Monday 24 July 2017

वाढदिवसाच्या शुभेच्छा श्रीरंग आणि प्रशांत !

डावीकडून मी, श्रीरंग ओक आणि प्रशांत लेले माझ्या वाढदिवशी 

 (आमच्या मैत्रीला ३० एक वर्षं झाली असतील. कॉलेजच्या काळात जेवढी होती तितकी आता ती राहिलीही नाही. कारण आता भेटीही होत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या व्यापात असतो. प्रशांत तर सातासमुद्रापार लंडनला असतो. बराचसा संवाद व्हॉटस्अप ग्रुपवर  होत राहतो.पण जेव्हा केव्हा प्रत्यक्ष भेट होते तेव्हा नुसती धमाल असते.  या वर्षी या दोघांच्या वाढदिवशी मला काहीतरी लिहावंसं वाटलं. त्याचाच हा ब्लॉग... ज्यांना माझे हे दोघेही मित्र माहीत नाहीत त्यांच्यासाठी - श्रीरंग हा पुण्यातला एक नामवंत होमिओपॅथिक डॉक्टर आहे. कॉलेजच्या काळात  त्याने बैल हे एक कॅरॅक्टर केलं होतं आणि त्यावर त्याने काढलेली व्यंगचित्रं जबराट होती. अजूनही ती चित्रं  पाहून आम्ही मनमुराद हसत असतो. तर प्रशांतने काही काळ होमिओपॅथीची प्रॅक्टिस केल्यानंतर सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर केलं असून तो आता लंडन येथे स्थायिक झाला आहे. टेनिस हे प्रशांतचं पॅशन असून गेली काही वर्षं तो सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत लाईन अंपायर म्हणून काम पाहतो.विम्बल्डन सारख्या स्पर्धेत अंपायर म्हणून काम करणे ही खूपच मोठी गोष्ट आहे, हे सूज्ञांस सांगणे न लगे !)

 



(हा ब्लॉग म्हणजे फॅन फिक्शनचा प्रकार आहे . म्हणजे यातील व्यक्ती खऱ्या आहेत पण प्रसंग पूर्णतः: काल्पनिक आहे. यात कोणालाही दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. ही केवळ एक गंमत आहे आणि त्याकडे तसेच बघितले जावे ही अपेक्षा आणि विनंती !) 
                                                                        .. १...

बुधवार १९ जुलै २०१७
स्थळ: महाराष्ट्र विधानसभा 
पावसाळी अधिवेशन : दिवस पहिला 
(आद्ल्यादिवशीच्या चहापानाच्या कार्यक्रमावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातल्यामुळे आज ते अत्यंत खुश दिसताहेत. आपण काहीतरी केल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यांवर ओसंडून वाहतंय. तर सत्ताधारी पक्षही खुश- तेवढेच चहापाण्याचे पैसे वाचले! कामकाजाला सुरुवात होते-)
मा. मुख्यमंत्री : अध्यक्ष महोदय... आज या ठिकाणी सभागृहाला एक प्रश्न विचारण्याचा अतिशय आनंद होतोय अध्यक्ष महोदय... आज वार काय आहे? अध्यक्ष महोदय... तारीख काय आहे?अध्यक्ष महोदय... 
(सभागृहातून आवाज : बुधवार...बुधवार... १९ जुलै... १९ जुलै)
मा. मुख्यमंत्री : बरोबर आहे ! (बाके वाजवण्याचा आवाज!) तर अध्यक्ष महोदय, आज, १९ जुलैच्या मंगल, पावन आणि पवित्र दिवशी अधिवेशनाला सुरुवात होत आहे हे आमचे परम भाग्य, अध्यक्ष महोदय! आजच्या कामकाजाचा मुख्य विषय आहे आमचे परममित्र मा. नामदार, डॉक्टर श्रीरंगरावजी ओक साहेब यांचा या ठिकाणी असणाऱ्या वाढदिवसाबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडणे ! डॉक्टरसाहेब हे होमिओपॅथीच्या क्षेत्रातले एक नामांकित आणि निष्णात डॉक्टर आहेत. त्यांची ओळख अख्ख्या जगालाच काय, सबंध भारतालाही आहे, अध्यक्ष महोदय ! फक्त एवढंच नाही अध्यक्ष महोदय, ते स्वभावाने अतिशय मृदू आणि निर्मळ मनाचे आहेत. आयुष्यात त्यांनी कधीही कोणाचे वाईट चिंतले नाही. 
शिक्षणमंत्री : ठरावाला माझे अनुमोदन... डॉक्टरसाहेब एक हसरे व्यक्तिमत्व आहेत !
अर्थमंत्री : डॉक्टरसाहेब अभ्यासू आहेत. माझेसुद्धा अनुमोदन... 
(सभागृहातून एकच आवाज : अनुमोदन ... अनुमोदन... )
इतक्यात अजितदादा उभे राहतात-(सत्ताधारी गटात चिंता! आता हे काय बोलणार?)
अजितदादा: आज... या ठिकाणी... डॉक्टर साहेबांचा वाढदिवस आहे... माझ्याकडूनही त्यांचे अभिनंदन! (सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी बाके वाजवून स्वागत !)
अजितदादा: पण... या ठिकाणी एक कपात सूचना मांडायची आहे... 
(सत्ताधारी गटात कुजबूज... कपात सूचना पारित झाली तर सरकार कोसळेल !)
कोणीतरी विचारतं : कुठली ?
अजितदादा : आजच्या दिवसाचे औचित्य साधून बैल हा आपला राज्य प्राणी घोषित केला पायजेले ! (विरोधी गटातून बाके वाजण्याचा तर सत्ताधारी संभ्रमात)
मुख्यमंत्री: दादा... सगळं ठीक आहे ना? (हशा ) काय बोलताय काय तुम्ही? आजचा विषय काय.. तुम्ही काय बोलताय? 
अजितदादा: मी सिंचनमंत्री असताना धरणात जाऊन XX णार होतो तसं आता बैलासमोर जाऊन XX का ? म्हणजे तुम्हांला पटेल? आज कोणाचा वाढदिवस? ओक साहेबांचा! त्यांचा आवडता प्राणी कुठला? त्यांनी कोणावर कार्टून काढली?


तर याचं उत्तर बैल आहे. यांच्या कार्टून मुळे आम्ही बैलाच्या प्रेमात पडलो. त्यांचा जो आवडता प्राणी तो साहजिकच आमचाही आवडता झाला ना? . म्हणून आता आम्ही बैल हा आपला राज्य प्राणी घोषित करावा यासाठी आंदोलन करणार आहोत.. त्याचाच एक भाग म्हणून ही कपात सूचना !
(सभागृहात गदारोळ !)
विधानसभा गॅलरीत उद्धव ठाकरे बसलेले असतात. तिथून ते ओरडतात.. आमच्या शिवसेनेच्या वाघांचाही या कपात सूचनेला पाठिंबा! सभागृहात आणखी गदारोळ ! 
मुख्यमंत्री: अध्यक्ष महोदय... अध्यक्ष महोदय... 
पण त्यांचं कोणीच ऐकत नाही. सभागृहाचं कामकाज तहकूब होतं. तर अशा रीतीने एक चांगला प्रस्ताव (तो ही विरोधी पक्षाकडून आलेला !) पारित होत नाही!  

                                                                             ..२.. 
सोमवार २४ जुलै २०१७ 
यंदाची विम्बल्डन स्पर्धा रॉजर फेडररने  जिंकल्यामुळे रफाएल नदाल खवळलेला असतो. त्याचा राग कसा कोण जाणे पण फेडररपर्यंत पोचतो . फोनवर तो नदालची समजूत काढायचा प्रयत्न करतो  पण ते काही होत नाही. नदाल सारखा म्हणतो - मीच नंबर वन ! मग शेवटी फेडरर म्हणतो - आपण एकदा भेटलं पाहिजे . मला भेटल्याशिवाय तू लंडन सोडू नकोस. कुठे भेटायचं त्याचा पत्ता मी तुला Whatsapp करतो. 
तर अशा रीतीने नदाल विम्बल्डन सेंटर कोर्टच्या बाहेर अमृतेश्वर अमृततुल्य या चहाच्या टपरीवर ठरलेल्या वेळी पोचतो . तिथे बघतो तर काय फेडरर, अँडी मरे आणि नोव्हॅक जोकोविच आधीच आलेले असतात. 
आता त्यांच्यातला हा सुखसंवाद -
नदाल : अरे लेका रॉजर, #@*&$,इथे बोलावलंस? चहाच्या टपरीवर? माझी पण काही पत आहे का नाही? इथे मलासुद्धा लोकं ओळखतात. आधीच विम्बल्डनमध्ये सुद्धा माझ्याशी partiality केली गेली. तुमच्या मॅचेस ठेवल्या सेंटर कोर्टला आणि आम्हांला मात्र ढकललं कुठेतरी कोपऱ्यात! त्या वर आता तू जखमेवर मीठ चोळ आणखी ! #@*&$( पुढे स्पॅनिश भाषेत अगम्य शिव्या!)
फेडरर (या सगळ्याकडे दुर्लक्ष करत) :  काय घेणार तुम्ही सगळे? (अमृततुल्य मधल्या वेटरला शिट्टी वाजवून बोलावून घेत) अरे बेटा दोन कटिंग आण रे...
जोकोविच (चेहऱ्यावर प्रचंड अविश्वास आणि आश्चर्य): भावा... अरे इतके करोडो कमावलेस ना नुकतेच ? आणि आमची फक्त कटिंग चहावर बोळवण करतोस? किती हा कंजूसपणा?!
फेडरर : काय सांगू मित्रा ? ४-४ पोरं वाढवायची म्हणजे खाऊची गोष्ट आहे का? त्यांचं दूध- दुभतं, कपडे-लत्ते, शाळेच्या फिया, बाईचा खर्च ! इथे महागाई मी म्हणतेय! म्हणून रिटायर न होता मला अजूनही काम करावं लागतंय. बरं ते जाऊ दे... 
असं म्हणून फेडरर नदाल का चिडलाय ते या दोघांना सांगतो. सारखा मीच नंबर वन म्हणतोय. वगैरे..  
मरे: हॅलो ..हॅलो ... मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ऑफिशियली अजून तरी मीच नंबर वन आहे !
जोकोविच : आणि मीही होतोच की! शिवाय बारा कप आहेत माझ्या कपाटात! 
फेडररला वाटलं होतं की सगळे मिळून नदालची समजूत काढतील तर इथे भलतंच घडत होतं. तो सगळ्यांना विचारतो  : अरे बाबांनो हा तिढा सोडवायचा तरी कसा? 

