Monday, 7 March 2016

(जर्मन) भाषा पहावी शिकून . . . (भाग ४)




                                                              १ 

माझ्या तीन वर्षांच्या जर्मन भाषा शिकण्याच्या तुटपुंज्या अनुभवाच्या जोरावर मी कुठलीही भाषा शिकू पाहणाऱ्यांसाठी काही सूचना देऊ शकतो. तुम्हांला जर भाषा शिकायची असेल तर एकही लेक्चर बुडवू नका.वर्गात जे काही शिकवतात ते लक्षपूर्वक ऐका आणि जर काही गृहपाठ दिला असेल तर तो यथाशक्ती पूर्ण करा. आम्ही हे सगळं एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे पाळलं. आठवड्यातले तीन दिवस प्रत्येकी दोन तास आम्ही असे बाजूला काढलेले होते.सहसा आम्ही लेक्चर बुडवलं नाही. एका लेक्चर मध्ये किती काय काय शिकवलं जाऊ शकतं ते आम्ही अनुभवत होतोच. जर ते बुडलं तर आपण बाकी वर्गाच्या मागे पडू आणि तो भाग समजला नाही तर त्यामुळे आपली आवड कमी होईल की काय असं आम्हांला वाटे. हे जे अभ्यासक्रमाबाहेरचे  उपक्रम आम्ही केले ते लेक्चरच्या वेळात कधीच नाही. कधी सकाळी लवकर येऊन, कधी दुपारच्या मोकळ्या वेळेत तर कधी (घरच्यांचा रास्त रोष पत्करून) रविवारीही ! या सगळ्याचा निश्चितच फायदा झाला. 

                                                             २ 
फेब्रुवारी महिना या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे लवकर संपला आणि हळूहळू परीक्षेचे वेध जाणवू लागले. इतकं सगळं चांगलं चाललेलं असताना परीक्षा कशाला असं वाटे. म्हणजे परत ते पेपर लिहिणे, मार्क मिळवणे आणि मार्कांवरून आपली योग्यता ठरवली जाणे याचा कंटाळा होता. सलग तीन तास बसून लिहिण्याची सवय गेली त्यालाही अनेक वर्षं झाली होती. पण एकदा हा कोर्स करायचा म्हटल्यावर या सगळ्यातून जाणे हे आलेच! आम्हांला एकदा वर्गात ऋचा मॅडमनी सांगितलं होतं की फक्त सर्टिफिकेट कोर्स करून काहीच उपयोग नाही. कारण या पातळीवर भाषा पूर्णपणे कशी असते याचा अंदाजच येत नसतो. फक्त भाषेची तोंडओळख होते इतकंच! पुढचे डिप्लोमा कोर्सेस करणं म्हणूनच गरजेचं होतं. अर्थात त्यांनी हे ही सांगितलं होतं की सर्टिफिकेट आणि डिप्लोमाच्या काठिण्य पातळीत खूपच फरक आहे. डिप्लोमाची ही उंच उडी सगळ्यांनाच जमेल असं नाही. 
पण दोघीही शिक्षिकांनी आमच्या सर्टिफिकेटच्याच पातळीवर पुढच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिने उत्तम पायाभरणी केली होती. हे अतिशय महत्त्वाचे होते. म्हणजे त्यांनी आमच्यात जर्मन भाषेबद्दल आवड निर्माण तर केलीच शिवाय कुठलीही गोष्ट अशी नव्हती की जी  आम्हांला समजली नव्हती. किंबहुना ती गोष्ट समजेपर्यंत त्यांनी खूप प्रयत्न केले. आम्हांला आधी विशेषणं हा प्रकार जड जात होता. तर त्याचा सराव व्हावा म्हणून मृण्मयी मॅडमनी आम्हांला  जवळपास ५०० वाक्यं दिली होती. दोघींनी मागील अनेक वर्षांच्या प्रश्नपत्रिका वर्गात सोडवून घेतल्या होता. तोंडी परीक्षेचा सरावही करून घेतला होता. या सगळ्यातून परीक्षेत काय असणार आहे याचा अंदाज बांधता आला. परीक्षेच्या दृष्टिने मनाची तयारी होऊ लागली आणि अशातच वर्षाचं शेवटचं लेक्चर आलं. 
                                                              ३

ऑगस्ट पासून सुरु झालेली ही स्वप्नवत वाटचाल आता मार्च मध्ये शेवटाकडे आली. पुढे काय होणार याचा आता काहीच अंदाज बांधता येत नव्हता. परीक्षेत डिप्लोमाला प्रवेश मिळवण्याइतके मार्क मिळाले तरच  हे भाषा शिकायचं चालू राहणार अन्यथा नाही. गेल्या अनेक महिन्यांत सगळ्याचीच सवय झाली होती. भाषा शिकण्यासाठी वेळ राखीव ठेवलेला असणं, ती शिकणं, रानडे इन्स्टीट्यूटचं छान वातावरण, इतक्या महिन्यात सगळ्यांशी झालेली मैत्री हे सगळं आता संपणार असे वेगवेगळे विचार मनात असताना शेवटच्या लेक्चरला सुरुवात झाली. मृण्मयी मॅडमनी आधी आम्हांला काही शंका आहेत का असं विचारलं आणि त्या दूर केल्यानंतर त्या म्हणाल्या की शिकवण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव होता आणि आमची batch त्यांच्यासाठी पहिलीच होती. हे त्या आधीही एक दोनदा म्हणाल्या होत्या. पण आम्हांला वर्षभरात फारसं कधीच जाणवलं नाही की त्या नवख्या आहेत. पहिली batch असल्यामुळे त्यांच्या मनात आम्हां सर्वांबद्दल एक वेगळे स्थान असावे. आणि त्या म्हणाल्या- "मी आता तुम्हांला महेश एलकुंचवार यांच्या 'मौनराग' या पुस्तकातला एक लेख वाचून दाखवते." हे अगदीच अनपेक्षित होतं. जर्मन भाषेच्या अभ्यासक्रमाचा शेवट आणि तो झाला महेश एलकुंचवारांच्या लेखाच्या अभिवाचनाने ! आणि या निमित्ताने मला असे अवचित महेश एलकुंचवार भेटले ! (या आधी मी त्यांचं काहीच वाचलेलं नव्हतं इतकी माझी साहित्यिक अभिरुची लाजिरवाणी होती.पुढे ते त्यांच्या इतर कलाकृतींमधून भेटत राहिले. आणि शब्दांमधून अर्थ आणि  नाद आणि दृश्यं पोचवणाऱ्या लेखकाची ओळख झाली.) आधीच वातावरण भारलेलं होतं, एक अनामिक हुरहूर होती आणि मॅडम शांत स्वरांत एलकुंचवारांच्या शब्दांतून आमच्यासमोर एक अद्भुत चित्र मांडत होत्या.

 '. . . . . पुष्कळदा देणारा कोण व घेणारा हेही कळत नाही.देणारा व घेणारा एकच होतात. एकातच एकाच वेळी देणाराही असतो आणि घेणाराही. देणारा श्रीमंत असतोच; पण खुलेपणाने घ्यायलाही तितकेच श्रीमंत मन लागते. काही घेताना, संकोच वाटावा इतके लहान आपण कधीच नसतो व ते नाकारावे एव्हढे मोठेही. आपण फक्त 'असलो' की देणेघेणे दुसऱ्या कशाने कलुषित होत नाही. प्रसन्न आनंद फक्त उरतो.'

हे विलक्षण होतं.या अभिवाचनातून मॅडमनी आमचा सर्टिफिकेटच्या कोर्सला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. तो एक सर्वसामान्य कोर्स न राहता ती एक ज्ञानसाधना झाली ज्यात आम्ही सर्व सहभागी होतो. 

'. . . . . देण्याघेण्यातून हे सगळे निघाले व कुठून कुठे आलो. मला खूप जणांनी दिले व खूप दिले. पण माझ्या विद्यार्थ्यांनी मला जे दिले त्याला तोड नाही. आपण मोलाचे काही देत आहोत हे त्यांना त्या भाबड्या वयात कळतही नसणार. त्यांना प्रश्न पडत व त्यांनी ते माझ्याजवळ आणून ठेवले के त्यांची उत्तरे शोधता शोधता मी श्रीमंत होऊन जाई.' 

देणारा(शिक्षक) आणि घेणारा(विद्यार्थी) यांच्या नात्यात खूप अंतर असते असं नाही. किंबहुना त्यांच्या भूमिकांमध्ये सरमिसळ होऊ शकते. नकळतपणे विद्यार्थी काही वेळा शिक्षक होऊन जातो. शिक्षक-विद्यार्थी नात्यामधलं  हे सुंदर अद्वैत त्यादिवशी पुन्हा अनुभवलं. आणि वर्षभर मॅडमनी कोणत्या भूमिकेतून आम्हांला शिकवलं  हे दिसून आलं. तसंच आमच्या नकळतपणे आमच्याकडूनही त्यांना शिकायला मिळालं असेल/नसेल, पण त्याबद्दलची त्यांची कृतज्ञतेची भावना विलक्षण होती. 
एकूणच हे सगळं  उत्कट होतं. या प्रसंगाचं  वर्णन शब्दांत पूर्णपणे मांडण्याएवढी  माझ्याकडे शब्दसंपदा आणि प्रतिभा नाही. पण मन अगदी भरून आलं. माझ्या आयुष्यात आपलं जगणं सार्थकी लागलं असं म्हणण्याजोगे खूप कमी प्रसंग आले. आणि त्यातले बरेचसे मला काहीतरी  शिकताना जाणवले होते. माझ्या मावशीकडे (कै. शोभना वाकणकर) लहानपणी मी गाणं शिकायला जात असे. तेव्हा एकदा ती भैरव राग गात होती. मीही थोडंसं म्हणत होतो. त्यावेळी एका वेगळ्याच विश्वात आम्ही होतो. टिळक रोडसारख्या गजबजलेल्या ठिकाणी असूनही मला बाकी कुठलाच आवाज येत नव्हता. ही गाण्यातून मिळणारी समाधीवस्था एकदाच अनुभवली. पण कायमचीच लक्षात राहिली. तसंच पुढे डॉक्टर विक्रांत महाजन यांच्याकडे होमिओपथीचे प्रशिक्षण घेत असताना sensitivity training साठी त्यांनी 'इजाजत' सिनेमा दाखवून त्यावर ग्रुप डिस्कशन घेतलं होतं. सिनेमा तर त्या आधीही पहिला होता पण तो जेवढा आणि जसा त्या चर्चांमधून समजला तेवढा पूर्वी नव्हताच कळला. या अनुभवांच्या तोडीचाच हा अभिवाचनाचा प्रसंग होता. कोर्सच्या शेवटच्या दिवशी मॅडमनी दिलेली ही भेट आयुष्यभर स्मरणात राहील. . . 
                                                                                                                         (समाप्त) 
(आमच्या सर्टिफिकेट कोर्सपुरतं इतकं लिहिलं जाईल असं वाटलं नव्हतं. पण पुढचे कोर्सेस ही छान होते. त्याबद्दलही पुढेमागे लिहीनच. पण सध्या इथेच थांबतो)

