Monday, 7 April 2025

वेदना व्यवस्थापन : होमिओपॅथिक दृष्टिकोन


 

(आमच्या बीकन फौंडेशन या होमिओपथी च्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे २००६ सालापसून आम्ही 'पर्याय' हा दिवाळी अंक काढत आहोत. सर्वसामान्य लोकांमध्ये होमिओपथी विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा अंक काढला जातो. २०२४ सालच्या दिवाळी अंकाचा विषय 'वेदना व्यवस्थापन ' होता. या अनुषंगाने मी लिहिलेला लेख ब्लॉग स्वरूपात प्रकाशित करत आहे ) 


वेदना व्यवस्थापन या विषयावर या आधीच्या काही लेखांमधून वेदनेचं स्वरूप, तिची व्याप्ती आणि त्यावर आधुनिक वैद्यकशास्त्रात कोणत्या प्रकारे उपचार करण्यात येतात यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या लेखांमधून एक बाब अधोरेखित होते की वेदना कोणत्याही (तात्कालिक वा जुनाट/दीर्घकालीन) आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. 
आता प्रस्तुत लेखात या वेदनेला किंवा त्या वेदनाग्रस्त पेशंटला होमिओपॅथिक डॉक्टर कशाप्रकारे समजून घेतात व त्यासाठी लागणारा होमिओपॅथीचा दृष्टिकोन कसा असणे आवश्यक आहे हे समजून घेऊ. 

सर्वप्रथम आपण होमिओपॅथीच्या काही मूलभूत तत्त्वांचा विचार करू -

१) Individualization : हा होमिओपॅथीचा गाभा आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर व्यक्ती तितक्या प्रकृती हे होमिओपॅथीचं प्रमुख तत्त्व आहे. उदाहरणार्थ- समजा जर १० पेशंटना सायटिकामुळे पाय दुखण्याचा त्रास होत असेल तरी त्या सर्व १० पेशंटना होमिओपॅथीचं एकच एक औषध दिलं जाईल असं नाही. होमिओपॅथिक डॉक्टर सायटिकाचा त्रास असलेल्या त्या १० पेशंटची सविस्तर माहिती घेऊन त्या प्रत्येक पेशंटची व्यक्तीनिष्ठ, वैशिष्ट्यपूर्ण लक्षणं विचारात घेतील आणि कदाचित त्या प्रत्येक पेशंटला वेगवेगळं औषध देखील दिलं जाऊ शकेल. कारण होमिओपॅथीनुसार व्यक्तीला आजार होतो, त्या व्यक्तीच्या अवयवाला नाही. म्हणून ती व्यक्ती नेमकी कशी आहे याची व्याख्या करणे आवश्यक असते. 

२) होमिओपॅथीची औषधं लक्षणांप्रमाणे/ लक्षणांवर आधारित असतात. होमिओपॅथिक डॉक्टर पेशंटच्या लक्षणांची एका विशिष्ठ पद्धतीने नोंद करतात. त्या लक्षणांचं पुढे सखोल विश्लेषण करून तौलनिक मूल्यमापन केलं जातं. अशाप्रकारे पेशंटच्या लक्षणांचा एक समूह तयार केला जातो. तर दुसरीकडे होमिओपॅथीच्या औषधांची लक्षणे एका ठराविक पद्धतीने 'मटेरिया मेडिका' या पुस्तकांमध्ये नोंदवली गेली आहेत. निरोगी व्यक्तींमध्ये ही औषधं देऊन त्यांच्यावर झालेले परिणाम आणि त्याद्वारे दिसून आलेली लक्षणे (drug proving) , तसंच वेगवेगळ्या आजारांकरिता वापरून उपयोगिता सिद्ध झालेल्या औषंधाची लक्षणे (clinical trials ) या आणि अशा काही प्रकारे लक्षणांच्या नोंदी केलेल्या आहेत. 
पेशंटच्या लक्षणांमधून तयार केलेला लक्षण समूह आणि मटेरिया मेडिका मधील औषधांपैकी एका औषधाच्या लक्षण समूहाशी मिळताजुळता असतो. जेवढी या दोन्हींमध्ये समानता (Symptom Similarity) जास्त, तेवढे ते औषध अचूक व म्हणूनच परिणामकारक असते कारण  होमिओपॅथीचे आणखी एक मूलभूत तत्त्व म्हणजे - Similia Similibus Curentur किंवा Like Cures Like. 





