल्लोळ व्यक्त करायचा आहे. संपूर्ण गाण्यात बासरी पुन्हा एकदा खूपच परिणामकारक आहे. विशेषतः 'पतझड की मैं हू छाया' किंवा' डोली उठी यु जैसे' या ओळींनंतर अक्षरश: काही सेकंदच बासरी वाजते पण ती खूप काही सांगून जाते. 'कटी पतंग' सिनेमात लता मंगेशकर यांचं हे एकच सोलो गीत आहे. किशोरकुमारच्या या सिनेमातल्या झंझावातापुढे देखील हे गाणं त्याच्या या वैशिष्टयांमुळे झाकोळलं जात नाही. उलट आपलं अढळ स्थान राखून एक संस्मरणीय गाणं ठरतं. 


४) जाने क्या बात है -सनी (१९८४) -

https://www.youtube.com/watch?v=iOkUl3x5ApQ (या लिंक मध्ये पूर्ण गाणं आहे ,तीन कडव्यांसह )

https://www.youtube.com/watch?v=FQYcjNxfsoc (हा या गाण्याचा व्हिडिओ आहे. पण यात दोनच कडवी आहेत ) 

या गाण्याविषयी लिहिण्यापूर्वी काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात-

अ) 'सनी' हा १९८४ सालचा सिनेमा आहे. हिंदी सिनेमांत सत्तरच्या दशकात (विशेषतः उत्तरार्धात) कथानकांत खूप बदल झाले आणि त्यामुळे देमार पट/ मारधाड असलेले सिनेमे येऊ लागले आणि त्यांची चलती होऊ लागली. अशा सिनेमांच्या भाऊगर्दीत सिनेमांतील गाणी/ त्यांची सुमधुरता लोप पावू लागली. या पार्श्वभूमीवर 'सनी' या चित्रपटातील गाण्यांकडे बघितलं पाहिजे. मग लक्षात येतं  की यातली गाणी त्यावेळच्या लाऊडनेसच्या तुलनेत एक ठळक अपवाद होती आणि याला कारण म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक राज खोसला होते (ज्यांनी गुरुदत्त/ देव आनंद सारख्यांबरोबर काम केलं होतं) 

आ) या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लता मंगेशकरांचं वय ५४-५५ वर्षं असावं! 

कुठल्याही तारूण्यात पदार्पण केलेल्या मुलीमधील सहज स्वाभाविक भावना या गाण्यात व्यक्त झाल्या आहेत. त्यात प्रियकराची असोशी आहे, त्याची वाट बघणं आहे...झोप न येणं आहे आणि प्रेमाच्या नात्याचं लग्नात रूपांतर करायची ओढही! याही गाण्यात एक ठेहराव आहे आणि 'जाने क्या बात है' नंतर एक लक्षात येण्याजोगा पॉज आहे. त्यानंतर थोडं off beat गाणं पुढे जातं. लता मंगेशकरांनी गाण्यात मींडकाम काय सुरेख केलं आहे. असं वाटावं की स्वरांच्या हिंदोळ्यावर एक नवथर तरूणी मस्तपैकी झुलतेय! मला यातच एक अल्लड निरागसताही दिसते. प्रत्यक्ष गाण्यातला ताल आणि इंटरल्यूड मधील ताल यात लयीत फरक आहे जो अर्थातच गाण्याच्या प्रसंगानुरूप आहे. गाण्यात इलेक्ट्रिक गिटारचा वापर छान आहे त्याचबरोबर सतार- सरोद आणि तिसऱ्या कडव्या आधी (पुढे गाण्यात शहनाईचा उल्लेख आहे म्हणून) तार शहनाईचा वापरही आहे.  (या गाण्यातील गिटार संबंधी मला माझा शालेय मित्र आणि संगीत/आर डी प्रेमी श्रीपाद गांधी याची मदत झाली)

या गाण्यांशिवाय आर डी- लता मंगेशकर यांची आणखीही काही सोलो गाणी आहेत (शिवाय डुएटस् आहेतच!) त्यावर पुन्हा कधीतरी लिहीनच!!




2 comments:

Unknown said...

सुंदर विषय हाताळला आहे...
.
...वेगवेगळे रिदम पॅटर्न, वेगवेगळे साउंड्स यांच्या प्रायोगिक वापराच्या नादात त्यांच्या गाण्यांतील भाव मागे पडतात हा त्या आक्षेपांपैकी एक असावा !...
मला वाटतं आरडी च्या संगीताची या वाक्याइतकी चेष्टा दुसरी असूच शकणार नाही. सिच्युएशनला संपूर्ण न्याय देणारा संगीतकार असंच आरडीबद्दल म्हणावं लागेल. मी त्याचा चाहता आहे म्हणून असं म्हणतोय असं अजिबात नाही तर याउलट तो एवढा विचार करून चाली बनवतो म्हणून मी त्याचा चाहता होत गेलो असं म्हणणं जास्त सयुक्तिक होईल. कितीतरी उदाहरणे देता येतील. हम किसीसे कम नही चं कॉम्पिटिशन सॉंग, एक चतुर नार, प्यार हमें किस मोड पे ले आया, हेलन-आशा-आरडी ची असंख्य गाणी, मामैय्या केरोमामा, आँधीची सगळी गाणी, अमर प्रेम यांतील सगळी गाणी, भीगी भीगी रातोंमें वगैरे वगैरे वगैरे... प्रत्येक गाण्याचं वैशिष्ट्य हे आहे की गाण्यातून प्रसंगाचा भाव उत्तम व्यक्त झालेला दिसून येतो. अलीकडे एका मुलाखतीत वाचलं की पंचमने खंत व्यक्त केली होती की "...आजकल गाने बंद कमरेमें बाजे (पेटी) या कीबोर्ड पर बनाते है...संगीत कभी ऐसे बनता है क्या?..." मला हे उद्गार अतिशय सखोल वाटतात... यांतला सूक्ष्म अर्थ हाच आहे की सिच्युएशन पूर्ण समजून घेऊन, ती संगीतकारांत भिनली पाहिजे मग बरोब्बर चाल बनते...हे धडाधड चाली बनवणा-यांना कसं कळणार?... असो.
बाकी वरची चारही गाणी योग्य निवडली आहेत. आणि गाणी उत्तम पण चित्रीकरण सामान्य हा प्रकार खूप जुन्या गाण्यांत सगळ्याच संगीतकारांच्या बाबतीत आपल्याला तरी वाटतोच...नाही का?
.
लता पंचम ड्युएट्स वर वाचायला आवडेल.

- श्रीपाद गांधी

Mugdha said...

गाणी सर्व खूपच सुंदर आहेत... लिंक पाठवली नाही तरी नुसत्या ओळी वाचल्यावर सगळं गाणं आपोआप डोळ्यासमोर येतं! पण त्या गाण्यांचे एवढे बारकावे लक्षात आले नव्हते... छानच लिहिले आहे.... टेक्निकल पण कंटाळवाणे नाही....A true researcher of songs I would say...