Tuesday, 13 August 2019

श्रीदेवीचा डान्स सिक्वेन्स, जयंत पदवाड आणि माझी फजिती….

(अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूनंतर २४.०२.२०१८ लिहिलेलं हे टिपण)


hqdefault
कालपासून श्रीदेवीच्या अकाली निधनाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. मला मात्र माझ्या कॉलेजच्या काळातल्या एका प्रसंगाची प्रकर्षाने आठवण येतेय. प्रसंग माझ्या फजितीचा असल्यामुळेच (कदाचित) तो माझ्या चांगलाच लक्षात  राहिलेला आहे!

माझ्या कॉलेजच्या काळात मी थोडंफार हार्मोनियम वादन करत असे. त्यावेळी कदाचित इतर कोणाला ते येत नसल्यामुळे मी वासरात लंगडी गाय (?शहाणी)  होतो. मी दुसऱ्या की तिसऱ्या वर्षाला असताना आमच्या कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात जयंत पदवाड नावाचा मुलगा आला. त्याला बघूनच कळत होतं की हा वयाने खूप मोठा आहे. लंबूटांग, अमिताभसारखे उंच केस, लांबसडक बोटं, लांबुळकी मिशी, जाड चष्मा, जाड (सिगारेट ओढल्यामुळे काळे झालेले) ओठ आणि मोठाले दात असं त्याचं एकंदरीत रूप होतं. त्याला कोणीही लांबूनही ओळखू शकेल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. भरीत भर सिगारेटमुळे ‘कमावलेला’ भसाडा आणि मोठा आवाज आणि मोठ्या आवाजात बोलायची सवय! त्याच्या एकूण बोलण्या-वागण्यात एक प्रकारची बेफिकिरी होती. तो कॉलेजमध्ये चक्क प्रोफेसरांच्या देखत सिगारेट ओढायचा! याला सध्याच्या भाषेत 'ऍटिट्युड असलेला' म्हणतात. आमच्यावेळी आम्ही 'शायनिंग करणारा' किंवा 'शायनर' असं म्हणायचो . मला कुठूनतरी नंतर कळलं की एमबीबीएस ला ३-४ वेळा नापास होऊन हा आमच्या कॉलेजमध्ये आला होता. तसंच हे ही कळलं होतं की तो एक पर्कशन आर्टिस्ट आहे, उत्तम ड्रम्स वाजवतो. या मुलाशी माझा परिचय होण्याचं खरं तर काही कारण नव्हतं. पण साधारण जानेवारी महिन्यात  कॉलेजमध्ये गॅदरिंगचे वारे वाहू लागले. आणि त्यात एक दिवस तो मला भेटला आणि म्हणाला- “तू पेटी वाजवतोस असं कळलं. या वर्षी गॅदरिंगमध्ये आपण धमाल करूयात.” मला हे सगळे धक्क्यावर धक्के होते!त्याचं आपलं बोलणं चालूच होतं.” उद्या तुझ्याकडची एखादी कॅसेट आण. मी तुला एक म्युझिक पीस देतो.  तू त्यातली पेटी वाजव. मी सगळी ऱ्हिदम इन्स्ट्रुमेंट्स वाजवतो. सगळी लोकं वेडी होतील ऐकून!” मी वाजवणार नाही वगैरे म्हणायची काही सोयच नव्हती. दुसऱ्या दिवशी मी त्याला कॅसेट दिली आणि त्याने तिसऱ्या दिवशी तो रेकॉर्डेड पीस आणून दिला. तो ऐकून मी तीन ताड उडालोच! श्रीदेवीच्या ‘चालबाज’ सिनेमातला दिड मिनिटाचाच तो पीस होता. पण तो पेटीवर वाजवणं काही खायची गोष्ट नव्हती. मी तरी तो पीस ‘बसवण्याचा’ प्रयत्न केला. कारण गाठ जयंत पदवाडशी होती, जो म्हणे बाप्पी लाहिरीकडे नियमितपणे ड्रम्स वाजवायचा!

१-२ दिवसांनंतर मी आणि तो कॉलेजमध्येच प्रॅक्टिससाठी भेटलो. मनात प्रचंड धाकधूक होती. तो मात्र कूल होता. आणि आम्ही वाजवायला सुरुवात केली. त्याच्या वाजवण्याबद्दल काही प्रश्नच नव्हता. तो एकदम भारीच वाजवत होता. वाजवण्याच्या उत्साहात तो काहीसं जोरात वाजवत होता की माझं कुठे चुकतंय हे कळू नये म्हणून मी पेटी सॉफ्टली वाजवत होतो हे आता सांगणं अवघड आहे. त्यात भरीत भर तालाशी माझं वाकडं ! त्यामुळे गुलजारांचे ‘गोलमाल’मधल्या गाण्यातले शब्द उसने घ्यायचे तर- ‘ताल कहां … सम कहां.. तुम कहां… हम कहां’ अशी माझी अवस्था झाली होती. त्याचे बेफाट वादन सुरु होते आणि माझी फरपट झाली होती, अक्षरश: दमछाक झाली होती. दोन-तीन वेळा हा खेळ झाल्यानंतर त्याच्या बहुदा लक्षात आलं असावं की हा काही याचा( म्हणजे माझा!) घास नाही. म्हणून अतिशय decently त्याने सांगितलं- “बहुतेक तुला बरीच प्रॅक्टिस करावी लागेल असं दिसतंय. आत्ता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. परत कधीतरी करूया.”
मी खजील झालो पण एकीकडे अगदी सुटकेचा नि:श्वासही टाकला. कारण फजिती फक्त एकाच माणसापुढे झाली होती. संपूर्ण कॉलेजसमोर झाली नाही हे चांगलंच झालं. 

पण त्याचं ते 'परत  कधीतरी करूया' काही प्रत्यक्षात उतरलं नाही कारण  काही काळानंतर जयंत पदवाड आमच्याही कॉलेजमध्ये टिकला नाही. कॉलेज सोडून गेला. नंतर तर असंही कळलं की तोही अकाली गेला…..

श्रीदेवीच्या आकस्मिक मृत्यूनंतर सारखी तिची गाणी सगळ्याच चॅनेलवर दाखवत होते. त्यात हा पीस दाखवला की नाही माहित नाही. पण तो पीस भारीच आहे. कुठल्याही ऱ्हिदम आर्टिस्टची बोटं शिवशिवतील, कुठल्याही वादकाला वाजवावासा वाटेल आणि कुठल्याही नृत्यांगनेची पावले थिरकतील असाच हा पीस आहे. श्रीदेवीने तर यावर कमाल नृत्य केलं आहे…
आता जेव्हा जेव्हा हा डान्स सिक्वेन्स बघेन तेव्हा त्याचा संबंध  दोन अकाली झालेल्या मृत्यूशी आहे असं मात्र कायम जाणवत राहील …

4 comments:

ShreepadG said...

राजेश...
फक्त आणि फक्त तू लिहिलं आहेस म्हणून इथपर्यंत आलो नाहीतर श्रीदेवीबद्दलचा ब्लॉग वाचायचे कष्ट मी काही घेतले नसते. तिच्याबद्दल आदर ठेवून म्हणू शकेन की मला इतर काही कलाकार श्रीदेवी पेक्षा जास्तं आवडायचे.
सदमा खूप आवडला होता...पण त्यांत सगळ्यांत वरची काही कारणं म्हणजे कमल हसनचा अभिनय, इलया राजाचं संगीत, गुलजारचे शब्द, नंतर श्रीदेवीचा अभिनय...सिल्क स्मिता चा डार्क ह्युमर पण लक्षांत राहिला ...
श्रीदेवीच्या अभिनयाची जातकुळी वेगळी होती मला विशेष न भावणारी...
पण तुझी आठवण मात्रं झकास आहे. जयंत पदवाड हा तुझ्या वर्णनाप्रमाणे उग्र असेलही पण diplomatic सुद्धा असावा असं मला आपलं वाटून गेलं ...त्याचं संवादकौशल्य आवडलं आपल्याला -
"त्याने सांगितलं- “बहुतेक तुला बरीच प्रॅक्टिस करावी लागेल असं दिसतंय. आत्ता आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. परत कधीतरी करूया.” हाहाहा...
गोड बोलून मारणे म्हणजे काय याचं हे एक छान उदाहरण आहे... :) अर्थात तू ते असं लिहीलं आहेस हेही कमी नाही.
पण श्रीदेवीचा मॉम मात्रं बराच आवडला ... एकूणच सादरीकरण उत्कृष्ट होतं...कथेचा गाभा, ए आर रहमानचं अंगावर येणारं पार्श्वसंगीत, श्रीदेवीचा संयत अभिनय, नवाजुद्दीनची फवारे उडवणारी उत्कट साथ वगैरे...
जरी ती मला कमी आवडत असली तरी तिचं अकस्मात जाणं मात्रं चटका लावून गेलं हे नि:संशय...
असो...दुसऱ्या ब्लॉगवर मात्रं प्रतिक्रिया देऊ शकेन असं वाटत नाही. अगदी खरं कारण म्हणजे मी अजूनही इंग्लिश विंग्लिश बघितला नाहीये... पण तो माझ्या 'बादलीत' (Bucket List) बुडवून ठेवला आहे हे अगदी नक्की...बघणार...

Rajesh Pusalkar said...

नेहमीप्रमाणेच उत्तम कॉमेंट लिहिल्याबद्दल धन्यवाद, श्रीपाद!
खूप जणांना श्रीदेवी आवडत नाही. पण मला ती आवडते. तिचं डोळ्यांतून हसणं,तिचा screen presence,तिचं comic timing, तिचं नृत्य आणि एकटीच्या जोरावर कुठलाही सिनेमा carry करण्याचं तिचं कौशल्य यासाठी! मि.इंडिया, चालबाज, चांदनी, लम्हें, नगीना, खुदागवाह यासारखी कितीतरी उदाहरणं देता येतील. तिचा आवाज आणि diction यात मात्र ती कमी पडली हे निर्विवाद!
तू English Vinglish पाहिला नाहीस तसा मी मॉम नाही पाहिला पण trailer मध्ये तरी ती खूपच विचित्र दिसत होती. म्हणून नाही बघितला. कुठे असेल तर बघीन.
पुन्हा एकदा कॉमेंट बद्दल आभार!

Unknown said...

मी इंग्लिश विंग्लिश बघितला बरं का...आवडला...
सुंदर आहे...
मॉम नेटफ्लिक्स वर बघायला मिळेल...

Rajesh Pusalkar said...

धन्यवाद श्रीपाद...मॉम बघतो आता