Saturday, 21 November 2015

पर्याय २०१२ : फॅमिली डॉक्टर: गरज सरली की बदलली?

(आमच्या बीकन फौंडेशन या होमिओपथी च्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे २००६ सालापसून आम्ही 'पर्याय' हा दिवाळी अंक काढत आहोत. सर्वसामान्य लोकांमध्ये होमिओपथी विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा अंक काढला जातो. 'पर्याय' च्या अंकात आलेले माझे काही लेख ब्लॉग वर देत आहे. त्यावर आपल्या मतांचे स्वागत आहे. सर्वप्रथम २०१२ सालचा हा लेख आहे. फॅमिली डॉक्टर या संकल्पनेचा आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे करण्यात आला आहे)


कुठेही बघा! गप्पांमध्ये काही ठराविकच विषय हमखास येत असतात... राजकारण, भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, क्रिकेट, सिनेमा आणि गॉसिप!  पण तुम्ही जर होमिओपॅथीचे डॉक्टर असाल आणि कुठल्याशा कार्यक्रमात गेला असाल तर फारशी कुठलीही ओळख नसलेली व्यक्तीही तुमच्याशी - हल्ली होमिओपॅथीकडे खूप जण वळतात, नाही?’ किंवा सध्या होमिओपॅथीचा प्रसार खूपच वाढलेला दिसतोअसं म्हणून (तुमची इच्छा असो वा नसो) संवाद सुरू करते. ह्याच अनुषंगाने गेली अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्राच्या बाबतीत एक विषय ऐकू येतो - फॅमिली डॉक्टर ही संस्था हळूहळू लोप पावत चालली आहे.मग यावर जरासे गप्पांचे गुर्‍हाळ चालते पण आवश्यक ती साधक-बाधक चर्चा होताना दिसत नाही. वरवरच्या गप्पांमध्ये प्रत्येकजण आपापल्या फॅमिली डॉक्टरांचे अद्भुत, विस्मयकारक किस्से रंगवून रंगवून सांगतो. त्यांनी दिलेल्या त्या रंगीबेरंगी गोळ्या (पिवळी, पांढरी, गुलाबी गोळी वगैरे), रंगीत पातळ औषध, त्या ठराविक आकाराच्या काचेच्या बाटल्या... यांची वर्णने करतो किंवा मग काही सुप्रसिद्ध फॅमिली डॉक्टर, जे जिवंतपणीच दंतकथा बनून गेलेले असतात त्यांच्याविषयी बोलतो. या सर्व गप्पांमध्ये असतो तो एक भावनिक ओलावा, एक अद्भुत अनुभव घेतल्याचा आनंद आणि बराचसा भाबडेपणाही! पण यातून मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. खरंच फॅमिली डॉक्टर ही संकल्पना आहे तरी काय? आणि खरोखरच ती आता का नष्ट होऊ लागली आहे? आणि कशामुळे?

यासाठी पूर्वापार चालत आलेल्या वैद्यकीय व्यवसायाची पार्श्‍वभूमी थोडीशी समजून घेऊ...
आजच्या वैद्यकीय व्यवसायापेक्षा सुमारे 30-35 वर्षांपूर्वीचं चित्र खूपच वेगळं होतं. डॉक्टरांची संख्या तशी मर्यादित होती. खाजगी हॉस्पिटलांची संख्या ही अगदी बोटावर मोजण्या इतकीच होती. डॉक्टरांमध्ये एमबीबीएस, एलसीइएच (होमिओपॅथी) एलसीपीएस, बीएएमएस प्रशिक्षण घेतलेले पदवीधर हेच संख्येने जास्त असायचे. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मर्यादित अनुभव घेऊन स्वत:चे साधे दवाखाने सुरू करणे असाच सर्वसाधारण प्रघात होता. सुपर-स्पेशालिस्ट तर सोडाच, पण साधे स्पेशालिस्टही संख्येने कमी होते व त्यांच्याकडे जाणे टाळण्याकडेच अधिक कल होता. छोट्या-मोठ्या सर्व आजारांवर हे वर उल्लेख केलेले डॉक्टर उपचार करत. छोट्या-छोट्या शस्त्रक्रियाही गरजेप्रमाणे करत (उदा. टाके घालणे, ड्रेसिंग करणे इ. ) पेशंटकडून फी माफक घेत. हे डॉक्टर बहुतेक घरांतील सर्वच्या सर्व रुग्णांवर (आबालवृद्ध, लिंगभेद विरहित) उपचार करत. त्यामुळे घरातील सर्वांचाच डॉक्टरांशी परिचय होई. त्याचेच रूपांतर पुढे घनिष्ट संबंधात होत असे. एखाद्या आजारावर या डॉक्टरांना उपचार करणे शक्य होत नसेल वा उपचार करून योग्य प्रतिसाद मिळत नसेल तर पुढील निदान व उपचारांसाठी पेशंटला स्पेशालिस्ट डॉक्टरकडे किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठविले जायचे. किंवा त्या पेशंटच्या उपचारांची दिशा ठरविण्याबाबत स्पेशालिस्टशी बोलून उपचार करण्याचे काम फॅमिली डॉक्टर करत असे. म्हणजेच सर्व तक्रारींवरील उपचारांकरिता फॅमिली डॉक्टर व त्यांनी सुचविले तरच स्पेशालिस्ट डॉक्टर अशी एक व्यवस्था होती.

गेल्या दोन-अडीच दशकांत वैद्यकीय शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढली, पण ती वाढलेली संख्याही खूपच अपुरी असल्यामुळे वैद्यकीय शिक्षणाचे बाजारीकरण होऊन त्याचा खर्चही भरमसाठ वाढला. शहरातील डॉक्टरांची संख्या वाढल्यामुळे आपसूकच स्पर्धाही वाढली. त्यामुळे काहीतरी वेगळेपण जपणं क्रमप्राप्त ठरलं. याचवेळी आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक वैद्यकीय शाखांच्या कक्षाही विस्तारल्या. उत्तरोत्तर अधिक जवळ येणार्‍या जगात परदेशात जाऊन शिक्षण घेणं सुलभ झालं. दुसरीकडे पेशंट वर्गही जाणकार, बहुश्रुत होऊ लागला. या सगळ्याचा परिणाम म्हणूनच की काय पण स्पेशलायझेशनला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं! ज्याची demand जास्त, त्याचं production ही  जास्त! म्हणूनच जागोजागी, गल्लोगल्ली, वळणावळणावर स्पेशालिस्ट दिसू लागले... आणि या गदारोळात ते फॅमिली डॉक्टर कधी, कुठे गुडूप झाले हे कळलं सुद्धा नाही!

याच काळात सामाजिक, आर्थिक स्थित्यंतरेही घडून आली. साध्याडॉक्टरला बदलत्या काळाप्रमाणे उत्पन्नाचे गणित बसविणे अवघड होऊ लागले. सर्वत्र असलेली महागाई, जागेचे वाढते भाव,डॉक्टरांमधली सुप्त पण क्रूर स्पर्धा तसेच सर्वत्र लागू पडणार्‍या Survival of the fittest या सिद्धांताप्रमाणे डॉक्टरांना आणखीन नवीन काही शिकणे (स्पेशलायझेशन) गरजेचे होऊन बसले. आणि त्यातूनच हळूहळू फॅमिली डॉक्टरचे बिरूद घेऊन असणारा बजेटडॉक्टर लुप्त होऊ लागला.

पेशंटच्या दृष्टिकोनातून:


पूर्वीच्या काळच्या पेशंटचं एक उदाहरण सांगता येईल. पेशंटला पोटदुखीचा किरकोळ त्रास होत होता. तो पेशंट त्याच्या फॅमिली डॉक्टरकडे स्वत:करिता नव्हे तर दुसर्‍या कोणाकरिता तरी गेला होता. सहज म्हणून जाता-जाता पेशंटने आपली तक्रार डॉक्टरांना सांगितली. डॉक्टर म्हणाले, ‘‘विशेष काही वाटत नाही. ओवा खा. औषध घेण्याची गरज नाही.’’ हे ऐकून पेशंट बाहेर पडला आणि त्याला अचानकबरं वाटू लागलं! कुठलंही औषध न घेता! केवळ डॉक्टरांचा हा दिलासा पेशंटसाठी पुरेसा ठरला. एकंदरीत डॉक्टरांवरील विश्‍वासानेच बर्‍याचदा आजार बरे होतात. व्याधीने त्रस्त झालेल्या पेशंटला आपल्याला नेमकं काय झालं आहे हे कळतही नसतं. वेगवेगळे घरगुती उपाय करूनही उपयोग झाला नाही तर डॉक्टरकडे जायचं अशी पूर्वी धारणा होती. आजाराबद्दलचे अज्ञान वा अनास्था वा आर्थिक असमर्थता यामधून आजार अंगावरही काढले जात असत. पण मग एकदा का डॉक्टरकडे गेलं की असहाय्य मन आणि शरीर डॉक्टरच्या हवाली केले जाई - पूर्ण विश्‍वासाने! म्हणून डॉक्टर हा एकप्रकारे तारणहार होई- पेशंटला आजारातून मुक्ती देणारा! यातूनच डॉक्टर म्हणजे एक श्रद्धास्थान किंवा दैवतच असं समीकरण होत असे. अशा ज्ञानी व पूजनीय व्यक्तीला कधीकधी घरगुती समस्यांबाबतही सल्ला विचारला जात असे. साहजिकच या सगळ्याचा परिणाम म्हणून डॉक्टर-पेशंट नात्याला एक वेगळे परिमाण प्राप्त होत असे.
पण अलिकडच्या काळात सामाजिक, आर्थिक बदलांचा चांगला/वाईट परिणाम जसा वैद्यकीय क्षेत्रावर झाला तसाच तो पेशंटवरही झाला. पूर्वी त्यामानाने माहिती मिळविण्याचे स्त्रोत मर्यादित होते. मात्र आधी टी.व्ही. व नंतर इंटरनेटच्या आगमनाने चित्र पालटले. इंटरनेटने तर माहिती मोफत व तुरंत करून टाकली. त्यामुळे आजारांबद्दल, त्यावरील उपचारांबद्दल आणि त्यांच्या प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूक होणे सहज शक्य  झाले. ही अतिशयोक्ती नाही की हल्ली पेशंट डॉक्टरांना आपल्या आजाराचे निदान सुचवितात किंवा डॉक्टरांकडून confirm  करून घेतात. जी गोष्ट पूर्वी फॅमिली डॉक्टर करायचे ती गोष्ट पेशंट स्वत:च करताना दिसतात. बारीक-सारीक तक्रारींवर तर ओव्हर-द-काऊंटर औषधं मिळतातच आणि जराशा मोठ्या तक्रारीसाठी थेट स्पेशालिस्टकडे जाणे सहज शक्य असते. आजकाल खिशात पैसा असल्याने ते परवडते देखील! पेशंट आपणहून हा पर्याय निवडू लागले आणि त्यामुळेच ज्यांना अगदीच परवडत नाही... वा उगाचच का औषध-पाण्यावर अति खर्च करायचा? अशा विचारसरणीचेच पेशंट फक्त फॅमिली डॉक्टरकडे जाऊ लागले. पुढे त्यांची संख्या घटत गेली आणि आता तर फॅमिली डॉक्टर हे सामान्य पेशंट आणि स्पेशालिस्ट यांच्यातील केवळ एक दुवा होऊन राहिले आहेत.

तसे पाहता-


फॅमिली फिजीशियन अशी कुठली स्पेशालिटी शाखा वैद्यकीय शिक्षणाची नाही. जसे स्त्री-रोग-प्रसूतीशास्त्र, शल्यचिकित्सा व हृदयरोगचिकित्सा या शाखा आहेत; तसे फॅमिली फिजीशियन होणे हे कुठल्याही वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या औपचारिक प्रशिक्षणाचा भाग नाही. केवळ अति-विश्‍वासापोटी पेशंट वर्गानेच डॉक्टरांना बहाल केलेली ही एक विशेष उपाधि म्हणता येईल. अर्थात, त्या उपाधिच्या अनुषंगाने येणारी प्रत्येक जबाबदारी डॉक्टर यशस्वीरित्या पूर्ण करत आला आणि म्हणून सतत पैशाची चणचण जाणविणार्‍या मध्यम वर्गाने या फॅमिली डॉक्टरला उचलून धरले. गेल्या दशकात मध्यम वर्गाचे रूपांतर उच्च-मध्यमवर्गीयात झाले. खर्चाच्या सीमा सहज ताणल्या जाऊ लागल्या आणि त्यात हा फॅमिली डॉक्टर मागे पडला. ते म्हणायचो ना आपण - गरज सरो... आता तर डॉक्टरांची भूक वाढली आहे आणि त्याबरोबरच पेशंटची क्रयशक्तीही वाढली आणि मग कित्येक स्पेशालिस्टच फॅमिली कन्सल्टंटची भूमिका बजावू लागले. त्यामुळे तो साध्या वेशातला, हातात चौकोनी बॅग घेऊन घरोघरी जाणारा फॅमिली डॉक्टर जरी लोप पावला असला तरी नव्याने उदयाला आलेल्या या फॅमिली कन्सल्टंटकडून बर्‍याच अपेक्षा आहेत. कित्येक वर्षांचे सौहार्दपूर्ण संबंध हे फॅमिली डॉक्टरचे वैशिष्ट्य हे फॅमिली कन्सल्टंटजपू शकतील का हा खरा प्रश्‍न आहे.

1 comment:

Dinesh Gaikwad said...

छान माहिती आहे धन्यवाद सर