Friday 24 June 2022

हिंदी सिनेमांमधील डॉक्टर ! (भाग १ )


('पर्याय' या बीकन फाऊंडेशन प्रकाशित होमिओपॅथीविषयक दिवाळी अंकात २०१० साली माझा हा लेख प्रसिद्ध झाला होता )


हिंदी सिनेमांचा ठराविक साचा असतो. म्हणजे पोलीस नेमके आणि नेहमी हिरोने हिरोगिरी केल्यावर सर्वात शेवटी येतात. आणि पोलीस सुद्धा ठराविकच असतात (किंवा असायचे) म्हणजे इफ्तेकार किंवा जगदीश राज वगैरे..वकिलांचे ही तेच.. 'तमाम गवाहों के मद्दे नजर' हे वाक्य म्हटल्याशिवाय सिनेमातला कुठलाही कोर्ट-सीन पूर्ण होत नाही. आणि पूर्वी जज साहेबांची भूमिका करणारे नट होते(सप्रू वगैरे) ते अगदी खर्जातल्या आवाजात केसचा निकाल द्यायचे. ..


तशाच प्रकारे डॉक्टरांच्या बाबतीतही हिंदी सिनेमात काही नियम आहेत-
१) डॉक्टर नेहमी पांढऱ्या एप्रन मध्ये दाखवले जातात. हल्ली कुठे हो कोणी असे एप्रन घालून असतात डॉक्टर?
२) पूर्वीच्या सिनेमात( मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे -पूर्वीच्या सिनेमात!) डॉक्टर चक्क होम-व्हिजीटला जायचे! हल्ली तसं होत नाही कारण सिनेमा हा समाजाचा आरसा असतो असं म्हणतात. हल्ली डॉक्टरच फारसे व्हिजीटला जात नाहीत. म्हणून सिनेमातही तसं दाखवत नाहीत! असो. तर डॉक्टर घरी येऊन पेशंटला तपासतात आणि हे वाक्य हमखास म्हणतात- "घबराने की कोई बात नही ! वैसे मैने इंजेक्शन दे दिया है.. एक -दो दिन में बुखार ठीक हो जायेगा" वगैरे.
३) सिनेमाच्या कथेला एक निर्णायक वळण देण्यासाठीसुद्धा डॉक्टरांचा उपयोग होतो.म्हणजे डॉक्टर असं घोषित करतात की- 'ये अब कभी माँ नहीं  बन सकती!' आणि पुढचा संपूर्ण सिनेमा- मग हिरो कोणकोणते पर्याय निवडतो किंवा निवडत नाही, दोघांपैकी त्याग कोण करतं (खरं तर हे सांगायला पाहिजे का ? नायिका ही पतिव्रता आणि विशाल अंतःकरणाची असल्यामुळे नायकाने काहीही केलं तरी तिला चालतं !) -हे दाखवण्यात जातो.
४) असंच एक ठराविक वाक्य असतं- 'इनके दिल को कोई गहरी चोट पहुंची है/सदमा पहुंचा है' .. किंवा 'ये अपनी याददाश्त खो चुके है'..आणि मग पुढचा सिनेमा याच गोष्टींभोवती फिरतो.
५) कोणाचा तरी मृत्यू झाला आहे हे घोषित करण्यासाठी डॉक्टरांना पाचारण केलं जातं ! खरं म्हणजे कित्येकदा डॉक्टर  हे घोषित करतही नाहीत. ते फक्त पेशंटचे डोळे बंद करतात आणि पेशंटवर पांढरी चादर घालतात. उदा- डॉन चित्रपटात अमिताभ बच्चन( विजय) DSP साहेबांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जातो आणि तो डॉन नाही, तर विजय आहे असं परोपरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावेळचा माहोल अगदी बघण्यासारखा ! DSP साहेब (इफ्तेकार) असे बँडेज घालून बेडवर आडवे पडलेले, डोळे निर्विकार ! सलाईनच्या बाटल्या लावलेल्या. आजूबाजूला मात्र गावजत्रेसारखी गर्दी आणि यातच कुठेतरी मागे अंग आक्रसून डॉक्टर उभे! अमिताभ बोलतोय पण DSP साहेबांची नजर शून्यात आणि मग अचानक डॉक्टर पुढे येतात आणि DSP साहेबांचे डोळे बंद करतात आणि चादर टाकतात. म्हणजे ते आधीच गेले होते का? आणि नव्हते गेले तर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न वगैरे? काही नाही! 
६) आपल्याकडे भुता-खेतांचं कथानक असलेले काही सिनेमे निघाले आहेत. अशा सिनेमात डॉक्टरचं पात्र नेहमी विज्ञान-निष्ठ दाखवलं जातं. भूत वगैरे सगळं थोतांड आहे असं डॉक्टर सुरुवातीला म्हणतो पण नंतर मात्र अशा काही गोष्टी घडतात की त्यामुळे डॉक्टरची बोलतीच बंद होते आणि त्याला या अशा गोष्टी असतात यावर विश्वास ठेवावा लागतो. याला अलीकडच्या काळातला अपवाद म्हणजे भुलभुलैय्या हा सिनेमा! यात अक्षयकुमार (जो Psychiatrist असतो !) तो बाकी सर्व काही करतोच( म्हणजे नाच-गाणी, छेडछाड इ ) पण शेवटी विद्या बालन च्या psychic वागण्याची केस सोडवतो आणि भूत नाही हे सिद्ध करतो ! 


हिंदी सिनेमांत (वकील/पोलीस या भूमिकांप्रमाणे) डॉक्टरची भूमिका काही मोजक्या लोकांनीच केली असं मात्र नाही. किंबहुना ती खूप जणांनी करून पाहिली. उदा- बलराज साहनी (अनुराधा), देव आनंद (तेरे मेरे सपने), धर्मेंद्र ( बंदिनी) सुनील दत्त (आज और कल), राजेंद्रकुमार (दिल एक मंदिर ) यांच्यापासून अमिताभ बच्चन (आनंद),जितेंद्र(खुशबू) विनोद मेहरा(बेमिसाल),पंकज कपूर (एक डॉक्टर की मौत ) ... 
ते आजकालच्या काळात संजय दत्त (मुन्नाभाई एमबीबीएस) अक्षयकुमार (भुलभुलैय्या) ते अगदी रितेश देशमुख (हो.. हो .. मस्ती सिनेमात) पर्यंत नायकांनी तर शर्मिला टागोर( सफर), राखी(काला पत्थर) स्मिता पाटील (दर्द का रिश्ता) सोनाली बेंद्रे ( कल हो न हो ) राणी मुखर्जी (साथिया), प्रीती झिंटा (अरमान) ग्रेसी सिंह(मुन्नाभाई) करीना कपूर (3 Idiots) या सारख्या नायिकांनी डॉक्टरच्या भूमिका केल्या आहेत .

हिंदी सिनेमांनी वैद्यकशास्त्राला अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे आव्हानही दिलं. यापैकी आपल्या सगळ्यांनाच 'अमर अकबर अँथनी' चं उदाहरण चांगलंच  माहित आहे. पण अशाच प्रकारची आणखीही काही उदाहरणं आहेत..
१) ऋषी कपूर- पूनम धिल्लो -टीना मुनीम यांचा एक सिनेमा होता- 'ये वादा रहा'. त्यात पूनम धिल्लोचा अपघात होऊन तिचा चेहरा विद्रूप होतो. त्याची प्लास्टिक सर्जरी करणारे डॉक्टर शम्मी कपूर महानच  म्हटले पाहिजेत! 

कारण या सर्जरी नंतर पूनम धिल्लोचे रुपांतर टीना मुनीम मध्ये होते. सर्जरी चेहऱ्याची पण त्याचे परिणाम एवढ्यावरच थांबत नाहीत. टीना मुनीम दाखवायची होती तर तिला आवाज तरी पूनम धिल्लोचा द्यावा ना? पण ते नाही. तिला आवाज होता जया भादुरीचा ! एका शस्त्रक्रियेमुळे काय काय होऊ शकते !
२) राकेश रोशन दिग्दर्शित सिनेमा -'खून भरी मांग' ! यातही प्लास्टिक सर्जरी आहेच, व्हिलनने नायिकेला न ओळखणं आहेच.. पण इथे मुद्दा तो नाही. यात कादरखान आणि शुभा खोटे अशी जोडी दाखवली आहे. लहानपणी कुत्रा चावल्यामुळे म्हणे शुभा खोटे यांचा आवाज पुरुषी होतो ! कलात्मक स्वातंत्र्य घ्यावं ते किती याचा कळस अजून पुढेच आहे. याच शुभा खोटेला कादरखान चावतो आणि मग तिचा आवाज तिला पुन्हा मिळतो! विनोदाची पातळी किती खाली जावी याला काही सुमारच नाही!


३) अशा न पटणाऱ्या गोष्टींची मालिका फक्त जुन्या सिनेमातच होती असं नाही. बहुचर्चित आणि बॉक्स ऑफिसचे बरेच रेकॉर्ड मोडीत काढणाऱ्या '3 Idiots' या सिनेमाचा एक महत्त्वाचा प्रसंग आठवून पहा... त्यात इंजिनिअर लोक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हिरॉईन (करीना कपूर, जी सिनेमात स्वतः डॉक्टर आहे !) च्या बहिणीची यशस्वीरीत्या प्रसूती करतात, तेही अस्वच्छ vacuum cleanerचा वापर करून ! धन्य ते इंजिनिअर ! त्यांना जगात असाध्य असं काहीच नाही! (नाहीतरी सध्या वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा इतका प्रभाव आहि की एक काळ असा येईल जेव्हा डॉक्टर असण्या-नसण्याने काहीच फरक पडणार नाही. तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवलं की झालं !) ... का धान्य तो आमिर खान असं म्हणावं? रँचो चा आलेख मोठा करण्यासाठी केवढा तो खटाटोप? या संपूर्ण प्रसंगात दिग्दर्शकाचा gender bias दिसतो. सिनेमात हिरोईन डॉक्टर असली तरी या सगळ्या प्रसंगात तिची दुय्यम भूमिकाच आहे ! ती हिरोपेक्षा मोठी होऊन कसं चालेल ? 

पण हिंदी सिनेमात डॉक्टर एक सशक्त कॅरॅक्टर म्हणूही दिसून आले. प्रसंगी छोट्या भूमिकेतून देखील आपले ठळक अस्तित्व अधोरेखित करून गेले. अशा काही भूमिकांचा हा धावत आढावापुढील ब्लॉग मध्ये... 
                                                                                                            (क्रमश:) 



1 comment:

Unknown said...

सचिनने बनवलेल्या कुंकू मध्ये अजिंक्य देवने डॉक्टरचे काम केले आहे. खूप छोटी भूमिका होती पण अजिंक्यने मनापासून केली असं तेवढ्या थोडक्या रोलमध्ये वाटून गेलं.
तसेच विद्या बालनच्या कहानी-१ मध्ये ते एक डॉक्टर गांधी का गांगुली यांचा अगदी दोनच मिनीटांसाठी रोल आहे पण तो कहानीच्या कथानकात इतर पात्रांसारखाच अगदी बेमालूमपणे उत्तम बसून गेलांय...बॉब बिस्वास या डॉक्टरांचीसुध्दा "एक मिनीट" म्हणत विकेट घेतोच...पण ही मंडळी विसरू म्हटली तरी विसरली गेली नाहीत... निदान मला तरी...कहानी१ हा माझ्या अत्यंत आवडलेल्या सिनेमांतला एक आहे आणि अजिंक्य तीनचार वेळा प्रत्यक्ष भेटलांय...त्यामुळेही असू शकण्याची शक्यता आहे. असो. Nice compilation...साऊथ इंडियन सिनेमात मला वाटत डॉक्टरांना चमत्कार करण्याची परवानगी असते...खूप विनोदी दृश्य दाखवतात... असो. 😂😁