वेदना हे प्रमुख लक्षण असणारा पेशंट होमिओपॅथिक डॉक्टरांकडे आला तर त्या डॉक्टरांचा या वेदनेकडे बघायचा काय दृष्टिकोन असतो हे आता आपण आणखी सविस्तरपणे पाहू. 
 
या प्रक्रियेमध्ये पहिलं पाऊल म्हणजे पेशंटकडून सविस्तर माहिती घेणे! असं म्हणतात की A good  Case taking is half work done ! वेदनेने त्रस्त असलेल्या पेशंटकडून माहिती मिळवणे ही खरं तर एक कलाच आहे! आणि त्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरकडे देखील चिकाटी आणि संयम असणे आवश्यक आहे. पेशंटकडून जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी ती मिळवणं हे पुढील लक्षण-विश्लेषणाच्या प्रक्रियेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 

पेशंटकडून माहिती घेताना -
१) वेदनेचं रोगनिदान (Diagnosis ) करणं आवश्यक आहे- होमिओपॅथीबद्दल एक गैरसमज सर्वश्रुत आहे की होमिओपॅथिक डॉक्टर रोगनिदानाला फारसे महत्त्व देत नाहीत. पण वास्तविक पाहता ते तसं नाही. रोगनिदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण यातूनच पेशंटच्या आजारासंबंधी बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. ( त्यामुळे रोगनिदानासाठी आवश्यक अशा चाचण्या करणंही श्रेयस्कर!) मुख्य म्हणजे पेशंटची वेदना होमिओपॅथिक उपचारांच्या कक्षेत आहे किंवा नाही हे रोगनिदानांतून ठरवता येते. उदाहरणार्थ एखाद्या पेशंटचा हात फ्रॅक्चर झाला आहे आणि हाडाचे अक्षरश: तुकडे झाले आहेत आणि त्यामुळे त्याला तीव्र वेदना होत आहेत. अशा पेशंटची वेदना हाडांचे तुकडे ऑपरेशन करून जोडल्याशिवाय कमी होणारच नाही. म्हणजेच इथे शस्त्रक्रिया अनिवार्य ठरते. आणि हे रोगनिदान क्ष किरण तपासणीअंती होऊ शकते. 
रोगनिदान करण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे आजाराच्या नेमक्या कोणत्या स्थितीत पेशंट डॉक्टरकडे आला आहे हे डॉक्टरांना रोगनिदानाने ठरवता येते. वेदनेच्या तक्रारीच्या सुरवातीलाच जर पेशंट डॉक्टरांकडे गेला तर त्यावर होमिओपॅथिक उपचार यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. मात्र आजार जुनाट झाला असेल वा त्यात शारीरिक गुंतागुंत निर्माण झाली असेल तर होमिओपॅथिक औषधांच्या उपयुक्ततेवर परिणाम होऊ शकतो. याचबरोबर त्या वेदनेसाठी पेशंट आणखी कोणते व किती उपचार घेत आहे, त्यात वेदनाशामक औषधांचा भडिमार किती करण्यात आला आहे इत्यादी गोष्टींवर देखील होमिओपॅथिक औषधांची परिणामकारकता अवलंबून असते. मात्र वेदना कितीही जुनाट असली तरी होमिओपॅथिक डॉक्टर त्यावर यशस्वी औषधोपचार करू शकतो.  
वेदना हे लक्षण असलेला पेशंट होमिओपॅथिक डॉक्टरकडे उपचारार्थ गेला तर त्या वेदनेचं रोगनिदान करून आजार कुठल्याप्रकरचा आहे हेही लक्षात येतं. हे समजण्यासाठी आपण खालील तक्त्याचा वापर करू- 



काहीवेळा वेदना ही तात्कालिक स्वरूपाची असते- उदाहरणार्थ अर्धशिशी, दातदुखी वगैरे. तर काहीवेळा वेदना ही एखाद्या दीर्घकालीन आजाराचं लक्षण असते. उदाहरणार्थ - संधिवातामुळे (Osteo arthritis) होणारी गुडघेदुखी. तर काही आजार दीर्घकालीन असतात मात्र त्यात अधूनमधून त्रासाची तीव्रता खूप वाढते. उदाहरणार्थ - Rheumatoid arthritis. 
होमिओपॅथिक डॉक्टरने नेमकेपणाने रोगनिदान केले तर पेशंट कुठल्या प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहे हे समजते आणि ज्याप्रकारचे आजार आहे त्याप्रमाणे होमिओपॅथिक उपचारपद्धतीत बदल होऊ शकतो. जर तीव्र लक्षणं असलेला तात्कालिक स्वरूपाचा आजार असेल त्या आजाराच्या वेळी असलेल्या लक्षणांचा विचार करून acute medicine दिले जाते. मात्र  दीर्घकालीन वेदना असेल तर त्यासाठी औषध देताना पेशंटची सविस्तर माहिती घेऊन त्यानंतर Constitutional medicine देऊन दीर्घकालीन उपाययोजना केली जाते तर Acute Exacerbation of Chronic Disease साठी तीव्र लक्षणं असताना acute medicine आणि त्यानंतर जुनाट वेदनेसाठी  constitutional medicine असे करावे लागते. 
रोगनिदान करण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे असे केल्याने आजाराची सर्वसाधारण लक्षणे, (म्हणजे अशी लक्षणे जी त्या आजाराच्या जवळपास सर्वच पेशंटमध्ये दिसून येतात  व अशा लक्षणांना common symptoms of the Disease असं म्हटलं जातं ) बाजूला काढता येतात. अशा लक्षणांचा होमिओपॅथिक औषध निवडण्यासाठी फारसा उपयोग नसतो वा खूपच मर्यादित उपयोग होतो. ही सर्वसाधारण लक्षणे बाजूला काढल्यानंतर जी लक्षणे राहतात ती त्या पेशंटची व्यक्तिनिष्ठ , वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे ( Individualistic, Characteristic Symptoms of the Person ) असतात आणि हीच होमिओपॅथिक औषधाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. कारण याआधी म्हटल्याप्रमाणे Individualization हा होमिओपॅथीचा गाभा आहे. 

२) पेशंटच्या वेदनेची माहिती घेत असताना होमिओपॅथिक डॉक्टर आपल्या केसपेपर वर पेशंटचे त्याच्या वेदनेबद्दलचे अनुभव एका विशिष्ट पद्धतीने शब्दबद्ध करत असतो. पेशंटचे बोलणे होमिओपॅथीच्या परिभाषेत परिवर्तित करत असतो. पेशंटकडून जास्तीत जास्त माहिती, कमीत कमी वेळात आणि पूर्वग्रहांचा कमीत कमी अडथळा येत, घेण्यासाठी काही नियम आणि कार्यपद्धतींचा वापर करत असतो. 
होमिओपॅथी हे लक्षणांना अनुसरून औषध देण्याचे शास्त्र आहे याचा याआधी उल्लेख केला आहेच. आता आपण हेच लक्षण जास्तीतजास्त परिपूर्ण कसे करता येईल यासाठीची पद्धत बघू. 
पेशंटला असलेल्या  वेदनेचे एक परिपूर्ण चित्र होमिओपॅथिक डॉक्टर कडे असणे आवश्यक आहे. त्यालाच होमिओपॅथी मध्ये पूर्ण लक्षण वा Complete Symptom असे म्हणतात. लक्षणे जेवढी पूर्ण स्वरूपात मिळतील तेवढे औषध निवडणे सोपे जाते. 

पूर्ण लक्षण म्हणजे काय याचा आपण एक उदाहरण घेऊन विचार करू -
१) Location -आजाराचे स्थान/ठिकाण -
यात वेदना कधीपासून आहे?  
वेदना शरीरातील नेमक्या कोणत्या संस्थेत होत आहे? ती वेदना एका ठिकाणाहून सुरु होऊन दुसरीकडे जाते का/(Radiating pain )  कोणत्या एका बाजूला/बाजूचा त्रास होत आहे का? असे प्रश्न पेशंटला विचारले जावेत. 

२) Sensation - (संवेदना ) - जिथे वेदना आहे तिथे नेमक्या काय संवेदना आहेत? तिथे नेमकं काय वाटत आहे - उदाहरणार्थ- ठसठसणे, कळ येणे, रग लागणे, आग होणे, टोचणे, कापल्यासारखे वाटणे, पिळवटून टाकणे इत्यादी. 
तसेच जिथे दुखत आहे त्या जागेला सूज आली आहे का? तिथला रंग बदलला आहे का? तिथले तापमान वाढले आहे की कसे? 

३) Modality (वेदना /आजार वाढवणारे वा कमी करणारे घटक) - यामध्ये Ailments From या घटकाचाही समावेश आहे. म्हणजेच असे एक कारण की ज्यामुळे पुढचा संपूर्ण आजार सुरू झाला. 
त्याचबरोबर वेदना काय केल्याने वाढते व कमी होते? ती ठराविक वेळी वाढते वा कमी होते का? कुठल्या एका स्थितीत (उदाहरणार्थ- पाठीवर सरळ झोपल्याने, खुर्चीत ताठ बसल्याने, मागे झुकल्याने) त्रास वाढतो वा कमी होतो का? हालचाल केल्याने त्रास वाढतो वकी कमी होतो? होमिओपॅथीमध्ये वेदनेचा किती खोलवर जाऊन विचार केला आहे त्याची काही उदाहरणे बघू-
डोकेदुखीचा त्रास जिने उतरताना झाल्यास त्यासाठी Belladonna सारखे औषध आहे, तर जिने चढताना डोके दुखत असेल तर त्यासाठी Belladonna व्यतिरिक्त Bryonia, Silicea यासारखी औषधे आहेत. डोक्यावर टोपी घातल्यामुळे आलेल्या ताणासाठी बरीच औषधे आहेत. गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर डोके दुखल्यास काही औषधं आहेत तसंच दुखण्याचा विचार केला तरी डोकं दुखतं यासाठीही औषधं आहेत. 

४) Concomitant Symptoms - ही आजाराव्यतिरिक्त पेशंटला जाणवणारी लक्षणे असतात. या लक्षणांमधून पेशंटची वैशिष्ट्यपूर्ण प्रकृती दिसते आणि म्हणून ही लक्षणे औषध निवडीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. उदाहरणार्थ- पेशंटची शीत/उष्ण प्रकृती, तहान- कमी लागणे वा वाढणे, घाम येणे. झोप न लागणे. काही वेळा पेशंटमध्ये त्रासाबरोबरच काही मानसिक लक्षणेही दिसतात -उदाहरणार्थ चिडचिडेपणा, अस्वस्थता. लहान मुलांमध्ये चिडचिडेपणाबरोबरच आणखी काही लक्षणे दिसतात. उदाहरणार्थ बाळ रडत असते आणि त्याला सतत कोणीतरी कडेवर घ्यावे असे वाटत असते. काही बाळे कडेवर घेतल्याशिवाय शांत होत नाहीत. पण काही बाळे कडेवर घेऊन देखील शांत होत नाहीत. तर काही बाळांना झोका द्यावा लागतो तर काहींना खुर्चीत बसवून ती खुर्ची हलवावी लागते. 
या सगळ्यात एक बाब अधोरेखित होते की होमिओपॅथिक डॉक्टर काय किंवा होमिओपॅथिक उपचारांसाठी आलेला पेशंट काय, दोघांचीही निरीक्षणशक्ती चांगली असली पाहिजे हा लेख वाचणारे पेशंट असतील तर  त्यांच्या लक्षात आलं असेल की डॉक्टर त्यांना इतके प्रश्न का विचारतात आणि त्यांच्या हेही लक्षात आलं असेल की त्यांच्या आजारासंबंधीच्या  बारीकसारीक निरीक्षणांचा होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी किती उपयोग होऊ शकतो. 
आता जर एखाद्या पेशंटच्या लक्षणांचं आपण पूर्ण लक्षण वा Complete Symptom मध्ये वर्गीकरण केलं तर त्यानंतरची औषध निवडण्याची प्रक्रिया सोपी होऊ शकते -





अशा पूर्ण लक्षणांचं तुलनात्मक मूल्यमापन केल्यानंतर खालील लक्षणसमूह तयार करता येतो-
१) शीत प्रकृतीचा पेशंट 
२) जड उचलल्याने त्रास सुरु होणे 
३) प्रचंड अस्वस्थता 
४) Sciatic Nerve - अति तीव्र वेदना - आणि ही वेदना हालचालीने वाढते तर दाबल्याने आणि शेकल्याने कमी होते 
५) डाव्या बाजूचा त्रास / Nerve चा त्रास 

वरील लक्षणसमूहाच्या आधारे Colocynth आणि Rhus tox ही औषधे येतात. आता आपल्याला या दोन औषधांमध्ये तुलना करून पेशंटच्या त्रासाच्या जास्तीत जास्त जवळ जाणारं औषध कुठलं आहे हे बघायचं आहे. Rhus tox मधील प्रमुख लक्षण हे आहे की वेदना वा अस्वस्थता ही हालचालीने कमी होते. म्हणून त्या व्यक्तीला सतत हालचाल करत राहावेसे वाटते. आपण आपण विचारात घेतलेल्या उदाहरणातील पेशंटचा त्रास हालचालीने वाढतो. त्यामुळे अशा पेशंटला Rhus tox हे औषध देता येणार नाही. कारण औषधाचं चित्र आणि पेशंटच्या आजाराचं चित्र जुळत नाही. याउलट Colocynth या औषधाशी  आपण तयार केलेल्या लक्षणसमूहाची सगळीच लक्षणं जुळतात. त्यामुळे अशा पेशंटसाठी Colocynth चा विचार केला जाऊ शकतो. 

जुनाट आजार असलेल्या पेशंटची माहिती घेण्यासाठी होमिओपॅथीमध्ये काही वेगळे नियम आहेत. यामध्ये पेशंटच्या आजाराची सविस्तर माहिती घेण्यात येतेच, पण त्याशिवाय पेशंटच्या शारीरिक आणि मानसिक प्रकृतीचा ( Physical and  Mental Disposition ) देखील विचार केला जातो.आजार होण्याआधीची त्या व्यक्तीची मन:स्थिती/स्वभाव कसा होता आणि शारीरिक tendencies काय होत्या याचा विचार केला जातो. यातून एक व्यक्ती म्हणून पेशंट कसा होता हे ठरवले जाते. अशा व्यक्तीच्या या वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांना Constitutional Symptoms म्हटले जाते. होमिओपॅथीला आपण व्यक्तिनिष्ठ शास्त्र म्हटले आहेच. याचा आणखी एक अर्थ असा आहे की कोणताही आजार आधी त्या व्यक्तीला होतो आणि जर ती व्यक्ती त्या आजाराचा सामना करण्यास असमर्थ ठरली तर मग शरीरातील एखाद्या अवयव/संस्थेमध्ये तो आजार स्थिरावतो. The Individual is sick first and later on his Parts get sick. म्हणूनच अशा व्यक्तीची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे शोधून त्यांना अनुसरून औषध दिल्यास ते औषध (Constitutional Medicine ) आजाराच्या मुळाशी जाऊन पेशंटला बरे करण्यास सहाय्य करू शकते. अशा वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांमध्ये खालील लक्षणांचा समावेश असू शकतो. -
१) पेशंटची शीत /उष्ण प्रकृती 
२) पेशंटची खाण्या/पिण्याच्या चवींबाबत आवड/नावड 
३) काही प्रवृत्ती(Tendencies ) उदा- घाम येणे, उन्हाचा त्रास होणे, जखम लवकर बारी न होणे, जखमांचे डाग राहणे इत्यादी 
४) स्त्रियांमध्ये मासिक पाळीशी संबंधित लक्षणे 
५) पेशंटच्या आयुष्यात आलेल्या ताण -तणावांच्या  प्रसंगांतून दिसून आलेले टायच्या स्वभावाचे वैशिष्ट्य(Reactions to  stressful circumstances )
६) झोप/स्वप्नं 
जुनाट स्वरूपाच्या आजारासाठी दीर्घकालीन औषधयोजना करावी लागते त्यात औषधाची मात्र (potency) आणि ते कितीवेळा घ्यायचे (repetition) यात कालांतराने बदल करावे लागतात. याच अंकात वरीलप्रमाणे माहिती घेऊन वेदनेचा त्रास असलेल्या आणि होमिओपॅथिक उपचारांनी बऱ्या झालेल्या काही केसेसबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्यामधून वरील सर्व संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होईल. 

