Saturday 19 November 2016

सलील चौधरी: एक अभिजात संगीतकार !

आज सुप्रसिद्ध संगीतकार सलील चौधरी यांचा जन्मदिवस !(१९.११.१९२५) खरं तर ते केवळ संगीतकारच नव्हते तर कवी, कथाकार, पटकथाकारही होते. हिंदी, बंगाली, मल्याळम आणि इतर दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं . शिवाय ते काही चित्रपटांना फक्त पार्शवसंगीत देत. 
लोकसंगीत आणि पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचा हिंदी चित्रपट संगीतात सुंदर मिलाफ करणारा हा संगीतकार !(मोझार्टच्या ४० नं सिम्फनीवरून 'छाया' चित्रपटातले 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणे त्यांनी तयार केले होते हे आपल्याला माहीत असेलच!) त्यांच्या गाण्यांमध्ये त्यांनी गिटार, बासरी, सतार,सॅक्सोफोन सारख्या वाद्यांचा वापर केला आणि कॉयरचं अतिशय वैशिष्ठयपूर्ण मिश्रणही !
जरी त्यांनी बिमल रॉय( 'दो बिघा जमीन','मधुमती','नौकरी','परख','बिराज बहू', 'प्रेम पत्र'),हृषिकेश मुखर्जी('मुसाफिर','छाया','मेम दीदी','आनंद','सबसे बडा सुख'),आर के फिल्म्सच्या  'जागते रहो' या सारख्या अव्वल बॅनरच्या चित्रपटांना संगीत दिलं असलं तरी तुलनेने कमी प्रसिद्ध दिग्दर्शक(उदा- डी डी कश्यप यांचा 'माया', कालिदास यांचा 'हाफ टिकिट') तसंच नामांकित दिग्दर्शकांच्या उतरत्या काळात(उदा-असित सेन यांचा 'अन्नदाता','अनोखा दान') आणि त्या काळच्या नवख्या दिग्दर्शकांबरोबरही (उदा-गुलजार यांचा- 'मेरे अपने', बासू चॅटर्जी यांचे 'रजनीगंधा', 'छोटीसी बात') त्यांनी तेवढ्याच उत्कृष्ठ दर्जाचं काम केलेलं आहे. काहीवेळा असंही झालंय की असे चित्रपट विस्मृतीत गेले आहेत पण त्यातील सलील चौधरींची सुमधुर गाणी मात्र लक्षात राहिलेली आहेत. 
अशीच काही गाणी इथे देत आहे-
१) 'प्रेमपत्र' या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांचं हे युगुलगीत- 'सावन की रातों में ऐसा भी होता है'. यात गद्य आणि पद्याचा छान मेळ आहे. तसंच लता मंगेशकर यांचा तिन्ही सप्तकांत फिरणारा आवाजही! तलत मेहमूद यांच्या काहीशा पडत्या काळातलं गाणं आणि तेही शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं! 

२) हे 'संगत' या चित्रपटातलं गाणं- पुन्हा एकदा युगुलगीत- लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलेलं! 'कान्हा बोले ना' ! काय सुंदर चाल आहे! कुठल्याही वाद्याच्या साथीशिवाय लता मंगेशकर यांनी गायलेला मुखडा लाजवाब ! एवढ्या चांगल्या गाण्याचं दुर्दैव हे की ते राकेश पांडे आणि कजरी यासारख्या अपरिचित नटांवर चित्रित झालं आहे. इथेच दुर्दैव संपत नाही. हा चित्रपट त्यावेळी प्रसिद्धच होऊ शकला नव्हता! त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही की निदान गाण्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. 

३) आता पुढच्या गाण्यात सलील चौधरींच्या संगीतातील बरीचशी वैशिष्ट्ये आहेत (अगदी कॉयर सकट!) शिवाय या गाण्यातला नाजूकसा ठहराव खूपच छान आहे. गाणं आहे- 'रातों के साये घने'. चित्रपट 'अन्नदाता'. या चित्रपटांत जरी जया भादुरी असली तरी तो फारसा काही चालला नव्हता. 

४) पुढचं गाणंही त्याच 'अन्नदाता' चित्रपटातलं आणि पुन्हा एकदा ठहराव असलेलं! पण गायलंय मुकेश यांनी-'नैन हमारे सांज सकारे देखे लाखों सपने'. अनिल धवन सारख्या ठोकळेबाज नटाच्या तोंडी असं सोन्यासारखं गाणं देऊन दिग्दर्शकांनी गाण्यावर खरोखरंच अन्याय केला आहे. 

५) हे गाणं आहे 'बिराज बहू' चित्रपटातलं- 'मेरे मन भूला भूल काहे डोले' ! पूर्णतःबंगाली संगीताची छाप असलेलं! या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे तीन संगीतकारांचं गाणं आहे- याचे गीतकार आहेत प्रेम धवन( ज्यांनी 'पवित्र पापी', 'शहीद' यासारख्या चित्रपटांना संगीत दिलं आहे.) गायक आहेत हेमंतकुमार( यांचे संगीतकार म्हणून अनेक चित्रपट गाजलेले आहेत हे वेगळं सांगायला नकोच!) आणि संगीतकार अर्थातच सलील चौधरी! आपल्या मराठीत तीन संगीतकारांनी मिळून केलेलं एक सुप्रसिद्ध गाणं आहे- स्वर आले दुरुनी(गीतकार यशवंत देव, संगीतकार प्रभाकर जोग आणि गायक सुधीर फडके!)
https://www.youtube.com/watch?v=2DsZAVyEOnY

६) हे पुढचं गाणं आहे 'आनंद महल' चित्रपटातलं! 'नि सा ग म प नी सा रे ग .. आ आ रे मितवा' हे येसूदास यांनी गायलेलं गाणं ! या गाण्याचा व्हिडिओसुद्धा उपलब्ध नाही.चित्रपटांत विजय अरोरा हिरो आहे त्यामुळे गाण्याचा व्हिडिओ नाही हे चांगलंच आहे म्हणायचं ! या गाण्यात ईसराज हे वाद्य ऐकू येतं. सलील चौधरी स्वतः ते वाजवत. या गाण्यात त्यांनी ते वाजवलंय का हे माहित नाही. 
https://www.youtube.com/watch?v=NjziC6b_zJc

७) आणि हे शेवटचं गाणं आहे 'हनिमून' चित्रपटातलं- 'मेरे ख्वाबो में खयालो में छुपे'! मुख्य स्वर आहे मुकेश यांचा. पण प्रत्येक अंतऱ्यात लता मंगेशकर यांनी अफलातून आलापी गायली आहे. त्यावरून नायिकेचा उत्फुल्ल, आनंदी मूड सहजच लक्षात येतो.
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwj-o5GHw7LQAhVCQY8KHakyBBoQtwIIGzAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DXVHD0S4gMrY&usg=AFQjCNH8BRPr8gWlUUn8cwIDPtqwAla1Rw&sig2=GUOVGDDYDGa1CGVdBIk4Sw


1 comment:

Shreepad M Gandhi said...

परवाच ह्रदयनाथ मंगेशकर यांचा एक अलिकडचा व्हिडीओ बघत होतो यूट्यूबवर...
त्यांना विचारलं गेलं की तुमच्यावर प्रभाव असा कुठल्या संगीतकाराचा आहे का?
ते (नेहमीप्रमाणेच सीधी बात नो बकवास ��) सरळ उत्तरले ... प्रभाव म्हणावा असेही आहेत आणि गुरू मानावं असेही आहेत...एकतर वडील मा. दीनानाथ, उ. आमीरखाँ, सज्जाद हुसेन, सलील चौधुरी आणि जयदेव...
यापैकी सगळ्यांच्या प्रतिभेचा परिचय आहे फक्त जयदेव सोडून...जयदेवना ह्रदयनाथ गुरुसमान मानतात?? आश्चर्य आहे... नक्कीच त्यांचं काही अप्रकाशित धन असावं ज्यामुळे ते असं प्रतिपादन करत आहेत. जेवढी गाणी जयदेव यांची प्रसिद्ध आहेत त्यावरून त्यांची सांगीतिक उंची किती हा चर्चेचा विषय होऊ शकतो...असो. आपल्याला कानसेनांना काय...चांगलं संगीत ऐकायला मिळालं की बास...
या कसोटीवर तू वर उल्लेख केलेली सगळी गाणी अगदी फिट्ट बसतात...सलीलदांकडे प्रचंड प्रतिभा होती. त्यांच्या गाण्यांतून अगदी ओसंडून दिसते...लताबाईंच्या आवाजाचा काही संगीतकारांकडे कस लागलेला जाणवतो...त्यांत सलीलदांचा क्रम खूप वरचा आहे. ब-याच voice of lata म्हणून मिरवणा-या गायिका सलीलदांच्या वाटेला जाण्याचं दु:साहस करत नाहीत. झेपणारच नाही.
वरच्या यादीतली काही काही गाणी ऐकायला लागतील त्यांमुळे खूप खुश आहे ... कारण ती माहिती नव्हती...हा:हा:..एक मेजवानी वाट बघतीये जणू...वा:...
त्यांनी आपली तीनही मैलाचा दगड झालेली कोळी गीतं बंगालीत उतरवली ... अतिशय श्रवणीय आहेत...सगळी मूळ गाणी दुस-या भाषेत केल्यावर तितकीच चांगली होतात हा भ्रम आहे... पण ही तीनही गाणी मात्र हा भ्रम नसून सत्य असल्याचं ठसवतात...असो.
राहुलदेव बर्मनच्या वेबसाईटवर सलीलदांचं एक पंचमबद्दलचं मत केव्हातरी वाचलं होतं...
I rate him alongside the stalwarts of my era viz. SJ, Naushad etc. He was always experimenting, innovative...Just like me...
या ...just like me ...हे तीन शब्द त्यांचा स्वतःच्या प्रतिभेबद्दलचा आत्मविश्वास दर्शवतात...टिपिकल वंगबंधू...����.
धन्यवाद राजेश !!!