Tuesday 3 June 2014

काश्मीर डायरी २


भारतीय सैन्य, सैनिक, भारतीय पोस्ट . . .
1

काश्मीर सहलीच्या पहिल्याच दिवशी आमच्या दृष्टीने एक अघटित घडलं, जे आम्हांला सुखद धक्का देऊन गेलं. श्रीनगरला शंकराचार्य मंदिर पाहून परत येत असताना आम्हांला चक्क बिबट्या दिसला ! ' कान्हा' च्या जंगलात बिबट्या अगदी ओझरता दिसला होता.तिथे वाघही एकदाच दिसला होता आणि तोही जखमी असल्यामुळे त्याच्या गळ्यात पट्टा लावलेला होता. ' कॉर्बेट' च्या जंगलात तर वाघ अजिबातच दिसला नव्हता . जिथे बघायला गेलो  तिथे दिसला नाही आणि श्रीनगरला असा अवचित दिसला ! ते ही कसा? भटके कुत्रे कसे गाड्यांच्या मागे लागतात तसा हा आमच्या गाडीच्या मागे झडप घातल्यासारखा आला. आम्ही तसेच पुढे गेल्यावर हा मागे फिरला. काहीसा अस्वस्थ वाटत होता . 



येणाऱ्या प्रत्येक गाडीवर असाच हल्ला करायचा. भुकेला होता की ती मादी होती आणि जवळपास तिची पिल्लं होती आणि तिला माणसांकडून धोका आहे असं वाटत होतं का? हे मात्र काही कळू शकलं नाही. छान १५-२० मिनिटं दर्शन देऊन तो पसार झाला . तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जावून, तिथल्या देवाच्या दर्शनाने एखाद्या भक्ताला जो अपरिमित आनंद होत असावा, अगदी तसाच आनंद या बिबट्याला पाहून झाला होता . सुरुवातीलाच असं थ्रील अनुभवल्यावर पुढे आणखी काय बघायला मिळणार आहे याची उत्सुकता वाढू लागली होती. 
यानंतर विविध रंगांची उधळण करणारी ट्युलिपची फुलं बघायला मिळाली. हॉलंडच्या कुकेनहोफ बागेत(' देखा एक ख्वाब' फेम) असतील एवढी नाही पण तरी नजर पोचते तिथपर्यंत फुलंच फुलं पाहून मन अगदी तृप्त झालं होतं .







           
                                                                                                                         (सर्व फोटो सौजन्य -अक्षय आपटे)

अशा काहीशा भारलेल्या, भारावलेल्या मन:स्थितीत संध्याकाळी आमच्या ओळखीचे सैन्यातील मेजरना आम्ही भेटलो आणि त्यांच्याशी मस्त गप्पा झाल्या. काश्मीर मधले त्यांचे अनुभव, इथली माणसं याबद्दलची त्यांची निरीक्षणं खूप उद्बोधक होती. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की काश्मिरी लोकांकडे स्वतः चं घर आणि छोटीशी का असेना पण जमीन असते. इथे चोऱ्या वगैरे प्रकार फारसा होत नाही. तुमच्याकडे एक वेळ जास्त पैसे मागतील पण चोरी करणार नाहीत. आम्हाला पहिल्या दिवसापासूनच सगळीकडे भारतीय सैनिक दिसत होते. रस्त्यावर उभे, कधी इमारतींच्या छतावर, कधी वाळूच्या पोत्यांच्या ढिगामागे! त्यांच्या असण्याने आम्हांला सुरक्षित वाटत होतं.  काश्मीरमध्ये भारतीय सैन्याचे असणे आणि इतक्या प्रमाणात  असणे हे आवश्यकच होते असं मेजर म्हणाले. भारत -पाक सैन्याची तुलना करता आपण 'त्यांच्यापेक्षा' नक्कीच वरचढ आहोत असेही ते म्हणाले. काश्मीर प्रश्न हा जटील खराच पण या विषयावर नि:पक्षपणे कोणी लिखाण केले आहे का असे विचारल्यावर त्यांनी लगेच पत्रकार एम. जे.अकबर यांनी लिहिलेलं 'Kashmir :  Behind the Vale' हे  पुस्तक सुचवलं.  विषय कसा कोण जाणे पण इथे ब्रिटिश सत्तेच्या खुणा का दिसत नाहीत इकडे वळला. सर्वसाधारणपणे सगळीकडे (आणि विशेषत:थंड हवेच्या ठिकाणी) ब्रिटीशकालीन इमारती किंवा त्यांची नावे असं काहीतरी दिसतं. पण श्रीनगरमध्ये  असं काही दिसलं नाही. त्यावर मेजर म्हणाले याला कारण कलम ३७० ! हे कलम खूप पूर्वीपासून अस्तित्वात आहे. अर्थात तेव्हा ते कलम ३७० या नावाने ओळखलं जात नव्हतं. ३७० मधील काही महत्त्वाच्या तरतुदी त्यावेळी होत्या. काश्मिरी राजाला अशी भीती होती की इथली जमीन इंग्रज बळकावतील. या तरतुदीमुळे ते होऊ शकलं नाही. पुढची माहिती तर खूप रोचक होती- यातूनच ' हाउस बोट' चा जन्म झाला. जर इंग्रज जमीन घेऊ शकत नव्हते तर त्यांनी शक्कल लढवून ही पाण्यावरची घरे बांधली! आम्ही ज्या उडी ला जाणार होतो तिथलीही माहिती त्यांनी सांगितली. तिथे दर सोमवारी आणि मंगळवारी दोन्ही बाजूंनी माल वाहतूक होते. व्यवहार पैशात होत नाही तर पूर्वीच्या काळाप्रमाणे मालाच्या बदल्यात माल असा होतो. २००३ सालापासून इथून पाक व्याप्त काश्मीर कडे जाणारी बस चालू झाली आहे. म्हणजे सीमेवर फक्त तणाव किंवा गोळीबारच होतो असं नाही तर सकारात्मक आदान-प्रदानही होते हे ऐकून बरे वाटले. यामुळे उडीला जाण्याची उत्कंठा अजूनच वाढली. 

(क्रमश:)

4 comments:

amitmoghewrites said...

mast...srinagarla wagh mhanaje farach luck jorat hota...

Dr.sadanand Chavare said...

शेषराव मोरे यांचे या विषयावरील एक पुस्तक मला बर्‍यापैकी नि:ष्पक्ष वाटले.
सदानंद

Rajesh Pusalkar said...

Amit, you are right. It was an unlikely place to sight a leopard & he came just out of nowhere! That was really a pleasant surprise!

Rajesh Pusalkar said...

Sadanand, thanks for the info. But what is the title of the book? If it is available in my library, I would like to read it.