Saturday 28 May 2022

सायकलिंग करता करता ...(भाग २)


                                                                        १

गेली काही वर्षं जंगल पर्यटन खूपच वाढलं आहे. प्राणी-पक्षी  त्यांच्या नैसर्गिक अधिवासात बघायला मिळणं याची मजा काही औरच आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं लक्ष जंगलातील प्राणी-पक्षी  यांच्याकडे जास्त जातं. परंतु जंगलाचा तितकाच महत्त्वाचा घटक असलेल्या झाडांकडे तेवढ्या गांभीर्याने पाहिलं जात नाही असं खेदाने म्हणावं लागतं. जंगलातल्या झाडांची ही गत तर शहरातल्या झाडांची काय कथा असणार! झाडं आपण फार गृहीत धरतो. कधी वादळी पावसाने झाडं पडली तर आपल्या लक्षात ती झाडं तिथे होती . अन्यथा आपण झाडांना अक्षरश: अनुल्लेखाने मारतो ! सायकलिंग करता करता झाडं बघत गेल्याने माझं झाडांकडे जाणीवपूर्वक लक्ष गेलं आणि झाडांची शहरातल्या दूषित वातावरणात, काँक्रीटच्या जंगलातही ( जिथे आता पूर्वीसारखं जमिनीत पाणी मुरत नाही तर रस्त्यांवरून ते वाहून जातं) तग धरून राहण्याची असोशी मला अचंबित करून गेली .

आता उदाहरणार्थ हे झाड बघा-

५) Australian Chestnut ( Castanospermum australe)-

अगदी ऐन सदाशिव पेठेत, न्यू इंग्लिश स्कूल च्या समोरील बोळात (पंतांचा गोट ) हे दुर्मिळ झाड दिमाखात उभं आहे. नावावरून लक्षात येतं की हे काही देशी झाड नाही. परंतु शहराच्या मध्यवस्तीत , जिथे आजूबाजूला हळूहळू जुने वाडे पाडून मोठ्या इमारती उभ्या राहिल्या आहेत, तिथे हे झाड संरक्षित राहिलं आहे. गंमत म्हणजे या गल्लीतून मी कितीतरी वेळा गेलो असेन . माझा मित्र डॉ विवेक गोवंडे याच गल्लीत राहतो. पण तरीही या झाडाकडे तितकंसं लक्ष गेलं नाही. त्याला या झाडाविषयी सांगितल्यावर तो म्हणाला की  ही झाडं त्याच्या आजोबांनी(कै. विष्णू गोवंडे ) फार पूर्वी म्हणजे साधारण १९४७-४८ साली लावली होती. म्हणजेच जवळपास ७५ वर्षं ही झाडं ऐन मध्यवस्तीत टिकून आहेत! पण हीच झाडं का लावली असावीत? त्याचं कारणही माझ्या  मित्राने सांगितलं. त्याच्या आजोबांचे नातेवाईक पुण्यातील एम्प्रेस गार्डन येथे सुपरिंटेंडंट होते. त्यांनी आजोबांना ही झाडं सुचवली कारण ती सदाहरित आहेत. हेही  मला माहीत नव्हतं. खरं तर आमच्या इतक्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा  होतात पण हा विषय कधी झालाच  नव्हता ! 

 
 


 

Australian Chestnut Tree बद्दल अधिक माहिती -


६) पिचकारी (African Tulip Tree) Spathodea campanulata

हे ही विदेशी झाड! पण आपल्या वातावरणात चांगलं रुळलं , रुजलं ! पुण्यात मला २-३ ठिकाणी ही झाडं दिसली. एक झाड  स्वारगेटजवळील गणेश कलाक्रीडामंचच्या प्रांगणात आहे. दुसरं राजाराम पुलाकडून डीपी रोडने गेल्यावर दीनानाथ हॉस्पिटलकडे जाताना आपण डावीकडे वळतो तिथेच वळणावर  उजव्या बाजूला आहे. हे त्यामानाने छोटं झाड आहे. सगळ्यात मोठं झाड मला नगर रोडला  येरवड्याच्या शास्त्रीनगर सिग्नलला डावीकडे दिसलं. Whatsapp वर status update ला हे झाड ठेवल्यावर काही जणांनी मला या फुलांना/(आणि म्हणूनच झाडाला)  पिचकारी म्हणतात असं सांगितलं. फुलांचा रंग आणि आकार छान आहे आणि लांबूनही ती लक्षात येतात आणि म्हणून हे झाडही लक्षात राहतं !

   
 
 
या झाडाविषयी अधिक माहिती -
२ 

कहाणी स्थलांतरित झाडांची ! 

प्राणी आणि पक्षी स्थलांतर करतात हे आपल्याला माहीत आहे. पण झाडं सुद्धा स्थलांतर करतात? हे कसं शक्य आहे? असा प्रश्न तुम्हांला पडेल. पण माणसाला काय अशक्य आहे! पुढील दोन झाडांच्याबाबतीत माणसांनी घडवून आणलेलं स्थलांतर उपकारकच ठरलं. मुळापासून उपटून दुसरेकडे लावलेली ही झाडं नव्या ठिकाणी देखील वाढली हे विशेष! 

७) शिंदी (Phoenix sylvesteris)
असं म्हणतात की फिनिक्स पक्षी त्याच्या पूर्वजांच्याच राखेतून नव्याने जन्म घेतो. फिनिक्स पक्ष्याला  अमरत्वाचं  प्रतीक मानलं जातं. पुण्यात स्थलांतर झालेली शिंदीची झाडं सुद्धा त्या फिनिक्स पक्ष्यासारखीच 'एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी' प्रमाणे नव्या ठिकाणी जगली आणि वाढली. म्हणूनच या झाडाला ज्या कोणा व्यक्तीने  त्याचे शास्त्रीय नाव Phoenix असं दिलं असेल ती व्यक्ती नक्कीच दूरदृष्टी असलेली आहे असं म्हणायला हरकत नाही ! 
नगर रोडला येरवड्याच्या पुढे सिग्नल संपल्यावर ते शास्त्रीनगरचा सिग्नल येईपर्यंत रस्ता दुभाजकावर कमीत कमी ७०-८० शिंदीची झाडं दिसतात. विशेष म्हणजे ही साधारणपाने प्रत्येकी  तीन झाडं जवळजवळ आणि मग थोडं अंतर ठेऊन पुन्हा तीन झाडं अशा रचनेत लावण्यात आली आहेत. ही झाडं मूळची या  जागेतली  नाहीत.  कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही (मलाही आधी ते खरं वाटलं नव्हतं !) पण ही झाडं सिंहगड रोडवरून इथे आणण्यात आली आहेत. श्री. श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांच्या लेखातील माहितीप्रमाणे आता जिथे पु ल देशपांडे उद्यान आहे त्या जागेत पूर्वी  ही सगळी झाडं होती. पण पु ल देशपांडे उद्यान हे एका वेगळ्या संकल्पनेवर साकारलेलं उद्यान आहे. त्यामुळे त्यात ही झाडं बसत नव्हती. म्हणून पुणे महापालिकेने ही झाडं नगर रोड  इथे हलवली आणि त्या रस्त्याचं सुशोभीकरण केलं ! याबद्दल पुणे महापालिकेचे आभार मानावे तितके कमीच आहेत! यात झाडांचे प्राण तर वाचलेच, रस्त्याचं सुशोभीकरण झालंच, शिवाय एवढी झाडं नव्याने घेतली असती तर त्यासाठी मोजावे लागणारे पैसेही वाचले ! म्हणजे आहे की नाही - आम तो आम और गुठलीयों के दाम ! 
आता माल खात्री आहे कि जेव्हा केव्हा तुम्ही नगर रोडने जाल तेव्हा न विसरता तुम्ही या झाडांकडे बघाल !किंवा या फोटोंकडे  बघून तुम्हांला ही झाडं पाहिल्याचं आठवेल !


 


 

