Saturday 26 September 2015

गाईड : आर. के. नारायण यांचा आणि देव आनंदचाही !

गाईड : आर. के. नारायण यांचा आणि देव आनंदचाही !
आज देव आनंदचा जन्मदिवस आहे आणि हे वर्ष  'गाईड 'चं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.(गाईड ६ फेब्रुवारी १९६५ ला प्रदर्शित झाला) सुरुवातीलाच कबूल करतो की गाईड हा सिनेमा सलगपणे मी कधीच पाहिला नव्हता. त्यातली गाणी किंवा त्यातले काही प्रसंग टीव्ही वर पाहिले होते. कॉलेजच्या काळात आर.के.नारायण यांची ही कादंबरी इंग्रजीतून वाचली होती. ती तेव्हा आवडली होती. आता नुकताच याच कादंबरीचा मराठी अनुवाद (अनुवादिका- उल्का राऊत, रोहन प्रकाशन) वाचला. तेव्हा वाटलं की सिनेमा बघायलाच हवा. म्हणून त्याची DVD पाहिली. हे असं मी पहिल्यांदा केलं- मूळ पुस्तक आणि त्यावर आधारलेला सिनेमा एकाच वेळी बघणं! आणि  पुस्तक श्रेष्ठ की सिनेमा या अनंत काळापासून चालू असलेल्या वादात मला पुन्हा एकदा प्रत्यय आला की पुस्तक निर्विवादपणे श्रेष्ठ!गाईड सिनेमा चांगला आहे. पण त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगलं मूळ पुस्तक आहे. आणि मराठी अनुवाद वाचूनसुद्धा मी हेच म्हणेन( खरं तर हा अनुवाद नीटसा जमलेला नाही असं माझं मत आहे. हिंदी भाषेचा नको इतका प्रभाव, काही संपादकीय डुलक्या असे मजेदार भाग त्यात आहेत. त्यावर एक वेगळे लिखाण होईल इतक्या चुका आहेत. पण तो आताचा विषय नाही.) आणि गाईड एक क्लासिक सिनेमा मानला जातो हे देखील मला पटत नाही.कदाचित हे विधान खूपच धाडसाचं होईल का? पण खरंच जितका गाईड एक milestone सिनेमा समजला जातो तितका तो नाही असं माझं मत आहे.
आर के नारायण 

