Monday, 17 November 2014

' एलिझाबेथ एकादशी' चं पारणं !



काल हा परेश मोकाशी दिग्दर्शित सिनेमा पाहिल्यावर माझी नेहमीप्रमाणे पहिली प्रतिक्रिया सिनिकल होती- छे ! असं कुठे असतं का? एवढं ' फील-गुड' दाखवतात का कधी ? वगैरे वगैरे … पण सिनेमा डोक्यातून जात नव्हता. तो ज्ञाना जसा पंढरपूरच्या छोटया-छोटया गल्ली- बोळातून सिनेमाभर फिरत असतो तसाच मी (मनातल्या मनात) त्याचे बोट धरून फिरलो आणि सिनेमाची एकीकडे उजळणी करता करताच दुसरीकडे या माझ्या  प्रौढत्व आणि सिनिसिझमच्या मुखवट्याआड, आत खोल खोल कुठे तरी कोपरयात दडून बसलेल्या माझ्यातल्या लहान मुलापर्यंत पोचलो. आणि मग मात्र मला सगळं आपसूकच पटू लागलं. तेव्हा माझ्या दृष्टीने या सिनेमाचं यश हे असं दुहेरी आहे- एक तर माझ्या सगळ्याच गोष्टींकडे नकारात्मक बघण्याच्या स्वभावाला थोडावेळ तरी मी बाजूला ठेवू शकलो आणि दुसरं मला माझ्यातलं लहान मूल (सिनेमा संपल्यानंतर का असेना पण ) दिसलं. 

या सिनेमाची गोष्ट सांगून मला वाचणाऱ्यांची सिनेमाबद्दलची गंमत घालवायची नाहीये. पण तरीही काही ठळक मुद्दे सांगावेसे वाटतात-
१) सिनेमात पहिल्यापासून ते शेवटपर्यंत काय जर असेल तर ती गोड निरागसता(हे पिवळं पितांबर सारखं होतंय का?) सर्वच मुलांच्या डोळ्यांतून, हसण्यातून, चेहऱ्यावरील हावभावातून, त्यांच्या बोलण्यातून, आणि त्यांच्या कृतीतून एक स्वाभाविक, त्या त्या वयाला साजेशी निरागसता दिसते. आणि या मुलांकडून तशा प्रकारे ती व्यक्त करायला लावण्यात दिग्दर्शकाचे कौशल्य आहे हे निर्विवाद !
२) सिनेमात काही गोष्टी खूप मार्मिकपणे दाखवल्या आहेत. केवळ सगळं गोड आणि सुंदर असं म्हटलं तर ते फार वरवरचं वर्णन होईल. त्यामुळे यातल्या काही facts चा ही उल्लेख करावासा वाटतो- 
अ) तसं बघायला गेलं  गोष्टीत जे काही घडतं ते ज्ञानाच्या आईला ५००० रू देऊन स्वेटरचे (बँकेने जप्त केलेले) मशीन सोडवता येत नाही म्हणून. बघायला गेलं तर ५००० रू ही रक्कम फार काही मोठी नाही असं वाटण्याची शक्यता आहे. हल्लीच्या मुलांना तर असं निश्चितच वाटू शकेल. कारण आपल्या शहरांमधील उच्च -मध्यमवर्गातील मुलांना ही रक्कम किरकोळ वाटू शकते. कपडे खरेदी -हॉटेलिंग -वीक-एंड ट्रिप्स आणि अशा इतर गोष्टींची सवय असणाऱ्या या मुलांना ५००० रू नाहीत म्हणून एखादे घर कोलमडू शकते किंवा या पैशांची जमवाजमव करताना किती अडचणी येऊ शकतात हे जाणवले तरी खूप झाले ! 
आ ) आणि अशी हलाखीची  परिस्थिती जरी असली तरी त्यावर हिमतीने मात करण्यासाठी झटणारी, मुलांच्या शिक्षणासाठी जमेल तेवढी तजवीज करणारी, स्वाभिमानी आणि realistic आई दाखवण्यात आली आहे. प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्यासाठी काही आया  अतिरंजित दाखवल्या जातात. त्या तुलनेत ही संयत आई (नंदिता धुरी यांचे अप्रतिम काम ) उठून दिसते. 
इ ) या मुलांमधील मैत्रीच्या आड कुठेही जात-पात, धर्म, आर्थिक स्थिती, आई-वडिलांचे व्यवसाय काही काही येत नाही. शाळेतला एक मुलगा 'वाईट वस्तीत राहतो ' म्हणून त्याला इंग्रजीचे पुस्तक द्यायचे नाही असली चलाखी ज्ञाना करत नाही. पुढे याच मुलाच्या खरी जाउन तिथली खाट घेऊन ही मुलं  दुकान थाटतात. वाईट वस्ती म्हणजे काय, त्या मुलाच्या आईचा व्यवसाय काय याबद्दलची त्या मुलांची चर्चा अफलातून ! 
ई ) टीव्ही आणि मोबाईल हे सध्याच्या मुलांचे 'मित्र' इथे जवळ जवळ नाहीतच ! नाही म्हणायला गण्याच्या मोबाईल वर त्याच्या वडिलांच्या नंबरसाठी रेड्याच्या आवाजाचा रिंगटोन धमाल उडवतो !
गण्याची भाषा शिवराळ असण्यामागे त्याच्या वडिलांची तशीच भाषा असते हे कारण आहे हे सोदाहरण पण विनोदी पद्धतीने छान दाखवलं आहे. तसाच 'या वेळची एकादशी खूप चांगली गेली' हे अनपेक्षितपणे एक वेश्या(ज्ञानाच्या मित्राची आई ) ज्ञानाच्या आईला सहजपणे सांगते.  हे वाक्य सिनेमातही इतकं सहज आणि पासिंग reference ने यावं असं आलंय की ते register ही होतं की नाही असं वाटतं. 
उ ) शहरातील आणि या सिनेमातल्या मुलांमधला आणखी एक फरक मला वाटला. तो म्हणजे सिनेमातली ही मुलं ज्ञानाचा प्रश्न म्हणजे आपला प्रश्न, त्यासाठी उत्तर शोधणे आणि ते प्रत्यक्षात आणणे हे सगळं मनापासून, स्वत:ला झोकून देऊन करतात. एवढं सहजपणे मोठ्या शहरातील मुलं करतील असं वाटत नाही. 
ऊ) आणि म्हणूनच मला या सिनेमातले पंढरपूर हे ही एक महत्त्वाचे पात्र वाटते. ही गोष्ट अशा ठिकाणी घडू शकते- जे  अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. जिथे विठोबाचे अस्तित्व भक्तांना पावलोपावली जाणवते. अशा ठिकाणी प्रामाणिकपणा, खरेपणा, सचोटी, दुसऱ्याचा आणि त्याच्या परिस्थितीचा विचार(घरमालकीण यांच्याकडे  ६ महिने भाड्याचं नाव सुद्धा काढत नाही !) करणे हे सगळे होऊ शकते. 
मी काही सिनेमाचं परीक्षण करणारा समीक्षक नाही . त्यामुळे माझं मत कितपत ग्राह्य धरलं जाईल माहित नाही. पण एका निर्मळ, निखळ आनंदाच्या अनुभवासाठी हा सिनेमा जरूर बघावा असं मी नक्की म्हणेन ! 

