Monday, 16 September 2013

तुम्ही 'कास' ला (प्लीज) जाऊ नका. . ...


काल कास पठारावर फुलं पहायला गेलो होतो. याआधी आम्ही २०१० साली गेलो होतो त्यानंतर ठरवलं की इतक्यात काही परत जायचं नाही. आता ३ वर्षांनी गेल्यावर पुन्हा हेच वाटतंय ! म्हणजे फुलं नव्हती म्हणून असं म्हणतोय का - तर नाही. . . रग्गड फुलं पाहिली . . . अगदी डोळे भरून ! नयनरम्य/नयनमनोहर/नेत्रसुखद वगैरे सगळी विशेषणं अनुभवली. . . पण . . . तिथे पोचेपर्यंतचा प्रवास . . . ती गाड्यांची भीषण गर्दी.  तो भयाण ट्राफिक जाम . . काहींचे भयंकर ड्रायव्हिंग. .  सगळं भयानक होतं. . . तिथे जी काही व्यवस्था होती ती या गर्दीमुळे पार कोलमडून गेली. आम्हांला वाटलं की गणेशोत्सव आहे . . . लोकं गणपतीत दंग असतील. . त्यामुळे कासला कोण जाईल ? पण आमच्यासारखाच स्मार्ट विचार करणारे हजारो लोक होते. आता आपल्याकडे गर्दी म्हणजे  हौशे/गवशे /नवशे असतात. ते इथेही पाहायला मिळाले-
१) एक हिरो फुलांच्या ताटव्यात आपला पृष्ठभाग टेकवून, उसेन बोल्टची जग जिंकल्याची पोझ देत फोटो काढून घेत  होते.
२) एक आजोबा हातात रानहळदीचे फूल मशाल घेतल्याप्रमाणे मिरवत होते. त्यांचा फोटो काढताहेत म्हटल्यावर लगबगीने आजीसुद्धा त्यांच्याकडची फुलं घेऊन फोटोत येत्या झाल्या .
३) कानामागे सुतार लोक पेन्सिल लावतात तशी  फुलं लावून कुणी हिंडत होते.
आम्ही फुलावर पाय पडू  नये म्हणून  इतके काळजीपूर्वक, खाली मान घालून चालत होतो . . .  पण बाकीचे अगदी निवांत जात होते . . . बेधडक आमच्या हृदयाचा ठोका चुकवत . . . फुलं पायदळी तुडवत !
४) एका लहान मुलीला तिच्या आई-वडिलांनी शिक्षा म्हणून उपाशी ठेवले होते कि काय माहित नाही पण ती चक्क फुलं खात होती. आई शप्पथ ! अजिबात खोटं नाहीये हे ! 
५) चॉकलेटचे wrappers, प्लास्टिक पिशव्या,बाटल्या सगळं काही सगळीकडे  पसरलेलं होतं . . 
६) जिथे नो पार्किंग झोन होता तिथेच शेकडो गाड्या लावून शांतपणे लोक फुलं बघायला निघून जात होते. नियमांची ऐशीतैशी त्या ! जिथे प्रवेश निषिद्ध होता तिथे मुद्दाम जात होते . . 

हे सगळं आजूबाजूला घडत असताना, त्यामुळे चिडचिड होत असताना डोळ्यांना सुखावणारी फुलं आणि अंगाला/ मनाला ताजातवाना करणारा आल्हाददायक, गार वारा असं मात्र छान रसायन होतं. . . पार्किंग पासून पठारापर्यंत चालत जाण्याचा शीण या वाऱ्याने  कुठल्याकुठे पळाला. . . कास तलाव, तिथले हिरवे डोंगर, उतरलेले ढग. .  प्रसन्न वाटलं! 
ही  सोनकीची फुलं !

आणि हा लाल तेरडा ! याचं शास्त्रीय नाव - Impatiens oppositifolia ! Impatiens हे जर अधीर या अर्थाने नाव असेल तर ते अगदी समर्पक आहे. . . उमलण्यासाठी अधीर . . जिथे जागा मिळेल तिथे येण्यासाठी अधीर . . . क्षणभंगुर आयुष्यात स्वतः आनंद घेत . .  दुसऱ्यालाही तो देण्यासाठी !
 

मराठीत काही नावं खूप छान वाटतात- आता याच फुलाचं पाहा- याचं नाव आहे सीतेची आसवं! या फुलावरील पांढरा ठिपका अश्रू सारखा दिसतो म्हणून हे नाव दिले असावे.इथे तेरड्याच्या बरोबरीने ही फुले दिसत आहेत-
 


ही पांढरी फुलं आहेत- Eriocaulon sedgwickii. . . . 
तेरड्याचा लाल रंग, सोनकीचा पिवळा, सीतेची आसवं निळसर 
जांभळी आणि या सगळ्याचा समतोल साधणारा पांढरा रंग !
 


हे असं vanilla ice cream उधळलेलं पाहूनच कदाचित त्या मुलीला ही फुलं खावीशी वाटली असतील !
 




 

या पिवळ्या फुलांना कावळा म्हणतात! एका लाजऱ्या आणि साजऱ्या  फुलाला कावळा का बरं म्हणत असावेत कोण जाणे?
 

या छान तुर्रेदार फुलांचं नावही भारदस्त आहे- Pogostemon deccanensis !
 

या झुडपांना फुलं नाहीत. कारण फुलं येणं ही यांची सप्त-वार्षिक योजना आहे . आम्ही २०१० मध्ये आलो होतो तेव्हा याची फुलं होती .म्हणजे आता पुन्हा भेट २०१७ ?हेच ते (टोपली ) कारवी !
 

या नाजूक फांदीच्या आणि फुलांच्या झाडाचं नाव बहुदा-Oldenlandia corymbosa आहे -
 

हे ही त्याच प्रकारचं । पण तेच नसावं ! हे चिंचुर्डी आहे का?-
 


हा फुलांचा आडवा दांडा म्हणजे बहुदा-Peristylus densus असावा - 
 


आणि ही रानहळद !-
 


तर ही आणि अशी आणखी काही फुलं पाहायला मिळाली. 
कास पठार हे युनेस्को घोषित World Natural Heritage site आहे त्यामुळे त्याचे जतन व्हावे या साठी खरोखरच सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. वर्तमानपत्रात याची सालाबादप्रमाणे फोटोरूपी 
जाहिरात आलीच नाही तरी या गर्दीला थोडा आळा बसेल. तिथे न जाणं हाच त्यावरचा सर्वोत्तम संवर्धनाचा मार्ग आहे  असं मला वाटतं. आपण न जाऊन गर्दी थोडीच कमी होणार आहे असाही विचार येऊ शकतो मनात! पण तरीही मी अगदी कळकळीची विनंती करतो की तुम्ही तिथे जाऊ नका आणि अशाप्रकारे हे कासचं नाजूक सौंदर्य आपण पुढच्या पिढीसाठी राखून ठेऊया ! तुम्ही जाऊ  नये म्हणून तर तुम्हांला ही सफर घडवली !
(आम्हीही २०१३ सालानंतर परत गेलेलो नाही !) 

(फोटोग्राफर- वृंदा पुसाळकर, स्मृती पुसाळकर )
 व फुलांच्या नावासाठी संदर्भ -  Flowers of Kas हे श्रीकांत इंगळहळ्ळीकर लिखित पुस्तक)




8 comments:

Anonymous said...

Pratekane jar niyam palun Kas pathar pahila tar jayala kahich harkat nahi.. ani Photo pahnyapeksha pratksha phule pahayla saglayana nakkich awdel

Rajesh Pusalkar said...

@Anonymous- Agreed! But what I wanted to emphasize is that Kas is not the usual Bhushi Dam type picnic spot. But unfortunately, people treat it that way. And generally when a person goes for picnic, the tendency is to be adventurous/ be in high spirits(not necessarily literally!) So rules take a back seat. But you are right- if it comes from within, then there should not be a problem!

vaishali said...

Marmik lihile ahes👌

vaishali said...

Var question mark disat ahe Karan , emoji cha prob distoy. Actually the sundar asa emoji ahe

Rajesh Pusalkar said...

@Vaishali- Thanks for the comment...

Unknown said...

Blog chan. Sarv points patanare. Gardi vadhat geli tar picnicspot banat gela tar phule kami hot akheris pathar rahil

शितल said...

विचार करण्यास लावणारा मार्मिक लेख आहे.
दुबई मध्ये Dec ते April मध्ये फक्त फुलांचा अन फुलपाखरांचा आनंद लोकांना मिळावा म्हणून तिथे पैसे मोजून जावे लागते Miracle garden..
तिथे जाणारे लोक प्रत्येक फुलाची फुलपाखरांची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजीही घेतात.
आपल्याकडे निसर्गाने भरभरून दान दिलेले Kas Miracle अगदी मोफत असूनही ही अवस्था फक्त लोकांच्या वागणुकीमुळे..
कासपठार बद्दल फक्त ऐकून होते पण लेख वाचून घरूनच सर्व फुले पाहायला मिळाली
thanks for perfect clicks with names..
(4 th point) मुलगी फुले खात होती
really felt restless

Rajesh Pusalkar said...

Thank you Sheetal for your comment. I am so sorry that I saw your comment so late(after 3 years!). But better late than never!! Thanks for reading my blog.