१
आमच्या या आधीच्या बऱ्याच सहली कुठल्यातरी ट्रॅव्हल एजंट अथवा जंगल सफारी आयोजित करणाऱ्या व्यक्ती/कंपनी या मार्फत झाल्या आहेत. ही हिमाचलची सहल मात्र अथ पासून इतिपर्यंत आमची आम्हीच प्लॅन केली. यात विशेष असं काही नाही कारण आजकाल बरेच जण असंच करतात. आमचा हा पहिलाच अनुभव! आम्हांला हे करणं सोपं गेलं कारण माझ्या एक पेशंट हिमाचल प्रदेश मध्येच राहतात. म्हणजे त्या मराठीच आहेत. मूळच्या पुण्याच्याच...त्यांनी निर्मलादेवींच्या सहजयोग कार्याला वाहून घेतलं आहे. धरमशाला जवळील नद्दी या ठिकाणी (इथे सनसेट पॉईंट आहे ) सहजयोग केंद्र आहे. तिथे त्या राहतात. तिथली हवा खूपच थंड झाली, बर्फ पडू लागला की त्या पुण्याला येतात. इथे काही महिने राहून मग परत तिथे जातात. त्यांच्या इथल्या वास्तव्यात त्या माझ्याकडे औषध घेऊ लागल्या. माझी मुलगी या आधी मनाली आणि कसोलला जाऊन आली आहे आणि तिचा आग्रह होता की आम्ही सुद्धा कसोल बघावं. या माझ्या पेशंटशी मी सहज बोललो की आम्ही हिमाचलला जायचा विचार करत आहोत तर त्यांना इतका आनंद झाला की काही विचारायची सोय नाही ! त्यांनी मग तिथली बघायची ठिकाणं, तिथले काही फोटो/व्हिडिओ , इतकंच काय धरमशाला ते कसोलला जाण्यासाठी बसचे पर्याय, त्यांच्या तिकीट बुकिंगच्या वेबसाईटच्या लिंक्स हे आपणहून शेअर केलं ! एवढं कोण करतं आजकाल ! तेही एका परक्या माणसासाठी ! मी हे असं कोणासाठी केलं असतं का असा विचार माझ्या मनात येऊन गेला आणि खोटं कशाला बोला- त्याचं उत्तर नाही हेच आलं ! या पेशंटच्या निर्मलादेवींच्या परिवारातील एक सदस्य श्री अमितकुमार यांचा नंबरही पेशंटने दिला. त्यांचं धरमशाला जवळ दल लेक (हो...इथेही दल लेक नावाचा...पण अतिशय छोटा आणि हिरवं पाणी असलेला तलाव आहे) येथे एक हॉटेल आहे. तिथे तुम्ही राहू शकता असं त्यांनी सुचवलं. त्याप्रमाणे आम्ही अमितकुमारांशी बोलून, हॉटेलचे फोटो वगैरे पाहून ८ आणि ९ एप्रिल ला तिथे राहायचं ठरवलं. माझ्या पेशंटने मनापासून आणि निरपेक्ष मदत केली म्हणून आमच्या तिथल्या वास्तव्याच्या काळात त्यांना भेटायला त्या सहजयोग केंद्रात गेलो.पेशंटला आम्ही गेल्याचा खूप आनंद झाला. तिथलं निर्मलादेवींचं फोटो प्रदर्शन पेशंटच्या आग्रहाखातर बघितलं. तिथल्या आणखी काही स्वयंसेवक आम्हांला तिथेच ध्यान धारणेला बसा असा आग्रह करत होत्या.पण वेळेअभावी तिथे थांबणं शक्य नव्हतं.
२
तर माझ्याबरोबर उभे असलेले हे अमितकुमार ! फोनवरच्या आवाजावरून त्या माणसाच्या दिसण्याचा वा त्याच्या प्रकृतीचा अंदाज बांधू नये हे अमितकुमारांच्या बाबतीत तरी खरं आहे. फोन वर अतिशय मृदू, विनम्र आवाजात, सर्व कॉर्पोरेट शिष्टाचार पाळून बोलणारे अमितकुमार, प्रत्यक्षात दिसायला अगदी बॉडी बिल्डर सारखे वाटले. फोटोत दिसत नाही पण त्यांच्या केसांना त्यांनी एक छोटी पोनी टेलही ठेवली होती. बोलणं मात्र तसंच नम्र- "येस सर...राईट सर... मैं कर दूंगा सर.." वगैरे. यांनीच आमच्यासाठी अमृतसर ते धरमशाला तसंच धरमशाला मधील ठिकाणं बघण्यासाठी आणि एक दिवस डलहौसी-खज्जियार साठी गाड्या बुक करून दिल्या. आमच्या सहलीसंबंधी सर्व शंका-कुशंकांना त्यांनी अतिशय नेमक्या शब्दांत आणि शांतपणे उत्तरे दिली. ते आमचे तिथले bankable resource person होते. पण आधी आम्हांला वाटलं होतं की ते आम्ही जिथे राहणार होतो त्या हॉटेलचे मॅनेजर वगैरे असतील. आम्ही पोचलो तेव्हा ते आमची वाट बघत खालीच उभे होते. हॉटेल रस्त्यालगत असलं तरी डोंगरावर असल्यामुळे २५-३० खड्या पायऱ्या चढून तिथपर्यंत पोचता येत होतं. आमच्याकडच्या २ मोठ्या बॅगा घेऊन ते झपझप वरती गेलेसुद्धा ! हॉटेलमध्ये आमच्याखेरीज कोणीच नव्हतं आणि कोणी कामगारही दिसले नाहीत. तेव्हा अमितकुमारांच्या बोलण्यातून समजलं की तेच या हॉटेलचे मालक आहेत आणि त्यांनी अगदी नुकतंच हे हॉटेल विकत घेतलं आहे. सध्या हॉटेलचं पुनर्बांधणीचं काम चालू होतं. हॉटेलमध्ये कामावर असलेल्या दोन कामगारांपैकी एक आजारी होता आणि दुसरा गावी गेला होता. त्यामुळे स्वयंपाकापासून ते आमची रूम साफ करण्यापर्यंत सर्व कामं म्हणजे अमितकुमारांचा वन मॅन शो होता. पण त्यात कुठल्याही प्रकारची तक्रार/ कुरकुर/ गाऱ्हाणी मांडणे असा प्रकार नव्हता. सर्व काही सहजतेने आणि हसतमुखाने चालू होतं.
अमितकुमार dynamic वाटले. फक्त त्यांची वाटचाल एकरेषीय पद्धतीने न होता त्यात चढ-उतार/ स्थित्यंतरं झाल्याचे दिसत होते. हॉटेल व्यावसायिक असलेले अमितकुमार यांनी मुंबईतील ताज हॉटेल मध्ये शेफ म्हणून काम केलं होतं. नंतर एमबीए करून काही काळ पुणे आणि नंतर स्वित्झरलँड, अमेरिका येथे नोकरी आणि मग आता पुन्हा हॉटेल व्यवसाय.. आत्ता हे हॉटेल आहेच शिवाय खाली कांगडा विमानतळाजवळ १०५ खोल्यांचं मोठं हॉटेल देखील लवकरच सुरु होणार आहे. पुण्यात ते काही काळ राहिले असल्याने त्यांना चांदणी चौक, बाणेर परिसर, चितळ्यांची बाकरवडी माहित होती. शिवाय आपल्याकडच्या हाय वे वर जागोजागी 'जेवण तयार आहे' चे फलक त्यांना गंमतशीर वाटले होते. योगायोगाने त्यांच्यासाठी मी चितळ्यांचीच बाकरवडी नेली होती. काही तासांनी जेवायच्या वेळी बाकरवडीचं पाकीट त्यांच्या बायकोच्या हातात दिसलं. तेव्हा त्यांनी आमची तिच्याशी ओळख करून दिली- "ये मेरी wife है. She is from China." याविषयी माझ्या पेशंटने मला सांगितलं होतं - त्या दोघांचा सहजयोगामुळे परिचय झाला आणि त्याचे प्रेमात रूपांतर होऊन लग्नही झाले. निर्मलादेवींच्या अनुयायींमध्ये अशा प्रकारचे विवाह होत असतात आणि त्यांना एक कायदेशीर स्वरूपही देण्याची पद्धत आहे. ही चिनी बायको अमेरिकेतल्या एका कंपनीत बॅक ऑफिस मध्ये कामाला असून वर्क फ्रॉम होम करते. दोघांना एक ६ वर्षांचा मुलगा आहे आणि त्याला तलवारबाजीच्या प्रशिक्षणासाठी काही काळ त्यांनी चीनला पाठवलं होतं. त्यांच्या बायकोला बाकरवडी आवडली - मोडक्या तोडक्या इंग्रजीत, बाकरवडीला खुणेने दाखवत आणि अकारण मोठ्या आवाजात हसत - तिने its good असं सांगितलं.
अमितकुमारांशी झालेल्या बोलण्यातील एक गोष्ट जात जात का असेना पण मला सांगाविशी वाटते.. ती म्हणजे कलम ३७० हे अजूनही हिमाचल प्रदेश मध्ये लागू आहे. म्हणजेच हिमाचल बाहेरील लोकांना येथे जमीन खरेदी करण्याचा अधिकार नाही. काश्मीर मधील हे कलम काढलं पण इथलं नाही आणि यात काही गैर आहे असंही कोणाला वाटत नाही असे दिवस सध्या आहेत. त्यामुळे फक्त आमचं असं बोलणं झालं एवढंच नमूद करतो..
अमितकुमारांच्या बोलण्यात हेही आलं की ते वर्षातले १० महिने खूप काम करतात आणि थंडीच्या दिवसांत २-२ महिन्यांसाठी दक्षिणेकडे जातात. कधी पुणे, मुंबई वा गोवा इथे राहतात. थंडी ओसरली की हिमाचलला परततात.
३
आम्ही कसोलला असताना आम्हांला २५-३० च्या दरम्यान वय असलेली रेश्मा नावाची एक सोलो ट्रॅव्हलर भेटली. मूळची केरळची, मुंबईत वाढलेली आणि आता नोकरीनिमित्त बंगलोरला राहणारी. यावर्षी बंगलोरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याने तिच्या कंपनीने कर्मचाऱ्यांना उन्हाळ्याच्या २ महिन्यांकरता आपापल्या घरी जायला सांगितलं. हिने घरी जाण्याऐवजी हिमाचलला येण्याचा पर्याय स्वीकारला. सोम-शुक्रवार काम आणि वीकेंडला फिरणे असा तिचा सध्याचा कार्यक्रम आहे. मग आमचं थोडं MAC (Mutual Admiration Club) झालं. म्हणजे मी तिच्या सोलो प्रवासाबद्दल तिचं कौतुक केलं तर तिने आम्ही तिघे एकत्र प्रवास करतोय, पक्ष्यांचे फोटो काढतोय या बद्दल आमचं कौतुक केलं! (कारण तिच्या आई-वडिलांना प्रवासाची अजिबात आवड नाही)
हवामान/वातावरण प्रतिकूल झाल्यावर पक्षी स्थलांतर करतात तशी माझ्या पेशंट, अमितकुमार आणि रेश्मा देखील करतात. पण ही एलिट उदाहरणं झाली. त्या सगळ्यांकडेच आर्थिक सुबत्ता आहे म्हणून ते हवा थंड झाली की दुसरीकडे जाऊ शकतात व बंगलोरला पाण्याचा प्रश्न निर्माण झाला म्हणून दुसरीकडे जाण्याची व्यवस्था कंपनीच करून देते. पण काही स्थलांतरं ही दुसरा पर्याय नसल्यामुळे किंवा प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे देखील करायची वेळ येऊ शकते.
४
कसोल ते मनीकरण गुरुद्वारापर्यंत आम्हांला टॅक्सीने सोडणारा अशोककुमार हा मूळचा चंबा जिल्ह्यातला. म्हणजे कसोलपासून कमीतकमी २०० किमी दूरवर असलेलं ठिकाण! इथे पोटापाण्यासाठी टॅक्सी चालवणारा. त्यादिवशी तिथे दिवसा ७-८ डिग्री तपमान होतं तरी आमचा थंडीने कुडकुडून जीव चालला होता. याला विचारलं की इथे कुठे राहतोस. तर म्हणाला- गाडीतच झोपतो. मला कल्पनाही करवेना. मग थंडी नाही का वाजत? अब क्या करे साहब ... अब इसकी भी आदत सी हो गयी है !
५
आम्ही मॅक्लिओडगंज जवळील भागसुनाग मंदिर आणि तिथल्या धबधब्यला भेट दिली. तिथल्या पायऱ्या उतरत असताना अचानक समोर हे राजस्थानी जोडपं दिसलं.
या व्हिडिओ मध्ये नीट दिसतंय की नाही माहित नाही पण यातील बाई आपल्या तान्ह्या बाळाला अंगावर पाजत होती. चेहऱ्यावर मात्र हसू होते. म्हटलं तर हे भीक मागणारेच पण अंगी थोडीफार कलागुण बाळगून असलेले. पोटापाण्यासाठीच एवढ्या लांब आलेले असणार! त्याठिकाणी अवचित हे दृश्य बघून मला भरूनच आलं. शिवाय काय गंमत होती पहा- हिमाचल प्रदेश मध्ये एका ठिकाणी, मी म्हणजेच एका मराठी माणसाने, एका राजस्थानी माणसाला गाण्याची फर्माईश केली आणि त्याने पारंपरिक राजस्थानी मांड मधील सुप्रसिद्ध गाणं म्हणून दाखवलं. आपली सांस्कृतिक विविधता समृद्ध आहे यात शंकाच नाही.
यापेक्षाही आणखी काही स्थलांतराचे प्रकार असू शकतात का? या विषयी पुढच्या ब्लॉग मध्ये...
( फोटो आणि व्हिडिओ - स्मृती पुसाळकर )
( क्रमश:)
3 comments:
छानच । स्थलांतराचा धागा पकडून खूप मस्त वर्णन झालं आहे....स्थलांतरित पक्ष्यांचे फोटो बघितले आहेतच आता ही मनुष्य स्थलांतरणाची वर्णनही रंजक आहेत
True as written by Amit... concept building is very nice
हिमाचल डायरी नेहमीप्रमाणे उत्कृष्ट लेखनाचा उत्तम दाखला/नमुना आहे. वाचताना प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतील एवढी लेखणीत ताकद आहे. ही घासून गुळगुळीत झालेली वाक्ये असली तरी खरी आहेत म्हणून 'पर्याय' नाही.
लोक सुवर्ण मंदिरात मथा टेकत होते, यातला मथा शब्द छान वाटतो..original असल्यामुळे असेल..शिवाय पंजाबी भाषेचा गोडवा काही शब्दात आहे, त्यातला हा शब्द आहे...
तसं तर लिहायला खूप आहे...स्वतः संपूर्ण trip arrange करुन ती यशस्वी होण्याचा अनुभव पण खूप छान मिळाला..
एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, स्थलांतरित पक्षी हा माझा प्रांत नाही. पण स्थलांतरित माणसांसाठीच महाराष्ट्राचा जन्म आहे असे वाटते इतके इथे पोटापाण्याच्या निमित्ताने आलेले लोक आहेत, जे आता मुळच्या महाराष्ट्रीयन पेक्षा जास्त झाले आहेत.. प्रवास वर्णनाबरोबर व्यक्तिचित्रण पण वाचनीय झाले आहे.
Post a Comment