Thursday 5 March 2015

' देवाघर'ची फुले



आज इथे लहान मुलांचा मस्त कल्ला चालू आहे.मुलं त्यांच्या शाळेतून परत आली आहेत. म्हणूनच असेल कदाचित की ती जास्त खुश आहेत. ना कसलं बंधन, ना कुठली शिस्त ! आरडाओरडा, चालताना बूट जोरजोरात आपटणे वगैरे प्रकार सुरू आहेत.शार्दुल त्याने शाळेत रंगवलेले चित्र एखाद्या मानपत्रासारखे सगळ्यांना दाखवत फिरतोय.  मी जिथे बसलोय त्या खोलीत शंतनू मिस्कीलपणे डोकावून बघतोय. हा इतर मुलांपेक्षा त्यांच्या खोलीत आधी आलाय. बेफिकीरीने असं दप्तर भिरकावून तो खोलीबाहेर पडलाय  देखील ! मग त्याला एक खोडी सुचली आहे. इतर मुलं आत असताना या पठ्ठयाने त्या खोलीचे दार बाहेरून लावून घेतले आहे आणि आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात तो तिथून निघूनही  गेलाय. मग इतर मुलांचा एकच गलका ! त्यांच्या त्या दार उघडण्यासाठीच्या विनवण्या ! कुणीतरी दार उघडून त्यांची सुटका केली आहे ! 
आता मला ही मुलं दिसत नाहीत पण त्यांचं  सर्व बोलणं स्पष्टपणे ऐकू येतंय. सगळीकडे कसलीतरी लगबग सुरू आहे. "दिदी, मला पण गंध लाव" असं कोणीतरी म्हणतंय. रोजच्या वेळेप्रमाणे बहुदा आता ही मुलं जेवणाच्या गोल टेबलाभोवती बसली असणार. "आज जेवायला काय आहे ? " असा कुठल्याशा मुलाचा प्रश्न ! "आज होळी आहे ना ? म्हणून आज पुरणपोळी आणि भजी आहेत" असं कोणीतरी उत्तर दिलंय. "चला सगळ्यांनी वदनी कवळ घेता म्हणा" असं ती दिदी सांगते आहे. 
बटन ऑन केल्यावर लगेच गाणे लागावे अशा त्वरेने मुलं म्हणू लागली आहेत-

वदनी कवन घेता नाम घ्या श्रीहरीचे 
सहज हवन होते नाम घेता फ़ुआचे 

सगळी मुलं एकत्र म्हणत नाहीयेत. जो उशीरा येईल तो नव्याने चालू करतोय. पण कोणीही 'फुकाचे' म्हणतच नाहीये- 
फ़ुआचे किंवा फुटाचे वा फुलाचे असंच चाललंय. 
मग ' जे जे रघुवीर समर्प' असं म्हणून गाडी पुढे जात आहे. 
Thank you God for the world so sweet… इथे thank जरा जास्तच लांबवला जातोय. खरं तर मी ह्या सगळ्या गोष्टी याच क्रमाने आणि अशाच प्रकारे गेली अनेक वर्षे अनुभवल्या आहेत. पण का कोण जाणे आज मला या thank you … मध्ये एकाच वेळी विरोधाभास (Irony) आणि निरागसता प्रकर्षाने जाणवते आहे. या मुलांनी त्या परमेश्वराचे आभार कशासाठी मानायचे ? या निष्पाप मुलांवर त्यांच्या आई- वडिलांशिवाय राहायची वेळ आणू दिल्याबद्दल?आणि या मुलांना कळतही नाहीये की ज्या जगातल्या त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडलंय (नाईलाजास्तव असो की अन्य कुठल्या कारणांनी ) त्याच जगाला ते sweet असं म्हणतायत. 

माझं काम संपवून मी बाहेर येतो  तर मला मुलांची जेवणाची गोलमेज परिषद भरलेली दिसतेय. मगाचचा तो दंगा अजिबात नाहीये. मुलं अगदी तल्लीन होऊन जेवतायेत. हे दृश्य मात्र फारच आश्वासक आहे.
त्यातला  एक मुलगा  समजून उमजून की प्रतिक्षिप्त क्रियेने, ते माहित नाही, पण मला टाटा करतोय. 

No comments: