Friday 26 December 2014

काश्मीर डायरी १०



खरं तर आजपर्यंत काही प्रवास केले. काही अभयारण्ये पाहिली. मोठी आणि सुंदर शहरे पाहिली. थंड हवेच्या ठिकाणीही गेलो. पण काश्मीरच्या बाबतीत जे घडलं (किंवा अजूनही घडतंय) असं या आधी कधीच झालं नव्हतं. कुठल्याही जुन्या हिंदी गाण्यात काश्मीर दिसलं की 'अरे! इथे आपण गेलो होतो.' आणि मग स्मरणरंजन चालू होत होतं ! काश्मीरबद्दलची कुठलीही बातमी जास्त इंटरेस्ट घेऊन वाचत होतो/पहात होतो. जणू एवढ्या लांबवर घडणारया बारीकशा गोष्टीचा आणि माझा खूप जवळचा संबंध होता! ही केवळ एक आत्मीयता नव्हती. फार क्वचित असं झालंय की एकदा एखाद्या ठिकाणी जाऊन आल्यावरही पुन्हा पुन्हा तिथेच जाण्याची ओढ मनाला लागली आहे.'साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताची' हे खरं तर प्रपंचाला मृगजळ समजणाऱ्या, प्रपंचाची ओढ न उरलेल्या वैरागी माणसाचे गाणे आहे. पण मला मात्र काश्मीरची हिमशिखरे जगण्यासाठी आणि या प्रपंचात राहण्यासाठी बळ देणारी वाटतात. 
काश्मीर मध्ये इतक्यात परत जाणे शक्य नाही. म्हणून या ब्लॉगच्या माध्यमातून ती हौस भागवून घेत आहे! काश्मीरवर लिहावं असं वाटलं होतं. पण ते इतकं लिहिलं जाईल असं मात्र मुळीच वाटलं नाही. म्हणूच नववा समारोपाचा ब्लॉग लिहूनही पुन्हा एकदा मी हजर आहे ! आम्ही मे महिन्यात काश्मीरला गेलो. तेव्हापासून आतापर्यंत तिथे काही ठळक घटना घडल्या किंवा काश्मीरसंबंधी मला गेल्या काही महिन्यात वाटलं त्याचा या ब्लॉग मध्ये आढावा ! 

मे महिन्यात आम्ही  तिथे गेलो होतो तेव्हा लोकसभा निवडणुकांचा एक टप्पा होता. बाकी आधीच झाल्या होत्या. ३० एप्रिलला  श्रीनगरला मतदान होते. तिथून फारुख  अब्दुल्ला उभे होते. एकूणच अब्दुल्ला घराणे आणि काँग्रेस यांच्याविषयी तीव्र नाराजी तिथल्या लोकांमध्ये असल्याचे जाणवले होते. म्हणून मला निकालाबद्दल उत्सुकता होती. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानही जास्त झाले होते. (आम्ही गुलमर्गहून  परत येत असताना एका मतदान केंद्रावर बॉम्बस्फोट झाल्याचे आम्हांला समजले होते. तरी त्या क्षेत्रातही  एकूण  मतदान बरे झाले) अपेक्षेप्रमाणे अब्दुल्ला आणि काँग्रेस या दोघांचा निवडणुकीत पूर्ण पाडाव झाला. अब्दुल्ला श्रीनगर मधून हरले. तिथे पीडीपीचा उमेदवार निवडून आला. ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या. त्यातही पुन्हा ह्याच निकालांची पुनरावृत्ती होणार अशी चर्चा सुरू झाली. 

                                                                    *******

अशात सप्टेंबरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये अभूतपूर्व पूर परिस्थिती निर्माण झाली. झेलम आणि चेनाब नद्यांना आलेल्या पुराने हाहा:कार माजला. अनेक जण  मृत्युमुखी पडले. पुराच्या पाण्याची आणि त्यामुळे झालेल्या नुकसानाची दृश्ये सर्व channels वर दाखवली जात होती. आणि ती अतिशय भयानक होती.न भूतो न भविष्यति अशा पुराची कारणमीमांसा करणारे काही लेखही वर्तमानपत्रात आले. अनिर्बंध बांधकामे, नियोजनाचा अभाव व त्यामुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आणि नैसर्गिक अशा ड्रेनेज व्यवस्थेवर मानवी अतिक्रमण अशी काही कारणं या पुरासाठी देण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी उत्तराखंड मध्येही अशाच कारणांमुळे पूर येउन अनेकांना प्राण गमवावे लागले होते आणि जबरदस्त हानीही झाली होती.
श्रीनगरला जिथे आम्ही चार दिवस होतो, ते हॉटेल अगदी दल लेक समोरच होते. मध्ये फक्त रस्ता -ज्याचे नाव बुलेवार्ड रोड! पण जी दृश्ये पाहत होत त्यात दिसत होते की हा सगळाच  भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. कित्येक ठिकाणी २-२ मजले पाणी  शिरले होते. दल लेक पूर्णपणे चिखलाच्या पाण्याचा दिसत होता. 

                                                      आम्ही पाहिलेले दल लेक चे हे विहंगम दृश्य....

आणि हे पुराचे भयावह दृश्य ! ....


 हे सगळं हेलावणारं होतं. आपण काहीतरी करावं असं सारखं वाटत होतं. पण इथे एवढ्या लांबून काय करू शकणार? निदान फोन करून काय परिस्थिती आहे हे तरी विचारावं असं वाटलं. डोळ्यासमोर श्रीनगरमधली आम्ही जिथे गेलो होतो ती सर्व ठिकाणं आणि तिथली माणसं आली. जिथे आम्ही राहिलो ते हॉटेल Brown  Palace, तिथला तो नाकी-डोळी आणि वर्णी पौराणिक सिनेमातला हिरो शोभणारा आणि वेळेचा पक्का पाबंद असलेला नझीर नावाचा वेटर आठवला. आमचा ड्रायव्हर शब्बीर, हाउस-बोट मधला इरफान आठवले. काय झालं असेल यांचं ? अस्वस्थपणे मिळतील ते सर्व नंबर फिरवले. अगदी जिथून त्या  पेपर माशेच्या वस्तू घेतल्या त्या दुकानदाराला केला तसेच Brown Palace, शब्बीर सगळ्यांना अनेक वेळा मी आणि माझा मेव्हणा सुनील याने फोन केले. पण संपर्क होऊ शकला नाही. नंबर लागतच नव्हते.शेवटी सैन्यदलातील माझ्या ओळखीचे मेजर यांच्याशी Whatsapp वर संपर्क प्रस्थापित झाला. त्यांची बदली कारगिलला झाली होती. तिथे अजिबातच काही अडचण नव्हती. त्यांचाकडून कळले की ज्यांनी आमची  उडीच्या सैनिकी पोस्टला दिलेली भेट आयोजित केली होती तेही 'सेफ' होते. हे समजल्यावर खूप बरं वाटलं. श्रीनगरमध्ये आम्ही जिथे केशर आणि बाकी बऱ्याच गोष्टींची खरेदी केली होती त्या मुदासीर यांचे दुकान दल लेकच्या अगदी समोर होते. त्यांच्याशीही मोठ्या मुश्किलीने Whatsapp वरच संपर्क होऊ शकला. मला आधी वाटलं होतं की ते ओळखतील की नाही किंवा त्यांना मी हे असे विचारणे आवडेल की नाही. पण तसं काही झालं नाही. मुदासीर हा दुकानाचा व्याप सांभाळण्याआधी एका न्यूज channelच्या मुंबई ऑफिस मध्ये प्रोडक्शन विभागात होते. तिशीतले,गोरेपान,गोबरया गालाचे  बोलायला एकदम गोड असे मुदासीर कामानिमित्त पुण्यालाही येउन गेले होते. त्यामुळे थोडंफार मराठीही बोलले होते. पुराच्या बाबतीत मी चौकशी केल्याचं त्यांना बरं वाटलं असावं. त्यांनी चक्क तिथले काही फोटो पाठवले. भूकंपानंतर जशी पडझड होते तशी अवस्था त्यांच्या दुकानाची झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५५-६० लाख रुपयांचे नुकसान झाले होते. उमर अब्दुल्ला यांनी पूर परिस्थिती नीट  हाताळली नाही असा त्यांच्यावर आरोप होत होता. स्थानिक लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया दाखवल्या जात होत्या. त्याबद्दल मुदासीर यांना विचारलं असता त्यांनी सावध उत्तर दिलं. ते म्हणाले की सरकार, सैन्यदल जे काही करायचं ते करतायत पण इथे परिस्थिती एवढी बिकट आहे की अजूनही काही लोकांपर्यंत पुरेशी मदत पोचली नाही. म्हणून कदाचित त्यांचा संताप झाला असावा. ज्या प्रकारचं संकट होतं त्यामानाने मुदासीर अतिशय धीराचे आणि संयमी वाटले. 
आमच्या शब्बीर ड्रायव्हरशी  मात्र संपर्क होऊ शकला नाही. आणि आता फोन करण्यात फारसा काही अर्थ आहे असं वाटत नाही. 

                                                                          *******

ऑक्टोबरमध्ये काश्मीरची पार्श्वभूमी असलेला, शेक्सपियरच्या 'हॅमलेट' वर आधारित आणि बहुचर्चित 'हैदर' आम्ही पाहिला. वैयक्तिक स्वार्थ, लालसा आणि महत्त्वाकांक्षेसाठी एखादा धूर्त माणूस आजूबाजूच्या अशांत परिस्थितीचा कसा वापर करतो हा भाग सिनेमात चांगल्याप्रकारे दाखवलाय असं मला वाटलं. हा सिनेमा म्हणजे काश्मीर प्रश्नावरील डॉक्युमेंट्री आहे असा आविर्भाव दिग्दर्शकाने कधीच आणला नव्हता. त्यामुळे सर्व बाजूंना पूर्ण न्याय दिला गेला पाहिजे असं काही बंधन नव्हतं. तरीही सिनेमावर उलटसुलट चर्चा, गदारोळ सगळं काही झालंच. सिनेमात जे काश्मीर दाखवलं आहे आणि आम्ही जे पाहिलं ते खूप वेगळं आहे असं वाटलं. 'बिस्मिल' हे गाणं अवन्तीपुरा मंदिरात चित्रित करण्यात आलं आहे. ते ओळखीचं वाटलं. डाउन टाउन श्रीनगर आणि क्वचित दिसणारा दल लेक सोडल्यास सगळंच अपरिचित वाटलं. कदाचित बरंचसं चित्रीकरण थंडीतलं होतं(आणि आम्ही जवळ- जवळ उन्हाळ्यात गेलो होतो ) म्हणून असेल. शिवाय संपूर्ण सिनेमाला एक अशी ग्रे किनार वाटत होती जी आम्हांला अगदीच अपरिचित होती. सिनेमात कामं सगळ्यांचीच छान झाली आहेत. के के मेनन आणि श्रद्धा कपूर यांच्या बोलण्यातला काश्मिरी लहजा मला खूप आवडला. 
या सिनेमातील सुप्रसिद्ध 'बिस्मिल' गाण्याची लिंक देत आहे.  (हे  अवंतिपुरा मंदिराच्या आवारात चित्रित करण्यात आले आहे ) 

                                                                       ******* 
एखाद्या विद्यार्थ्याचा अभ्यास झाला नसेल तर त्याच्या मनात एक वेडी आशा असते की जर परीक्षाच पुढे ढकलली गेली तर? उमर अब्दुल्ला यांच्या मनातही विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत असेच असावे. म्हणून त्यांनी पुराचे कारण पुढे करून निवडणुका पुढे ढकलता येतात का असा प्रयत्न करून पाहिला. पण तसे होणे शक्य नव्हते. प्रस्थापित सरकारविरोधी वातावरण आधीच होते. त्यात पुराने भर घातली. प्रत्येक टप्प्यात मतदानाचा आकडा उत्साहवर्धक होता. भाजपला रोखण्यासाठी का असेना पण जर लोकं मतदानासाठी बाहेर पडत होती तर ते एक सकारात्मक पाउल होते. त्यातच उडी येथील सैनिकी कॅम्पवर अतिरेक्यांनी हल्ला केला. टीव्ही वर जी दृश्ये दाखवली त्यावरून आम्हांला हे नेमकं कुठे घडलं असेल याचा अंदाज आला. उडीची भौगोलिक रचना आपल्यादृष्टीने कशी तोट्याची आहे हे मागे मी लिहिलं होतंच. त्याचाच प्रत्यय या घटनेत दिसून आला.लेफ्टनंट कर्नल या मोठ्या हुद्यावरील ऑफिसरसह आपले काही सैनिक यात मारले गेले हे खूपच दुर्दैवी होतं. २००४ मध्ये ही ते अशा हल्ल्यातून बचावले होते. या वेळी मात्र तसे होणे  नव्हते. 
लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक असे सहा-सात महिन्यात एक वर्तुळ पूर्ण झाले. नवीन सरकार स्थापनेच्या हालचाली अजून सुरू आहेत. काही नवीन शक्यता निर्माण होऊन जम्मू काश्मीर मध्ये एक नवे पर्व सुरु होईल अशी आशा आहे. 

                                                                    *******



                                        


या मधल्या काळात काश्मीर वरील- 'Kashmir : Behind the Vale' हे एम जे अकबर लिखित आणि 'Curfewed Night' हे बशरत पीर लिखित अशी दोन पुस्तके आणली. सांगण्यास अतिशय लाज वाटते की माझी ती अजूनही वाचून झालेली नाहीत. झाल्यावर त्याविषयी कधीतरी लिहिन. . . . हे म्हणजे एखाद्या सिनेमाच्या शेवटी त्याच्या सिक्वेलची बीजं पेरतात तसं झालं ! पण तूर्तास इथेच थांबतो !

No comments: