Monday, 1 December 2014

तीन कविता …२

कविता १  
ना फोन ना SMS 
ना फूल ना भेट...
घरीसुद्धा काहीच हालचाल दिसेना.
शेवटी घसा खाकरत मीच विषय काढला...
आज काय आहे माहितेय ना?
सारं कसं शांत शांत...
मग मलाच सांगावं लागलं...
तेव्हा majority मध्ये असणारया स्त्रियांपैकी दोघींनी मला Royal Ignore केलं..
बायकोनं जाता जाता तिला जमेल तेवढ्या तिरकसपणे विचारलं, " असं पण असतं का?"
मित्रहो, असा चालू झाला 

आमचा आजचा जागतिक पुरुष 'दीन'..नव्हे दिन!



___________________________________


कविता २

विरोधाभास

एक हात नाजुक

मऊ, लुसलुशीत. .फुलासारखा
तर एक हात थकलेला 
खरखरीत.कोमेजत्या फुलासारखा
एकीचे डोळे टपोरे,
हसरे
तर दुसरीचे
बारीक , भकास. 
दोघींना दात नाहीत 
पण एक हसते मनमुराद
आणि दुसरी हसणं विसरलीये.
दोघींना गरज आहे आधाराची
कारण एकीला सोडलंय 
तिच्या आई-वडिलांनी
तर दुसरीला
तिच्याच मुलांनी!
या मुलीपुढे आहे भविष्य 
पण तिच्यात दिसतो
मला माझा भूतकाळ
आठवते माझ्या मुलीचे
निरागस हसू!
आजींचे सरले आयुष्य 
त्यात मात्र दिसते 
मला माझे भविष्य ! 
_________________________

कविता ३


भीतीची भुतं 

कुठला तरी इंग्रजी चित्रपट पाहून 
घाबरलेली माझी लेक मला म्हणाली-
" मी आज तुझ्या शेजारी झोपते"
माझ्या कुशीत झोपली, माझा हात तिच्या अंगावर घेऊन !

बघता बघता गाढ झोपली. 
निश्चिंत. . निरागस !
मला तिच्या लहानपणीचा चेहरा आठवला.
 झोपेत नकळत हसणारा !

काय गंमत आहे !
तिला होती भुतांची भीती 
आणि माझ्या मनात होती 
असंख्य भीतीची भुतं !
आणि तरीही 

मी तिला तिचा आधार वाटत होतो !