Tuesday 2 June 2015

बोरकरांच्या गोव्यात …




                                                                                     …१….

गोव्यात फोंड्याहून लोटलीला चाललो होतो. आमच्याबरोबर तिथेच राहणारे एक ओळखीचे श्री. गांवकर आणि त्यांचे  कुटुंब होते. अचानक त्यांच्यापैकी एक आम्हांला म्हणाले- " तुम्हांला बाकीबाब  माहित आहेत ना ? बा. भ. बोरकर? त्यांचे घर आहे इथे. . . " ते इतके off-hand बोलले की काही कळायच्या आत आम्ही बोरकरांच्या घराला ओलांडून पुढे गेलो देखील ! घर मुख्य रस्त्यावरच होते. बोरकरांच्या बोरी या गावी ! तिथून येताना मात्र गाडी मुद्दाम थांबवून हा फोटो काढला. घराची अवस्था फोटो वरून लक्षात येत असेलच ! ज्या कवीच्या रोमा-रोमात गोव्याची संस्कृती भिनली होती, ज्याने गोव्याच्या मुक्ती संग्रामात भागही घेतला होता, त्याचे घर हे असे दुर्लक्षित स्थितीत पाहून वाईट वाटले.
स्वत: आनंदयात्री असलेल्या बोरकरांनी आपल्या घराचे नाव दुसरे आनंदयात्री रवींद्रनाथ टागोरांच्या 'शांतीनिकेतन' वरून ठेवून एक प्रकारे त्यांना tribute च दिले आहे ! 

परदेशात अशा निसर्ग कवीच्या घराचे त्याच्या स्मारकात रुपांतर झाले असते हे नक्की !
त्यांच्या 'चांदणवेल' या संग्रहातल्या माझे घर या कवितेत त्यांनी त्यांच्या स्वप्नातल्या घराचे इतके सुंदर चित्र उभे केले आहे-
तृप्त स्वतंत्र गोव्यांत केव्हां तरी केव्हां तरी 
फेसाळत्या लाटांपाशी सिन्धुसरितेच्या तीरी 
बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर 
गार विलायती वेल चढवीन भिंतीवर 

मागें  विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड 
गर्द हिरवे न्हाणीशी नीरफणसाचे झाड 
केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा 
त्यांत सवत्स कपिला, ओल्या चाऱ्याचा नि सांठा 

फुलपाखरांच्यासाठी पुढे फुलझाडे चार 
आंबा एखादा कलमी यावी म्हणूनिया खार 
गारव्याच्यासाठी कांही गार नाजूक पोफळी 
नागमोडी त्यांच्यावर पानवेली मिरवेळी 
                 ……
-बा. भ. बोरकर 

कवितेतले हे स्वप्नचित्र आणि आताच्या वास्तवातला हा विरोधाभास सहज लक्षात येण्यासारखा आहे… 

                                                        .... २…. 

बोरकरांनी 'माझ्या गोव्याच्या भूमीत' वर्णन केलेला गोवा अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे. ठिकठिकाणी दिसणारी आंबा, नारळ-पोफळीच्या  झाडांची दाट वनराई  मन प्रसन्न करतात.आंब्यापेक्षाही फणसाची झाडं जास्त दिसली. झाडांना लटकलेले ते अजस्त्र फणस आणि हवेतही एक प्रकारचा फणसाचा घमघमाट हे आम्ही सगळीकडे अनुभवले. 

आम्ही जिथे राहिलो होतो तिथेही मागे अशीच झाडी होती.  सकाळी उठल्या उठल्याच दयाळ, बुलबुल यांची शीळ ऐकू यायची. नंतर कोकीळ, खंडया, भारद्वाज यांचे आवाज यात मिसळायचे. मध्येच हिरवा तांबट त्याच्या  गूढ आणि repetitive आवाजाने आपले अस्तित्व जाणवून द्यायचा. पलीकडच्या डोंगरावरून मोराची केकावलीही ऐकू यायची. हे सगळे आवाज कमी होते म्हणून की काय यातच भर टाकत होते गायबगळे, पाणकोंबड्यांचे विचित्र आवाज ! पण सकाळचा सगळा काळ या पक्ष्यांच्या किलबिलाटा मुळे छान जायचा हे नक्की ! 

माझ्या गोव्याच्या भूमीत 
आंब्याफणसांची रास 
फुली फळांचे पाझर 
फळी फुलांचे सुवास 

माझ्या गोव्याच्या भूमीत 
वनश्रीची कारागिरी 
पानाफुलांची कुसर 
पशुपक्ष्यांच्या किनारी 

माझ्या गोव्याच्या भूमीत 
उन्हाळ्यांत खारा वारा 
पावसांत दारापुढे 
सोन्या चांदीच्या रे धारा 
-बा. भ. बोरकर 


                                                       … ३… 

याच कवितेत बोरकर पुढे म्हणतात -
माझ्या गोव्याच्या भूमीत

सागरांत खेळे चांदी 
आतिथ्याची अगत्याची 
साऱ्या षडरसांची नांदी 

गोव्यातल्या लोकांच्या आतिथ्याचा, त्यांच्या अगत्याचाही खूप छान अनुभव आम्हांला आला. वर उल्लेख केलेलं फोंड्यात राहणारं एक कुटुंब आमच्याबरोबर पूर्ण दिवस होतं. त्यांची आणि माझ्या बायको(वृंदा)ची ओळख! त्यांच्या आजारपणावरील उपचार वृंदा जिथे काम करते त्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये झाले आणि त्यात तिची त्यांना खूप मदत झाली. त्यांनी तिला गोव्यात येण्याचं म्हणतात तसं standing invitation दिलं होतं. आम्ही आल्यावर दोघा नवरा बायकोनी सुट्टी घेतली. आम्ही तिघे आणि ते चौघे असे सात जणं मिळून एका गाडीतून दिवसभर फिरलो. लोटली येथील जुने पोर्तुगीज घर, त्याच्यासमोर असलेले बिग फूट, त्यानंतर कुर्ती येथील spice plantation, बोंडला येथील प्राणी संग्रहालय आणि शेवटी तांबडी सुर्ला इथले महादेव मंदिर इतक्या ठिकाणी आम्ही गेलो. पैकी spice plantation इथली सोडल्यास त्यांनी आम्हांला कुठलीच तिकिटं काढू दिली नाहीत. आम्ही खूप आग्रह केला म्हणून आम्ही ती तेवढी तिकिटं काढू शकलो. मध्ये त्यांच्या बोरी इथल्या घरी गेलो. तिथे एक भला मोठा फणस त्यांनी कापला. शिवाय गोटी आंबेही  खायला दिले. आईस्क्रीमही होतेच. शिवाय एक किलो उच्च प्रतीचे काजूही आमच्यासाठी आणले होते. शिवाय २ भले मोठे फणसही(आम्ही कितीही नाही म्हणालो तरीही ) विकत घेऊन दिले. त्यांनी हे सर्व दिलंच, पण त्यांच्या बोलण्यातून त्यांना वाटणारी आपुलकी सहज कळून येत होती. फोंड्याहून परत निघताना अंधार पडला होता. थोडा पाऊसही पडत होता. तर हे त्यांच्या गाडीतून आम्हांला रस्ता दाखवण्यासाठी लांबपर्यंत आले. शिवाय रूम वर पोचल्यावर आम्ही कळवायच्या आत त्यांचाच फोन- " नीट पोचलात ना ?" हे विचारायला ! त्यांचे हे आदरातिथ्य बघून माझी मलाच लाज वाटली. मला नाही वाटत की मी कधी कोणासाठी सुट्टी घेऊन इतक्या सहजतेने असं काही करीन. माझ्यात एक प्रकारचा रूक्षपणा आहे. मी असं out of the way जावून कोणासाठी काही करीन असं वाटत नाही. 

या सगळ्या अगत्यात कोकणी भाषेचेही वेगळे स्थान आहे असं वाटतं. आम्ही दिवसभर गाडीतून फिरलो तेव्हा त्यांच्यातला  कोकणीतला  संवाद ऐकला .अनुनासिक स्वरात, हेल काढून बोलणे ऐकायला खूप छान वाटत होते. गाडीतले कोकणी बोलणे असे अजून कानांत घुमते आहे.  ड्रायव्हरही त्यांच्या ओळखीतला होता. बोरीच्या त्यांच्या घरी बेसिनवर मी हात धुवायला गेलो तर हा तिथे उभा ! मला म्हणाला- " तिथे साबण आहे. तो घे आणि हात या टॉवेलला पुस !" 
अहो-जाहो करण्यामुळे एकमेकांत जे उगाच अंतर येते ते अशा सहज बोलण्याने पार नाहीसे होते. 

                                                      … ४…. 
हे कुटुंब आमच्या थोडं तरी परिचयाचं होतं. पण जिथे आम्ही राहिलो होतो तिथले कोणीच आमच्या ओळखीचे नव्हते. आम्ही आमच्या रूमवर जाताना नेहमी त्यांच्या घरावरूनच जायचो. सहज घरात लक्ष जायचे. सासू किंवा त्यांची सून, कोणीही असले तरी छान हसायचे आमच्याकडे बघून. आणि विचारायचे-काय बरं आहे ना ? कुठून आलात वगैरे. . 
आम्ही पुण्याला परत जायच्या दिवशी सकाळी मी जरा गाडी पुसत होतो. त्या आजी नळीने अंगणात पाणी घालत होत्या. त्यांनी  मला विचारलं- " देऊ का नळी गाडी धुवायला?"  
निघण्यासाठी गाडीत बसलो. गाडी चालू करणार एवढ्यात त्या आल्या. त्यांच्या हातात पिशवी होती. पिशवीत १० आंबे ! आणि वर प्रेमाने म्हणाल्या- " या परत हां ! "

9 comments:

Dr.sadanand Chavare said...

Keval apratim

amitmoghewrites said...

mastach

Rajesh Pusalkar said...

Thanks Amit...

लीना देवस्थळी said...

गोव्याच मोहक शब्द चित्र उभं केल्यावर तू.

लीना देवस्थळी said...

PM
गोव्याच मोहक शब्द चित्र उभं केल आहेस तू.

Rajesh Pusalkar said...

Thank you Leena mami for your comment...

Mrunmayee said...

Wonderfully written,Dr.! Very honest and sensitive :) I am in love with Goa and Borkar's poems. Your article is definitely cherry on the cake!

Unknown said...

Khup cha ahe likhan...borkarabaddal navin mahiti milali..kavita apratim

शब्द said...

अप्रतिम..