Wednesday 25 September 2013

' लता-वसंत' पर्व

   


ज्यांच्या गाण्याने  भरभरून आनंद मिळाला आणि मूड कुठलाही असो ज्यांची गाणी ऐकल्यावर नेहमीच शांत, सात्विक समाधान मिळालं अशा लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त (२८ सप्टेम्बर )आज एका काहीशा मागे पडलेल्या वसंत प्रभूंबरोबरच्या त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी थोडेसे -


भावगीतातील  वैभवशाली असे 'वसंत पर्व' लता आणि वसंत प्रभू या जोडीच्या  गाण्यांमधून दिसते. बऱ्याच अंशी पी. सावळाराम यांचे शब्द, त्यावर प्रभूंनी केलेले  लता यांच्या आवाजाचे कोंदण असा छान त्रिवेणी संगम या  गाण्यातून दिसून येतो. स्त्रीच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांवर आधारित व  सोप्या  शब्दांत भाव पोचवणारी ही गाणी म्हणूनच लोकप्रिय झाली. 'लेक लाडकी या घरची' हे लग्न ठरलेल्या मुलीच्या मनातील भाव व्यक्त करणारे गाणे, 'गंगा यमुना डोळ्यात उभ्या का' असं लग्न झालेल्या मुलीला निरोप देतानाचे गाणे किंवा 'बाळा होऊ कशी उतराई' हे एका आईने व्यक्त केलेली भावना दर्शवणारे गाणे ! सर्वसामान्य आयुष्यातील हे महत्त्वाचे टप्पे ! सहज ओठावर रूळतील असे शब्द, कमीतकमी वाद्यमेळ आणि लता मंगेशकर यांचा तो बहरत्या काळातला आवाज! यामुळे अशाप्रकारची अनेक प्रासादिक गाणी जन्माला आली. लोकांना ती आपलीशी वाटली आणि त्या काळी रेडिओ व्यतिरिक्त फारसे इतर माध्यम नसताना देखील ती खूप लोकप्रिय झाली. सुधीर फडके, श्रीनिवास खळे, सी. रामचंद्र, वसंत देसाई, वसंत पवार यासारख्या संगीतकारांच्या ऐन बहराच्या काळात यामुळेच वसंत प्रभू आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करू शकले ! त्यांच्या गाण्यांची ही लिंक देत आहे. ही ऑडिओ लिंक आहे. चक्क रेडिओच आहे हा . त्यामुळे नोस्टाल्जियाचा ही आनंद ! 

No comments: