१
मी एक हौशी पक्षी निरीक्षक आणि फोटोग्राफर आहे. इंग्लंडला जायचं ठरवल्यावर तिथल्या पक्ष्यांचे फोटो काढायची खूप उत्सुकता होती. तिथे सामान किती नेऊ शकतो यावर मर्यादा असल्याने तिथे Point & Shoot कॅमेरा न्यायचा की DSLR का दोन्ही यावर आमच्यामध्ये चर्च्यांच्या अनेक फेऱ्या झडूनही एकमत न झाल्यामुळे शेवटी मी माझा खास अधिकार वापरला आणि दोन्ही कॅमेरे बरोबर घेतले. तिथे गेलो आणि मोठा कॅमेरा बरोबर नसला तर नेमकं काहीतरी छान दिसायचं आणि मग मनाला रुखरुख लागून राहायची !- हे मला नको होतं. पण प्रत्यक्षात घडलं थोडंसं उलटंच !एवढा जड कॅमेरा नेऊनही त्याचा खूप कमी वापर झाला आणि तो सगळीकडे एखाद्या लहान बाळासारखा मला वागवावा लागला!
इंग्लंड मधली हवा एवढी छान. अजिबात प्रदूषण नाही. आम्ही The Lake District ला असताना तिथला AQI फक्त २ होता. तर लंडनमध्ये असताना तो ४ होता! मला तर वाटायचं की AQI मोजायचं यांचं यंत्र बिघडलं तर नाही ना?! शिवाय सगळीकडे हिरवाई. जिथे बघावं तिथे लहान मोठे वृक्ष आणि झाडं झुडपं ! जागोजागी तलाव. अगदी लंडनच्या बागांमध्येही मोठाले तलाव होते. पण त्यामानाने पक्षी कमी दिसले. म्हणजे भारतीय उपखंडात जेवढी जैव विविधता आहे तेवढी इथे आढळली नाही. पक्ष्यांचे प्रकारही कमी होते आणि संख्यासुद्धा! अगदी कावळे सुद्धा तुरळक दिसले.तेच तेच पक्षी वारंवार दिसले. कदाचित माझ्या अपेक्षा जास्त होत्या का? किंवा असंही असेल की मी फक्त पक्षी बघायला तिथे गेलो नव्हतो. जेव्हा आपण एखाद्या जंगलात किंवा पाणथळीच्या जागी जातो तेव्हा आपण आपलं पूर्ण लक्ष तिथले प्राणी-पक्षी बघण्याकडे असतं. इथे तसं नव्हतं. त्यामुळेही कदाचित मला कमी पक्षी दिसले असतील. पण एकूण या आघाडीवर थोडीशी निराशा झाली खरं ! असो! पण जे काही पक्षी दिसले त्यांचे फोटो या ब्लॉग मध्ये दिले आहेत.
(डिस्क्लेमर :
१) या ब्लॉगच्या पहिल्या वाक्यातील हौशी शब्द महत्त्वाचा!
२) मी कॅमेरे नेले असले तरी आमची सर्वार्थाने कौटुंबिक सहल होती. पक्ष्यांचे फोटो काढणे हा काही मुख्य उद्देश नव्हता.
३) हा ब्लॉग लिहिण्यामागे माझा उद्देश फक्त कुठले पक्षी बघितले याची फोटोरूपी नोंद करणे( record shots) हाच आहे. त्यामुळे फोटोंमध्ये कदाचित तितकीशी सफाई आढळणार नाही.
४) तिथल्या पक्ष्यांची नावं मला अजिबात माहित नव्हती. नावांसाठी मी Merlin आणि Google Lens या दोन मोबाईल अँप्सचा उपयोग केला आहे. तरीही कुठल्या पक्ष्याचे नाव माझ्याकडून अनवधानाने चुकले असल्यास क्षमस्व! जर तुम्हांला एखाद्या पक्ष्याचं नाव वेगळं आहे असं वाटत असेल तर मला जरूर सांगा.)
२
सगळ्यांत पहिला दिसला म्हणून याचा फोटो सर्वप्रथम दिला आहे. हा कबुतर प्रवर्गातला सर्वात मोठा पक्षी आहे.
Common Wood Pigeon
आधी जरी आम्हांला हा लेमिंग्टन स्पा मध्ये दिसला असला तरी नंतर हा सगळीकडेच आढळला. केसिक असो वा केंब्रिज वा केन्सिंग्टन गार्डन, हा सगळीकडेच 'भेटला'. याचा काहीसा गूढ आवाज तिथल्या शांततेत अधिकच उठून दिसायचा.
या व्हिडिओत याचा आवाज ऐकता येईल-
विचित्र आवाज करणारा आणखी एक पक्षी आम्हांला तिथे दिसला. तो म्हणजे Eurasian Magpie. हा कावळा प्रवर्गातला पक्षी असून अतिशय बुद्धिमान पक्षी आहे.
Eurasian Magpie
या व्हिडिओत त्याचा आवाज ऐकता येईल. हा आवाज आपल्याकडे दिसणाऱ्या Rufous Treepie (टकाचोर) सारखा आहे-
जिथे जिथे पाणी होतं तिथे आम्हांला हे ठराविक पक्षी दिसायचेच. -
Mute Swan
याला Mute Swan म्हणतात कारण याच्या इतर भाऊबंदांपेक्षा हा कमी आवाज करतो.
