Thursday 2 June 2022

सायकलिंग करता करता... (भाग ४)

सायकलिंग करता करता झाडं बघण्याच्या या सिलसिल्यामध्ये काही अविस्मरणीय क्षण अनुभवले. मॅग्नोलिया चे वर्णन श्री. इंगळहळ्ळीकरांच्या लेखमालेत वाचणे, त्यानंतर ते झाड शोधून काढणे आणि त्याचा फोटो घेणे याविषयी आधीच्या एका ब्लॉगमध्ये लिहिले आहेच.तो सगळाच अनुभव विलक्षण होता! असंच आणखी एक फूल अनपेक्षितपणे  बघायला  मिळालं आणि ज्याला सध्याच्या भाषेत WOW moment म्हणता येईल असा अपूर्व आनंद मिळाला ज्यावरून वाटलं की आपण ही सायकलिंग आणि झाडं बघण्याची सांगड घातली ती सार्थकी लागली ! 

१२) असाच आघारकर संस्थेवरून जात होतो. संस्थेच्या बरोबर समोरच्या बंगल्यात एक झाड फुलांनी लगडलेलं बघितलं. साधारण १०-१२ फूट उंचीचं झाड होतं. मोठ्या पांढऱ्या शुभ्र  पाकळ्या असलेली, मध्यभागी पिवळी असलेली  फुलं ! फुलांचा मनमोहक वास आणि त्यावर स्वर होऊन त्या फुलांवर जमलेल्या मधमाश्या! 

हे इतकं सुंदर दृश्य होतं पण आजूबाजूच्या कोणालाही ते बघण्यात फारसा रस नव्हता. फक्त मी तिथे का थांबलोय एवढं मात्र त्यांना बघायचं होतं !मला त्यांना सांगावंसं वाटत होतं - बघा हे नयनरम्य फूल आणि त्याचा सुवास अनुभव! एखाद्या मंद अत्तरासारखा तो वास त्या झाडाच्या आजुबाजूला भरून राहिलेला होता. मला तो वास काही पकडणं शक्य नव्हतंच !फुलांचे तेवढे फोटो काढले! झाड जरी बंगल्याच्या आत होतं तरी त्याच्या फांद्या बंगल्याबाहेर, फूटपाथवर  होत्या. त्यामुळे कोणाचीही परवानगी न घेता फोटो काढणं शक्य होतं ! म्हणून एका पाठोपाठ फोटो काढत सुटलो! 

 
 
 

                                              
                                                                                 
         
          

नंतर शोध घेतला असता कळलं की या झाडाचं/ फुलाचं नाव  Fried Egg Tree आहे. नाव देणाऱ्याने पण किती कल्पकतेने हे नाव ठेवलं आहे! मी हे मार्चमध्ये काढलेले फोटो आहेत. त्यानंतर तिकडे गेलो नाही. त्यामुळे आता झाडाला फुलं आहेत की नाही हे माहीत नाही. पण लोक जसे दरवर्षी भक्तिभावाने वारीला जातात तसा संकल्प मी या झाडाच्या बाबतीत सोडला आहे- दरवर्षी या झाडाला बघायला जायचंच! इतका या फुलांच्या मी प्रेमात पडलो आहे! 
 
 


Fried Egg Tree ( Oncoba spinosa) बद्दल अधिक माहिती -
 


१३) कैलासपती/Cannonball Tree( Couroupita guianensis)-
राजाराम पुलाकडून डीपी रोडने दीनानाथ हॉस्पिटल कडे जाताना त्या गल्लीच्या अलीकडेच लालबहादूर शास्त्री सोसायटी आहे. (सोसायटी जुनीच असावी पण मला मात्र ती आत्ताच लक्षात आली!) त्या सोसायटीच्या आवारात कैलासपतीचे दोन उंचच्या उंच  वृक्ष आहेत. त्या वृक्षांवर लांबून बघितलं  तर एखाद्या अजस्त्र सापाने विळखा घातल्यासारखी फुलं दिसत होती. पण जवळ गेलो तर एकदम वेगळंच दृश्य दिसलं ! आपल्याकडच्या मंदिरांमध्ये जशा मोठ्या दीपमाळा दिसतात तशाप्रकारे एकावर एक फुलं रचून हेवल्यासारखी दिसत होती. याही फुलांचा मंद दरवळ होता. 
 
 
 

पण एवढी सुंदर फुलं असलेल्या या झाडाला इंग्रजीत Cannonball tree का म्हणत असावेत? याचं उत्तर पुढेच असलेल्या ताथवडे उद्यानामध्ये असलेल्या कैलासपटीच्या झाडामध्ये सापडलं ! तिथल्या झाडाला तोफगोळ्यांसारखी फळं लागली होती !
 
 

फुलं सुगंधी असली तरी फळांना मात्र अतिशय उग्र वास असतो म्हणे!

कैलासपती विषयी अधिक माहिती-


१४) Sausage Tree (Kigelia pinnata)-
सायकलिंगसाठी डीपी रोड एकदम मस्त रस्ता आहे. सकाळच्या वेळी फारशी गर्दी नसते... दुतर्फ़ा झाडी आणि रस्त्यात काही खड्डे नाहीत, स्पीडब्रेकर नाहीत... त्यामुळे एका ठराविक वेगाने आपण सहज जाऊ शकतो.. याच रस्त्यावर दोन-तीन झाडांना चॉकलेटी रंगांच्या मोठमोठ्या काकड्या/ दुधी भोपळ्यासारखी फळं लागलेली दिसली. तज्ज्ञांना विचारल्यावर याचं नाव कळलं . झाडाला फुलं फारशी राहिली नव्हती. नाही म्हणायला एक फूल फूटपाथवर पडलं होतं . 
  

