Friday, 30 May 2014

काश्मीर डायरी १

काश्मीर डायरी 
...१...
२ मे २०१४ संध्याकाळ-

बर्फाच्छादित डोंगर, हवेतला छान गारवा, हलकासा पाऊस अशा वातावरणात श्रीनगरला पोचलो. आमच्या गाडीचा ड्रायव्हर शब्बीर पुढचे आठ दिवस आमचा सारथी, वाटाडया आणि गाइड होता. एखाद्या राज्याच्या राजधानीच्या मानाने रस्ते तसे छोटे होते . इमारती बैठ्या आणि काहीशा जुनाट वाटत होत्या. रस्त्यावर वाहनेही तुरळकच दिसत होती. नाही म्हणायला ज्या गाडीचे उत्पादन मारुती ने बंद केले (आणि ती आमची पहिली गाडी असल्यामुळे एक भावनिक नाते!), ती मारुती ८०० बऱ्यापैकी दिसत होती. संध्याकाळची वेळ, ढगाळ वातावरणामुळे ५.३०- ६.०० ला अंधारून आलेलं, त्यात फारशी वाहतूक नाही की माणसांची गर्दीही नाही. आणि काश्मीर सारखा अशांत प्रदेश! त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडंसं विचित्र वाटलं. भरीत भर दुकानंही बंद दिसली. गाडीत बसल्यापासून आमचे प्रश्न चालू झाले.शब्बीरही आमच्याशी अतिशय अदबीने  बोलत होता.     " यहां पर शॉप्स जल्दी बंद हो जाती है ?" आमच्यापैकी कोणीतरी शब्बीरला विचारलं. 
" नही सर. ऐसी कोई बात नही."         
" तो फिर आज क्यो . . " 
"वो तो सर इधर स्ट्राईक चल रहा है. ३० तारीख को इधर इलेक्शन था  ना. . .  तो इधर थोडी गडबड हो गई. एक लडके को फौज ने मार दिया. इसके खिलाफ स्ट्राईक चल रही है." 
झालं ! आम्ही काश्मीरला जाणार म्हटल्यावर काही जणांनी पहिला प्रश्न विचारला होता -"तिथे जाणं सेफ आहे का नक्की?" आम्ही मारे बढाया मारत त्यांना सांगितला होतं -" काही नाही हो.  काही प्रॉब्लेम येत नाही." आणि आता इथे पोचल्यावर लगेचच हे कळलं ! 
" स्ट्राईक में क्या होता है ?" आमचा अगदी भीतीयुक्त निष्पाप प्रश्न! 
"कुछ नही  सर ! बस सब दुकाने बंद होती है और लोग कही पे पत्थर -शत्थर फेंकते है !" 
स्वाभाविकपणे माझी नजर गाडीच्या खिडक्यांकडे गेली. खिडक्या बंद होत्या. 
हे त्याने पाहिले की नाही माहित नाही, पण शब्बीर आपणहून म्हणाला, " लेकिन वो सब सर down-town श्रीनगर में होता है. पुराना इलाका. यहा पर  कुछ नही  होता. टूरिस्ट लोगोंको कुछ नही होता. हमारी रोजी रोटी टूरिस्ट लोगोंपर ही तो है ना !" 
आणि अर्थातच पुढे काहीही आकस्मिक घटना न घडता आम्ही दल लेक समोरील आमच्या हॉटेलवर पोचलो. पहिल्या दिवसापासूनच दिसलेलं डोळ्यांत न मावणारं निसर्गसौंदर्य एकीकडे आणि हा अशांततेचा threat एकीकडे अशा संमिश्र मन:स्थितीत आमची काश्मीर सहल सुरू झाली. 

....२....
दुसऱ्या दिवशी आम्हांला उडी येथील भारतीय सैन्याची पोस्ट बघायला जायचे होते. तसे आम्ही शब्बीरला सांगून त्याच्याशी वेळ ठरवत होतो. तर हा एकदम अस्वस्थ झाला. 
"आप कल उडी जाओगे ?" " मुझे तो नही लगता आपने जाना चाहिए.  उडी बारामुल्ला में आता है . वहां ७ तारीख को election है . इस वक़्त उधर tension है.मै  ये नही  चाहता कि आपको कोई नुकसान हो. मै तो इधर का ही हू . मुझे अपने बारे में नही,पर आपके बारे में तो सोचना चाहिए " 
तो यायला तयारच होईना . मग सैन्यदलातील आमच्या ओळखीचे  मेजर,जे उडी येथे posted होते, त्यांच्याशी फोनवर बोललो. पण ते तर म्हणाले काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही निश्चिंत रहा. उडी चा रस्ता म्हणजे हायवे आहे. जागोजागी सैनिक असतात. बिनधास्त या. मग ते आणि शब्बीर यांच्यात तिकडच्या भाषेत चर्चा झाली. आम्हांला वाटलं आता काम झालं. पण परत फोनवर मेजर म्हणाले-तुमचा ड्रायव्हर जरा जास्तच काळजी करतोय. पण तुम्ही त्याच्या म्हणण्याप्रमाणे करा. मग अशी तडजोड ठरवण्यात आली की दुसऱ्या दिवशी श्रीनगर पहावे, त्यानंतरच्या दिवशी  सोनामर्गला जावे आणि पुढच्या दिवशी उडी ला जावे. खरं तर मला हा फॉर्म्युला पटला नव्हता. २ दिवसांत असा काय फरक पडणार होता? उलट नवीन कार्यक्रमाप्रमाणे आम्ही निवडणुकीच्या तारखेच्या जवळच्या दिवशीच तिथे जाणार होतो. पण शब्बीरच्या मर्जीप्रमाणे करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. 
गंमत म्हणजे शब्बीरचं उडी ला दुसऱ्याच दिवशी न जाण्यामागचं खरं कारण दोन दिवसांनी त्याने स्वत:च सांगितलं. उडी ला जाणे हा आमचा खासगी कार्यक्रम होता.आमची सहल आखून देणाऱ्या माझ्या पेशंटने त्या दिवसासाठी आम्हाला गाडी देण्याचे कबूल केले होते. एरवी आमची सहल व्यवस्थित आयोजित करून देणाऱ्या पेशंटकडून नकळतपणे ही गोष्ट या शब्बीरपर्यंत पोचलीच नव्हती. उडी श्रीनगरपासून १०० किमी लांब आहे. डिझेलचा खर्च, एक दिवस जाणार हे सगळे मुद्दे यात आले असणार. तशी त्याची फारशी काही चूक नव्हती. समज-गैरसमजाचा भाग होता. तो निस्तरण्यासाठी त्याने हा २ दिवसांचा अवधी घेतला.मग पुण्यापर्यंत फोनाफोनी झाली आणि प्रश्न मिटला. आधी ठरल्याप्रमाणे आम्ही उडी चा बेत आखला. ५ मे ला उडी ला जावूनही आलो. कुठेही काहीही त्रास झाला नाही. " tension" चा मागमूसही जाणवला नाही. शब्बीर सारख्या सामान्य माणसानेही या (नसलेल्या) tension ची ढाल पुढे केली तर या परिस्थितीचा (गैर)फायदा राजकीय  नेतेही घेत असतीलच ना  ?

....३....
शब्बीर तिशीतला. . . . गहू वर्ण . . . काश्मिरी अजिबात वाटत नव्हता-ना गोरा, ना  ते धारदार नाक. . . उंची ही बेतास बात ! चालण्याची लकब थोडी सलमान खान सारखी -हात असे अंगापासून लांब काढून ! पण हुशार होता. . . पहिल्याच दिवशी काश्मीरबद्दल बरीच factual माहिती त्याने दिली- अगदी २२ जिल्हे, त्यात १३ RTO ऑफिस, राज्यपाल एन. एन. व्होरा वगैरे वगैरे. वडील सैन्यात होते. आता निवृत्त. हा ही जाणार होता. पण प्रवेश-परीक्षेत अडकला. आणि टूरिझम मध्ये आला. उडी च्या बाबतीत आलेला अनुभव सोडला (आणि त्यात ही तो आमच्याशी नीटच वागला होता ) तर ८ दिवसांचा त्याचा अनुभव नक्कीच चांगला होता. ७ मे ला जेव्हा बारामुल्लाला निवडणूक होती, त्या दिवशी आम्ही गुलमर्गहून पहलगामला जाणार होतो. गुलमर्ग बारामुल्ला क्षेत्रात येतं. आणि बारामुल्ला अशांततेबद्दल कुख्यात आहेच ! हे विचारात घेत  त्याने आम्हांला सांगितलं की सकाळी ६ वाजताच  तयार रहा. संवेदनशील भागातून मतदान सुरू होण्याआगोदरच बाहेर पडू. त्याप्रमाणे आम्ही केले. पहलगामच्या रस्त्यावर माझ्या मेव्हण्याच्या फोन वर NDTV चा संदेश आला- बारामुल्ला येथे एका निवडणूक केंद्रावर स्फोट! एक जवान ठार! 
या वेळी tension खरं होतं !
(क्रमश:)

1 comment:

amitmoghewrites said...

मस्त.....आम्ही वाटच बघत होतो ....पुढचे भाग हि लगेच येऊ देत....संभाषणात्मक लिहिल्यामुळे वाचायला आणखी छान वाटतंय...जर मध्ये मध्ये फोटो add केलेस तर प्रत्यक्ष तिकडे गेल्याचं फिलिंग येईल..