(अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर २४.०२.२०१८ लिहिलेलं हे टिपण)
कालपासून श्रीदेवीच्या अकाली निधनाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. मला मात्र माझ्या कॉलेजच्या काळातल्या एका प्रसंगाची प्रकर्षाने आठवण येतेय. प्रसंग माझ्या फजितीचा असल्यामुळेच (कदाचित) तो माझ्या चांगलाच लक्षात राहिलेला आहे!
माझ्या कॉलेजच्या काळात मी थोडंफार हार्मोनियम वादन करत असे. त्यावेळी कदाचित इतर कोणाला ते येत नसल्यामुळे मी वासरात लंगडी गाय (?शहाणी) होतो. मी दुसऱ्या की तिसऱ्या वर्षाला असताना आमच्या कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात जयंत पदवाड नावाचा मुलगा आला. त्याला बघूनच कळत होतं की हा वयाने खूप मोठा आहे. लंबूटांग, अमिताभसारखे उंच केस, लांबसडक बोटं, लांबुळकी मिशी, जाड चष्मा, जाड (सिगारेट ओढल्यामुळे काळे झालेले) ओठ आणि मोठाले दात असं त्याचं एकंदरीत रूप होतं. त्याला कोणीही लांबूनही ओळखू शकेल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. भरीत भर सिगारेटमुळे ‘कमावलेला’ भसाडा आणि मोठा आवाज आणि मोठ्या आवाजात बोलायची सवय! त्याच्या एकूण बोलण्या-वागण्यात एक प्रकारची बेफिकिरी होती. तो कॉलेजमध्ये चक्क प्रोफेसरांच्या देखत सिगारेट ओढायचा! याला सध्याच्या भाषेत 'ऍटिट्युड असलेला' म्हणतात. आमच्यावेळी आम्ही 'शायनिंग करणारा' किंवा 'शायनर' असं म्हणायचो . मला कुठूनतरी नंतर कळलं की एमबीबीएस ला ३-४ वेळा नापास होऊन हा आमच्या कॉलेजमध्ये आला होता. तसंच हे ही कळलं होतं की तो एक पर्कशन आर्टिस्ट आहे, उत्तम ड्रम्स वाजवतो. या मुलाशी माझा परिचय होण्याचं खरं तर काही कारण नव्हतं. पण साधारण जानेवारी महिन्यात कॉलेजमध्ये गॅदरिंगचे वारे वाहू लागले. आणि त्यात एक दिवस तो मला भेटला आणि म्हणाला- “तू पेटी वाजवतोस असं कळलं. या वर्षी गॅदरिंगमध्ये आपण धमाल करूयात.” मला हे सगळे धक्क्यावर धक्के होते!त्याचं आपलं बोलणं चालूच होतं.” उद्या तुझ्याकडची एखादी कॅसेट आण. मी तुला एक म्युझिक पीस देतो. तू त्यातली पेटी वाजव. मी सगळी ऱ्हिदम इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो. सगळी लोकं वेडी होतील ऐकून!” मी वाजवणार नाही वगैरे म्हणायची काही सोयच नव्हती. दुसऱ्या दिवशी मी त्याला कॅसेट दिली आणि त्याने तिसऱ्या दिवशी तो रेकॉर्डेड पीस आणून दिला. तो ऐकून मी तीन ताड उडालोच! श्रीदेवीच्या ‘चालबाज’ सिनेमातला दिड मिनिटाचाच तो पीस होता. पण तो पेटीवर वाजवणं काही खायची गोष्ट नव्हती. मी तरी तो पीस ‘बसवण्याचा’ प्रयत्न केला. कारण गाठ जयंत पदवाडशी होती, जो म्हणे बाप्पी लाहिरीकडे नियमितपणे ड्रम्स वाजवायचा!
१-२ दिवसांनंतर मी आणि तो कॉलेजमध्येच प्रॅक्टिससाठी भेटलो. मनात प्रचंड धाकधूक होती. तो मात्र कूल होता. आणि आम्ही वाजवायला सुरुवात केली. त्याच्या वाजवण्याबद्दल काही प्रश्नच नव्हता. तो एकदम भारीच वाजवत होता. वाजवण्याच्या उत्साहात तो काहीसं जोरात वाजवत होता की माझं कुठे चुकतंय हे कळू नये म्हणून मी पेटी सॉफ्टली वाजवत होतो हे आता सांगणं अवघड आहे. त्यात भरीत भर तालाशी माझं वाकडं ! त्यामुळे गुलजारांचे ‘गोलमाल’मधल्या गाण्यातले शब्द उसने घ्यायचे तर- ‘ताल कहां … सम कहां.. तुम कहां… हम कहां’ अशी माझी अवस्था झाली होती. त्याचे बेफाट वादन सुरु होते आणि माझी फरपट झाली होती, अक्षरश: दमछाक झाली होती. दोन-तीन वेळा हा खेळ झाल्यानंतर त्याच्या बहुदा लक्षात आलं असावं की हा काही याचा( म्हणजे माझा!) घास नाही. म्हणून अतिशय decently त्याने सांगितलं- “बहुतेक तुला बरीच प्रॅक्टिस करावी लागेल असं दिसतंय. आत्ता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. परत कधीतरी करूया.”
मी खजील झालो पण एकीकडे अगदी सुटकेचा नि:श्वासही टाकला. कारण फजिती फक्त एकाच माणसापुढे झाली होती. संपूर्ण कॉलेजसमोर झाली नाही हे चांगलंच झालं.
पण त्याचं ते 'परत कधीतरी करूया' काही प्रत्यक्षात उतरलं नाही कारण काही काळानंतर जयंत पदवाड आमच्याही कॉलेजमध्ये टिकला नाही. कॉलेज सोडून गेला. नंतर तर असंही कळलं की तोही अकाली गेला…..
श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यूनंतर सारखी तिची गाणी सगळ्याच चॅनेलवर दाखवत होते. त्यात हा पीस दाखवला की नाही माहित नाही. पण तो पीस भारीच आहे. कुठल्याही ऱ्हिदम आर्टिस्टची बोटं शिवशिवतील, कुठल्याही वादकाला वाजवावासा वाटेल आणि कुठल्याही नृत्यांगनेची पावले थिरकतील असाच हा पीस आहे. श्रीदेवीने तर यावर कमाल नृत्य केलं आहे…
आता जेव्हा जेव्हा हा डान्स सिक्वेन्स बघेन तेव्हा त्याचा संबंध दोन अकाली झालेल्या मृत्यूशी आहे असं मात्र कायम जाणवत राहील …