(माझ्या सर्व परिचित/अपरिचित टेनिसप्रमींना हा ब्लॉग मन:पूर्वक समर्पित!)
१
माझ्या लहानपणीची टेनिसबद्दलची आठवण गंमतशीर आहे आणि ती विम्बल्डनशी संबंधितच आहे. आम्ही १९८० साली ज्यादिवशी विम्बल्डन स्पर्धेत पुरुषांचा अंतिम सामना होता त्याच दिवशी आणि त्याच वेळी कुठल्याशा सिनेमाला गेलो होतो. त्यामुळे अंतिम सामना आपल्याला काही (अर्थातच टीव्हीवर ) बघता येणार नाही याची थोडीशी रुखरुख होती. पण सिनेमा बघून आम्ही घरी आलो तरी तो सामना चालूच होता! ही तीच सुप्रसिद्ध लढत होती- बियॉन बोर्ग आणि जॉन मॅकेन्रो यांच्यातली जी साडे तीन तासांपेक्षा जास्त काळ चालली होती. यात मॅकेन्रो ने चौथा सेट टायब्रेकर मध्ये १८-१६ असा जरी जिंकला असला तरी अंतिम सामना बोर्ग ने जिंकला होता. बोर्ग आणि मॅकेन्रो हे दोघेही परस्परविरोधी स्वभावाचे होते. मॅकेन्रो अतिशय चिडखोर स्वभावाचा, राग उघड उघड व्यक्त करणारा, आदळआपट आक्रस्ताळेपणा करणारा! तर याउलट बोर्ग अतिशय शांत, स्थितप्रज्ञासारखा! सामन्याच्या स्कोअरचा, हारजितीचा, इतकंच काय विरुद्ध बाजूला असलेल्या मॅकेन्रोच्या चिडण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. यामुळे हा विरोधाभास बघायला मजा यायची. पुढे असाच विरोधाभास बोरिस बेकर आणि इव्हन लेंडल आणि बोरिस बेकर आणि स्टीफन एडबर्ग यांच्या सामन्यांतही बघायला मिळायचा. बेकर आणि लेंडलचा १९८६ साली विम्बल्डन स्पर्धेतील अंतिम सामना होता त्यावेळी आमच्याकडे रंगीत टीव्ही नव्हता. तो सामना आम्ही आमच्या समोरच्यांच्या घरी बघितला होता. तेव्हाचं विम्बल्डनचं हिरवं मैदान आणि बेकरचं डाइव्ह मारत फटके मारून लेंडलला नामोहरम करणं लक्षात राहिलं. महिलांच्या बाबतीत अशीच चुरस ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांच्यात असायची. नंतर स्टेफी ग्राफ आली आणि तिने टेनिसचा नूरच पालटला. कसा ते सांगायला नकोच!
चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी विम्बल्डन स्पर्धा काहीतरी वेगळीच होती आणि आहेही! त्या स्पर्धेचा इतिहास, तिची प्रतिष्ठा, ग्रास कोर्टवर खेळताना खेळाडूंचा लागणारा कस, अंतिम सामन्यात येणारे सेलिब्रिटी, त्यांचं ग्लॅमर, बक्षीस वितरणासाठी उपस्थित राहणारे राजघराणे..त्यांचं ते प्रोटोकॉल प्रमाणे बॉल बॉईज बसून सगळ्यांशी बोलणं, खेळाडूंपासून सगळ्यांचंच राजघराण्याशी अदबशीर वागणं, विम्बल्डनचे खेळाडूंनी पांढरेच कपडे घालण्याबद्दलचे कडक नियम, हिरव्यागार कोर्टावर पांढऱ्या कपड्यांमधले खेळाडू, तिथला सुप्रसिद्ध स्ट्रॉबेरी विथ क्रीम हा पदार्थ... हे सगळं इतर ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये उठून दिसायचं आणि त्यामुळे माझ्या वैयक्तिक आवडीच्या स्पर्धेत विम्बल्डनचं फ्रेंच ओपन पेक्षाही वरचं स्थान होतं.