Canada Goose
नावातूनच लक्षात येतं की हा उत्तर अमेरिकेत आणि आर्क्टिक भागात आढळतो. पण इंग्लंडमध्ये देखील हा आता चांगलाच स्थिरावला आहे. अगदी माणसाळला आहे.
३
The Lake District मध्ये काही छोटे आणि वेगळे पक्षी दिसले.
आमच्या बस टूर मध्ये आम्ही वर्डस्वर्थची समाधी बघत होतो तेव्हा बाकीचे लोक जिंजर ब्रेड घेण्यासाठी मोठ्या रांगेत थांबले होते. तिथेच हा नाजूकसा पक्षी धीटपणे रस्त्यावर उभा होता. इंग्लंडचा अधिकृत असा पक्षी नाही पण २०१५ साली एका खाजगी वृत्तवाहिनीने घेतलेल्या मतदानात European Robin ने ३४% मतं मिळवून पहिला क्रमांक मिळवला. त्यामुळे हा इंग्लंडचा अनधिकृत राष्ट्रीय पक्षी आहे असं म्हणता येईल! या शर्यतीत या इवल्याश्या पठ्ठ्याने गव्हाणी घुबड (Barn Owl) आणि Blackbird या दोन मोठ्या पक्ष्यांना मागे टाकलं.
European Robin
अगदी समाधी जवळ हा दिसला -
Song Thrush
शिवाय हा देखील -
Dunnock
हा वरवर जरी चिमणीसारखा दिसत असला तरी तो चिमणी प्रवर्गातील पक्षी नाही.
बस टूर मधल्या Ullswater च्या आमच्या थांब्यावर हा दिसला-
Eurasian Nuthatch
४
लंडन मध्ये London Eye च्या पाळण्यात बसलेलो असताना त्या पाळण्यावर या पक्ष्यांचा थवा आम्हांला दिसला. गंमत म्हणजे हा पक्षी एकदाच दिसला आणि तेही या पाळण्यावरच! बाकी कुठल्याही बागांमध्ये किंवा इतरत्र कुठेही दिसला नाही -
Common Starling or European Starling
हा साळुंकी प्रवर्गातील पक्षी असून हा थंडीच्या काळात भारताच्या उत्तर भागातही आढळतो.
लंडनमधील Regent's Park मध्ये बरेच पक्षी दिसले.
Egyptian Goose
नावावरून लक्षात येईलच की हा खरं तर आफ्रिकेत आढळणारा पक्षी आहे. मात्र तो शोभिवंत पक्षी(Ornamental bird) असल्याने इंग्रजांनी त्याला सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये आणला आणि नंतर तो पाळीव न राहता हळूहळू इंग्लंडमधील तळ्यांमध्ये राहू लागला. हा इंग्लंडचा स्थानिक पक्षी नाही.
Tufted Duck
हा थंडीच्या काळात भारतात आढळतो. इथे ही मादी असावी कारण हिच्या जवळच ही दोन पिल्लं सुद्धा होती.
इथे विशेषतः geese जातीतले पक्षी खूपच माणसाळले आहेत. हे कितपत बरोबर आहे माहित नाही पण
त्यांना इथले लोक खायला घालतात(म्हणजे ब्रेड वगैरे).त्यामुळेच हे माणसांना अजिबात घाबरत नाहीत, खूपच जवळ येतात. अगदी आपल्या हातातून खाद्यपदार्थ काढून घ्यायलाही ते कमी करत नाहीत.
Greylag Goose
आणखीही एक प्रकारचं धीट बदक बघितलं. ते म्हणजे Mallard-
Male
Female
लेमिंग्टन स्पा तसंच टेम्स नदीवर आणि लंडनमधील काही बागांमध्ये काही प्रकारचे Gulls बघितले.
Black headed Gull
Great Black backed Gull

Adult Herring Gull
? Bonaparte's Gull
५
आपल्याकडे दिसणारे पक्षी तिथेही बघून काहीतरी ओळखीचं बघितल्याचा एक वेगळाच आनंद मिळायचा. Greylag Goose मी भरतपूरला बघितला होता. याशिवाय काही पक्षी तर मी पुण्यातही बघितले होते. अगदी विठ्ठलवाडीच्या नदीकाठी किंवा मॉडेल कॉलनी मधील लकाकि तलावात देखील!त्यापैकी-
Eurasian Coot
हा तर पुण्यातला स्थानिक पक्षी आहे. याच्या डोक्यावरील/कपाळावरील पांढऱ्या चट्ट्यामुळे त्याने टिळा लावला आहे असं वाटतं म्हणून याला मराठीत वारकरी बदक असं म्हणतात.
हा देखील पुण्यात पाहिला आहे-
Common/Eurasian Moorhen ( काळी पाणकोंबडी)
आणि शेवटचा पक्षी-
Great Cormorant (मोठा पाणकावळा)-
(क्रमश:)
No comments:
Post a Comment