जोकोविच : एक उपाय आहे. आपण एका अशा माणसाला विचारू शकतो की जो उत्तम टेनिस जाणतो आणि जो निःपक्षपणे आपली परीक्षा घेईल. अशी एक व्यक्ती मला माहित आहे. मी ओळखतो त्या व्यक्तीला... 

(तिघेही विचारतात) : कोण? 

कट टू

प्रशांत लेलेचं लंडनमधलं घर. फोन वाजतोय. ध्रुव(प्रशांतचा मुलगा) फोन घेतो. आतूनच प्रशांत विचारतो- कोणाचा फोन आहे रे ध्रुव्या?
ध्रुव : बाबा, जोको अंकलचा फोन आहे. ते म्हणतात असशील तसा शून्य मिनिटांत सेंटर कोर्टवर ये. 
विम्बल्डन स्पर्धा नुकतीच संपली असली तरी प्रशांत अजूनही अंपायरच्याच वेशात असतो. त्यामुळेच तो तडक अमृततुल्यला जाऊ शकतो . 

फेडरर आतापर्यंत घडलेली सगळी कथा प्रशांतला सांगतो. 
प्रशांत  -त्यात काय!  हे सोप्पं आहे.  काहीच प्रॉब्लेम नाही. आत्ता मॅच घेऊ इथे आपण. प्रत्येक जण फेडरर बरोबर एक सेट खेळेल. टायब्रेकर होणार नाही.  मी चेअर अंपायर होतो! जो जिंकेल तो सर्वोत्तम! 
फेडरर, मरे, जोकोविच तयार होतात. पण नदाल मात्र ग्रास कोर्टवर खेळायला तयार होत नाही. चिडचिड करून, आदळआपट करून, रॅकेट तोडून तिथून तो निघून जातो. प्रशांत नदालला बाद घोषित करतो आणि for the record मॅचेस सुरूच राहतील असं सांगतो.
मग पहिल्यांदा फेडरर वि जोकोविच अशी मॅच होते आणि या सामन्यासाठी पहिल्यांदाच सेंटर कोर्टवर प्रशांत चेअर अंपायर होतो आणि त्याचं एक मोठं स्वप्न पूर्ण होतं. ही मॅच फेडरर ८-६ अशी जिंकतो. नंतर फेडरर-मरे यांच्यात धुंवादार, मॅरॅथॉन मॅच होते. ती फेडरर १८-१६ जिंकतो. मॅचनंतर सगळेच प्रशांतच्या अंपायरिंगचं कौतुक करतात. 
फेडरर: आजचा हा रोमहर्षक विजय मी प्रशांतला अर्पण करतो. सध्या नंबर वन कोणी का असेना पण G.O.A.T. मीच आहे हे आता सिद्ध झालं आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी मला ज्याने मदत केली त्या प्रशांतचे मनापासून आभार मानतो!

No comments: