हिंदी सिनेमांत असा प्रसंग अनेक वेळा बघायला मिळतो . अर्थात मी आमच्या वेळच्या सिनेमांबद्दल बोलतोय.(म्हणजे अगदी इसवीसनापूर्वी नव्हे पण तरीही त्या मानाने जुन्याच!) सध्याच्या नाही. म्हणजे असं असतं की कोणाच्या (हिरोईन किंवा तिची मैत्रीण) तरी घरी पार्टी असते .छान वातावरण असतं. अर्थातच पार्टीला साजेसे कपडे असतात. उंची खाणं/पिणं . . . हसणं-खिदळणं . . . कधीकधी नाचणं देखील ! मग अचानक सगळ्यांना शांत बसण्याची सूचना दिली जाते आणि कोणीतरी हिरोला गाणं म्हणण्याची विनंती करतं.हिरो महाशयांना या पार्टीच्या निमित्ताने एक नामी संधी मिळते - जिच्यावर मी (म्हणजे हिरोने!) एवढं नि:स्वार्थी, निस्सीम, निरतिशय वगैरे प्रेम केलं, ती कशी 'बेवफा' निघाली! हिरो गाणं सुरू करतो आणि सगळे एकदम चिडीचूप ! आधीचा सगळा तो मूड . . . तो माहोल . . सगळं गायब. . . हिरो आपल्या शब्दांच्या करामतीतून सूचकपणे किंवा कधी कधी उघडपणे जी कैफियत मांडतो ती सगळे अगदी मनोभावे तल्लीन होऊन ऐकू लागतात.कोणीही त्याला थांबवत नाही- " अरे आम्ही कशासाठी आलो आणि तू हे काय रडगाणं गातोयस?" असं विचारतही नाही . क्वचित दोघांची एखादी कॉमन मैत्रीण सूचक हसते किंवा ती जर 'खल-प्रवृत्तीची ' असेल तर तिला अगदी आनंदाच्या उकळ्याच फुटतात! हिरोला मिळवण्याच्या तिच्या मार्गातला हिरोईन नामक काटा दूर झाल्याचा तो आनंद असतो. पण हिरोचं गाणं चालू राहतं. माझ्या (म्हणजे हिरोच्या !) 'अशा प्रेमाचा तू स्वीकार का केला नाहीस ? आता या प्रेमभंगामुळे मी 'गम' मध्ये बुडून जाईन' वगैरे वगैरे . . . .
अशा सुरुवातीला आनंदी वातावरण पण नंतर सॅड प्रसंगातील गाणी मात्र खूप छान असतात. कित्येकदा ही गाणी या पार्श्वभूमीचा विचार न करता ऐकली किंवा ती जर माहीतच नसताना ऐकली तर ती रत्नजडित खजिन्यासारखी वाटतात. अशी गाणी आधी ऐकली आणि नंतर त्याचे दृश्य स्वरूप पाहिले की केवढी निराशा होते ! याचे एक अस्सल उदाहरण तुम्हांला सांगतो - कोणे एके काळी 'हवस' नावाचा सिनेमा आला होता. अनिल धवन आणि नीतू सिंग यांचा. सध्याच्या पिढीला हे अभिनेते ओळखण्याची/लक्षात ठेवण्यासाठी एक क्लू म्हणजे- वरूण धवनचे काका आणि RK ची आई ! तर त्यात एक अप्रतिम गाणं होतं - 'तेरी गलियो में ना रखेंगे कदम आज के बाद.. . ' संगीतकार उषा खन्ना, गायक मोहम्मद रफी ! साधे सोपे शब्द, दर्दभरी चाल. . . interlude संगीतही छान. . तेरी गलियो में या पहिल्या ओळीच्या ( आणि नंतर कडव्याच्या शेवटीही ) मागे मागे जे व्हिसल ऐकू येतं ते खूप छान वाटतं . रफीच्या आवाजाने या गाण्याचे सोने केले आहे. या गाण्याची लिंक देत आहे. मात्र मी सल्ला देईन की आधी ते फक्त ऐका आणि मग व्हिडीओ पाहा. . .
व्हिडीओ विनोदी आहे आणि हे मी फारच सौम्यपणे म्हणतोय. या सिनेमाच्या ड्रेस डिझायनर, हेअर डिझायनर, मेकअप मन यांना अजूनपर्यंत कोणी विशेष पुरस्कार दिला नसेल तर तो जरूर द्यावा असं मला वाटतं. पण सगळ्यात मोठं बक्षीस कास्टिंग विभागाला द्यावं -त्यांनी या गाण्यात नीतूसिंगच्या डाव्या बाजूला बसलेला हिरा शोधून काढल्याबद्दल ! असा नग आहे की त्यापुढे अनिल धवनही ग्रीक देव वाटावा ! थोडक्यात गाणं आणि त्याचं चित्रीकरण यात प्रचंड तफावत असलेलं आणि तरीही संस्मरणीय असलेलं हे गाणं !
4 comments:
Nice...Have posted my comment on the next part of your blog on Rafi
Good one
Wa chhan lihaaly sir
गाणं सुंदरच आहे आणि वर लिहिल्या प्रमाणे individual ऐकलं तर जास्त छान!असे प्रसंग बऱ्याच सिनेमा मध्ये बघायला मिळतात... त्याचं वर्णन मस्त केलं आहे!
Post a Comment