१
आम्ही बसने कोव्हेन्टरीला जात होतो. वाटेत असा एक क्षणही जात नव्हता की जेव्हा आम्हांला कुठे झाडं दिसली नव्हती. दुतर्फा उंचच उंच झाडं आणि बऱ्याच ठिकाणी छोट्या टेकडीवजा शेतजमिनी! या टेकड्या मात्र हिरव्या दिसत नव्हत्या. सध्या उन्हाळा असल्यामुळे शेतांमध्ये सगळीकडे वाळलेलं गवत/चारा दिसत होता. तो अतिशय पद्धतशीरपणे बॅरलच्या आकारात रचून ठेवला होता. हवाही आल्हाददायक होती. इंग्लिश कंट्रीसाईडचं हे दृश्य सुखावणारं होतं.
आम्ही इंग्लंडला गेलो होतो त्या सुमारास इंग्लंडच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घटना घडून गेल्या होत्या. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी फ्रान्सला नमवून इंग्लंडने तिसरा क्रमांक मिळवला होता. (अर्थात उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता हेही खरंच!) पण काही नाही तरी उत्तेजनार्थ बक्षीस इंग्लंडने कमावलं होतं. दुसरी घटना म्हणजे २० जुलैला इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून अँडी बर्नहॅम यांनी पदभार स्वीकारला होता. पण आमच्या या बस प्रवासातच काय, पुढील १५ दिवसांच्या काळात आम्हांला या दोन घटनांचे पडसाद उमटलेले कुठेही जाणवले नाहीत. ना कोणी त्यावर बोलताना ऐकलं ना कुठे- 'विश्वचषक फुटबॉल मध्ये तिसरा नंबर मिळाल्याबद्दल अभिनंदन हॅरी केन...शुभेच्छुक पॉल हॅरी, ख्रिस्ती सेवा मंडळ बर्मिंगहॅम' किंवा 'राजाचं राजपण काल पण..आज पण.. उद्या पण.. अँडिभाऊ तुच्यासाठी काय पण !' असे फ्लेक्सचे बॅनर दिसले ! म्हणजे लोकांपर्यंत या बातम्या खरोखरच पोचल्या होत्या ना असा प्रश्न पडावा इतके लोक आपापल्या जगात मस्त आनंदात जगत होते !
२
रॉयल लेमिंग्टन स्पा ! किंवा नुसतंच लेमिंग्टन स्पा ! लेम नदीवरील मोठा इतिहास असलेलं हे उच्च्भ्रू लोकांचं देखणं, आखीव रेखीव, टुमदार, छोटंसं शहर ! बघताक्षणीच प्रेमात पडावं असं!इथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. उत्तम बस सेवा आहे, रेल्वेद्वारे देखील इतर ठिकाणांशी ते जोडलेलं आहे. शहरात सर्व प्रकारचे मॉल्स, दुकानं, हॉटेल्स आहेत, जवळच असलेल्या रिटेल पार्क मध्ये तर Sainsbury's Superstore Marks & Spencer (including M&S Food hall and Café) The Range, Next, TK Maxx, Boots या सारखी मोठाली दुकानं आहेत. ऑटोमोबाईल, डिजिटल मीडिया, व्हिडिओ गेमिंग उद्योगाचे लेमिंग्टन स्पा हे महत्त्वाचे केंद्र आहे. या शिवाय इथे जेफसन गार्डन, व्हिकटोरिया पार्क अशा प्रशस्त बागा आहेत. या सर्वावर कडी म्हणजे इथे खूप निवांतपणा आहे, शांतता आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे सूर्यास्त रात्री ९-९.१५ वाजता होतो. एवढा मोठा दिवस सार्थकी लावण्यासाठी लोक हर तऱ्हेने प्रयत्न करताना दिसत आहेत. कोणी एकट्याने कोणी जोडीने वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करत आहे.. इथल्या (एकूणच इंग्लंडमधल्या) लोकांच्या फिटनेस बद्दलच्या जागरूकतेला खरोखरच सलाम करावासा वाटतो. आबालवृद्ध जमेल तसा जमेल तेवढा व्यायामच करताना दिसत आहेत. ज्यांना शक्य आहे ते पळत आहेत..कोणी सायकलिंग करत आहे.. तर बाकीचे चालत आहेत. इथे फिटनेसची संस्कृती आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. इथे बऱ्याच जणांकडे पाळीव कुत्रे आहेत. त्यांना घेऊन फिरायला जाणारे लोक हे दृश्य तर अगदी रोजचेच! किती वेगवेगळ्या जातींचे श्वान इथे बघायला मिळाले याची गणतीच नाही ! उन्हाळा मुबलक असतो म्हणून आपण ऊन गृहीत धरतो पण उन्हाचा कालावधी इथे कमी असल्याने ' Make hay while the sun is shining' या उक्तीचा प्रत्यय इथे दररोज बघायला मिळत आहे . इथल्या परेड स्ट्रीट वर सकाळी सकाळी अगदी म्हातारे-कोतारे देखील ठेवणीतले उन्हाळी हवामानाला साजेसे कपडे घालून, नीटनेटका नट्टापट्टा करून फिरायला आलेले दिसत आहेत . यात काही असेही आहेत जे अपंग आहेत . तरी ते आपल्या जोडीदाराबरोबर व कधी एकट्याने देखील व्हील चेअर वरून फिरत आहेत. त्यांच्यातला हा उत्साह एखाद्याचं नैराश्य अक्षरश: पळवून लावेल इतका संसर्गजन्य आहे.
३
इंग्लंडच्या जवळपास सर्वच गोष्टींना इतिहास आहे तसा तो लेमिंग्टन स्पा ला देखील आहे. इथल्या पाण्याला औषधी गुणधर्म आहेत म्हणून अठराव्या शतकात ही जागा नावारूपास आली. मग खास आंघोळ करून आपले आजार दूर करण्यासाठी इथे लोक येऊन राहू लागले. अशा तऱ्हेने इथे स्पा चा एक व्यवसायच उभा राहिला! उच्च्भ्रू आणि प्रतिष्ठित लोक इथे राहू लागले. तेव्हाची राणी व्हिकटोरिया १८३८ मध्ये इथे आली होती आणि तिनेच गावाचं रॉयल लेमिंग्टन स्पा असं नामकरण केलं. एकोणिसाव्या शतकानंतर स्पा उद्योग मागे पडला आणि मग हे शहर पेन्शनरांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले.
लॉन टेनिस या खेळाच्या इतिहासाशी देखील लेमिंग्टन स्पा जोडलं गेलेलं आहे. जगातील पहिला टेनिस क्लब १८७२ साली मेजर हेन्री जेम आणि ऑग्यूरो परेरा यांनीही इथे स्थापन केला. आधुनिक टेनिस या खेळाचे नियम देखील इथेच १८७४ साली राबविण्यात आले. मॅनॉर हाऊस हॉटेलच्या आवारात पूर्वी एक बाग होती. तिथे या क्लबची स्थापना झाली. आमच्या ट्रिपच्या पहिल्याच दिवशी आम्ही ही जागा पाहिली. आता तिथे एक अस्पष्ट असा नामफलक लावण्यात आलेला आहे.
2 comments:
Sunilapte@0101@gmail.com
अरे व्वा मस्त! भाग २ वाचून आता भाग ३ ची उत्पसुकता आहे. फ्लेक्स मी imagine करायला लागलो.😀
Post a Comment