माझा कॉलेजमधील मित्र प्रशांत लेले(याचा या लंडनवारीच्या आधीच्या काही ब्लॉग्ज मध्ये उल्लेख आलेला आहेच) हा टेनिस खेळाडू आहे. आमच्या कॉलेजच्या काळात तो पुण्यात डेक्कन जिमखाना क्लबवर टेनिस खेळायचा तेव्हा त्याचे काही सामने बघायला मी गेलो होतो. तेव्हा प्रथमच टेनिस हा खेळ प्रत्यक्ष बघितला होता. (आणि तेव्हा त्याचे बारकावे जास्त चांगल्या प्रकारे समजले होते) आणि टेनिसची आवड आणखी घट्ट झाली.
टेनिस मध्ये रॉजर फेडरर युग अवतरलं आणि त्याने आम्हांला अभिरुची संपन्न केलं. फेडरर तर विम्बल्डनचा अनभिषिक्त सम्राट! विम्बल्डनच्या दृष्टीने त्याचा खेळ परिपूर्ण होता. सर्व्ह अँड व्हॉली, संपूर्ण कोर्टाच्या वेगवेगळ्या अँगल्सचा वापर करून त्याने मारलेले फटके, त्याच्या हालचालींमधली सफाई, सहजता, त्याच्या शॉट्स मधील टायमिंग आणि touches आणि लालित्यपूर्ण नजाकत हे सगळंच देखणं होतं. He was a Poetry in Motion ! त्याचे सामने बघणं हे एखादी शास्त्रीय संगीताची सुरेख आणि सुरेल मैफल ऐकण्यासारखं होतं. याबरोबरच महत्त्वाचं म्हणजे तो माणूस वाटायचा, एखादं पॉवरबाज मशीन नाही! त्यामुळे त्याचे सामने बघायला मजा यायची.
विम्बल्डन स्पर्धा टीव्हीवर बघायचं आणखी एक महत्त्वाचं कारण होतं. माझा मित्र प्रशांत हा नंतर लंडनमध्ये स्थायिक झाला. तिथेही त्याने आपलं टेनिस हे पॅशन जपलं आणि जोपासलं. इतकं की २०११ सालापासून तो विम्बल्डन स्पर्धेत लाईन अंपायर म्हणून काम करू लागला. त्यामुळे प्रशांत आम्हांला विम्बल्डन स्पर्धांदरम्यान टीव्हीवर दिसतोय का हे बघायची उत्सुकता वाटायची आणि तो दिसला की आमची कॉलर टाईट व्हायची! जणू काही आम्हीच तिथे लाईन अंपायर आहोत असं आम्हांला वाटायचं!
प्रशांतच्या एका वाढदिवसानिमित्त मी फॅन फिक्शन प्रकारचा एक ब्लॉग लिहिला होता त्याची लिंक इथे देत आहे-
https://rajeshpusalkar.blogspot.com/2017/07/blog-post.html
तसंच प्रशांतच्या विम्बल्डन अंपायर होण्याच्या प्रवासाबद्दल त्याने अलीकडेच लिहिलं होतं त्या लेखाची लिंकही देत आहे-
२
या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही आमच्या इंग्लंड ट्रीपमध्ये विम्बल्डनला जाणार हे अगदी निश्चितच होतं ! आम्हांला खरं तर प्रत्यक्ष स्पर्धा चालू असताना तिथले सामने बघायला जायला आवडलं असतं. त्या काळात तिथला माहोल अनुभवणं हे काहीतरी औरच असणार! तिथे सामन्यांची तिकिटं मिळवण्यासाठी उत्साही लोक दोन दोन दिवस आधी कॅम्पिंग वगैरे करतात. (माझ्या भाच्यानेही ते केलं होतं). या दिवसांत तिथे उत्सवी वातावरण असणार. पण काही अपरिहार्य कारणांमुळे स्पर्धेच्या कालावधीत आम्हांला इंग्लंडमध्ये जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे सामने जरी बघता नाही आले तरी विम्बल्डनची टूर करून आम्ही दुधाची तहान ताकावरच भागवणार होतो. आमच्या इंग्लंडच्या ट्रीपच्या दरम्यान प्रशांतही तिथे होता. त्याच्याबरोबर विम्बल्डनला जाणं हाही एक अद्भुत अनुभव झाला असता. पण तेही काही कारणाने जमलं नाही. त्यामुळे शेवटी आमचे आम्हीच ती टूर करून आलो.
३
विम्बल्डनच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर लक्ष वेधून घेतं ते सुप्रसिद्ध Rolex कंपनीचं घड्याळ आणि ब्रिटिश टेनिसपटू फ्रेड पेरी यांचा पुतळा!-
जे आपण नेहमी टीव्हीवर बघतो ते आपण आता प्रत्यक्ष बघत आहोत यावर आमचा काही क्षण विश्वासच बसेना!
टूर च्या सुरवातीला आम्ही विम्बल्डनचं प्रशस्त संग्रहालय बघितलं.हो..इथेही संग्रहालय आहेच! टेनिस या खेळाचा आणि विम्बल्डनचा सखोल इतिहास सांगणारं !
लेमिंग्टन स्पा विषयी लिहिताना इंग्लंडवारीच्या माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं की टेनिस या खेळाचा आणि लेमिंग्टन स्पाचा खूप जवळचा संबंध आहे. जगातील पहिला टेनिस क्लब १८७२ साली इथे स्थापन झाला होता. याबद्दलची माहिती विम्बल्डन च्या संग्रहालयात वेगळ्या प्रकारे बघायला मिळाली-
टेनिसच्या रॅकेट मध्ये हळूहळू झालेले बदल-
त्याचबरोबर टेनिसच्या बॉल मध्येही झालेले बदल-
हेच नाही, तर खेळाडूंच्या कपड्यांमध्ये झालेले बदल हेदेखील तिथे दर्शवण्यात आले आहेत. पूर्वी महिला कॉर्सेट घालून खेळायच्या. १९२०-३० या दशकात यात बदल झाला.
पूर्वी पुरुषांचा पोशाख देखील असा होता-
ही त्याकाळच्या पुरुषांच्या चेंजिंग रूमची प्रतिकृती आहे-
विम्बल्डनच्या बॉलबॉईज आणि गर्ल्स बद्दलही इथे माहिती देण्यात आली आहे-
इतकंच नाही तर तिथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थ आणि स्ट्रॉबेरी विथ क्रीम या पदार्थाचा इतिहास देखील रंजकपणे मांडण्यात आला आहे-
तर या फोटोत सेरेना विल्यम्सने २०१० च्या स्पर्धेत घातलेला स्ट्रॉबेरी विथ क्रीम या थीमचा ड्रेस-
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विम्बल्डनला चांगलीच झळ बसली होती. १९३९ साली इथल्या क्लबहाऊस मध्ये रेड क्रॉस मधील कर्मचारी राहायला आले. क्लबहाऊसच्या बाहेरच्या जागेत सैनिकांची परेड होत असे. कार पार्किंगची जागा खणून या जागेचं चक्क शेतात रूपांतर करण्यात आलं आणि तिथे कोंबड्या-डुकरांपासून अगदी गाढवांपर्यंत प्राण्यांचा मुक्त संचार असे. १९४० साली विम्बल्डन वर १६ बॉम्ब टाकण्यात आले ज्यात सेंटर कोर्टवरील आच्छादनाचं खूप नुकसान झालं. हे सगळं फोटोंसकट अशा प्रकारे दाखवण्यात आलं आहे.
आणखी एका दस्तावेजाने माझं लक्ष वेधून घेतलं. तो म्हणजे १९७५ साली पुरुषांची स्पर्धा जिंकून अशी स्पर्धा जिंकणारा पहिला कृष्णवर्णीय पुरुष हा विक्रम/इतिहास रचणाऱ्या आर्थर अँश याच्या हस्ताक्षरातील डायरी!-
महिला आणि पुरुष विजेत्यांना मिळणारे चषक देखील इथे बघायला मिळतात-
माहितीचा असा खजिना घेऊन आम्ही प्रत्यक्ष विम्बल्डन कोर्टवर गेलो.
४
यावर्षीची स्पर्धा नुकतीच संपल्यामुळे आम्हांला विम्बल्डनच्या नियमांनुसार टूर मध्ये फक्त सेंटर कोर्टच बघता आले. तसंच गतविजेत्या स्पर्धकांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे कोर्ट नंबर १ देखील हे असे बाहेरूनच बघायला मिळाले-
सेंटर कोर्ट इतकंच मला कोर्ट नंबर १८ बघायची खूप उत्सुकता होती. कारण याच कोर्टवर जॉन इस्नर(अमेरिका) आणि निकोलस माहूत( फ्रान्स) यांच्यात टेनिसच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक काळ चालणारा सामना २०१० साली झाला होता. तब्बल ११ तास ५ मिनिटं आणि एकूण तीन दिवस चाललेला हा सामना इस्नरने शेवटच्या सेटमध्ये ७०-६८ असा जिंकला होता. पण तेही बघता आलं नाही. त्या कोर्टवर तसा फलकही लावलेला आहे. तो प्रत्यक्ष बघता आला नाही. पण त्याचा फोटो इंटरनेट वरून साभार-
टीव्हीवर आपण पाहिलेल्या सेंटर कोर्टची प्रतिमा आणि आम्हांला प्रत्यक्ष दिसलेलं सेंटर कोर्ट हे खूपच वेगळं होतं. यावर्षीची स्पर्धा नुकतीच संपल्यामुळे तिथलं गवत पूर्णपणे काढून ते नव्याने उगवण्याची (relaying of grass) प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे असं आमच्या गाईडने सांगितलं. त्यामुळे सेंटर कोर्ट असं दिसलं -
स्टेडियमची आसनक्षमता १४,१०० आहे असं गाईड म्हणाली.
पण आता तिथे कोणीच नसल्याने ते अगदीच रिकामं रिकामं दिसत होतं.मात्र प्रेक्षक असताना इथे कसं वातावरण असेल याची कल्पना करता आली.
सुप्रसिद्ध रॉयल बॉक्स, जिथे राजघराण्यातील लोकांची बसायची जागा आहे, तो देखील असा झाकून ठेवल्यामुळे ओळखता आला नाही-
लंडनच्या लहरी पावसाळी हवामानामुळे सामन्यांत व्यत्यय येऊ नये म्हणून २००९ साली इथे उघड-बंद होणारं छत बसवण्यात आलं आहे-
ओळखीच्या दोन गोष्टी मात्र तिथे होत्या- एक म्हणजे ते Rolex चं घड्याळ -
आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्कोअरबोर्ड!
यावर्षीच्या पुरुष आणि महिलांच्या अंतिम सामन्याचा स्कोअर इथे अजूनही दिसतोय-
सेंटर कोर्टमधून बाहेर पडताना वाटेत आजवरच्या विजेत्यांची नावं आणि फोटो अशा फलकांत दर्शवण्यात आली आहेत-
या सगळ्या महान विजेत्यांच्या नावांमध्ये लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा ही भारतीय नावंही झळकताना पाहून अभिमान वाटला. विम्बल्डनच्या या गौरवशाली इतिहासात काही मोजक्या भारतीयांनी सर्वोच्च कामगिरी करून सुवर्णाक्षरांनी पान कोरलं आहे हे पाहून खूपच आनंद झाला!
टीव्हीच्या पडद्यापासून सुरू झालेला आमचा विम्बल्डनचा हा प्रवास अखेर प्रत्यक्ष सेंटर कोर्ट पाहण्यापर्यंत येऊन पोहोचला होता!
(क्रमश:)
1 comment:
खूप सुंदर वर्णन!! Wimbledon ची वारी परत एकदा झाली! बारकावे लक्षात ठेवून योग्य ठिकाणी लिहिणे हा तर तुझ्या बाये हात का खेल!
प्रशांतच्या writing ची लिंक पाठवल्यामुळे त्याचा प्रवासाची story थोडक्यात समजली.
Post a Comment