शिंदी झाडाविषयी अधिक माहिती-


८) मॅग्नोलिया ( Magnolia grandiflora) -
या झाडाच्या कथेत एक उपकथानकही आहे ! मुख्य कथा अर्थातच हे झाड पुण्यात कसं आलं  याविषयी तर उपकथानक म्हणजे हे झाड मला कसं सापडलं याबद्दल ! श्री. श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांच्या लेखमालेत पुण्यात हे झाड कसं आलं आणि त्याचं स्थलांतर होऊन देखील ते बहरलं याबद्दल रोचक माहिती आहे. फर्ग्युसन कॉलेज मधील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख श्री. तुळपुळे एकदा अमेरिकेला गेले होते. तिथे मिसिसिप्पी राज्यात जागोजागी त्यांना मॅग्नोलियाची झाडं दिसली. (मॅग्नोलिया हे मिसिसिप्पीचं राज्यफूल आहे) ती फुलं आवडल्यामुळे श्री. तुळपुळे यांनी त्या झाडाच्या बिया पुण्यात आणल्या. मॅग्नोलिया उष्ण हवामानात वाढणारं झाड असल्यामुळे इथे ते वाढलं-अगदी मजलाभर उंचीचं  झालं. त्याला फुलंही आली. त्यावेळी श्री. तुळपुळे फर्ग्युसन रोड येथे राहत होते. नंतर ते कर्वेनगर येथे राहायला गेले. एवढ्या प्रेमाने आणलेलं झाड त्यांना तिथेच सोडवेना. म्हणून ते झाड त्यांनी तिथून कर्वेनगर येथे त्यांच्या नव्या जागेत नेलं. विशेष म्हणजे तिथेही ते जगलं आणि त्याला फुलं येऊ लागली. पाळीव पक्षी-प्राणी यांच्यावर अतोनात प्रेम करणारे आपण बघतो परंतु तसंच प्रेम झाडांवरही करणारे खूप कमी वेळा दिसतात. श्री तुळपुळे यापैकीच ! 
आता उपकथानकाकडे -
मॅग्नोलियाची माहिती वाचल्यावर मला ते झाड आणि फूल बघायची उत्सुकता खूपच वाढली. लेखात कर्वेनगर मधला सविस्तर पत्ता दिल्यामुळे माझं काम सोपं झालं. सायकल मारत तिथपर्यंत गेलो. तर ती बंगल्यांची सोसायटी असल्याचं दिसलं. एका बंगल्यावर तुळपुळे अशी पाटीसुद्धा दिसली. आणि मग चक्क ते झाड आणि त्यावरचं फूलही दिसलं. मला अगदी हर्षवायूच व्हायचा बाकी होता! इतक्या वर्षांनंतरही ते झाड दिमाखात उभं होतं याचा मला अत्यानंद झाला. पण झाडाचा फोटो काढणार कसा? कारण झाड बंगल्याच्या आतमध्ये होतं. बाहेरून कॅमेऱ्याने परवानगी न घेता फोटो काढणं मला  तितकंसं प्रशस्त वाटलं नाही. थोडावेळ कोणी बंगल्यातून बाहेर येतंय का याची वाट बघितली. पण कोणीच आलं आंही. शेवटी मनाचा हिय्या केला- 'जास्तीत जास्त काय होईल? ते लोक फोटो काढायला परवानगी देणार नाहीत.' हा विचार केला आणि बंगल्यात शिरून घराची बेल वाजवली. एका तरुण स्त्रीने दार उघडलं. "मी डॉ पुसाळकर !" अशी माझी ओळख त्यांना करून दिली. (अशावेळी/अशा ठिकाणी  मी डॉ असल्याचा फायदा होतो हे नक्की !) मला मॅग्नोलियाचे फोटो काढायचे आहेत तर तुमची काही हरकत नाही ना? असं विचारताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी सहजपणे सांगितलं - "हो. काढा की फोटो! फक्त तुम्ही फोटो काढताय त्या नादात तुमचं लक्ष जाणार नाही...पण आमचा इथे कुत्रा आहे तो कदाचित भुंकेल. तेव्हा घाबरू नका. तो बांधलेला आहे. तो काही करणार नाही." हे त्यांनी इतक्या हसतमुखाने आणि छान सांगितलं की मला धक्काच बसला ! मग कॅमेरा काढून फोटो काढायला सुरुवात केली तर आणखी एक मध्यमवयीन महिला तिथे आल्या. त्यांनी मला झाडावर फुलं कुठे आहेत हे दाखवलं. मी श्रीकांत इंगळहळ्ळीकरांच्या लेखाचा उल्लेख केला. त्या त्यांना ओळखत होत्या. ज्यांनी हे मॅग्नोलिया इथे आणलं ते श्री. तुळपुळे या बाईंचे चुलत सासरे! झाड आणि फुलाचे फोटो काढताना लक्षात आलं की  फूल थोडं वरच्या बाजूला होतं आणि आत लपलेलं होतं. खरं तर त्यांच्या  बंगल्याच्या गच्चीवर गेलो असतो तर जास्त चांगले फोटो मिळाले असते. पण हा विचारसुद्धा माझ्या मनात आला याची मलाच लाज वाटली! म्हणजे मऊ दिसलं तर कोपराने खणण्यासारखंच ते झालं असतं ! त्यामुळे मिळतील ते फोटो काढले, झाड आणि फूल अगदी मनभरून पाहिलं.. तुळपुळे कुटुंबाचे आभार मानले आणि एक वेगळंच  समाधान घेऊन बाहेर पडलो!

 
 
 

मॅग्नोलिया विषयी अधिक माहिती- 

                                                                                                                                                    (क्रमश:)






1 comment:

Mugdha said...

Nice information about trees! तुझ्या स्टेटस वर पोस्ट बघत होते वेगवेगळ्या झाडांची... स्थलांतरित त्यात नव्हती if i remember correctly...
फोटोही छान आहेत...