१
सर्वप्रथम हे सांगितलं पाहिजे की या ब्लॉग मालिकेचं शीर्षक मला मच्छिन्द्र कांबळी आणि संजीवनी जाधव यांच्या 'तांदूळ निवडता निवडता' या नाटकाच्या नावावरून सुचलं आहे. माझ्या या मालिकेसाठी हे शीर्षक अगदी चपखल आहे. गेले काही महिने मी नियमितपणे सायकलिंग करत आहे. तो सध्याचा माझा आवडीचा छंदच आहे ! गिअरची सायकल असूनदेखील गिअर न वापरता मी सायकल चालवतो. त्यामुळे मला २२-२५ किमी इतक्या थोड्या अंतरासाठी तास-दीड तासापेक्षा जास्त वेळ सहज लागतो. सायकलिंग कितीही 'मनाशी संवाद' करणारा व्यायाम असला तरी रोज रोज तोच मार्ग वगैरेचा कंटाळा येतो. काहीवेळा वाटतं -"आज जाऊच नये, दांडी मारावी!" मूळचा आळशी स्वभाव झटकून सायकलिंग सातत्याने करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मग स्वतः लाच आमिषं दाखवावी लागतात काहीवेळा नव्या मार्गाने जाण्याचं आमिष असतं. काहीवेळा लांब अंतर गाठण्याचं आमिष असतं. काहीवेळा मोठा चढ चढून जाण्याचं आमिष असतं. तर काहीवेळा सायकल चालवताना निरीक्षणं करण्याचं असतं -मग ती माणसं असो वा पुण्यातील पुतळे/म्युरल्स !- यातूनच माझे आधीचे 'सायकलवरून दिसलेले पुणे' हे चार ब्लॉग लिहून झाले. या सगळ्या गोष्टींमुळे सायकल चालवायला एक उद्देश मिळत राहतो आणि मग सातत्य टिकून राहतं.
२
असंच एक नवं आमिष मला अनपेक्षितपणे मिळालं ! फार पूर्वी 'टाइम्स ऑफ इंडिया' मध्ये वनस्पतिशास्त्राचे सुप्रसिद्ध अभ्यासक श्री. श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनी पुण्यातील झाडांबद्दल एक लेखमाला लिहिली होती. झाडांची माहिती, त्यांचे फोटो आणि पुण्यात ही झाडे कुठे पाहायला मिळतात असं त्या लेखमालेचं स्वरूप होतं. या लेखमालेची कात्रणं मी जपून ठेवली होती पण नंतर नेहमीप्रमाणेच मी याबद्दल विसरूनही गेलो होतो. नुकतीच आवराआवरी करत असताना ही कात्रणं माझ्या बायकोला सापडली. कात्रणं ठेवायची की टाकून द्यायची असं मला बायको विचारायला आली आणि ती कात्रणं बघून मला अगदी खजिना गवसल्याचा आनंद झाला ! सायकलिंग करण्याचं मला एक नवं प्रयोजनच सापडलं ! १२-१५ वर्षांपूर्वीची त्या लेखमालेतली झाडं अजूनही आहेत का हे सायकलने जाऊन बघायचं, त्यांचा फोटो काढायचा आणि त्यांची माहिती शोधायची हे ते प्रयोजन ! माझ्या पुढील काही ब्लॉग मध्ये अशा झाडांचे फोटो आणि माहिती मी देणार आहे. मला अगदी योग्य वेळी ती कात्रणं सापडली- ऐन वसंत ऋतूमध्ये -म्हणजेच साधारण पणे मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात मी हे फोटो काढले आहेत. अर्थात सगळीच झाडं काही त्या लेखमालेतली आहेत असं नाही. सहज बघता आणखीही काही झाडं दिसली. मग अशा झाडांची ओळख कशी पटवायची? यासाठी मला वनस्पतिशास्त्राच्या दोन प्राध्यापकांची खूपच मदत झाली. त्या म्हणजे खारघर येथील धनश्री बर्वे आणि पुण्यातील सौ. पूनम नगरकर! मी काही झाडांचे अथवा फुलांचे फोटो काढून त्यांना पाठवायचो आणि त्या लगेचच झाडाचं नाव आणि शास्त्रीय नाव कळवत. या दोघींमुळे ही मालिकां पूर्ण करणं शक्य झालं. त्याबद्दल दोघींचेही मनापासून आभार !
तर आता ही सायकलिंग करता करता दिसलेल्या झाडांच्या फोटोंची मालिका सादर करत आहे-
(रोज एक या प्रमाणे हीच मालिका मी माझ्या Whatsapp status वरही पोस्ट केली होती, ज्याला चांगला प्रतिसादही मिळाला. त्याविषयी लिहीनच!)
१) विलायती शिरीष (Samanea saman or Rain tree or Monkey pod tree)
1 comment:
Khup chan lihile aahe.. as usual nice clicks
Post a Comment