१
आम्ही लंडनला सकाळीच पोचलो होतो. आमच्या Air bnb चं check in दुपारी ३ वाजता होतं. आमच्याकडे मोठाल्या बॅगा होत्या. पण व्हिक्टोरिया कोच स्टेशन (बस स्टेशन, जिथे आमची बस कॉव्हेन्टरी वरून आली ) वर आपल्या बॅगा ठेवण्याची सोय (अर्थातच चार्जेबल) आहे. त्यामुळे आम्ही check in आणि check out अशा दोन्ही दिवशी या सुविधेचा वापर केला. ३-३ तासांच्या स्लॉट प्रमाणे इथे बॅगा ठेवता येतात. पहिल्या दिवशी लंडन दिवसभर फिरल्यानंतर इथून आमच्या Battersea भागातील Air bnb पर्यंत जाण्यासाठी आम्ही Uber केली कारण एवढं सामान नेण्यासाठी दुसरा काही पर्याय नव्हता. व्हिक्टोरिया बस स्टेशनच्या समोरच सिग्नलजवळ आम्ही थांबून Uber केली. लगेच टॅक्सी आली. सिग्नलजवळ जास्त वेळ थांबता येत नसल्याने ड्रायव्हर आम्हांला लवकर सामान ठेवून बसायची खूप घाई करत होता. तेव्हा तो थोडासा रागावलाच होता असं आम्हांला वाटलं. वाटेत ड्रायव्हर बरोबर आमच्या गप्पा सुरू होत्या. आधी आम्ही त्याच्याशी इंग्रजीत बोलत होतो. त्याला इंग्रजीत इतकंही चांगलं बोलता येत नव्हतं. त्याचं दिसणं, पेहराव आणि भाषेच्या लहज्यावरून तो पाकिस्तानी असावा असं वाटलं. मग मी हिंदीत बोलायला सुरुवात केली. मात्र आमच्या बोलण्यात उगाचच एक अंतर होतं. आम्ही दोघेही एकमेकांची चाचपणी करून बोलत होतो. तो गेली १६ वर्षं इथे राहतोय असं समजलं. नंतर तो एकदम अदबीनं म्हणाला- "बुरा ना मानिए तो आपसे एक बात कहू?" मनात आलं आता हा काय बोलणार..तर म्हणाला - "आप अगर टॅक्सी बुक करना चाहते हैं तो आप सिग्नल के पास मत रुकिये. वहां कोई टॅक्सी आयेगीही नहीं. क्योंकि उधर रुकेंगे तो कॅमेरेमें फोटो निकलेगा और हमें फाईन भरना पडेगा " एवढ्या मृदू आवाजात आणि अदबीने टॅक्सी/रिक्षावाले यासारखे लोक्स बोलतात हा एक मोठाच धक्का होता.आपल्याकडचे काय अनुभव असतात हे सांगायला नकोच! पुढे इतर गप्पा झाल्या. त्याने आम्ही कधी आलो काय काय बघितलं ते विचारलं. Lake District बघितलं असं सांगितल्यावर म्हणाला- "हां वो कश्मीर जितनाही सुंदर हैं." त्याच्या लोकेशन नुसार त्याने आम्हांला एके ठिकाणी सोडलं पण तिथे आमचं राहण्याचं ठिकाण आहे असं वाटत नव्हतं. सगळीकडे सारख्याच इमारती होत्या पण 'आमचं घर' काही सापडत नव्हतं. शिवाय तिथे वन-वे होता. त्यामुळे त्यालाही गाडी जास्त फिरवणं शक्य नव्हतं. म्हणून मग आम्ही सामान उतरवून टॅक्सी सोडली. निघताना मी त्याला म्हणालो- " आपने जिस अदब के साथ बात की वो हमें बहुत अच्छा लगा " मग तोही म्हणाला- "आप लोग भी बहुत अच्छे हैं" तर अशा प्रकारे आमचा 'अमन की आशा' चा एक छोटा कार्यक्रम झाला !
नंतर एकदा Uberचा ड्रायव्हर इराणी होता. त्याच्या गाडीत I Love Iran आणि इराणचा झेंडा तसंच Free Palestine असं स्टिकर होतं. वयाने तिशी-चाळिशीचा होता पण त्याच्या गळ्यात कुठल्याशा युनिव्हर्सिटीचा बॅज होता. शिकत होता की काय माहित नाही. पण हा ड्रायव्हर अजिबात बोलका नव्हता. अगदी जेवढ्यास तेव्हढं बोलायचा. लंडनमध्ये काही बांगलादेशी पण दिसले. व्हिक्टोरिया बस स्थानकावर असलेल्या Subway मधले सगळे कामगार बांगलादेशी होते. आणि तिथे कस्टमरची गर्दी असल्याने अगदीच भंजाळलेले होते. आम्ही लंडनला Amorino Italian Gelato खाल्लं तिथले कर्मचारी पाकिस्तानी वाटले. आणखी एका Subway मध्ये आश्चर्याचा धक्का म्हणजे सगळे कर्मचारी भारतीय होते. पण तिथेही गर्दीच एवढी होती की त्यांच्याशी बाकी काहीच बोलता आलं नाही.
२
गुगलवर सहज शोध घेतला असता समजलं की एकट्या लंडनमध्ये ऐतिहासिक, वैज्ञानिक, भौगोलिक, कला-सांस्कृतिक इ विविध विषयांना वाहिलेली २५० पेक्षाही जास्त संग्रहालयं आहेत! एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे संग्रहालयं का असावीत? माझ्यामते यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे खूप काळापासून इथे असलेली वैज्ञानिक बैठक/ पाया हे आहे. इथल्या राजेशाहीने आणि अनेक धनिकांनी विज्ञान, संशोधन आणि प्रबोधन या सारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड आर्थिक गुंतवणूक केली. लोकशाही प्रस्थापित झाल्यानंतर इथल्या सरकारांनीही यात आपला वाटा उचलला. वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याने इथे दस्तावेजीकरणाला खूप महत्त्व प्राप्त झाले असावे. इंग्रजांनी भलेही जगभर राज्य केले, अनेक देश लुटले . परंतु तो लुटलेला ऐवज आपल्या देशात नेऊन त्याचे व्यवस्थित जतन केले आणि प्रत्येक वस्तूची नोंदही ठेवली. यामुळेच त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर शतकानुशतकांच्या वस्तूंचा साठा आहे. हे सर्व करण्याची शिस्त आणि दृष्टी आहे. म्हणूनच ते इतिहास आणि एकंदरीत मानवी प्रगतीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊ शकले आणि या संग्रहालयांमार्फत आपल्यापर्यंतही पोचवू शकले. इंग्रज इतिहास, कला, साहित्य संस्कृती याकडे भावनिकतेने न बघता बुध्दिने बघतात . हा एक आदर्श वस्तुपाठच आहे असं मला वाटतं. इथल्या संग्रहालयांचं वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश ठिकाणी सरकारी पाठबळ असल्याने तिथे मोफत प्रवेश आहे.
एवढ्या साऱ्या संग्रहालयांपैकी आमच्या लंडनमधील वास्तव्यात आम्ही फक्त ३ संग्रहालयंच बघू शकलो. त्यातही हीच का बघितली, अन्य का नाही याला काही उत्तर नाही. पहिलं संग्रहालय- National Gallery हे तर आम्हांला अपघातानेच सापडलं. Trafalgar Square ला गेलो असताना त्याच्या मागेच ही भव्य इमारत कुठली असा प्रश्न आम्हांला पडला म्हणून ती बघायला गेलो तर ती National Gallery होती.
हा फोटो गुगलवरून साभार
याची स्थापना १८२४ साली झाली असून यात तेराव्या शतकापासून ते १९०० सालापर्यंतच्या विविध चित्रकारांची सुमारे २३०० पेंटिंग्ज आहेत. चित्रांचा संग्रह जरी असला तरीही तो बघण्यासाठी इथे प्रचंड गर्दी होती. मला सांगायला लाज वाटते की चित्रकला या क्षेत्रातलं मला काहीच कळत नाही. संग्रहालय बघायला आलेल्या लोकांची यातील आवड, जाण आणि जिज्ञासा बघून मी आणखी खजील झालो. पूर्व आशियायी देशांतील अनेक लोक इथे इतक्या एकचित्ताने प्रत्येक चित्राचा अभ्यास करत होते की काही विचारायची सोया नाही! आमची मजल फक्त काही सुप्रसिद्ध चित्रकारांची नावं आणि त्यांची काही मोजकी चित्रं माहित असण्यापर्यंतच ! त्यामुळे तिथे आम्ही ती आहेत का हे शोधलं. तर ते चित्रकार सापडले आणि त्यांची काही चित्रंही ! या संग्रहालयाचे मी काढलेले काही फोटो -
The raising of Lazarus (Sebastiano del Piombo) (1517-1519)
हे या संग्रहालयात १८२४ साली जमा झालेलं पहिलं पेंटिंग आहे.
The Entombment -Michelangelo (Burial of Jesus) (Painting date1500-1501)
Long Grass with Butterflies (Vincent Van Gogh)(1890)
Chair (Vincent Van Gogh)(1888)
Two Crabs (Vincent Van Gogh)(1889)
Enclosed Field with ploughman (Vincent Van Gogh)(1889)
काही काही चित्रं तर फोटो काढले आहेत अशी वाटत होती. -
Memorial Service for Kaiser Friederich (Max Liebermann)(1888)
या सगळ्यात लक्षवेधक हे चित्र होतं -
Whistlejacket(George Stubbs)(1762)
हे साधारण ३ मीटर x २.५ मीटर चं भव्य पेंटिंग आहे. यातील घोड्याची उडी किती जिवंत वाटत आहे. आणि त्याचा डोळाही !
दिवसभर आणखी बऱ्याच गोष्टी बघायच्या असल्यामुळे हे संपूर्ण संग्रहालय आणखी वेळ देऊन बघता आलं नाही याची हळहळ वाटली.
३
आम्ही नैऋत्य लंडन भागातील एका टेकडीवर असलेली Royal Observatory ग्रीनिच (Greenwich ) देखील बघितली. हे मात्र मोफत नाही. पण बघण्यासारखं आहे.
दारातच हे ऐतिहासिक Shepherd Gate Clock बसवण्यात आलं आहे. हे १८५२ साली Charles Shepherd ने इथे बसवलं. सार्वजनिकरित्या GMT (Greenwich Mean Time) दाखवणारं हे पहिलंच घड्याळ आहे. यात २४ तासांचे आकडे रोमन लिपीमध्ये आहेत. तसंच हे घड्याळ संपूर्ण वर्ष GMT दाखवते. इंग्लंड मधील उन्हाळ्याप्रमाणे हे वेळ बदलत नाही.
ही Royal Observatory ची इमारत आहे. इमारतीच्या छतावर लाल रंगाचा मोठा Time ball दिसत आहे. हा १८३३ साली इथे बसवण्यात आला. नाविकांना कालमापनाच्या दृष्टीने याचा उपयोग होतो.
हीच ती Prime Meridian Line जी जगाला पूर्व आणि पश्चिम गोलार्धात विभागते. ही रेषा आधार पकडून पूर्व किंवा पश्चिम दिशेचे अंतर आणि वेळ मोजता येते.
वर जी इमारत आहे ती Flamsteed House आहे. १६७५-७६ साली बांधलेली ही इमारत अजूनही चांगल्या प्रकारे राखून ठेवण्यात आली आहे. John Flamsteed हा पहिला Astronomer Royal इथे राहून काम करायचा. वरच्या मजल्यावर एक अष्टकोनी खोली आहे जिथून आकाशनिरीक्षण केलं जायचं
अष्टकोनी खोलीचं छत
तर खालच्या खोल्या या निवासासाठी वापरल्या जात.
Flamsteed ने ४० वर्षं अथक परिश्रमाने त्याच्या टेलिस्कोपच्या आणि अचूक घडाळ्याच्या मदतीने ब्रिटन मधील ताऱ्यांचा प्रवास अचूक मोजला.
कालमापनाचा इतिहास आणि त्याचा प्रवास इथे बघायला मिळतो. उदाहरणार्थ -
हे Mural Quadrant आहे ज्याच्या साहाय्याने पूर्वी रेखांश (Longitude) शोधला जात असे.
इथे काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे फोटोही पाहायला मिळाले. उदा- हा युरेनस ग्रहाचा शोध लावणाऱ्या विल्यम हर्शेल यांचा फोटो.
तर या खालच्या फोटोत डावीकडे आहेत जॉन ब्रॅडली आणि उजवीकडे आहेत एडमंड हॅले. एडमंड हॅले यांनी सुप्रसिद्ध हॅले धूमकेतूचा शोध लावला होता आणि त्याचा मार्गही शोधला होता.
प्रयोग करत करत, चुकांमधून शिकत हे सर्व शास्त्रज्ञ झटले आणि त्याचा परिणाम म्हणून आपण आज स्थळ-काळाच्या बाबतीत इतके अचूक झालो आहोत. याचा उपयोग दळणवळण, GPS mapping, हवामान, वाहतूक अशा कितीतरी क्षेत्रांत आपण करत असतो. त्यामुळे या सर्व ज्ञात-अज्ञात शास्त्रज्ञांना सलाम करून आम्ही इथून बाहेर पडलो.
४
आम्ही ग्रीनिचला एक दिवस गेलो होतो तर National Gallery आणि Natural History Museum एकाच दिवशी बघितली. दोन्ही मोफत आहेत तरीही ऑनलाईन बुकिंग केल्यास प्रवेशासाठी रांगेत थांबावं लागत नाही. तिकीट दाखवून थेट प्रवेश मिळतो.
हा फोटो गुगलवरून साभार
या संग्रहालायचं एकाच शब्दात वर्णन करायचं झालं तर अद्भुत असंच करावं लागेल. इथे
वनस्पतिशास्त्र(Botany), कीटकशास्त्र(Entomology), खनिजशास्त्र(Minerology), जीवाश्मशास्त्र(Palaentology) आणि प्राणीशास्त्र(Zoology) अशा पाच प्रमुख वर्गांत मिळून सुमारे ८ कोटी वस्तूंचा संग्रह आहे. हे संग्रहालय वर्गीकरणशास्त्र(Taxonomy), ओळख आणि संवर्धन या क्षेत्रांत विशेष प्राविण्य असलेले संशोधन केंद्र आहे.या संग्रहालयात नैसर्गिक इतिहासाच्या विविध क्षेत्रांतील नमुन्यांचा(Specimen) विस्तीर्ण संग्रह आहे.इथे भूकंप, ज्वालामुखी यासारख्या नैसर्गिक घटनांविषयी सविस्तर आणि शास्त्रीय माहिती देण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भूकंपामुळे झालेली मनुष्यहानी आणि नुकसान याविषयी फोटो आहेत. तसंच एके ठिकाणी आपल्याला भूकंपात नक्की काय होतं हे सिम्युलेशन द्वारे दाखवलं जातं. संग्रहालयात विविध प्रकारची खनिजं आणि मौल्यवान खडे देखील आहेत. यामध्येच आश्चर्याचा सुखद धक्का देणारी एक गोष्ट बघितली-
पुण्याजवळील वाघोलीतील एका खाणीत सापडलेलं हे दुर्मिळ खनिज- Cavansite. यामध्ये Calcium (Ca ) Vanadium (Va) आणि Silica (Si ) ही तीन खनिजं असतात आणि यांची नावं एकत्र करून Cavansite हा शब्द तयार करण्यात आला आहे.
मानवाची उत्क्रांती कशी झाली हे सांगणारा एक विशेष विभाग इथे आहे.
मानवाच्या कवटीत काळानंतर कसे बदल होत गेले हे दर्शवणारी एक भिंतच इथे आहे-
इथली काही विशेष आकर्षणं आहेत-
१) Sophie -Stegosaurus या डायनासॉरस चा सांगाडा! २००३ साली अमेरिकेत व्योमिंग इथे हा सापडला असून तो जवळजवळ पूर्ण सांगाडा आहे.
२)
दीडशे दशलक्ष वर्ष जुना पण आपल्याला नव्याने सापडलेला हा डायनासॉरसचा सांगाडा- Enigmacursor Mollyborthwickae
३) जिराफचा पूर्ण सांगाडा -
४) Blue Whale या देवमाश्याचा अजस्त्र सांगाडा-
उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणाऱ्या शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन याचा इथे पुतळा आहे. त्याने अभ्यासलेल्या वस्तूदेखील इथे ठेवण्यात आल्या आहेत. एकूण हे संग्रहालय बघणं हा खूप काही शिकवून जाणारा अनुभव होता.
५
लंडनमध्ये फिरायचं म्हणजे खूप पायपीट करावी लागते. शिवाय ही अशी संग्रहालयं बघणं म्हणजे खूप वेळ उभं राहावं लागतं. त्यासाठी स्पोर्ट शूज असणं अत्यंत आवश्यक. एवढी दमणूक झाल्यानंतर आमच्या Air bnb वर परतून तिथे नुसतं पहुडणं हे अतिशय सुखद होतं. सर्व सुखसोयींनीयुक्त असलेलं हे घर होतं. त्याचे काही फोटो-
(क्रमश:)