वेदनेच्या त्रासाचा आणखी एक प्रकार आहे. तो म्हणजे कॅन्सरसारख्या दुर्धर, असाध्य आजारांमध्ये जाणवणारी वेदना. अशाप्रकारची वेदना बरी होण्याची(Cure या अर्थाने ) शक्यता कमी असते. मात्र अशा आजारांमध्ये वेदनेची तीव्रता नक्कीच कमी करता येते. कॅन्सर सारख्या  पसरलेल्या आजाराने ग्रस्त असलेल्या पेशंटला अशावेळी constitutional medicine देणं कदाचित त्रासदायक ठरू शकतं. म्हणून केवळ वेदनेच्या लक्षणांनुरूप औषध दिले जाते (Superficially acting medicine ). याने वेदना कमी होतात आणि औषधाचा काही त्रास होत नाही. त्यामुळे ही उपचारपद्धती सुसह्य ठरते. अशा होमिओपॅथिक उपचारपद्धतीला Palliation असं म्हणतात. 

आतापर्यंत आपण होमिओपॅथिक डॉक्टर वेदनेचा त्रास असलेल्या पेशंटकडून कशाप्रकारे माहिती घेतात आणि त्या माहितीचे पुढे कशाप्रकारे विश्लेषण केले जाते हे बघितले. सध्याच्या कॉम्प्युटर युगाच्या परिभाषेत बोलायचं झालं तर पेशंटने सांगितलेली सर्व लक्षणे हा एक प्रकारचा डेटा आहे. या माहितीचे होमिओपॅथिक नियम-नियमावली प्रमाणे संकलन, विश्लेषण आणि तुलनात्मक मूल्यमापन केले जाते. म्हणजेच हे डेटा अनॅलिसिस झालं. यातून पेशंटच्या आजाराचे एक लक्षण-रुपी चित्र (Picture of Disease ) तयार केले जाते. 
होमिओपॅथिक औषधांची एकत्रित नोंद असलेल्या मटेरिया मेडिका या पुस्तकात हजारो औषधं आणि त्यांची लक्षणं असतात. हा सुद्धा डेटाच आहे! एवढ्या प्रचंड डेटा मधून पेशंटच्या लक्षणसमूहाशी (लक्षणरुपी चित्राशी) मिळतंजुळतं औषध शोधून काढणं हे एरवी खूप अवघड काम झालं असतं. पण होमिओपॅथीच्या अभ्यासकांनी यावर उपाय म्हणून Repertory हे पुस्तक तयार केलं आहे. यामध्ये औषधं आणि त्यांच्या लक्षांची पुनर्मांडणी केली आहे (Organization and Rearrangement of  data ) मन या विभागापासून ते Generalities अशा विभागापर्यंत शरीरातील सर्व संस्थांची लक्षणं यात आहेत. लक्षणं आणि त्यापुढे औषधं (म्हणजे एक प्रकारे मटेरिया मेडिकाच्या उलट पद्धतीने) अशी ही मांडणी आहे. Repertory मधील या लक्षणांना rubrics असं म्हणतात. पेशंटचं लक्षणरुपी चित्र एका विशिष्ट पद्धतीने मांडून (Repertorial Totality) त्यानुसार Repertory मधून  संदर्भ शोधल्यास हजारो औषधांना चाळणी लागून (Filter )  एकमेकांशी संबंधित औषधांचा एक छोटा समूह आपल्याला मिळतो. प्रामुख्याने Kent, Boenninghausen आणि Boger अशा तीन repertories प्रचलित असून पेशंटच्या लक्षणसमूहांत कोणत्या लक्षणांचे प्राबल्य त्यानुसार कुठली repertory वापरावी हे ठरवले जाते. Repertory चा असा वापर जुनाट आजारांसाठी लागणाऱ्या Constitutional medicine शोधण्यासाठी करू शकतो. तसेच तात्कालिक तीव्र त्रासासाठी देखील repertories मधून संदर्भ घेऊन आपण एका छोट्या औषधसमूहापर्यंत पोचू शकतो. 

आपण उदाहरणासाठी Kent Repertory मधील डोकेदुखी हा विभाग बघू. Head या विभागात Pain या शीर्षकाखाली इथे जवळपास १०० पानांमध्ये डोकेदुखीच्या वेदनेबद्दल सविस्तर आणि प्रदीर्घ वर्णन आहे. यातील छोटे छोटे rubrics बघून लक्षात येतं की वेदनेच्या सूक्ष्मात सूक्ष्म लक्षणांचा किती खोलात जाऊन विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ -
Head Pain, bending head backward while अशा rubric (लक्षणा) साठी सुमारे ३० औषधांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर याच्या उलट- 
Head Pain, bending head backward ameliorates (बरे वाटणे ) या rubric मध्ये १५ औषधं देण्यात आली आहेत. 
खाण्याअगोदर डोकं दुखत असेल तर वेगळी औषधं आहेत, खात असताना डोकं दुखत असेल वेगळी औषधं आहेत तर खाऊन झाल्यानंतर डोकं दुखत असेल तर आणखी वेगळी औषधं आहेत. 
याआधी म्हटल्याप्रमाणे Repertory चा उपयोग हा एखाद्या चाळणीप्रमाणे करून एका छोट्या औषधासमूहापर्यंत आपण येऊ शकतो. त्यापुढे पुन्हा मटेरिया मेडिकाचा वापर करून त्या औषध समूहापैकी एका अचूक औषधाची निवड करण्यात येते. वरील सर्व विवेचनावरून लक्षात येते की होमिओपॅथी हे एक Data Management चं शास्त्र आहे. 

सरतेशेवटी असं म्हणता येईल की होमिओपॅथिक उपचारपद्धती वेदना व्यवस्थापनासाठी एक परिणामकारक उपाययोजना ठरू शकते. होमिओपॅथीमध्ये वेदना व्यवस्थापनेबाबत एक सखोल आणि विशिष्ट विचार आहे. पेशंटच्या वेदनेचा इतक्या बारकाईने विचार फक्त होमिओपॅथीमध्येच केला जातो. वेदनेचे निवारण करणे म्हणजे लगेच त्यावर उपाय शोधणे नव्हे तर आधी ती वेदना समजून घेणे होय. वेदना समजून घ्यायची म्हणजे वेदनाग्रस्त व्यक्तीला समजून घ्यायचं . विविध प्रकारच्या व्यक्तींना समजून त्याआधारे योग्य ती औषधयोजना करणे फक्त होमिओपॅथीमध्ये शक्य आहे. वेदनेवर उपाय करणारी परिणामकारक औषध रूपी आयुधं होमिओपॅथीमध्ये आहेत.  औषधं देण्यासाठी एक ठराविक पद्धत आहे, त्यामागे एक शास्त्रशुद्ध पाया  आहे. त्या औषधांपर्यंत पोचण्यासाठी नेमक्या पायऱ्या आहेत, कार्यपद्धती आहेत. होमिओपॅथी आजाराच्या मुळाशी जाणारी औषधयोजना आहे. या उपचारपद्धतीचा फारसे दुष्परिणामही नाहीत. शिवाय बव्हंशी ती खिशाला परवडणारी आहे. असं असून देखील होमिओपॅथी वेदना व्यवस्थापनाच्या क्षेत्रात कुठेच का दिसून येत नाही? Pain management च्या integrated आणि holistic उपचारपद्धतीत होमिओपॅथीला दुय्यम स्थान का दिले जाते? किंबहुना काहीवेळा तर पूर्णपणे दुर्लक्षिले जाते असे का? एकूणच होमिओपॅथीबद्दल असलेली अनास्था हेच या अवहेलना आणि दुजाभावामागचे कारण आहे असं म्हणता येईल का? केवळ अनास्था वा दुजाभावच नव्हे तर मध्यंतरी होमिओपॅथिक औषध म्हणजे निव्वळ प्लॅसिबो आहे असं म्हणून होमिओपॅथीची चक्क खिल्ली उडवली जात होती. अशा सनसनाटी हेडलाईन आणि बातम्यांमुळे अकारण  होमिओपॅथीबद्दल संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. होमिओपॅथीला प्लॅसिबो म्हणताना प्रचलित उपचारपद्धती मात्र पेशंटवर औषधांचा भडिमार करून 'आजार परवडला पण त्यावरील उपचार नको' या स्थितीत पेशंटला आणून सोडते त्याचे काय? एखादी रेघ  मोठी आहे हे दाखवण्यासाठी  दुसरी रेघ  छोटी करणं कितपत योग्य आहे? जसं प्रचलित उपचारपद्धतीला स्थान आहे तसंच पर्यायी उपचारपद्धती देखील महत्त्वाच्या आहेत आणि शेवटी कुठला उपचार घ्यावा हे निर्णयस्वातंत्र्य पेशंटकडे आहेच! फक्त निर्णय घेताना पेशंटने तो साधकबाधक विचार करून घ्यावा ही अपेक्षा!