Saturday, 5 March 2016

(जर्मन ) भाषा पहावी शिकून . . . (भाग ३)


                                                                १
बाकी कुठला नाही तरी माझ्यात एक जर्मन गुणविशेष आहे- मी वेळ पाळणारा माणूस आहे. त्यामुळे मी सगळीकडे वेळेच्या आधीच जाऊन पोचतो. तसंच या कोर्स साठीही पोचत होतो. लेक्चर सुरु व्हायला थोडा वेळ असायचा. आणि मग त्या वेळेत हळूहळू वर्गातल्या इतरांशी परिचय होऊ लागला. सुरुवातीला थोडासा संकोच होता . की आमच्या वयाचा दरारा . .की आम्ही डॉक्टर असल्याची एक (उगाचच) आदरयुक्त भीती? माहित नाही. खरं तर आमच्या डॉक्टरकीची तथाकथित झूल आम्ही वर्गाबाहेर काढूनच कोणत्याही सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच वर्गात शिरायचो.पण एकदा ओळख झाल्यावर मात्र यातलं काहीच आड आलं नाही आणि छान मैत्री झाली. आधी फोन नंबर घेतले गेले, मग फेसबुक रिक्वेस्ट केली गेली. यातनं निसर्ग,मानसी, संजय,सौमित्र  या आमच्यापेक्षा खूप लहान तर वर्गात आमच्या शेजारी बसणाऱ्या आणि साधारण वयाने आमच्याच आगे मागे असणाऱ्या स्वप्ना, शिल्पा, पल्लवी, सीमा, सुप्रिया अशा वर्गमित्र-मैत्रिणींशी ओळख वाढली. पण यात सुरुवातीलाच एक वेगळा पेच निर्माण झाला, ज्याचा विचार मी कधीच केला नव्हता. निसर्गने मला विचारले-"मी तुम्हांला काय म्हणू?" अरेच्चा ! हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. मी त्याला म्हटलं- " काहीही म्हण..अगदी नुसतं राजेश म्हणालास तरी चालेल. पण काका म्हणू नकोस प्लीज !" (मला त्या झी च्या 'हम पांच' मालिकेची आठवण झाली. त्यात एक पूजा नावाचं पात्र असतं. तिला कोणी आण्टी म्हटलेलं चालत नसे!) नुसतं राजेश म्हणणं हे निसर्गला पटणं जड गेलं असावं. म्हणून मग आम्ही मधला मार्ग काढला. ते सगळेच आम्हांला डॉक्टर म्हणू लागले. आमच्या शिक्षिकांनाही हा पेच जाणवला होता की काय माहित नाही.कारण दोघीही आमच्यापेक्षा लहानच होत्या. (ऋचा मॅडमच्या बाबतीत एक गंमतशीर योगायोग सांगता येईल. त्यांचा नवरा म्हणजे आमचा शाळकरी मित्र मनोज फोंडगे! दुनिया गोल आहे म्हणतात ते असं !)

                                                                 २

भाषेची ओळख आणखी चांगल्या प्रकारे व्हावी या दृष्टीने इथे दर वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. याला Februar Fest (फेब्रुवारी महिन्यात आयोजित केलेला उत्सव या अर्थाने) असे म्हटले जात असले तरी याची सुरुवात डिसेंबरपासूनच होते.वर्गात एक दिवस जर्मन पाककला दिवस साजरा केला जातो.(Kochtag). नंतर वेगवेगळ्या वर्गांनी केलेल्या जर्मन पाककृतींवर आधारित स्पर्धाही घेतली जाते. या स्पर्धेला जर्मन परीक्षक असतात. ते केलेल्या पदार्थांची चव घेतात शिवाय तुम्हांला त्यांना पदार्थ कसा केला(सामुग्री सह) हे सगळं जर्मन मध्ये बोलून सांगावे लागते. आम्ही वर्गात सगळ्यांनी मिळून Kartoffelsalat आणि Obstsalat असे दोन पदार्थ केले होते. खूप धमाल केली होती तेव्हा. 
या Fest मध्येच extempore भाषणाची एक स्पर्धा होती. ऐनवेळी दिलेल्या विषयावर जर्मनमध्ये बोलायचं अशी ती स्पर्धा. मी नाव दिलं (शिक्षिकांच्या आग्रहाखातर) खरं पण मनात धाकधूक होती. सगळ्यांसमोर जर्मनमध्ये कशाला एरवीसुद्धा बोलताना दडपण येतं! पण एकदा ठरवलं होतं ना की काही न लाजता, भीडभाड न बाळगता मजा घ्यायची! आणि खरंच मजा आली. थोडंसं बोलताही आलं.तसंच आम्ही जर्मन ग्रुप साँग मध्येही भाग घेतला. आमच्यासाठी मृण्मयी मॅडमनी एक छान गाणं शोधलं होतं. (Der Postbote klingelt was bringt er mir) त्याची त्या आमच्याकडून practice ही करून घेत.  जर्मन व्याकरणातल्या Wechsel Preposition वर आधारित हे गाणं होतं. त्यात मानसी आणि संजयने मायमिंग केलं आणि आमच्या १०-१२ जणांच्या ग्रुपने ते म्हटलं होतं. आमच्यादृष्टीने गाणं चांगलं बसलं होतं पण आम्हांला बक्षीस नाही मिळालं तरी ते गाणं डोक्यात एकदम पक्कं झालं.
                                                                ३
याच Fest चा एक भाग म्हणून एक एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. सर्टिफिकेटचेच आमचे १४-१५ वर्ग होते. त्यामुळे तशी चांगली स्पर्धा होण्याची शक्यता होती. साधारण १५-२० मिनिटांचे नाटक जर्मन भाषेत सादर करणे अपेक्षित होते. आधी यात भाग घेऊ नये असं वाटत होतं. किती ठिकाणी (उगाचच) मिरवायचं असं वाटायचं. आधी आमच्या वर्गातून आणखी कोणीतरी नाटक लिहिणार होतं. पण ते कशामुळे माहित नाही वेळेत लिहिलं गेलं नाही. आम्हांला आमच्या पुस्तकाव्यतिरिक्त सरावासाठी काही उतारे मृण्मयी मॅडमनी दिले होते. त्यातले बरेचसे विनोदी होते. माझा एक गैरसमज होता की जर्मन लोकं खूप गंभीर असतात. त्यांना विनोदाचे वावडे असते. तो गैरसमज मोडीत काढणारे ते उतारे होते. त्यात भाषेतल्या गमतीजमती होत्या, त्यांच्या स्वभावावर मार्मिक टिपण्णी होती. नर्मविनोदी शैली होती. मला वाटतं जर्मन लोकांना गडगडाटी हास्याचे किंवा विनोदाचे वावडे असावे पण खुसखुशीत विनोदाला त्यांची ना नसावी ! तर अशा काही उताऱ्यांना जोडून, त्यात एक गोष्ट घालून एक कट-पेस्ट नाटक मी तयार केले. त्यातही continuity आणायला आणि नाटक जर्मन लोकांचे वाटावे या करता आणि अर्थातच व्याकरण आणि इतर गोष्टींसाठी मृण्मयी मॅडम यांनी खूप मदत केली. नाटकात  निसर्ग, विवेक, संजय मी हे तर होतोच पण त्याबरोबरच आदित्य, ऋजुता आणि सुप्रिया हे पण होते. ऋजुता जर्मन मध्ये बी ए करत होती आणि तिचे जर्मन उच्चार खूप छान होते. तिला नाटकात एक मोठे स्वगत होते. ते ती अगदी सहज म्हणत असे. सगळ्यात कमाल केली ती सुप्रियाने. खरं तर त्या लांब कल्याणीनगरहून येत. पण नियमित येत. घरचं दोन मुलांचं करून येत आणि उत्साहाने नाटकात सहभाग घेत. नाटक नवविवाहित जोडप्याच्या प्रेमळ समज-गैरसमजावर आधारित होतं. यात मुख्य भूमिका संजय आणि ऋजुता यांनी केली होती. नाटकात आम्ही काही क्लूप्त्या केल्या होत्या. त्यात कलाकारांचा curtain call होता  आणि Das Ende (The End) ची अक्षरं प्रत्येकाच्या हातात होती. नाटकात मध्येमध्ये मोझार्टचे पीसेस होते.एकूण नाटक जमून आलं असावं. बक्षीस मिळावं या साठी हा खटाटोप नव्हताच. नाटक लिहिण्यापासून ते बसवण्यापर्यंतची आणि सादर करण्यापर्यंतची प्रक्रिया खूप काही शिकवून गेली, आनंद देऊन गेली आणि जुन्या कॉलेजच्या दिवसांची आठवणही यामुळे झाली. नाटकासाठी आमच्या दोन्ही शिक्षिकांचे मार्गदर्शन आम्हांला उपयुक्त ठरले.   
नाटकाला पहिलं बक्षीस मिळालं. मग याचा प्रयोग बाल शिक्षण शाळेच्या ऑडीटोरीयम मध्ये जर्मन पाहुण्यांच्या उपस्थितीत झाला. तसं बघितलं तर हे सगळं खूपच छोटं होतं. आता विचार करता ते आणखी छोटं वाटतं. त्यात खरंच असं जग जिंकल्यासारखं काही नव्हतं. एवढंच होतं की आम्ही उत्साहाने हे सगळं केलं. याने अभ्यासक्रमाशिवाय भाषा कशी असते याचा एक छोटासा अंदाज बांधता आला. पण हे नाटक हा काही आमच्या शिकण्याचा परमोच्च क्षण होता का? कदाचित नाही… 
                                                                                                                                   (क्रमश:)

Monday, 29 February 2016

(जर्मन ) भाषा पहावी शिकून . . . (भाग २)


                                                               १
कुठलीही भाषा शिकण्यासाठी ती भाषा ऐकणे,बोलणे,वाचणे आणि लिहिणे असे चार घटक असतात. आणि या चारही घटकांसाठी चांगल्या दर्जाची साधनं उपलब्ध असतील तर ती भाषा शिकणं सोपं होऊ शकतं. मी काही काळ  जर्मन शिकत होतो त्या अनुभवातून म्हणू शकेन की जर्मन भाषेत अशी साधनं मुबलकपणे उपलब्ध आहेत.नवशिक्यांसाठी वेगळ्याप्रकारचं सुलभ साहित्य तर जशीजशी काठिण्य पातळी वाढत जाईल तसं वेगळ्या प्रकारचं साहित्य मिळतं. दृक-श्राव्य माध्यम तर आहेच पण बऱ्याच पुस्तकांबरोबर ऑडिओ सीडी मिळते, जी ऐकून त्यावर पुस्तकात प्रश्नही असतात. या सर्व पुस्तकांची  मांडणी अतिशय आकर्षक, कागद सुंदर आणि छपाई उत्कृष्ठ असते. जर्मन लोकं त्यांच्या भाषेवर खूप प्रेम करतात आणि तिचा प्रसार होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नही करतात. हेच आपल्या मराठीच्या बाबतीत म्हणता येईल का ? निदान माझ्या तरी अशी साधनं मराठीत आहेत असं पाहण्यात नाही. असो. हे थोडं विषयांतर झालं. 
Max Mueller Bhavan (MMB) आणि पुणे विद्यापीठाच्या जर्मन विभागाच्या शिकवण्याच्या पद्धतीत फरक आहे. MMB मध्ये जास्त भर जर्मनमध्ये बोलण्यावर आहे . 'तोडकं मोडकं, चुकत माकत का असेना पण तुम्ही बोला' असा तिथला दृष्टिकोन असतो. तर इथे 'आधी व्याकरण समजून घ्या, भाषेचा पाया पक्का करा  आणि मग ती बोला' असा विचार असतो. यापैकी कुठलं तरी एक चूक किंवा बरोबर असं काही नाही. आणि यावर मत मांडायचा मला अधिकार देखील नाही. एवढंच वाटतं की MMB मधून शिकलेले किंवा शिकणारे जर्मनचे विद्यार्थी हमखास ओळखू येतात. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा आत्मविश्वास असतो. मग भलेही ते चुकीचं बोलत असतील. तरीही ते  रेटून बोलतात. मला माझ्या शालेय जीवनाची या निमित्ताने प्रकर्षाने आठवण झाली. मी जरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलो असलो तरी आमच्या शाळेत मराठमोळं वातावरण होतं. आम्ही एकमेकांशी मराठीतच बोलत असू. त्यामुळे स्पोकन इंग्लिश मला खूपच उशिरा आलं. आणि त्यातही सुरुवातीला बोलताना ततपप होत असे. पण आजूबाजूची कॉन्व्हेंट शाळेत जाणारी मुलं 'फाड-फाड' इंग्लिश बोलत.त्यामुळे ती dashing वाटत.  पण त्यात काहीही बोलत - "Have you karofied your homework?" अशा प्रकारचं बोलत… खरंच ! 

                                                                २
                                                                
आठवडयातून तीन दिवस प्रत्येकी दोन-दोन तास (आमचा सकाळचा वर्ग होता) असा आमचा कोर्स होता. त्यापैकी एक लेक्चर ऋचा मॅडम घेत तर मृण्मयी मॅडम दोन घेत. दोघींमध्ये चांगलं सामंजस्य आणि समन्वय होता. त्यांची शिकवण्याची पध्दत थोडी वेगळी होती. मृण्मयी मॅडम कटाक्षाने जर्मन मध्ये बोलत तर ऋचा मॅडम सुरुवातीला आम्हांला जड जाऊ नये म्हणून इंग्रजीतूनही बोलत. अंकलिपी, मुळाक्षरांपासून आमचा भाषेचा प्रवास सुरु झाला. शिवाय जर्मन भाषेत गुड मॉर्निंग वगैरे हे ही शिकवलं गेलं. मग काही मूलभूत क्रियापदं शिकवली गेली.
तेव्हा असं जाणवलं की भाषा शिकवणाऱ्या शिक्षकाला इतर अनेक कलांचं अंग असणं गरजेचं आहे. विशेषत:नवशिक्यांना शिकवताना देहबोली, अभिनय,हेसुद्धा महत्त्वाचे ठरतात. आता हेच पहा ना- kommen (येणे) आणि gehen (जाणे) याचा अर्थ समजावून सांगताना मृण्मयी मॅडम यांनी वर्गाच्या आत आणि बाहेर असं आम्हांला करून दाखवलं. हे ही ठीक होतं. पण lachen (हसणे) आणि weinen (रडणे) हे ही दाखवलं. अगदी जसं लहान मूल रडताना डोळे चोळून रडतं तसं! नंतर हळूहळू क्रियापद चालवणे हा प्रकार सुरु झाला. कर्ता, कर्म, क्रियापद म्हणजे काय हे समजण्याची अशी मुळापासून सुरुवात झाली. पहिल्याच महिन्यात आमच्यासाठी एक Welcome Party होती. त्यावेळी आम्हांला प्रथमच डॉक्टर मंजिरी परांजपे, ज्या या सर्व अभ्यासक्रमांच्या समन्वयक होत्या, यांचं जर्मन मधून भाषण ऐकण्याची संधी मिळाली. कळलं अर्थातच काही नाही पण ऐकायला खूप छान वाटलं. कुठलाही कागद समोर न घेता त्यांनी घेतलेला मागील वर्षाचा आढावा (हे इंग्रजीत होतं) प्रभावित करून गेला. आमचे सर्व शिक्षक डॉक्टर परांजपे मॅडम यांच्याच मार्गदर्शनात शिकलेले होते. त्यामुळे सर्टिफिकेट पासून ते advance डिप्लोमा पर्यंत प्रत्येक शिक्षिका त्यांच्याविषयी नेहमीच आदराने बोलत. 
मला वाटतं की एखादी नवी भाषा शिकायची असेल तर ती नेहमीच एका ग्रुपमध्ये शिकावी. एकट्याने शिकली तर ती शिकवणी होईल. शिकणं होईल का हे सांगता येणार नाही. कारण ग्रुप मधल्या प्रत्येकाची विचाराची पद्धत वेगळी, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी, शब्दसंपदा वेगळी. या सगळ्याचा नक्कीच आपली भाषा सुधारण्यासाठी उपयोग होतो. शिवाय तसं बघितलं तर प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणात चुका करूनच शिकत असतो. आपण बोलताना किंवा लिहिताना चुकणार तर नाही ना याची एकदा भीती बाळगायचं सोडून दिलं की मग शिकणं सोपं होतं. आमच्या वयामुळे आमच्यावर हे दडपण जास्त होतं. पण माझा मित्र विवेक बरोबर असल्यामुळे हळूहळू माझीही भीड चेपली. त्याला कुठली शंका आली की तो नि:संकोच विचारत असे. आणि सर्वच शिक्षक कुठलाही कंटाळा न करता वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यांच्याच शंकांचं निरसन करत.लेक्चर्स मध्ये बऱ्याच वेळा धमाल असे. कधी गटा- गटात तर कधी जोडीदाराबरोबर राहून वेगवेगळ्या activities द्वारे शिकवलं जाई. हसत खेळत आम्ही शिकत होतो. या सगळ्यामुळे भाषा हळूहळू कळू लागली आणि आवडूही लागली.
                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                           (क्रमश:)

Friday, 26 February 2016

(जर्मन ) भाषा पहावी शिकून . . . (भाग १)



     
                           १
२०११ ते २०१४ या काळात माझा मित्र विवेक गोवंडे याने घेतलेल्या पुढाकाराने आणि दुसरा मित्र सदानंद चावरे याच्या बरोबरीने मी पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाचा जर्मन भाषेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.(सर्टिफिकेट कोर्स ते ऍडव्हान्स डिप्लोमा) पोटापाण्याची दैनंदिन कामं सांभाळून आम्ही हे केलं. या शिकण्याचा अर्थार्जनासाठी उपयोग करावा असं काही डोक्यात ठेवून आम्ही शिकलो नाही. अर्थात भाषांतराचं काम मिळालं असतं तर ते आम्ही केलंही असतं.पण ते मिळेल अशी काही आमची अपेक्षा नव्हती कारण या क्षेत्रात आम्ही तसे खूपच उशीरा आलो.म्हणजे माझ्या वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी मी जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली. त्यामुळे भाषांतर हा अगदीच नवीन व्यवसाय इतक्या उशीरा निवडणे (आधीचा सोडून) हे शक्यच  नव्हते. मला भाषा कितपत येते  हे मला या निमित्ताने तपासून घेता आले.(निष्कर्ष हाच निघाला की फार काही येत नाही !) तीन वर्षांचा हा काळ अतिशय आनंदात गेला. कितीतरी नवीन माणसं भेटली. परिचय झाला. काहींशी मैत्रीही झाली. मधल्या अनेक वर्षांच्या खंडानंतर कॉलेजची ती उत्फुल्ल धमाल पुन्हा अनुभवता आली. किंबहुना पदवीचं शिक्षण घेताना ज्या गोष्टी करता आल्या नव्हत्या त्या इथे करायला मिळाल्या.माझी स्वत:शी नव्याने ओळख झाली. भाषा शिकणं तर झालंच, त्याचबरोबर एका  नवीन संस्कृतीचा (नाट्य,साहित्य,संगीत,चित्रपट,खाद्य इ मधून) परिचय झाला. आपल्यापेक्षा वेगळ्या प्रदेशात, वेगळ्या वातावरणात, वेगळ्या परिस्थितीत राहणाऱ्या लोकांना थोडंसं समजून घेण्याचा एकूण अनुभव खरोखर समृद्ध करणारा होता. हा थ्रीलिंग प्रवास शब्दांकित करण्याचा हा छोटासा प्रयत्न. . . 

                                                                     २
सर्टिफिकेट कोर्सच्या प्रवेशासाठी दहावी पास असणं एवढी एकच पूर्व अट होती. तो काही प्रश्न नव्हता ! पण संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी तसं माझी दहावीची मार्कशीट शोधण्यापासून सुरुवात करावी लागली. दहावीच्या मार्कांचा पुढच्या आयुष्यात कधी उपयोग होऊ शकेल असं कधी वाटलंच नव्हतं.शेवटी कुठेतरी कोपऱ्यात जीर्ण अवस्थेत ती सापडली.Admission साठी कागदपत्र  दाखवताना केवळ दहावीचे मार्क कमी होते म्हणूनच नव्हे तर ती जवळजवळ फाटकी मार्कशीट होती म्हणूनही थोडीशी लाज वाटत होती. सुदैवाने माझे मार्क आड आले नाहीत. पण कौंटरवरच्या जमीर कांबळे सरांनी फ्रेंडली सूचना दिली- 'या मार्कलिस्ट ला laminate करा.' आता त्यांना कुठे सांगणार की माझी मार्कलिस्ट हा मागच्या शतकातला उत्खनन करून बाहेर काढलेला ऐतिहासिक दस्तऐवज आहे ! तर अशा रीतीने सर्टिफिकेट कोर्सला मला प्रवेश मिळाला आणि या प्रवासाची सुरुवात झाली. . . 

                                                                     ३

'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात मुन्ना मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला जातो आणि तो वर्गात शिरताच सगळे उभं राहून - Good Morning Sir ! असं म्हणतात. आपलीही तशीच अवस्था होऊ नये म्हणून पहिल्या दिवशी आम्ही तसे लवकरच वर्गात पोचलो. मुन्ना सारखं झालं नाही पण लवकर जाऊनही शेवटच्या रांगेत जागा मिळाली. आजूबाजूला फुल्ल कल्ला चालू होता. एकंदरीत उत्साहाचे वातावरण होतं. भाषेचा कोर्स असूनही मुलांची संख्या लक्षणीय होती. सगळे मिळून आम्ही ७०-८० जण तर सहज होतो. यथावकाश वर्गावर दोन मॅडम आल्या. आमच्या batch ला शिकवणाऱ्या- ऋचा फोंडगे आणि मृण्मयी शिवापूरकर. त्यापैकी ऋचा मॅडमच आमच्याशी बोलत होत्या. पहिलाच दिवस असल्यामुळे त्या इंग्लिश मध्ये बोलत होत्या. प्रत्येकाने आपले नाव आणि व्यवसाय सांगून आपली ओळख करून द्यावी असं त्यांनी सांगितलं. त्या ओळखींमधून कळत गेलं की या वर्गात केवढी विविधता होती ! कोणी इंजिनियर होतं तर कोणी डॉक्टर। कोणी नुकतंच दहावीतून अकरावीत गेलं होतं. कोणी आर्किटेक्ट होतं तर कोणी गृहिणी ! वयोगटही म्हणूनच वय वर्षे १६ ते ४२ असा होता.एकंदरीत वेगवेगळी पार्श्वभूमि असलेला आमचा वर्ग जर्मन भाषा शिकणार होता.आमच्यासारख्या बऱ्याच जणांचा  कुठलीही भाषा शिकण्याचा संबंध सुटूनही अनेक वर्षं लोटली होती.  बरं भाषा शिकण्याची कारणंही  वेगवेगळी होती. इंजिनियर लोकांना त्यांच्या कामासाठी उपयोग होईल म्हणून शिकायचं होतं… काही जणींना भाषांतरकार व्हायचं होतं तर काही फक्त एक छंद म्हणून शिकायला आले होते. सगळ्यांची जर्मन भाषेची शून्यापासून सुरुवात होती असंही नाही. कोणी जर्मन मध्ये बी.ए. करत होतं तर कोणी Max Mueller Bhavanचे आंतरराष्ट्रीय मान्यता असलेले कोर्स करत होतं. अशा इतक्या भिन्न प्रकृतीच्या आणि खूप कमी समान धागे असणाऱ्या लोकांना  भाषा आणि तीही परकीय भाषा शिकवणं हे खरोखरच अवघड काम असणार ! अर्थात तेव्हा ते तितकं जाणवलं नाही. आमच्यात समानता होती किंवा common ground होतं आमच्या अभ्यासक्रमासाठीचं पुस्तक- Moment Mal भाग १ (याचाच दुसरा भाग आम्हांला डिप्लोमासाठी होता) याच्याच आधारे आम्ही जर्मन शिकायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी शेवटच्या रांगेत बसल्यामुळे आजूबाजूला खूप गलका जाणवला होता. म्हणून ठरवलं होतं की यानंतर पुढेच बसायचं. नंतरच्या तासाला पहिली रांग रिकामीच होती. मग जणू अलिखित नियमच बनून गेला की आमच्या सारख्या ज्येष्ठ नागरिकांनी पुढेच बसायचं. आमचीही याला ना नव्हतीच ! पण याचं कारण मात्र आम्हांला वर्षाच्या शेवटच्या लेक्चरमध्ये समजलं. आम्ही पुढे बसल्यामुळे मॅडम आम्हांलाच प्रश्न विचारत. त्यामुळे मागे बसणाऱ्या मुलांसाठी आम्ही फुटबॉलमध्ये असते तशी संरक्षक भिंत होतो ! एकंदरीत तो दोन्ही बाजूंच्या सोयीचा मामला होता ! 
                                                                                                                    (क्रमश:)

Friday, 15 January 2016

पुकारता चला हू मैं ….

आज,१६ जानेवारी, संगीतकार ओ  पी नय्यर यांची जयंती (जन्म-१९२६) त्यानिमित्त हे लिखाण...

                                  -१-
क्वचितच असं होतं की एखाद्या संगीतकाराच्या कारकीर्दीवरून त्याच्या स्वभावाचा, खरं तर  त्याच्या अटिट्यूडचा अंदाज येतो. 
ओ  पी नय्यर हे यापैकीच! तुम्हांला पुरावेच हवे आहेत का? तर हेच बघा ना...
१) कुठल्या कारणासाठी का असेना पण शेवटपर्यंत एकदाही लता मंगेशकर ओ  पी कडे गायल्या नाहीत. त्यांनी लता शिवायही यशस्वी संगीतकार होऊन दाखवलं.
२) लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारही त्यांनी नाकारला. कारण त्यांचं मत होतं की संगीतकार गायकाला मोठं बनवतो. म्हणून संगीतकार श्रेष्ठ! गायक नव्हे ! गायकाच्या नावाचा पुरस्कार त्यामुळेच त्यांनी नाकारला.
३) एका गाण्याच्या रिहर्सलला रफी उशीरा गेला म्हणून ओ  पी त्याच्याशी भांडले आणि त्यामुळे रफी काही काळ त्यांच्याकडे गात नव्हता. रफीने त्यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितली. त्यानंतरच तो पुन्हा त्यांच्याकडे गायला. यात मध्ये फक्त पाच वर्षे गेली!
२) तेव्हाचा आघाडीचा कवी साहिर ओ  पी ला एकदा म्हणाला - "माझ्यामुळे एस डी बर्मन मोठे झाले. नाहीतर त्याआधी ते कोण होते?"
ओ  पी आणि साहिर यांनी त्या आधी 'नया दौर', 'सोने की चिडिया' या सारखे गाजलेले चित्रपट केले होते. पण हे ऐकल्यानंतर ओ पी नी साहिर बरोबर कधीच काम करायचं नाही असं ठरवलं. त्यांच्याबद्दलही साहिर असंच बोलेल असं त्यांना वाटलं असावं. 'तुमसा नहीं देखा' आणि '12 O' Clock' या सिनेमांतून त्यांनी साहिरला बाहेर काढायला लावलं . 
वरील उदाहरणांवरून लक्षात येईल की आपलं सांगीतिक करिअर पणाला लावून त्यांनी त्यांच्या स्वत्वाला जास्त महत्त्व दिलं. त्याची त्यांनी जबरदस्त किंमतही  मोजली. हे अगदी self- destructive होतं. पण ते नेहमीच आपल्या terms वर जगले. म्हणूनच ते एक 
अटिट्यूडवाले संगीतकार होते.

                                                                      -२-
 'टांगा ठेक्याची गाणी देणारा संगीतकार' असा एक उगीचच नकारात्मक शिक्का ओ  पी नय्यर यांच्यावर बसवण्यात आला आहे. तसं बघितलं तर या ठेक्याची त्यांची ही काही  प्रसिद्ध गाणी आहेत-
१) मांग के साथ तुम्हारा- नया दौर
२) पिया पिया पिया मोरा जिया पुकारे- बाप रे बाप
३) होले होले साजना धीरे धीरे बालमा- सावन की घटा
या पेक्षा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची गाणी ओ  पी नी दिली. त्यांनी पंजाबी ढंग आणि पाश्चिमात्य संगीत याचा सुंदर मिलाफ केला. उडत्या चालीची गाणी तर दिलीच पण शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलेले नसताना देखील शास्त्रीय रागांवर आधारित अनेक गाणी दिली. नाइट क्लबची sensuous गाणी दिली तशीच अनेक विनोदी गाणी दिली. Rhythm King असा लौकिक असणाऱ्या या संगीतकारानं काही संथ आणि ठहराव असलेलीही गाणी दिली, ज्यात काही वेळा ठेका असून नसल्यासारखाच वाटतो.
ओ  पीच्या या वैशिष्ट्यांचा धावता आढावा-

                                                                       -३-
  ओ  पी च्या गाण्यात वापरण्यात आलेली काही वाद्ये आणि ती गाणी-
१) हार्मोनियम -
लेके पहला पहला प्यार - CID
https://www.youtube.com/watch?v=vVmShhhiPPI
कजरा मोहब्बतवाला- किस्मत
बहुत शुक्रिया बडी मेहरबानी 
२) मेंडोलिन + सारंगी-
कहीं पे निगाहें- CID
३) सरोद + सारंगी-
आप यूंही अगर हमसे मिलते रहे- एक मुसाफिर एक हसीना
४) सॅक्सोफोन-
है दुनिया उसीकी जमाना उसीका- काश्मीर की कली
५) क्लॅरिनेट+ बासरी-
बूझ मेरा क्या नाम रे- CID
६) संतूर-
जाईए आप कहाँ जायेंगे- मेरे सनम
ये चाँद सा रोशन चेहरा - काश्मीर की कली
७) गिटार-
पुकारता चला हूँ मैं -मेरे सनम 
८) Castanets-
आईए मेहरबान- हावडा ब्रिज
९) बीन-
एक परदेसी मेरा दिल ले- फागुन
१०) पियानो-
आपके हसीन रूखपे- बहारें फिर भी आयेंगी 

                                                                             -४-
ओ  पी नय्यर यांची शास्त्रीय संगीतावर आधारित काही गाणी -
१) तू है मेरा प्रेमदेवता- कल्पना - राग ललत
https://www.youtube.com/watch?v=p0y61M6nOe0
२) छोटासा बालमा- रागिणी-राग तिलंग
३) बेकसी हद से जब गुजर- कल्पना- राग देस
४) इन्साफ का मंदिर है ये- नया दौर- राग भैरवी
५) रातभर का है मेहमान अंधेरा- सोने की चिडिया- राग जोगिया
६) इशारों इशारों में - काश्मीर की कली- राग पहाडी
७) जाईए आप कहाँ जायेंगे - मेरे सनम- राग पिलू 
https://www.youtube.com/watch?v=wu8PNqsMsTM
८) पुकारता चला हूँ मैं- मेरे सनम- राग किरवानी
९) आना है तो आ - नया दौर- मिश्र बसंत
१०) आपके हसीन रूख पे- बहारें फिर भी आयेंगी- राग यमन

                                                                              -५-

आणि जाता जाता ही ठहराव असलेली ओ  पीची काही गाणी-
१) प्रीतम आन मिलो- Mr.& Mrs. 55- गीता दत्त (तसेच सी. एच. आत्मा)हे गाणं ओ पी यांच्या पत्नी सरोज नय्यर यांनी लिहिलंय. याचं गैरफिल्मी version सी. एच. आत्मा यांनी गायलं होतं. नंतर हे गाणं सिनेमात घेतलं गेलं.

२) प्यार पर बस तो नहीं है- सोने की चिडिया- तलत मेहमूद- आशा
प्रेमात पडलेल्या माणसाची संभ्रमावस्था, त्याच्या जीवाची तगमग, त्याची हुरहूर साहिरने शब्दांत अचूक पकडली आहे. तलतचा मखमली आणि काहीसा कापरा आवाज ही अवस्था छान व्यक्त करतो. कमीत कमी वाद्यं गाण्याचा गहिरेपणा वाढवतात. यात आशाला केवळ आलापी आहे, एकही शब्द नाही. पण त्यातून तिनं एक आश्वासकता व्यक्त केली आहे. एक परिपूर्ण गाणं ! 

३) आपके हसीन रूख पे - बहारें फिर भी आयेंगी - रफी
ही एक गझल आहे आणि रफीने अशाप्रकारे गायलीय की समजून यावं की गाणं धर्मेंद्र वर चित्रित करण्यात आलंय.
४) चैन से हमको कभी- प्राण जाए पर वचन न जाए - आशा

हे आशा - ओ  पी यांचं शेवटचं गाणं ठरावं हे किती prophetic आहे! यानंतर ओ  पी यांची कारकीर्द जवळपास संपली. आशाची जागा दुसऱ्या कुठल्याच गायिका घेऊ शकल्या नाहीत. या गाण्यातली बासरी लाजवाब आहेच शिवाय गाण्याबरोबर व्हायोलिन वाजताना ऐकू येते. त्याने sadness मध्ये भरच पडते. या गाण्यात तालवाद्य तसं कुठलंच नाही. Steel triangle याचाच ठेका आहे. Rhythm King असलेल्या नय्यर यांचा हा rhythm चा (न) वापर उठून दिसतो.

Wednesday, 2 December 2015

पर्याय २०१५ : होमिओपॅथच्या ‘कॅमेर्‍या’तून : नाट्य-सिनेमातील व्यक्तिरेखा

(पर्यायचा  या वर्षीचा विषय आहे -' नाती-गोती आणि होमिओपॅथी'. या अंकातला हा माझा एक लेख)

होमिओपॅथी ही केवळ एक उपचार पद्धतीच नाही, तर ती एक जीवनशैलीही आहे. आणि तिचा अंगीकार पेशंट आणि होमिओपॅथीचे डॉक्टर दैनंदिन आयुष्यात करत असतात. होमिओपॅथीच्या डॉक्टरांबद्दल तर असं म्हणता येईल की दवाखान्यात पेशंट बघणं झाल्यावरही होमिओपॅथी त्यांची साथ करतच असते, अगदी सगळीकडे! मग डॉक्टर कुठे सणा-समारंभांना गेले तर तिथेही भेटणार्‍या आणि केवळ दिसणार्‍याही लोकांचं निरीक्षण करणं आणि त्यांच्या डॉक्टरांना वाटणार्‍या स्वभाव-वैशिष्ट्यांचा विचार करणंही चालू राहतं. आजूबाजूच्या लोकांची देहबोली, त्यांची बोलण्याची लकब, त्यातील बारकावे, जे बोललं जातं त्याचा मतितार्थ, शब्दांच्या पलीकडले शब्द या सगळ्यांबद्दल डॉक्टर जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. कालांतराने या गोष्टी आपसूक होत असतात. मुद्दाम बेअरिंग घेऊन काही करावं लागतं नाही. होमिओपॅथी हे पुष्कळसं माणसं वाचण्याचं आणि समजण्याचं शास्त्र आहे. माणूस (पेशंट) कसा आहे, त्याच्या आयुष्यात कुठे ताण-तणाव आहेत, त्यांतून जात असताना त्याच्या काय reactions येतात? यामधून त्याचा स्वभाव कसा दिसतो? अशा स्वभावाची एक totality उभी करून तसेच त्या व्यक्तीचे शारीरिक गुणधर्म, त्याच्या तक्रारींचा एकत्रित विचार करून पेशंटला एक constitutional औषध देण्यात येते. जशा व्यक्ती तितक्या  प्रकृती असतात, त्याप्रमाणेच होमिओपॅथीच्या औषधांच्याही प्रकृती असतात. म्हणजेच पेशंटच्या स्वभाव गुणधर्माशी साधर्म्य असणारी औषधंही असतात. या दोन्हीमधली समानता शोधणे हे होमिओपॅथीच्या डॉक्टरचं मुख्य काम असतं. दोन्हीमधली समानता जेवढी जास्त, तेवढं औषध जास्त अचूक! म्हणूनच डॉक्टरसाठी होमिओपॅथीच्या औषधांची लक्षणं, त्यातील बारीक बारीक माहिती हे तर आवश्यक असतंच, पण त्याबरोबरच लोक जगत असलेल्या आयुष्याबद्दल, त्यातील प्रसंग आणि त्यामधून दिसणार्‍या लोकांच्या स्वभावाबद्दलही आस्था असणं, त्यावर त्याने विचार करणं हेही महत्त्वाचं असतं. त्यासाठी होमिओपॅथीच्या डॉक्टरने संवेदनशील असणं, निरीक्षक असणं आणि खुल्या मनानं विचार करणं अपेक्षित असतं.
या सगळ्याचं प्रशिक्षण डॉक्टरला होमिओपॅथिक कॉलेजमध्ये मिळणं दुरापास्त असतं. त्याची स्वत:ची जडणघडण, त्याचे संस्कार, त्याची विचारसरणी आणि त्यावर होमिओपॅथीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने केलेले पुनरावलोकन म्हणूनच महत्त्वाचे ठरते. नाटक-कथा-कादंबर्‍या-चित्रपट इत्यादी विविध कलाकृतींही संवेदनशीलतेला पूरक ठरू शकतात. कारण शेवटी या प्रत्येकात व्यक्तिरेखांचं आणि त्यांच्या नातेसंबंधांचं चित्रण असतं. ते समजून त्यातील अनुभवांवर विचार करून होमिओपॅथीच्या डॉक्टरला स्वत:ची विचारसरणी समृद्ध करण्याची संधी मिळते.
प्रस्तुत लेखात अशाच काही कलाकृतींचा होमिओपॅथीच्या अंगाने विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. यात रंजनाचा भाग आहेच पण त्यातून होमिओपॅथीच्या औषधांचा विचार कसा केला जाऊ शकतो हेही सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ज्या कलाकृतींचा इथे विचार करण्यात आला आहे त्या सर्व तुमच्या-आमच्या परिचयाच्या आहेत. बहुतांश लोकांनी त्या पाहिल्याही असतील आणि त्या त्यांच्या लक्षातही असतील. मात्र त्यावर होमिओपॅथीच्या दृष्टीने कसा विचार केला जाऊ शकतो, त्या व्यक्तिरेखा होमिओपॅथीच्या कुठल्या औषधांशी मिळत्या-जुळत्या असू शकतात हे एक वेगळे परिमाण त्या कलाकृतींना लावल्यामुळे अशी आशा आहे की सर्वसामान्य वाचकांच्या आस्वादात भरच पडेल आणि त्यामुळे या कलाकृतींचा ते नव्याने विचार करू लागतील.

सर्वप्रथम विचार करावासा वाटतो एका नाटकाचा! महेश एलकुंचवार लिखित वाडा चिरेबंदीचा! या नाटकाचा पहिला प्रयोग 1985 साली झाला. स्वातंत्र्योत्तर काळातील विदर्भातल्या एका गावातल्या देशपांडे कुटुंबाची गोष्ट हा नाटकाचा विषय आहे. जसं बडा घर पोकळ वासेअसं म्हणतात तसंच या देशपांडे कुटुंबाचंही आहे. वाडा मोठा आहे पण renovation करण्याची गरज असली तरी ते करण्याजोगी आर्थिक परिस्थिती देशपांडे कुटुंबाची नाही. शेतजमीन कुळ कायद्यात गेलेली आहे. कुटुंबप्रमुख तात्या यांचं निधन झालं आहे आणि तिथून नाटकाची सुरुवात होते. कुटुंबाने कोणे एके काळी वैभव अनुभवलेलं आहे. आता त्या प्रतिष्ठेला काळ बदलला आणि आर्थिक दुरवस्था झाली तरी, जगण्याचा, जपण्याचा पोकळ प्रयत्न थोरला मुलगा भास्कर करतोय. नाटक वरवर पाहता या कुटुंबाभोवती फिरत असलं तर त्यात इतर अनेक पैलू आहेत. काही पात्रांच्या बोलण्यातून ते थेट येतात, काही त्यांच्या कृतीतून दिसतात तर काही अप्रत्यक्षपणे सूचित केलेले आहेत. तात्यांचा दुसरा मुलगा (सुधीर) मुंबईत नोकरी करतोय. विदर्भातल्या लोकांना मुंबईबद्दल वाटणारी असूया आणि तरीही मुंबई या मायानगरीचे आकर्षण, शहरी आणि ग्रामीण जीवनशैलीतील फरक, नोकरी करणार्‍यांना आर्थिक तणाव नसतात हा ग्रामीण लोकांचा (गैर)समज, टी.व्ही./सिनेमा या माध्यमांचा खेडोपाड्यांतील लोकांवरही असणारा प्रभाव असे अनेक पदर नाटकातून उलगडताना दिसतात. लेखकाने 70-80च्या दशकातल्या बदलत्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक स्थितीवर  उत्तम भाष्य नाटकातून केले आहे.

देशपांड्यांचा वाडा हा जसं गतवैभवाचा साक्षीदार आहेतसंच तो आता कालानुरूप बदल न केलेल्या आणि जुन्यामूल्यांना कवटाळून बसणार्‍या देशपांडे कुटुंबाच्या स्वभावाचंही प्रतीक आहे. देशपांडे कुटुंबात सर्वसाधारण कुटुंबामध्ये असतात तसेच वाद-विवाद आहेतपितृसत्ताक पद्धती आहे आणि त्यामुळेच पुरुषी वर्चस्वही आहे. तात्या गेल्यानंतर सत्तांतर होऊन भास्करकडे सत्ता आणि घराच्या तिजोरीच्या चाव्याही येतात. वडील गेल्यानंतर मुलांमध्ये संपत्तीच्या वाटण्या होणं आणि त्याची चर्चा होणं हे तसं स्वाभाविकच. यात काही वेळा एकमेकांची उणीदुणीही काढली जातात. तसं ते इथेही होतं. हे सगळं जरी असलं तरी जेव्हा कुटुंबावर कठीण प्रसंग येतो तेव्हा हे सगळं कुटुंब एकत्र होतंहेही तितकच खरं. अशावेळी वैयक्तिक त्रासस्वार्थ बाजूला ठेऊन प्रसंगोचित वागणारी ही माणसं एकत्र कुटुंबाची पडझड होत असतानाही एकमेकांना धरून ठेवणारी वाटतात.
देशपांड्यांच्या या वाड्याचं आणखी एक वैशिष्टय आहे. इथल्या अंधार्‍या खोल्यांमध्ये स्त्रियांची दु:खं  कोंडलेली आहेत. नाटकात स्त्रियांच्या चार पिढ्या आहेत. तात्यांची आई-दादी! यांना स्थळ-काळाचं भानच नाही. दुसरी स्त्री म्हणजे तात्यांची बायको - आई. तात्या जोवर होते तोवर आईचं एक वेगळ स्थान असतं. पण ते गेल्याक्षणी तिची रवानगी माजघरात होते. तिच्या हातून घराची सत्ता निघून जाते आणि ती एकदम परावलंबी होते. तात्यांची सून-वहिनी या बरंच काळ तात्या-आई यांच्या सत्तेपुढे नमतं घेत राहिल्या आहेत. पण आता अचानक तिजोरीच्या चाव्या हाती आल्यामुळे त्यांचं स्थान वधारलं आहे. पण इतका काळ त्यांच्या स्वत:च्या इच्छा-आकांक्षा मनातच राहिल्या आहेत. तशीच काहीशी गत भास्करचीही आहे. म्हणूनच तो त्याच्या बायकोला म्हणजेच वहिनीला सुतक असूनही दागिने घालायला सांगतो. ती एक-एक दागिना घालत असताना त्याचं वजन आणि वर्णनही करत जातो. मात्र वहिनी दागिन्यांत मढल्यानंतरही काहीशा अलिप्त, गंभीर आहेत. त्यांना आनंदापेक्षा जास्त आहे तो एक प्रकारचा भारावलेपणा! कारण त्यांच्या सासूबाईनी त्यांना त्या घरात आल्यानंतर या पिढ्यानपिढ्या  वैभवाबद्दल सांगितलं होतं आणि ते आज त्या स्वत: ल्यालेल्या आहेत. आई आणि वहिनी यांच्या स्वला घुसमटून, मन मारून जगण्याच्या स्वभावावरून त्यांचं होमिओपॅथीमधलं मॅग्नेशियम ग्रुपच्या औषधांशी साम्य वाटतं. इथं जाणवतं ते भावनांचं दमन आणि वहिनींना एक संधी मिळताच त्यांचा भावनावेगच सांगतो की त्यांनी किती भावना दाबून टाकल्या आहेत.
वहिनींच्याच पिढीतली, तात्यांची मुलगी प्रभा ही नाटकातील आणखी एक व्यक्तिरेखा आहे. भावंडामधली ती एकटी मुलगी असली तरी तिच्यावर अन्याय झाला आहे. मॅट्रिकनंतर तिला पुढे डॉक्टर व्हायचं होतं पण तात्यांनी परवानगी न दिल्यामुळे ते राहून गेलेलं आहे. शिवाय तिचं लग्नही होत नाही. तिच्या या इच्छा पूर्ण झालेल्या नाहीत. पण त्याचा राग ती वेळोवेळी अगदी फणकार्‍याने व्यक्त करते. तिच्या स्थितीला ती वडिलांइतकीच भावांनाही दोष देते. वडील गेल्यामुळे तिला फारसं काही दु:ख झालेलं नाही, हे ती स्वत:च सांगते. एवढंच नव्हे तर मुंबईहून सुधीरने तिने सांगितलेली पुस्तके आणली की नाही हेही विचारते. तिचे वहिनीबरोबरही खटके उडतात. तिला जे वाटतं ते ती बोलून मोकळी होते. शिवाय प्रभाच्या मनात तिच्या आईबद्दल खूप ओढ आणि हळवेपणा आहे. तिच्या वाटचं सोनं मिळाल्यावर ते विकून तिला अमरावतीला शिकायला जायचंय. तिथे आईलाही न्यायची तिची इच्छा आहे. वडिलांच्या पश्‍चात भास्कर आईला नीट सांभाळणार नाही असं तिला वाटतं. प्रभाचा हा मोकळा-ढाकळा स्वभाव, मनात आणि त्याचबरोबर एखाद्या नात्याबद्दल अतीव ओढ वाटणं हे होमिओपॅथीमधल्या काली ग्रुपशी मिळतजुळतं चित्र आहे.
नाटकात आणखी एक व्यक्तिरेखा आहे, जी म्हणजे भास्कर आणि वहिनी यांची मुलगी रंजू! अभ्यासात यथातथाच आहे. दहावीची परीक्षा दोनदा देऊनही उत्तीर्ण झालेली नाही. तिच्यासाठी एका मास्तरांची शिकवणी लावण्यात आली आहे. पण रंजूचं लक्ष अभ्यासाऐवजी रेडिओ, सिनेमा असल्या गोष्टीत आहे. तिला सिनेमात कामही करायचं आहे जे अर्थातच देशपांडे कुटुंबाला साजेसं नाही. या रंजूमुळे नाटकात नाट्य निर्माण होतं. देशपांडे कुटुंबाचे सर्व दागिने वहिनींनी एका डब्यात ठेवलेले असतात. तो डबा देवापुढे ठेवलेला असतो. दुसर्‍या दिवशी त्यांची वाटणी होणार असते. पण दुसर्‍या दिवशी हेच दागिने घेऊन रंजू त्या मास्तरांबरोबर पळून जाते. ती सुधीरला मुंबईला सापडते पण दागिने आणि तो मास्तर हाती लागत नाहीत. रंजूच्या आधीच्या पिढ्यांमधील सर्वच स्त्रियांनी आपलं मन मोडून इच्छा मारून आयुष्य काढलेलं आहे. पण रंजू तशी नाही. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती घरातील दागिने पळवते. घरातल्यांची कोणत्याच बाबतीत फिकीर करत नाही. आपल्या मनातील सणकेवर स्वार होऊन, मागचा पुढचा विचार न करता ती कृती करते. मास्तर आणि तिचे प्रेम असते हेही नाटकात सूचित करण्यात आलेले आहे. अल्लड वयातल्या या प्रेमाचं भवितव्य तसं काहीच नाही. तरीही ती बंडखोरी करून हे सर्व करते. एकप्रकारे ती घरच्या वर्चस्वाला, प्रस्थापित कुटुंब व्यवस्थेला आव्हानच देते. तर अशी भावनाप्रधान, सणकी, बंडखोर व्यक्तिरेखा होमिओपॅथीमधल्या नॅट्रम मूर या औषधाशी साम्य असणारी आहे.

मनातल्या भावना मनातच राहणं, त्या कुठेही व्यक्त करता न येणं आणि त्यामुळे मनाचा कोंडमारा होणं हे पुष्कळ हिंदी सिनेमातील व्यक्तीरेखांमध्येही दिसतं. यातूनच मॅग्नेशियम आणि नॅट्रम या दोन ग्रुपमधील होमिओपॅथीच्या औषधांत अक्षरश: स्पर्धा असल्याचं जाणवत. काहीवेळा या दोन औषधांमधल्या सीमारेषा धूसर वाटतात तर काहीवेळा असं वाटतं की जणू एखाद्या कसलेल्या होमिओपॅथनेच एखादा सिनेमा काढून त्या औषधांची totality व्यक्तिरेखांमार्फत उभी केली आहे. आठवायला गेलं तर कितीतरी सिनेमे आणि व्यक्तिरेखा आठवता येतील. आणि प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे (आणि होमिओपॅथीच्या अभ्यासाप्रमाणे देखील!) हे बदलू शकेल. त्यामुळे हे सगळं व्यक्तीसापेक्ष आहे हे मान्य करूनच पुढे जाणं श्रेयस्कर!

सर्वप्रथम विचार करावासा वाटतो हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट अनुराधाचा! 1960 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची गोष्ट आहे अनुराधा राय (अभिनेत्री लीला नायडू) व तिचे पती डॉ. निर्मल चौधरी (अभिनेता बलराज साहनी) यांची! अनुराधा एक सुप्रसिद्ध गायिका आहे आणि नृत्यांगनाही! कर्मधर्मसंयोगाने तिची निर्मलबरोबर भेट होते, तो तिच्या भावाचा मित्र असतो हेही कळतं आणि तिच्या नृत्याच्या कार्यक्रमानंतर पाय मुरगळल्यावर उपचार करायला निर्मलच येतो. यातून दोघांचं प्रेम जुळतं. तो तिच्या आवाजावर फिदा असतो. अनुराधाचं लग्न तिच्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी, दीपकशी ठरवायचा घाट तिचे वडील घालतात. ही गोष्ट ती निर्मलला सांगते. तेव्हा निर्मल त्याची पार्श्‍वभूमी तिला सांगतो. तो डॉक्टर होण्यामागे कारण असते त्याच्या आईच्या मृत्यूच्या वेळेची परिस्थिती! खेडेगावात असल्यामुळे उपचार न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू होतो. म्हणून निर्मल डॉक्टर होऊन खेड्यात राहून प्रॅटिस करण्याचं ध्येय बाळगून असतो. तर अनुराधा एका श्रीमंत घरची मुलगी! निर्मलशी लग्न केलं तर शहरातून खेड्यात आणि तेही कष्टाचं जीवन जगावं लागणार याची तिला कल्पना असते. शिवाय गाण्याचं करिअरही मागे पडणार हेही तिला माहित असतं. दीपकही तिच्या आवाजाचा फॅन असतो. दीपकशी लग्न केलं असतं तर ती संगीताला प्राधान्य देऊ शकली असती. पण अनुराधा असं करत नाही कारण तीही निर्मलच्या प्रेमात बुडालेली असते. याच प्रेमापायी ती वडिलांशी वाद घालते आणि त्यांना तिचा निर्णय न पटल्यामुळे बंड करून वडिलांच्या इच्छेविरूद्ध निर्मलशी लग्न करते. स्वत:च करिअर बाजूला सारून भावनेला प्राधान्य देते.
लग्नानंतर मात्र चित्र बदलतं. अनुराधाची भूमिका फक्त घर सांभाळणं, त्यांच्या मुलीकडे बघणं आणि निर्मलची सेवा करणं एवढीच उरते. कारण निर्मल संपूर्णपणे झोकून देऊन गावात practice करतो. त्याचा आदर्शवादी दृष्टिकोन असल्यामुळे पेशंटच्या घरी जाणे, वेळी-अवेळी काम करणे, घरी आल्यावर देखील अभ्यास करणे असा त्याचा दिनक्रम असतो. या सगळ्यांत त्याला अनुराधाकडे लक्ष द्यायला वेळ होत नाही. तिच्या साध्या साध्या इच्छाही तो पुर्‍या करू शकत नाही. अर्थात जाणूनबुजून नाही तर कामात बुडाल्यामुळे. या सगळ्यांत अनुराधाचं संगीतही मागे पडतं. किंबहुना ती संगीताची ऊर्मी जवळजवळ दाबून टाकते. परंतु खर्‍या कलाकाराची ऊर्मी, कलेप्रतीची ओढ पूर्ण दाबणं केवळ अशय! योगायोगानं अनुराधाची भेट दीपकबरोबर होते आणि त्याच्यासमोर ती गाणं म्हणते -
अनुराधा

कैसे दिन बीते, कैसे बीती रतिया, पिया जाने ना...
आणि त्यातच पुढे
ऋत मतवाली आके चली जाए, मन में ही मेरे मन की रही जाए, खिलने को तरसे नन्हीं नन्हीं कलियाँ...
https://www.youtube.com/watch?v=OzNcKTcZoHw
या सगळ्यांतून दीपकला तिच्या मन:स्थितीचा अंदाज येतो. तो तिच्यातील संगीताविषयीचं सुप्त प्रेम जागं करतो. ती त्याच्याबरोबर जायला तयारही होते. पण नंतरच्या प्रसंगातून तिला आपल्या नवर्‍याच्या कर्तृत्वाची आणि निर्मलला आपल्या पत्नीच्या त्याग, साधना आणि तपस्येची जाणीव होते. शेवट अर्थातच गोड होतो. या सिनेमात एकीकडे भावनाप्रधान, भावनेच्या भरात प्रसंगी बंडही करणारी आणि प्रवाहात वाहून जाणारी, सर्वस्व अर्पण करणारी अनुराधा दुसरीकडे आपलं स्वत्व किंवा प्राण असलेल्या संगीताला जाणूनबुजून suppress करते. तिचं हे व्यक्तिमत्व होमिओपॅथीमधल्या नॅट्रम मूर या औषधाच्या जवळ जाणारं आहे. तर डॉ. निर्मल हा मूल्यांना जपणारा, तत्त्वनिष्ठ, आदर्शवादी आहे. त्याचं बायकोवर प्रेम आहे पण त्याचं प्राधान्य त्याचं काम हेच आहे. या त्याच्या स्वभावाशी होमिओपॅथीमध्ये मिळतंजुळती औषधं म्हणजे सिलिशिया किंवा लायकोपोडियम!

एखाद्या कलाकारातल्या कलेची घुसमट झाली तर काही काळाने तो कलाकार अस्वस्थ होतो. ती कलाच त्या व्यक्तीला स्वस्थ बसू देत नाही. अशीच तगमग दाखवणारा आणखी एक चित्रपट होता 1965 चा विजय आनंद दिग्दर्शित गाईड’. यात रोझी (वहिदा रहमान) ही नृत्यांगना आहे. पण तिचा archaeologist पती मार्को (किशोर साहू) हा सतत त्या गुहा-गुफांच्या संशोधनात दंग आहे. त्याला रोझीने नृत्य केलेले आवडतही नाही. ते अशीच कुठली गुहा बघायला एका गावी येतात जिथे राजू (देव आनंद) त्यांचा गाईड असतो. या गाईडच्या सहवासात रोझीला तिचं हरवलेलं नृत्य परत मिळतं. राजू आधी तिचा फक्त पर्यटनातला गाईड बनतो. 
गाईड
नंतर तिला सखा/मित्र बनतो. त्या भावनिक सामर्थ्याच्या जोरावर रोझीला तिचं हरवलेलं नृत्य पुन्हा सापडतं आणि यातून आलेल्या आत्मविश्‍वासाच्या बळावर ती  पतीचं घर सोडून राजूकडे राहायला येते. हा रोझीचा सर्व प्रवास पुन्हा एकदा नॅट्रम या होमिओपॅथीच्या औषधाच्या जवळ जाणारा वाटतो.

खरं तर काही वेळा असं वाटतं की हिंदी सिनेमात नॅट्रम गु्रुपचा विचार वेगवेगळ्या बाजूंनी करण्यात आला आहे. पराकोटीची भावनाशीलता, कोणतेही निर्णय भावनेच्या भरात घेणं हे नॅट्रमच्या व्यक्तिमत्त्वात असू शकतं तसंच धुमसत राहणारं, मनात धग, अंगार बाळगणारं! प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध बंड करणारं किंवा कुटुंबातील सत्ताकेंद्राशी (बहुतांशी वडील) न पटणारं! त्या व्यक्तीबद्दल पराकोटीचा राग बाळगणं आणि काही वेळा या रागाचं रूपांतर सूड घेण्यात करणं! या सगळ्यांत कारणीभूत असते ती लहानपणीची परिस्थिती. नाजूक वयात कोवळ्या मनावर उमटलेले ओरखडे तसेच राहतात. हे unresolved childhood पुढे या व्यक्तिच्या नातेसंबंधात बाधा आणतं. नॅट्रमचा हाही एक पैलू आहे. अमिताभ बच्चन यांनी दीवार’, ‘काला पत्थर’, ‘त्रिशूल’, ‘शक्तीया चारही सिनेमांमध्ये विजय नावाचं कॅरेक्टर केलं आहे. ही सगळी वेगवेगळ्या अर्थाने नॅट्रमचीच रूपं! दीवारमध्ये विजय स्मगलर होण्याला कारणीभूत असते त्याची लहानपणीची परिस्थिती! कामगारांच्या न्याय्य हकांसाठी लढणार्‍या त्याच्या वडिलांवर बालंट आल्यामुळे शरमेपोटी शहर सोडून जायची वेळ येते. संतप्त कामगार आणि त्यांची मुलं विजयच्या हातावर मेरा बाप चोर हैहे गोंदतात. वडील निघून गेल्यामुळे अचानक आलेल्या गरिबीशी सामना करत करत विजय वाईट मार्गाला लागतो. तर त्रिशूलमध्ये वडिलांच्या विरूद्ध सूड घेण्याची बीजं विजयची आईच त्याच्यामध्ये पेरते. वडिलांनी तिच्याशी केलेल्या प्रतारणेचा सूड तिचा मुलगा विजय पुरेपूर घेतो. इथे सूड घेण्याची भावनाही रागाचा परमोच्च बिंदू गाठते. दीवारआणि त्रिशूलया दोन्ही सिनेमांमध्ये विजयला लौकिक अर्थाने वडिलांचा फारसा सहवास नाही; अनुभवही नाही. पण तरीही राग आहे आणि त्याचवेळी त्याच्या मनात आईबद्दल प्रचंड हळवेपणा आहे. दीवारमध्ये आई आजारी आहे असं समजल्यावर आपला जीव धोक्यात घालूनही तो तिला भेटायला जातो.
शक्ती’ (दिग्दर्शक रमेश सिप्पी) या सिनेमात याच रागाचा, दबलेल्या अंगाराचा थेट सामना होतो तो कर्तव्यनिष्ठेशी! एकीकडे लहानपणी घडलेल्या एक प्रसंगामुळे पूर्ण आयुष्य डोयात राग घेऊन जगणारा विजय तर दुसरीकडे त्याचप्रसंगी एक पोलिस ऑफिसर म्हणून आपले कर्तव्य पार पाडणारे त्याचे वडील अश्‍विनीकुमार (दिलीप कुमार). लहानपणी विजयचे अपहरण करण्यात आलेले असते. एका गुंडाला सोडण्याच्या बदल्यात विजयला सोडले जाईल असा सौदा जे.के. (अमरीश पुरी) अश्‍विनीकुमारला सांगतो. पण तो आपला प्रामाणिकपणा सोडत नाही. मुलाचे प्राण गेले तरी गुंडाला सोडणार नाही असे तो जे.के.ला ठणकावून सांगतो. हा प्रसंग असा आहे की दोन्ही बाजूंनी बघितलं तरी दोघंही (विजय आणि त्याचे वडील) आपापल्या जागी बरोबरच आहेत असं वाटतं. विजयला हे सगळं संभाषण ऐकवण्यात येतं आणि त्याला पळून जायला मदत करतो तो आणखी एक स्मगलर! या प्रसंगातून विजयच्या मनात वडिलांबद्दल तीव्र नफरत निर्माण होते. इतकी की जे जे वडिलांना आवडत नाही ते-ते तो मुद्दाम करतो. वाईट मार्गाला लागतो. सूडाच्या आगीत विजय उत्तरोत्तर जळत जातो आणि वडिलांनाही त्यात ओढतो. कर्तव्य श्रेष्ठ की भावना असा प्रश्‍न अश्‍विनीकुमारसमोर पुन्हा एकदा उभा राहतो आणि यात तो त्याचा मुलगा गमावतो. तो स्वत:च बंदुकीने विजयला मारतो. या दोघांच्या भिन्न स्वभावाचा, संघर्षाचा अंत शोकात्मक होणे हे तसे अपरिहार्य! विजयच्या मनात वडिलांबद्दल तीव्र सूडाची भावना आहे तर दुसरीकडे त्याच्या वडिलांच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आहे पण प्राधान्यक्रमात कर्तव्य वरचढ आहे. या दोघांमधला दुवा विजयची आई (राखी). पण या सूडनाट्यात तिचाही अंत होतो. 
 
शक्ती
दिलीपकुमारने या सिनेमात आपल्या देहबोलीतून, नजरेतून, संवादफेकीतून वडिलांची तगमग उत्कृष्टपणे मांडली आहे. विजय मागे म्हटल्याप्रमाणे नॅट्रम ग्रुप या होमिओपॅथीच्या औषधाजवळ जाणारी व्यक्तिरेखा आहे तर अश्‍विनीकुमार ही लायकोपोडियम/सिलिशिया या औषधांशी मिळतीजुळती आहे.

नाती-गोती या विषयावरील सिनेमांवर आधारित लेख आणि त्यात गुलजार यांचा उल्लेख होणार नाही, हे केवळ अशक्य ! आपल्या जवळपास प्रत्येक सिनेमांमधून गुलजार यांनी वेगवेगळ्या नात्यांचा शोध घेतला आहे, आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुलजार टच मुळे त्याच्या सिनेमातील माणसे आणि प्रसंग तसे तुमच्या-आमच्यासारखे आणि म्हणूनच जवळचे वाटतात. आपण पटकन त्या प्रसंगांशी relate करू शकतो.
असाच एक गुलजार यांचा एक सिनेमा म्हणजे किनारा’. कुठल्याही नात्याचा पाया Guilt(अपराधीपणाची भावना) असू शकतो का? असल्यास त्याचे त्या नात्यावर काय परिणाम होऊ शकतात? त्याने नाते कितपत प्रभावित होऊ शकते? ‘किनारासिनेमाचा खरं तर हा विषय आहे. 


किनारा

एखाद्या माणसाला पश्‍चात्तापाने घेरले असता त्या पश्‍चात्तापातून सुटका मिळवण्यासाठी तो over compensate करू शकतो आणि त्यातून नात्यातले पेच वाढत जातात. त्याचा हेतू चांगला असला तरी घडते त्याच्या अगदी विपरीत! हा पश्‍चात्तापाचा प्रवास आहे इंदरचा (जितेंद्र) आणि जिच्यासाठी तो सगळं करतो ती आरती (हेमामालिनी) त्याच्या या compensate करण्यामुळे उत्तरोत्तर वेगळ्याच समस्यांमध्ये गुंतत जाते. इंदरच्या या  conscientious किंवा सद्सद्विवेकबुद्धिवादी स्वभावाला अनुसरून होमिओपॅथीमध्ये काही औषधे आहेत. त्यापैकी काही म्हणजे Carcinosin, नॅट्रम मूर, सिलिशिया इत्यादी.
गुलजारांचा आणखी एक सिनेमा म्हणजे सर्वपरिचित इजाजत’! ‘इजाजतही एक तरल भावकविताच आहे. माया, महेंद्र, सुधा आणि सुधाचा दुसरा नवरा (शशी कपूर) यांची ही कथा. या कथेतून गुलजारांनी स्त्री-पुरुष नात्याचा एक उत्कट, संवेदनशील प्रवास मांडला आहे. त्यांच्या नेहमीच्या फ्लॅशबॅक तंत्राने वर्तमान आणि भूतकाळात फिरणारी ही कथा सुरू होते रेल्वे प्लॅटफॉर्मवर, वेटिंगरूममध्ये आणि संपतेही तिथेच! सिनेमाची गोष्ट शब्दबद्ध करणं केवळ अशक्य आहे कारण या सिनेमाला सुंदर दृश्यात्मकता आहे आणि आर.डी. बर्मन यांच्या संगीताची अजोड साथही! 
या दोन्ही गोष्टींशिवाय इजाजतचा विचार होऊच शकत नाही. म्हणून गोष्ट न सांगता त्यातील व्यक्तिरेखांबद्दल लिहिणं जास्त श्रेयस्कर!
माया(अनुराधा पटेल)

माया (अनुराधा पटेल) ने लहानपणीच आपल्या आई-वडिलांची भांडणं अनुभवली आहेत. म्हणूनच तिचा लग्न या संस्थेवर विश्‍वास नाही. ती बंडखोर आहे पण तिच्यात आक्रस्ताळेपणा नाही की व्यवस्थेबद्दल चीड नाही. ती संवेदनशील आहे, कवी आहे, रोमँटिक आहे आणि म्हणूनच अतिशय हळवीही! ती अतिशय unpredictable आहे. भावनेच्या भरात, impulsively ती काय करेल हे सांगता येत नाही. ती अशी मनस्वी आहे आणि तरीही vulnerable ही! म्हणूनच महेंद्र तिच्याशी असलेले नाते तोडू शकत नाही. सुधाशी लग्न होऊनही मायाला विसरू शकत नाही. माया कधी एके ठिकाणी राहत नाही. अचानक दुसरीकडे निघून जाते. कोणाच्याही नकळत. हा तिचा flight response आहे असे म्हणता येऊ शकते. मायाची व्यक्तिरेखा पुन्हा एकदा होमिओपॅथीच्या नॅट्रम व मॅग्नेशिअम ग्रुपशी साधर्म्य बाळगणारी वाटते.


सुधा (रेखा)
सुधा (रेखा) ही एक पारंपरिक विचारसरणीची, मध्यमवर्गीय संस्कारात वाढलेली स्त्री आहे. महेंद्रशी तिचं लग्न ठरलंय. पण त्याच्या आयुष्यात आधीच माया आहे हे तो तिला सांगतो आणि सुधाच्या पुढाकारामुळे लग्न रद्दच व्हावे असे तिला सुचवतो. पण सुधा तिच्यावरच्या संस्कारांमुळे हे करू शकत नाही. दोघांचं लग्न होतं. ती महेंद्रचं गतआयुष्य स्वीकारून संसार समजुतदारपणे करू लागते. पण महेंद्रच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा माया वेगवेगळ्या प्रकारे येतच राहते. सुधासारख्या/कोणत्याही स्त्रीला हे स्वीकारणे जडच जाणार! शेवटी सुधा स्वतंत्ररीत्या निर्णय घेऊन महेंद्रचे घर सोडून जाते आणि नंतर आयुष्यात स्थिरावते देखील! हा सुधाचा परंपरेला/संस्कराला धरून राहणारा, त्यामुळे एकप्रकारे rigidity येणारा स्वभाव होमिओपॅथीच्या सिलिशिया औषधाशी मिळताजुळता आहे.
महेंद्र (नसीरूद्दीन शहा) हा अत्यंत भावनाप्रधान आहे. 
महेंद्रने माया आणि सुधा या दोन्ही नात्यांत त्याच्या भावना गुंतवल्या आहेत. म्हणून तो मायालाही विसरू शकत नाही आणि सुधाला जपायचा, तिचं मन राखायचाही तो पूर्ण प्रयत्न करतो. या गुंत्यामुळे दोन्ही नात्यांमध्ये त्याच्या पदरी निराशा येते. या निराशेचे शारीरिक परिणामही त्याला भोगावे लागतात (हृदयविकार, डायबेटिस) अशी व्यक्ती होमिओपॅथीच्या नॅट्रम ग्रुपशी (पुन्हा एकदा पण वेगळ्याप्रकारे!) मिळतीजुळती वाटते.
महेंद्र (नसीरूद्दीन शहा)
सुधाचा दुसरा नवरा (शशी कपूर) - खरं तर सिनेमात या व्यक्तिरेखेला फार काम नाही. संवादही नाहीत. त्या व्यक्तिरेखेचं नावही आपल्याला कळत नाही. तरीही ही व्यक्तिरेखा सिनेमाच्या दृष्टिने अतिशय महत्त्वाची आहे.

शशी कपूर
या लेखात आधी उल्लेख केलेल्या इतर चित्रपटांतील व्यक्तिरेखा असोत किंवा एकूण विचार करता बहुतांश नाते-संबंधात प्रामुख्याने असतो तो एक झगडा - काहीवेळा व्यवस्थेशी, काही वेळ व्यक्तीशी, पण पुष्कळदा स्वत:शीच! आपल्या गतआयुष्याशी! हा झगडा/तिढा न सुटल्यामुळे नात्यांमधला तणाव वाढत जातो. इजाजतमधल्या सुधाच्या दुसर्‍या नवर्‍याचं मात्र तसं नाही. त्याला सुधाचं आणि महेंद्रचं आधीचं नातं, त्यांचा भूतकाळ माहित आहे. पण त्याच्याशी त्याचा झगडा नाही. त्याच्याकडे आहे त्या नात्याकडे बघण्याचा समजुतदारपणा, एक खुलेपणा! म्हणूनच तो महेंद्रकडे बघतो, समंजसपणे हसतो आणि सुधाला मागे ठेवून बाहेर जातो. त्याच्या मनात सुधाबद्दल असते एक आश्‍वस्तता, तिच्याबद्दल वाटणारी खात्री, एक विश्‍वास! अगदी दोनच क्षणांसाठी अनपेक्षितपणे येणारी ही शशीकपूरची व्यक्तिरेखा एकूणच नात्यांविषयी खूप काही सांगून जाते!