Wednesday, 12 November 2014

तीन कविता...१


१) भाजपचे पहिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडे स्टेडियम वर एका भपकेबाज सोहळ्यात पदाची शपथ घेतली. त्यानिमित्त ही कविता- 

शपथविधी 

वानखेडे स्टेडियम जवळची 
लगबग पाहून एका सामान्य माणसाने 
तिथल्या वॉचमनला विचारले -
'इथे काय चाललंय हो?''
त्रासिकपणे वॉचमन म्हणाला -
' दिखता नहीं क्या ?'
'नितीन चंद्रकांत देसाईंचा दिसतोय सेट
आहे कसला इव्हेंट?'
झी गौरव ? की म टा सन्मान ?
नॉमिनेशन की मानांकन?
'अरे नया है क्या तू?
जानता नहीं ?
नया सी एम आ रहा है
शपथ ले रहा है'
' अहो पण तिथे शेतकरी
आत्महत्या करताहेत
दलित मारले जाताहेत
आणि इथे....'
'वो रोना धोना छोड रे
अब अच्छे दिन आए रे'
शपथविधीला कुणी धरतोय ठेका
उडवतोय टोप्या उधळतोय पैका
कारण शपथविधीच्या ब्रेक मध्ये
सुरु आहे लावणी
बावन्नखणी अहो बावन्नखणी
कशाचाच कशाला नाही मेळ
आहे फक्त पैशाचाच खेळ! 


( ३१ ऑक्टोबर २०१४ ) 
------------------------------------------------------

२) दिवाळी च्या आधीचे वातावरण टिपणारी ही कविता- 

आली दिवाळी


वर्तमानपत्राचं पहिलं पान बघेपर्यंत
जेव्हा सहा पानांच्या जाहिरातींचा अडथळा पार करावा लागतो
तेव्हा समजावे दिवाळी जवळ आली !
ज्वेलर्स ते बिल्डर्स
मॉल्स वा इलेक्ट्रॉनिक आयटम
ग्राहक राजाला भुलविणार्या
जाहिराती जेव्हा येऊ लागतात
तेव्हा समजावे
दिवाळी जवळ आली !

लोकांच्या नजरेतूनही कळतं
दिवाळी जवळ आली!
पोलिसांची ती 'शोधक 'नजर
पोस्ट मनची आशाळभूत तर
बायकांची शॉपिंग करतानाची भिरभिरती नजर सांगते
दिवाळी जवळ आली!
डॉक्टर कडची कमी होऊन
पिठाची गिरणी पासून ते टेलरपर्यंत
सगळीकडे गर्दी वाढली की समजावे
दिवाळी जवळ आली!
आणि हो!
आमच्यासारख्या कवड्यांच्या
कवितांचे पेव फुटू लागले
तरी समजावे
दिवाळी जवळ आली!

१२ ऑक्टोबर २०१४ ) 


३) आज पहाटे पुण्यात पाउस पडला.. अगदी थोडासाच... योगायोग पहा-इंटरनेट वर मुशाफिरी करताना कवी राजेश्वर यांची अशाच पावसाचे वर्णन करणारी कविता मिळाली. ती देत आहे-
असा कसा रे तू पावसा...
कुठलाही आवाज न करता
दबक्या पावलांनी आलास..
सवतीच्या घरी रात्र काढून
पहाटेच चोरट्यासारख्या परतणाऱ्या
एखाद्या पतीराजाप्रमाणे ?
तुझे हे असे येउन न येणे
चकवून जाणे ..
कोणालाच मान्य नाही.
बघ.. तुझ्याच थेंबांचे अश्रू ढाळून
झाडं मूक निषेध नोंदवतायेत.
(९ मे २०१२)

'मल्टी-पर्पज' डॉक्टर !




पूर्वी Reader's Digest या मासिकात 'All in a Day's work' या स्वरूपाचं सदर यायचं.
(आता ते सदर आहे की नाही माहित नाही) रोजच्या कामात घडणारे प्रासंगिक विनोद त्यात दिले जात. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर आहे आणि माझ्या रोजच्या  कामात काही मजेशीर प्रसंग घडत असतात . अगदी Reader's Digest मध्ये सांगतात त्याचप्रकारे ! अशाच काही  प्रसंगाविषयी सांगण्यासाठी हा लेख ! 
मात्र सुरुवातीलाच एक डिसक्लेमर देतो - विशेषतः हे लिखाण माझे काही पेशंट वाचण्याची शक्यता आहे त्यांच्यासाठी- हे जे काही मी लिहिलंय त्यातले पेशंट तुम्ही नाही. आणि तरीही तुम्हांला यात काही साधर्म्य आढळल्यास तो केवळ एक योगायोग समजावा आणि हलके घ्यावे. यातून कोणाला दुखवायचा अजिबात हेतू नाही.पेशंट खरं तर आजाराने, त्यांच्या आयुष्यातल्या समस्यांनी त्रस्त असतात. त्यांच्या आजाराला कमी लेखण्याचा किंवा त्यांच्या दुखण्याची चेष्टा करण्याचा इथे हेतू नाही. परंतु नकळतपणे काही विसंगती घडत जातात आणि त्याची गंमत वाटते. म्हणून हे लिहावेसे वाटले. 

एक होमिओपॅथीचा डॉक्टर म्हणून जे काही कारणे अपेक्षित असते त्या व्यतिरिक्त इतरही काही छोट्या छोट्या भूमिका मी निभावत असतो. यात मी आणि दुसरे पात्र माझा दवाखाना असते. पेशंटच्या दृष्टीने माझा दवाखाना हा केवळ दवाखाना नसून आणखी बरंच काही असतो. यातून काही मजेशीर गोष्टी घडत असतात. उदा-
१) काहींना माझा दवाखाना हे मोफत वाचनालय वाटतं. वेटिंग रूम मध्ये ठेवलेली मासिके अत्यंत गंभीरपणे ते वाचत असतात. काही पेशंट तर आपले दवाखान्यातले काम झाले तरी बराच वेळ अंक वाचत बसतात. कोण म्हणतो की आपली वाचनाची आवड सध्या कमी झाली आहे? अर्थात याला मीही खत-पाणी घालत असतो. 'साधना', 'अनुभव', 'मिळून साऱ्या जणी' सारखी मराठी तर 'आउटलुक' किंवा 'The Caravan' सारखी इंग्रजी नियतकालिके दवाखान्यात वाचायला उपलब्ध असतात आणि तसे ताजेच अंक असतात. एकदा एक पेशंट आपल्या ५-६ वर्षांच्या मुलीला 'साधना' च्या मुखपृष्ठावरील चित्र दाखवून गोष्ट सांगितल्या सारखे बोलत होते-  "हे आजोबा कोण आहेत माहित आहे का? हे आहेत मोहन धारिया आजोबा ! तुला माहित आहे का.. यांनी किनई  खूप मोठं काम केलंय" ती मुलगी बिचारी काहीही न कळूनही कळल्यासारखी मान डोलवत होती. समाजवाद अजूनही इतक्या ग्रास रूट पातळीवर आहे हे पाहून मला अगदी भरून आलं. ते मला म्हणाले-"डॉक्टर हा अंक मी घरी घेऊन जाऊ का? हिला मी त्यांची सगळी गोष्ट सांगतो." चला ! म्हणजे पुढच्या पिढीत ही रुजणार समाजवाद ! एवढ्या प्रामाणिकपणे विचारल्यावर मी नाही कशाला म्हणतोय! इथे कितीतरी अंक असे न विचारता नेले जातात. आमच्या ओळखीच्या एक मावशी त्यांचे वाचून झाल्यावर मला 'अनुभव' आणि 'मिळून साऱ्या जणी' चे अंक देत असतात.त्या नेहमी मला म्हणतात- "हे घे राजेश, तुझ्या पेशंटनी पळवून नेण्यासाठीचे अंक!" काही पेशंट वेगळीच शक्कल लढवतात- आमच्या होमिओपॅथीविषयक दिवाळी अंक 'पर्याय' मधून बरोब्बर त्यांना उपयोगी वाटणारी पाने फाडून घेऊन जातात. अंक जागच्या जागी सुरक्षित! तेव्हा अशा पेशंटच्या तुलनेत हा पेशंट मला अदबीने विचारत होता तर मी नाही कसे म्हणणार ? आणि खरंच तो पेशंट समाजवादी असावा.कारण पुढच्याच आठवड्यात त्यांनी अंक चक्क परत केला! आणि वर म्हणाले-"इतर कोणाला वाचायला हवा  असेल तर उपयोगी पडेल!" 

२) नोटांचे विनिमय केंद्र- नाही ! मी काही डॉलरमध्ये फी आकारत नाही! इथे विनिमय या शब्दाचे  दोन अर्थ आहेत. पहिला म्हणजे डॉक्टरांच्या फीची अगदी फुटकळ रक्कम असली तरी त्यांना एकदम  २ हजाराची नोट द्यायची! वर हे ही सांगणारे/सांगणाऱ्या असतात -"पहिल्यांदा तुमच्याकडेच  आले. आता पैसे सुट्टे झाल्यावर पुढच्या खरेदीला जाणार!" म्हणजे आपण यांच्या खरेदीचा मार्ग मोकळा करून द्यायचा ! दुसरा प्रकार म्हणजे फाटक्या, जीर्ण, चिकटपट्टी लावलेल्या, कुबट वास असलेल्या, रंगपंचमीचा /पानाचा लाल रंग लागलेल्या, थोडक्यात काय की इतरत्र कुठेही न खपू शकलेल्या नोटा डॉक्टरांकडे द्यायच्या. त्यांच्याकडे सहज खपतात! देताना ते इतक्या बेमालूमपणे देतात की आपल्याला थांगपत्ताही लागत नाही. काही वेळा असं वाटतं की आपण गाफील राहावं म्हणून फी देताना पेशंट उगाचच नाही नाही त्या विषयावर गूळ काढत बसतात आणि आपलं लक्ष नाही असं पाहून हातचलाखीने अशा नोटा खपवतात. 

३) मोफत दूरध्वनी केंद्र - हे आता मोबाईलच्या जमान्यात थोडं कमी झालं आहे. तरीही  क्वचित एखादा पेशंट म्हणतो- "डॉक्टरसाब, क्या मैं आपका फोन इस्तमाल कर सकता हूँ  ?मेरा फोन मैं घर पे भूल आया हूँ " आणि मग ते आपल्या बायकोशी फारसं काही महत्त्वाचं नसलेलं बोलण्यासाठी माझा लँडलाईन फोन वापरतात. (म्हणजे -आता मी इथे आहे… नंतर तिथे जाईन आणि मग घरी येईन... येताना कुठला मासा आणू .. वगैरे )

४) काही पेशंटना माझा  दवाखाना एक टप्पा वाटतो. म्हणजे कुठून कुठून खरेदी वगैरे करून यायचं आणि 'जरा विसावू या वळणावर ' तसं आपलं येता जाता दवाखान्यात यायचं! एकदा तर केटरिंगचा व्यवसाय असलेल्या एका पेशंटने माझ्या दवाखान्यात शेगडी, कढई, झारे असलं काय काय सामान आणलं आणि लटक्या अजीजीनं म्हणाल्या- "हे मी जरा इथे ठेवते. माझा भाऊ येऊन  घेऊन जाईल. आत्ता तो नेमका घरी नाहीये.सॉरी हं तुम्हांला थोडा त्रास देतेय." मी माफकपणे विरोध करत म्हटलं -" अहो पण ते लवकर घेऊन जातील ना ? नाहीतर लोकांचा गैरसमज व्हायचा की डॉक्टरांनी केटरिंगचा नवा जोडधंदा चालू केला की काय !" यावर त्या नुसत्या हसल्या आणि चक्क निघून गेल्या ! पुढे त्यांचा तो भाऊ येईपर्यंत माझा जीव मात्र  टांगणीला ! 

५) संकेत मीलनाचा -
पहिला फोन- "हॅलो आई, अगं मी डॉक्टर पुसाळकरांकडे आहे. येईन मी घरी इथलं झालं की !"
दुसरा फोन -"हॅलो... अमित ... अरे मी पुसाळकरांकडे आहे (फरक लक्षात घ्या- डॉक्टर शब्द गाळला आहे !) तू इकडेच ये … "
अच्छा ! म्हणजे माझ्याकडे येण्याच्या सबबीखाली काहीतरी वेगळंच शिजतंय! माझा दवाखाना हे असं भेटण्याचं ठिकाण होतंय ! अशा प्रकारे भेटून पुढे (त्याच मुलाशी) लग्न केलेल्या मुलीने कधी आत्मचरित्र लिहिलं तर कदाचित माझा त्यात कृतज्ञतेने उल्लेख होईल की- "घरून आमच्या प्रेमाला जेव्हा विरुद्ध होत होता तेव्हा डॉक्टर पुसाळकरांचा दवाखाना हा आम्हांला एकमेव आधार होता"- अशी आपली भाबडी आशा मला आहे ! 

पेशंटचीही काही खासियत असते. त्यांच्या काही सवयी असतात. मुख्य सवय म्हणजे डॉक्टरशी बोलताना उगीचच इंग्रजी शब्दांचा वापर करायचा . आता अस्मादिक मराठी आहेत हे आमच्या आडनावावरून सहज लक्षात यावे. त्यामुळे गरज नसताना कशाला इंग्रजी वापरावं? म्हणजे पेशंटनी अशक्तपणाला weaknessपणा म्हणणं, डोक्याला headache झालाय म्हणणं किंवा इन्सुलिनला इन्शुरन्स म्हणणं याचीही  आता सवय झाली आहे. पण त्याही पुढे जाणारे पेशंट असतात- एकदा असाच एक पेशंट पहिल्यांदाच आला आणि म्हणाला-" डॉक्टर, मला सर्दीचा त्रास आहे. त्यासाठी मला तुमच्याकडून स्टेटमेंट घ्यायची आहे !" दोन क्षण मला कळलंच नाही. स्टेटमेंट द्यायला मी राजकीय नेता नाही वा तो पत्रकार नाही. किंवा जबानी द्यायला मी कुठला विटनेस नाही. मग लक्षात आलं. त्याला ट्रीटमेंट म्हणायचं होतं ! "हा...सर्दीसाठी तुम्हांला ट्रीटमेंट हवी आहे का?" 
"हो.. तेच ते... स्टेटमेंट !" (आपला हेका सोडायचा नाही!) 
'क्रोसीन'च्या गोळीला 'केरोसीन'ची गोळी म्हणणारे काही पेशंट पाहिले आहेत. पण एका पेशंटची सर कोणालाच येणार नाही असं इंग्रजी त्याने फाडलं ! मला म्हणाला- "डॉक्टर, मला external jealousy होतेय!" 
"काय?" " कुठे?" 
असं विचारल्यावर त्याने गळ्याचा भाग दाखवला. साहेबांना तिथे नायट्यासारखे फोड आले होते आणि तिथे खाज येत होती आणि आग होत होती. सरळ तसं सांगावं ना? जळजळ/ आग होणे यासाठी उगाच jealousy आणि बाहेरून त्रास होतो म्हणून external jealousy असं इंग्रजी भाषेला योगदान कशाला द्यायचं? 

होमिओपॅथिक डॉक्टरांना पेशंटच्या त्रासासंबंधी वेगवेगळे प्रश्न विचारावे लागतात. पेशंट त्या त्रासांचं जेवढं वर्णन करेल तेवढं आमच्या दृष्टीने औषध निवडण्याला मदतच होते. याचा काही वेळा पेशंट खूप वेगळाच अर्थ घेतात आणि आऊट ऑफ द वे जाऊन कुठल्याही गोष्टीचं(विचारलेलं नसतानाही) 'रसभरीत' वर्णन करतात. त्यांना वाटतं की ते डॉक्टरांना खूप काही मौलिक माहिती पुरवत आहेत! काही लोक  तर आणखी पुढे जातात. त्यांना एक  वरदान लाभलेलं असतं. क्लिनिक मध्ये येतात आणि  मोठ्या आवाजात हुकमी ढेकर देतात. क्लिनिकमधील काचा  अगदी दहीहंडी किंवा गणपतीच्या वेळच्या स्पीकरच्या भिंतींनी जशा हादरतात  किंवा व्हायब्रेट होतात तसंच काहीसं ! आणि मग हे शांतपणे म्हणतात- "डॉक्टर .. काहीतरी करा हो  तुम्ही ! .. अशा ढेकरा मला दिवसभर येतात! " म्हणजे आम्हांला न मागता लाईव्ह डेमो ! (तरी बरंय आणखी कशाचा डेमो नाही देत ते !)

होमिओपॅथीचे डॉक्टर फॅमिली डॉक्टरची भूमिका निभावत असतात. अलीकडच्या काळात कुटुंबाचा आकार लहान झालाय. त्यामुळे घरात वडीलधारी मंडळी कमी झालेली आहेत. लहान मुलांचे लाड जास्त आणि त्यांना शिस्त कमी अशी काही घरांमध्ये स्थिती असते. त्यामुळे आमच्यासारख्या डॉक्टरांकडे मुलांच्या आया घेऊन येतात. उद्देश आम्ही त्या मुलांना धाक दाखवावा हा असतो. पण त्यातून आमचं एक प्रकारे तक्रार निवारण केंद्र होतं. आणि बहुतांश आयांची एकच तक्रार- "डॉक्टर हा काही खातच नाही हो!" एक आई तर म्हणाली- "वॉचमन झाला, पोलीस झाला पण काही उपयोग नाही. शेवटी तुमच्याकडे घेऊन आले आहे. कोणाचं ऐकतच नाही. चांगलं मोठं इंजेक्शन द्या त्याला!" बाप रे ! म्हणजे पोलीस आणि वॉचमन यांच्या लाईनीत डॉक्टर ! आणि त्या मुलालाही माहित असतं या डॉक्टरकडे इंजेक्शन वगैरे काही नसतं ! फक्त गोड गोळ्या मिळतात. त्यामुळे तो एकदम चिल मध्ये असतो! काही आया म्हणतात- "अगदी घरभर फिरवतो हो खाण्यासाठी ! त्याच्या मागे मागे जाऊन भरवावं लागत!पार दमवतो तो मला !" पण कित्येकदा हे लक्षात आलेलं असतं की अशी मागे लागून भरवावं लागणारी मुलं चांगली गुटगुटीत असतात आणि आया देखील त्यांच्यामागे धावून अजिबात बारीक झालेल्या नसतात ! 
काही वेळा मात्र मुलांचं खाणं ही एक वरवरची समस्या असते. त्या मागचे काही वेगळेच धागेदोरे सापडतात. अशीच एका सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबातली आई तिच्या आठवी- नववीतल्या मुलाला घेऊन आली होती. (बऱ्याच वेळा दिसतं की ही तक्रार सांगायला आईच येते.) तक्रार नेहमीचीच- मुलगा जेवत नाही. पालेभाज्या खात नाही वगैरे. तर अचानक मुलगा आईच्या वसकन अंगावर धावून गेला- 
"ए ... असं कुठे आहे? खातो मी हं भाज्या! तूच करत नाहीस पालेभाज्या तुला पित्त होतं म्हणून!" त्या मुलाचा आवेश, बोलण्याची पद्धत सेम टू सेम त्याच्या बाबांसारखी! त्यामुळे आई एकदम गप्पच ...तक्रार करायला ती आलेली असते पण इथे डाव तिच्यावरच उलटतो म्हणून खजील होऊन गप्प! अगदी अशीच ती नवऱ्यापुढेही गप्प होत असणार ! यांच्या घरी साधारण काय वातावरण असेल  याची एक छोटीशी झलक माझ्यासमोर सादर झाली. म्हणजे बाबा या व्यक्तिरेखेला दवाखान्यात येण्याचे कष्टही पडलेले नसतात.पण मुलाच्या रूपाने मात्र  ते हजर झालेले असतात ! आई तोंडघशी पडलेली असते, मुलाचा विजयी आविर्भाव झालेला असतो आणि आपण मात्र अवाक झालेलो असतो !