 

Sausage Tree बद्दल अधिक माहिती -
 
१५) उंदीरमारी ( Gliricidia) -
याच डीपी  रोडवर मला हे fencing साठी वापरलं जाणारं उंदीरमारीचं बहरलेलं झाड दिसलं- 

 
Gliricidia बद्दल अधिक माहिती-
 

१६) शमी (Prosopis cineraria) 
श्री. इंगळहळ्ळीकरांच्या लेखमालेत हे झाड नेने घाटाजवळ गुपचूप गणपतीच्या देवळात आहे असं म्हटलं होतं. पण तिथे गेलो तर कळलं की आता ते झाड तिथे नाही. ते झाड वठलं. लेखमालेत हाती त्यापैकी बरीचशी झाडं मला बघायला मिळाली. (एक झाड 'लकाकि' या किर्लोस्करांच्या बंगल्यात होतं त्यामुळे ते बघायला मिळण्याचा काही प्रश्न नव्हता !) पण शमीचं  असं एकच  झाड होतं  की ते सांगितलेल्या ठिकाणी नव्हतं. त्यामुळे माझा थोडा हिरमोडच झाला. परंतु माझ्या काही सुहृदांकडून माहिती मिळाली की शमीचं झाड तर नारायण पेठेतल्या मोदी गणपती मंदिरात पण आहे. तो ही माझा नेहमीचा जाण्या येण्याचा रस्ता आहे. मग एक दिवस गेलो तिथे आणि माझा शक्यतो सायकलवरूनच फोटो काढायचा शिरस्ता मोडून देवळात जाऊन फोटो काढले. यामध्ये मला शमीच्या फुलाचाही फोटो काढता आला-


 

शमी विषयी अधिक माहिती- 

१७) या झाडांचे फोटो Whatsapp status वर ठेवत होतो त्याचा चांगला परिणाम झाला. फोटो बघणाऱ्यांमध्ये झाडं बघण्याचं कुतूहल निर्माण झालं. काही जण मुद्दाम जाऊन झाडं बघून आले. काहींनी झाडांविषयीचे त्यांचे अनुभव, एखाद्या झाडाविषयी अधिक माहिती देणं हे देखील केलं. त्यामुळे एक प्रकारचा निकोप संवाद निर्माण झाला. अशाच प्रकारे माझे स्नेही श्री. अविनाश पाषाणकर यांनी मला एका झाडाचा फोटो काढून पाठवला. मग ते झाड बघायला मी फर्ग्युसन कॉलेजसम्रोरच्या गल्लीत गेलो(अर्थातच सायकलने!) आणि त्याचे फोटो काढले. नंतर तज्ज्ञाकडून माहिती घेतल्यावर  कळलं की ते करंजाचं झाड आहे (Pongamia/Millettia pinnata)-
  
 
 
करंज विषयी अधिक माहिती-
 

१८) इंग्रजीत म्हणतात -All good things have to come to an end! -तसं माझी ही मालिका जशी न ठरवता सुरू  झाली तशीच ती न ठरवता अपरिहार्यपणे बंदही करावी लागली! पण मला स्वतः ला ही मालिका खूप आनंद देऊन गेली. कितीतरी झाडं मला शोधता आली. त्याविषयी वाचता आलं. फोटो काढता आले. झाडांविषयी अनेकांशी बोलता आलं. एक सकारात्मक ऊर्जा यातून मिळाली. माझा असा मुळीच दावा नाही की पुण्यातील सगळी झाडं मला यातून नोंदता आली . पण तसा माझा उद्देशही नव्हता. मुख्य उद्देश सायकलिंग करणे हाच होता. यावर्षी ही झाडं बघितली. कदाचित पुढच्या वर्षी आणखी काही बघायला मिळतील ! पण सायकलिंग करता करता मला हा खजिना सापडला !आणखी काय पाहिजे! जिंदगी गुलजार है !
शेवटचं झाड टिळक रोडला बाजीराव रोडच्या सुरवातीला अभिनव कॉलेजच्या चौकात बघायला मिळालं. याला African Baobab किंवा गोरखचिंच म्हणतात. याच झाडाला Tree of life असंही म्हणतात . आफ्रिकेतील वाळवंटात हे झाड म्हणजे जगण्याचा आधारच कारण या झाडाच्या उदरात असतं जीवनामृत-पाणी! तेव्हा हे झाड बघून शुष्क वाळवंटात भटकणाऱ्या, पाण्यासाठी आसुसलेल्या थकल्या भागल्या जीवांची जीवनेच्छा बळावते !म्हणून हे झाड  जीवनदायी आणि आशादायी सुद्धा !

 
 
Flower of Baobab tree 



गोरखचिंच विषयी अधिक माहिती-
   
इंटरनेटवर African Baobab वर एक चांगली कविता मिळाली-

         

                                                                                                                                            (क्रमशः) 














No comments: