Wednesday, 3 June 2015

बकुल गंध मोहरे ….

२००९ मध्ये गोव्यात आलो होतो. तेव्हाचे चित्र मनात अजूनही अगदी फिट्ट बसले आहे. माशेल गावात शिरल्यावर डावीकडे वळायचं आणि रस्त्याचा उतार संपला की उजव्या हाताला दिसतं पिंपळाचं मोठं झाड… झाडाभोवती पार ! तुम्ही झाडाकडे पाठ केली की तुम्हांला तुमच्यासमोर दिसतं ते देवकी-कृष्णाचं देऊळ ! थोड्या पायऱ्या चढून तुम्ही देवळाकडे आलात आणि मागे वळून पाहिलं की पुन्हा ते झाड तर दिसतंच, शिवाय तुमच्या डाव्या हाताला दिसतं अजून एक देऊळ- गजांतलक्ष्मीचं आणि समोर आणखी एक- शांतादुर्गेचं ! आणि झाड आणि ह्या देवळांच्या मध्ये एक मोठं मैदान ! हा सगळा panoramic view डोळ्यासमोर आहेच… शिवाय त्या झाडावर बसलेले पक्षी - गडद पिवळ्या रंगाचा  हळद्या (Golden Oriole )चा ३-४ पक्ष्यांचा थवा ! त्यांचा तो सुमधुर आवाज ! तेही सर्व आठवतं !  एवढे Orioles एकावेळी  एकत्र मी कधीच पाहिले नव्हते. एवढं सगळं आठवण्याचं एक कारण म्हणजे हे आमच्या वृंदाच्या माहेरचं कुलदैवत हे तर आहेच ! पण हा सर्व अनुभव डोळे, कान आणि नाक या senses नी पुरेपूर घेतला होता म्हणूनही तो स्मरणात असावा ! 

यावेळी २८ मे ला आम्ही तिकडे गेलो. बाकी सगळं जवळजवळ तसंच होतं. का कोण जाणे, पण  देवकी-कृष्ण देवळाची रया जरा गेल्यासारखी वाटली. मुख्य देवळावर लिहिलेला माशेल शब्दही अर्धवट पडून गेला होता. खरं तर असं का व्हावं कळत नव्हतं. देऊळ परिसरात बांधकामाचं सामान इतस्ततः पडलं होतं. कदाचित मंदिराचा जीर्णोद्धार होईलही. पण आताच्या स्वरूपात देऊळ अगदी निस्तेज दिसत होतं. आत मुख्य मूर्ती आणि त्याच्या आजूबाजूची सजावट मात्र सुरेख होती. आपल्याकडे खूपच कमी ठिकाणी देवकी आणि तिच्या कडेवर श्रीकृष्ण अशी मूर्ती बघायला मिळते. हे देऊळ त्यापैकी एक ! 


 देवकी-कृष्णाचं देऊळ

देवळातल्या छतावरचं कोरीव काम 
देवकी कृष्णाची मूर्ती 

मनात सारखी मागच्या वेळी काय पाहिलं होतं आणि आता ते कसं दिसतंय याची तुलना सुरु होती. तेव्हाचे orioles अर्थातच आता दिसणं अवघडच होतं ! मग अजून काय होतं ? आणि मग एकदम लक्षात आलं- २००९ मध्ये या परिसरात बकुळीचा मंद सुवास येत होता. आणि अहो आश्चर्य ! आताही तो तसाच जाणवत होता ! फक्त तो कुठून येत होता हे काही कळत नव्हतं! कारण देवळाजवळ कुठलंच झाड दिसत नव्हतं. न राहवून शेवटी मी तिथल्या ऑफिस मधल्या माणसाला विचारलं- " इथे बकुळीचं झाड आहे का?"  ते म्हणाले- "हा वास येतोय तो त्या बायका फुलांच्या वेण्या विकतायत तिकडून! आणि झाड म्हणाल तर ते समोरच्या देवळाजवळ आहे !" आणि आम्ही पायऱ्या उतरून पाहिलं तर खरंच बायका फुलं  विकत होत्या त्यात बकुळीची फुलंही होती. मग आम्ही ते झाड शोधायला गेलो. समोरच्याच बाजूला गजांतलक्ष्मी देवळाच्या बाजूला ते झाडही सापडलं .

देऊळ आणि बकुळीचं झाड 

 
 

झाडावर फुलंही होती. मला अतिशय आनंद झाला… म्हणजे माझ्या मनातला मागचा अनुभव आता मला पुन्हा घेता आला हे मुख्य कारण ! शिवाय बकुळीच्या फुलांचा आणखी काही आठवणींशी संबंध आहे. त्याही पुन्हा जाग्या झाल्या. दोन्ही आठवणी देवळांशीच संबंधित आहेत. आठवलं म्हैसूरच्या चामुंडा देवळातलं असंच एक बकुळीचं झाड. दुर्दैवानं त्या झाडाकडे कोणाचं लक्षही जात नव्हतं. सगळ्यांना चिंता रांगेत किती काळ उभं राहून झाल्यावर दर्शन घेता येईल याचीच ! दुसरी आठवण कोळथरे इथल्या कोळेश्वर मंदिराची ! देवळात कोणीही नव्हतं . त्यामुळे अतिशय शांत वाटत होतं . संध्याकाळचा मंद वारा वाहत होता. देवळाजवळ हे भले मोठे बकुळीचे झाड ! झाडाजवळ फुलांचा सडा पडलेला होता. त्याच्या  सुवासाने आसमंत भारलेला होता. बकुळीची  फुलं अतिशय सोज्वळ, शालीन आणि अदबशीर वाटतात .फुलांच्या रंग-रुपात आणि  त्यांच्या वासांत …  कुठलाही भपका जाणवत नाही. तुमचे फार लक्ष गेले नाही तर कदाचित तुम्हांला कळणारही नाही की इथे बकुळीचं झाड आहे. फुलं दीर्घ काळ टिकतात. कोरडी झाल्यावरही मंद वास रेंगाळतो. आपल्या मनात आठवणी दरवळतात त्या प्रमाणेच हा दरवळ !


बकुळीची फुलं माझ्या एका मित्राला(योगेश खरे) फार आवडतात. आणि हे मला अलीकडेच कळलं. कॉलेजच्या काळात एका ग्रुप मध्ये असूनही तेव्हा जे कळलं  नव्हतं ते आता या whatsapp मुळे  कळलं ! योगायोगाने त्याचा दुसऱ्याच दिवशी (२९ मे ) वाढदिवस होता.  फुलाचा गंध जरी त्याला पाठवू शकलो नाही, तरी आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्या फुलांचा फोटो काढून मात्र पाठवला !

1 comment:

Shreepad M Gandhi said...

अरे वा:...तुझ्याकडून कधी कुठल्या मंदिराबद्दल वगैरे ब्लॉग लिहीलेला असेल असं वाटलं नव्हतं...������
असो. पण मजा आली वाचायला...कधी ऐकलं नव्हतं की देवकी-कृष्ण यांचं सुध्दा मंदिर असू शकतं...भारतात काहीही बघायला मिळू शकतं...
Enjoyed...
बकुळीची फुले नांवाचा कुठल्यातरी एका जुन्या कविराजांचा काव्यसंग्रह अत्रे सभागृहातल्या एका पुस्तक प्रदर्शनांत 'चाळला' होता...कविता वगैरे वाचायचा मुळांतच असलेला कंटाळा यामुळे ते पुस्तक चटकन हाता'वेगळं' झालं असावं...पण हो, अजून एक सांगतो...बकुळीच्या फुलांचे गजरे बनवून एक बाई चितळ्यांच्या बाजीराव रस्त्यावरच्या दूकानाबाहेर दरवर्षी अगदी नियमित ठराविक मोसमांत बघितली आहे... हल्ली नाही दिसत...आशा करूया की तिच्या मुलांनी शिकूनसवरून चांगलं मोठं होऊन आईला जरा आराम दिला असावा...
ही फुलं अगदी विशिष्ट ठेवणीची असतात प्राजक्तासारखीच...म्हणजे गजरा ओवाळणा-यांना कमी कष्ट व्हावेत अशी...आणि धुंद करणारा Axe effect गंध...��