 कोणतेही मूळ पुस्तक वाचून तुमच्या डोळ्यासमोर आणि मनात त्या गोष्टीची, त्यातील व्यक्तिरेखांची एक प्रतिमा निर्माण होत असते. ती गोष्ट तुमच्या मनात रेंगाळत असते. त्या व्यक्तिरेखांचं त्या त्या प्रसंगांत वागणं, त्यामागचा कार्यकारणभाव याचाही तुम्ही विचार करत असता. कुठल्याही व्यक्तिरेखेचा आलेख आणि तिचे तिच्या  परिस्थितीशी असलेले नाते याचाही शोध तुम्ही घेत असता .यात अर्थातच आपले रंगही  मिसळले जातात.आपले अनुभव, आपली मतं, आपल्या भावना, आपले विचार या सगळ्याचा एक समांतर प्रवास वाचनाच्या दरम्यान चालू असतो. आणि पुस्तकाच्या पानागणिक आपण या सगळ्यांत गढून जातो. कादंबरीचं संपूर्ण अवकाश आपल्या मनात अवतरतं.त्या व्यक्तिरेखांना आपण आपल्या परीनं आणि आपल्या नजरेतून बघत असतो. ही सगळी प्रक्रिया घडायला थोडा वेळ लागतो आणि म्हणूनच पुस्तक  जास्त काळ आपली सोबत करतं.सिनेमाच्या बाबतीत हे सगळं घडतच नाही असं मला म्हणायचं नाही. पण पुस्तकात जेवढी आपली involvement होण्याची शक्यता असते तितकी आणि तितका काळ ती सिनेमात होणं थोडं अवघड असतं.
या सर्वसाधारणपणे लागू असलेल्या गोष्टी गाईड या पुस्तकाला आणि सिनेमालाही लागू आहेत. गाईड कादंबरी वाचत असताना राजू गाईडच्या लहानपणीपासून ते तो गाईड होईपर्यंत(त्याच्यातल्या street स्मार्टनेस सह), त्यानंतर तो रोझीच्या आयुष्याचा गाईड होईपर्यंत, नंतरचा त्याचा पझेसिवनेस आणि downfall आणि मग त्याच्यावर त्यावेळेच्या परिस्थितीमुळे  लादलं गेलेलं स्वामीपण आणि शेवटचा आध्यात्मिक डूब असलेला प्रवास ही सगळी स्थित्यंतरं ठळकपणे जाणवतात. आधीचा स्वार्थी, केवळ आपल्यापुरतं बघणारा, सर्व- साधारण राजू ते लोकांसाठी प्राण त्यागणारा राजू ही एकाच व्यक्तिरेखेमधली  खोली पुस्तकातून आपल्यापर्यंत पोचते. राजूचं हे evolution विस्मयकारक वाटतं.हे पुस्तक संपूर्णपणे राजू गाईड च्या perspective मधून आहे आणि त्यात पहिल्यापसून शेवटपर्यंत सातत्य आहे.
सिनेमा करताना मात्र याबाबतीत गोंधळ झालाय की काय असं वाटतं. राजूची सर्व स्थित्यंतरं न दाखवता रोझी आणि राजूचे प्रेम आणि त्यानंतरचे त्याचे अध:पतन हा भाग जास्त आलाय. मूळ कथेपासून तर सिनेमा खूपच फारकत घेतो- रोझीचे आत्महत्येचे प्रयत्न, मार्कोचा स्त्री-लंपटपणा, रोझीने मार्कोला थोबाडीत मारणे या सगळ्यातून रोझीबद्दल जरा जास्तच सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मूळ पुस्तकात हे असं नाही. तसंच रोझी आणि राजूच्या आईनं एकमेकींना भेटणं, त्यातून तिला रोझीचं पूर्वायुष्य समजणं हे ही नाही. मार्को आणि राजूची  (रोझी नृत्यांगना झाल्यानंतरची ) भेट काय किंवा शेवटी राजू आणि त्याची आई आणि राजू आणि रोझी यांची भेट हे देखील मूळ पुस्तकात नाही. त्यामुळे मूळ कथेपेक्षा खूपच स्वातंत्र्य घेतलंय असं वाटतं. आणि एकूण चित्रपट रोझीकडे झुकलाय की काय असं वाटत राहातं. मला सिनेमा खूप तुटक तुटक वाटला. दिग्दर्शकाचं जे कौशल्य गाणी चित्रित करण्यात दिसतं ते सिनेमाच्या दृश्यात आणि त्यांच्या संपादनात अधिक दिसलं असतं तर एक वेगळा सिनेमा बघायला मिळाला असता. रोझीच्या रोमारोमांत नृत्य भिनलंय पण मार्कोशी लग्न झाल्यानंतर तिचं नृत्य बंदच होतं. तिची ही ऊर्मी ती नागराज बघायला जाते तेव्हा आपसूक बाहेर पडते आणि ती बेभान होऊन नाचते. हा प्रसंग पुस्तकात फार तर एक पान दीड पानाचा आहे. पण सिनेमात तो तब्बल ४-४.५ मिनिटं चालतो. वहिदा रेहमान एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे म्हणून  इतका वेळ त्यासाठी इतका वेळ दिला गेला का? पाहा हेच ते  बेभान नृत्य-
https://www.youtube.com/watch?v=IJbgi9S7IMo

माझ्या मते वहिदा रेहमान आणि या सिनेमाचं संगीत(संगीतकार एस. डी, बर्मन)  ही त्याची बलस्थानं आहेत. पण याच बलस्थानांमुळे दुर्दैवाने सिनेमाचा समतोल ढळतो. सगळीच गाणी अप्रतिम आहेत. पण खूप जास्त गाणी आहेत. ३-४ गाणी अगदीच अनावश्यक वाटतात. (उदा- गाता रहे मेरा दिल, दिन ढल जाये, क्या से क्या हो गया) शेवटी जेव्हा रोझी आणि राजू भेटतात तेव्हा देखील -लाख मना ले दुनिया साथ न ये छुटेगा हे गाणं background ला ऐकू येतं. त्याने तर अगदी रसभंग होतो. देव आनंदच्या चॉकलेट हिरोच्या प्रतिमेशी खूपच फारकत घेणारी अशी त्याची भूमिका आहे. खरं तर once in a lifetime म्हणतात तशी ! त्याने ती खूप प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला आहे. पण तरी हे प्रयत्न अपुरे आहेत असं वाटतं.
माझ्या दृष्टीने सिनेमाचं फलित त्याचं उत्कृष्ट संगीत, वहिदा रेहमान चं नृत्य आणि तिचा अभिनय आणि महत्त्वाचं म्हणजे सिनेमा बघून लोकांना पुस्तक आणि त्यातील व्यक्तिरेखा  यांचा परिचय होऊन त्यातून लोकांना मूळ कादंबरी वाचावीशी वाटणं!(माझ्याबाबतीत मात्र हे उलटं झालं असलं तरी!)

No comments: