( 'पर्याय' चा २०१४ चा मन हा विषय होता. या अंकातला हा माझा लेख )
मनोविकाराच्या पेशंटना काही वेळा त्यांची लक्षणे तीव्र
झाल्यामुळे इस्पितळात ठेवावे लागते. काही वेळा इतर काही अपरिहार्य कारणांमुळे
पेशंटची घरी राहून देखभाल होऊ शकत नाही. सरकारी इस्पितळांव्यतिरिक्त खासगी
संस्थांद्वारे देखील अशा पेशंटच्या राहण्याची, उपचारांची आणि शक्य होईल अशा
पेशंटसाठी पुनर्वसनाची व्यवस्था केली जाऊ लागली आहे. ‘चैतन्य
मनोविकार सेवा केंद्र’
हे यापैकी एक! ते बघायला ‘बीकन फाऊंडेशन’ची आमची टीम गेली होती.
पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर जैनांच्या सुप्रसिद्ध
शत्रुंजय मंदिरासमोर 5 मजली दोन इमारतींमध्ये हे केंद्र आहे. मनोविकाराचे पेशंट इथे राहत असल्यामुळे
अर्थातच प्रवेशद्वाराला कुलूप होतं. ते उघडून देणारी व्यक्ती कुठल्याही गणवेशात
नव्हती. इथून आत शिरल्यावर डाव्या आणि उजव्या बाजूला दोन इमारती अशी केंद्राची
विभागणी होती.
आम्ही येणार हे बहुधा तेथे माहित असावं. आम्हाला डाव्या बाजूच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. उजव्या बाजूच्या इमारतीच्या खालच्या भागात बर्यापैकी वर्दळ होती. नर्स, कर्मचारी वर्ग यांच्यात चर्चा सुरू होती. डाव्या बाजूच्या इमारतीत खाली सुसज्ज जिम्नॅशियम होतं. जिन्याने वर आल्यावर आम्ही ऑफिसमध्ये पोचलो. प्रशस्त जागेत स्वागत कक्ष, कार्यालयीन कामाकाजासाठी एक खोली तसेच इतर दोन मोठ्या खोल्या अशी एकूण रचना होती.
आम्ही येणार हे बहुधा तेथे माहित असावं. आम्हाला डाव्या बाजूच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. उजव्या बाजूच्या इमारतीच्या खालच्या भागात बर्यापैकी वर्दळ होती. नर्स, कर्मचारी वर्ग यांच्यात चर्चा सुरू होती. डाव्या बाजूच्या इमारतीत खाली सुसज्ज जिम्नॅशियम होतं. जिन्याने वर आल्यावर आम्ही ऑफिसमध्ये पोचलो. प्रशस्त जागेत स्वागत कक्ष, कार्यालयीन कामाकाजासाठी एक खोली तसेच इतर दोन मोठ्या खोल्या अशी एकूण रचना होती.
‘चैतन्य’चे संचालक श्री. रॉनी जॉर्ज यांच्याशी आमची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर
त्यांच्या खोलीत आम्ही ‘चैतन्य’विषयीची माहिती जाणून घेतली. या कक्षात टेबलावर ‘चैतन्य’ला
विविध उपक्रमांत मिळालेली सन्मानचिन्हं ठेवण्यात आली होती. आमच्या चर्चेच्या
सुरुवातीलाच श्री. जॉर्ज यांच्या पत्नी श्रीमती सुशुप्ती रॉनीही आम्हांला भेटल्या.
परंतु त्यांना एका पेशंटच्या नातेवाईकांशी बोलायचे असल्यामुळे त्या थांबू शकल्या
नाहीत.
अतिशय उत्साहाने श्री. जॉर्ज यांनी ‘चैतन्य’चा
आजपर्यंतचा प्रवास आमच्यासमोर मांडला. अशा प्रकारचे पुनर्वसन केंद्र सुरू
करण्यामागची त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
श्री. जॉर्ज आणि त्यांच्या पत्नी दोघेही MSW आहेत. दोघांचा
विषय Psychiatry! शिकत असतानाच श्री. जॉर्ज यांच्या मनात अशा प्रकारचे केंद्र
सुरू करावे अशी कल्पना होती. त्यानंतर दोघांनी बंगलोरच्या NIMHANS(National Institute of Mental Health And Neuro Sciences) या सुप्रसिद्ध
संस्थेत जाऊन अभ्यास केला. सुशुप्ती रॉनी यांनी तिथे M.Phil केलं. कोलकातामधील
पुनर्वसन केंद्र पाहून झालं. तेव्हा असं लक्षात आलं की पश्चिम भारतात अशी सुविधा
कुठेही नाही. त्यामुळे हे केंद्र सुरू करण्याच्या कल्पनेला पाठबळच मिळालं.
मनोविकाराच्या पेशंटना जेव्हा तीव्र स्वरूपाचा त्रास होतो किंवा जेव्हा त्यांच्या
आजाराचे निदान होते,
तेव्हा त्यांना त्या-त्या आजाराबरहुकूम औषधे दिली जातात. ‘परंतु
त्यानंतर काय?’
हा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांना भेडसावत असतो. पेशंट आणि
नातेवाईकांची हीच गरज ओळखून पुण्यात धनकवडी येथे सुरुवातीला एका छोट्या बंगल्यात 1999 साली ‘चैतन्य’ची
स्थापना करण्यात आली.
याच अनुषंगाने श्री. जॉर्ज यांनी पुनर्वसन या संकल्पनेवर
सविस्तर भाष्य केले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, सर्वसामान्यत: पुनर्वसनाचा
खूपच मर्यादित अर्थ घेतला जातो. मनोविकाराच्या पेशंटचे लग्न झाले किंवा त्याला
नोकरी मिळाली म्हणजे त्याचे पुनर्वसन झाले इतकाच अर्थ पुनर्वसन या शब्दाला नाही.
ही पुनर्वसनाची प्रक्रिया पेशंटच्या आजाराचे निदान होऊन त्यावर औषधोपचार चालू
केल्यापासून सुरू होते आणि ती शेवटपर्यंत अविरत चालूच राहते. याचे मुख्य कारण
म्हणजे मनोविकार हे सहसा पूर्णपणे बरे (Cure) होत नाहीत.
मनोविकार झाल्यानंतर पेशंटची जीवनशैली बदलते. त्याच्या
दिनक्रमात एकप्रकारे शिथिलता येते,
त्याला काहीही करावेसे वाटत नाही किंवा काही वेळा त्याला
त्याचे भान राहत नाही. त्याच्या आधीच्या सवयी बदलतात. म्हणूनच पेशंटला समाजात
मिसळता यावे यादृष्टीने योग्य अशा सवयी लावाव्या लागतात. यासाठी प्रशिक्षण द्यावे
लागते. असे प्रशिक्षण हाही पेशंटच्या पुनर्वसनाचा एक अविभाज्य भागच आहे. ‘चैतन्य’मध्ये
पेशंटच्या मनोसामाजिक (Psycho-social) पुनर्वसनावर भर दिला जातो.
‘‘चैतन्य’मध्ये राहणार्या पेशंटसाठी एक ठराविक आखीव-रेखीव असा दिनक्रम असतो’’, असं
श्री. जॉर्ज म्हणाले. यात सकाळी उठल्यावर वैयक्तिक स्वच्छता या गोष्टीला खूप
महत्त्व दिलं जातं. याबाबतीत सर्वसाधारणत: पेशंट अतिशय उदासीन असतात. यानंतर
व्यायाम आणि मग नाश्ता. नाश्ता आणि भोजन पेशंट आणि सर्व कर्मचारी, डॉक्टर्स
एकाच ठिकाणी एकत्रपणे घेतात. इथे कुठलाही दुजाभाव नसतो.
नंतर थोडा वेळ वाचन,
टी.व्ही. पाहणे यासाठी राखीव असतो. त्यानंतर थोडा वेळ
समूह-चर्चा (Group -discussion ) होतं. पेशंटला आपल्या मनातले विचार मांडण्याचं
प्रोत्साहन याद्वारे मिळतं. त्यानंतरही विविध उपक्रम असतात. उदाहरणार्थ, Group therapy, करमणूक, योगासनं आणि इतर व्यायाम इत्यादी. जे निरोगी असतात किंवा ज्यांना शारीरिक आजार
नसतात त्यांनी संध्याकाळी स्वत:चे कपडे स्वत: धुणे अपेक्षित असतं. यातूनच
स्वावलंबन रूजवले जाते. संध्याकाळी प्रार्थना होते. त्यानंतर रात्रीचे जेवण आणि
रात्री 10 वाजता झोपणे अनिवार्य असते.
इथे प्रत्येक सण साजरा
केला जातो. मग तो गणेशोत्सव असो वा ईद, ख्रिसमस असो की दिवाळी!
सगळेच सण उत्साहाने साजरे केले जातात आणि पेशंटही त्याचा आनंद घेतात. घराबाहेरचे
असले तरी एक प्रकारे घरासारखेच वातावरण ‘चैतन्य’मध्ये असते,
असे श्री. जॉर्ज यांनी नमूद केले.
इथल्या दिनक्रमाशी जुळवून घ्यायला सुरुवातीला पेशंटना जड
जातं. त्यांच्या आजारामुळे त्यांची काही करायची तयारी नसते. त्यांच्या मागे लागावे
लागते. त्यांना push द्यावा लागतो. हे काम इथला स्टाफ करतो. इथे जवळ-जवळ 100
कर्मचारी आहेत. बहुतांश स्टाफ निवासी आहे. त्यापैकी बरेचसे MSW, शिवाय
नर्सेस आणि इतर कामगारही आहेत. नामवंत Psychiatrists इथे दिवसभर उपलब्ध असतात.
तातडीच्या प्रसंगांसाठी इथे चार ambulance गाड्या सतत उपलब्ध असतात.
वेगवेगळ्या प्रकारचे Schizophrenia, Bipolar mood disorders, नैराश्य यासारख्या आजारांचे पेशंट तर इथे आहेतच शिवाय इथे Dementia आणि Alzheimer's च्या पेशंटसाठी स्वतंत्र कक्ष आहे,
ज्याची क्षमता 30 पेशंटची आहे. व्यसनाधीनतेच्या पेशंटसाठीही वेगळा कक्ष आहे. ज्यात दारू तसेच
इतर मादक द्रव्यांमुळे व्यसनाधीन झालेल्या पेशंटवर उपचार केले जातात.
श्री. जॉर्ज यांच्या म्हणण्यानुसार, इथे
दाखल होणार्या पेशंटपैकी सुमारे 30 टक्के पेशंट जवळजवळ नॉर्मल आयुष्य जगू शकतात. स्वत:चीच नाही तर कुटुंबाचीही
जबाबदारी घेऊ शकतात. 30 टक्के पेशंट अंशत: बरे होतात. मात्र 40 टक्के पेशंटमध्ये काहीही सुधारणा होऊ शकत नाही. एकूणच मनोविकाराच्या पेशंटना
सांभाळावे लागते. बर्याचदा छोट्या कुटुंबांना दीर्घकाळ हे शक्य नसते वा त्यांची
तयारी नसते. म्हणूनच अशा पेशंटना ‘चैतन्य’ सांभाळते.
1999 मध्ये ‘चैतन्य’ सुरू केल्यानंतर पहिल्या 6 महिन्यांत कोणीच पेशंट आले नाहीत. मात्र त्यानंतरच्या 6
महिन्यांत 32 पेशंट दाखल झाले. ‘चैतन्य’ची पुण्यात 3 तसेच गोवा,
कोची आणि दिल्ली इथे केंद्र आहेत. सर्व मिळून एकूण 520
पेशंटची काळजी घेतली जाते. सुरुवातीला मात्र पेशंटला उपचारांची गरज आहे हे पटवून
द्यावे लागायचं. याबाबतीत श्री. जॉर्ज यांनी काही उदाहरणं दिली. मुंबईच्या एका बड्या
कंपनीचे प्रमुख मनोविकाराने आजारी होते. त्यांच्या नातेवाईकाने श्री. जॉर्ज यांना
पेशंटच्या घरी बोलावले होते. पेशंट उपचार घ्यायला तयार नव्हता. श्री. जॉर्ज
त्यांच्याशी बोलत असताना अचानक पेशंटने त्यांच्या छातीवर जोरात लाथ मारली.
त्यामुळे श्री. जॉर्ज अक्षरश: फेकले गेले आणि त्यांचं डोकं भिंतीवर आपटलं. तरीही
श्री. जॉर्ज यांनी पेशंटला ताब्यात घेतलं. आधी मुंबई येथे काही काळ उपचार झाले.
त्यानंतर 3 महिने पेशंट पुण्यात ‘चैतन्य’मध्ये राहिला. त्यानंतर तो बरा होऊन आता पूर्ववत काम करू लागला आहे. ‘त्या’ दिवशी
केलेल्या मारहाणीविषयी जे त्यांनी अनेक वेळा दिलगिरीही व्यक्त केली आहे.
आता-आतापर्यंत ते श्री. जॉर्ज यांच्या नियमित संपर्कात होते.
दुसरं उदाहरण सोलापूर मधल्या एका कुटुंबाचं! या एकाच
कुटुंबात तब्बल चार पेशंट! मात्र श्री. जॉर्ज यांना त्यांच्या घरी प्रवेश
मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. आईला paranoid schizophrenia होता. ती
तिच्या मुलीला घरी कोंडून ठेवत असे. घरात कोणी डोकावू नये म्हणून काचांना कागद
लावलेले होते. शिवाय घरी कुत्राही होता. मुलगी स्वत:ही मनोरुग्ण होती. तिला उपचार
मिळणे गरजेचे होते. यासाठी मुलीच्या वडिलांची मदत घेण्यात आली. ‘फ्रीज
दुरुस्त करायला मेकॅनिक आला आहे’
असे निमित्त करून श्री. जॉर्ज कसे तरी त्यांच्या घरी गेले.
मुलीला तिथून बाहेर काढले. तिच्यावर उपचार झाले. ती आता बरी झाली असून, इंजिनियर
झाली आहे. तिचे लग्नही झाले आहे. मग आई आणि तिच्या दोन मुलांवर उपचार झाले.
त्यापैकी एक मुलगा बरा झाला असून,
दुसर्या मुलाचे आजाराचे चढ-उतार चालू असतात.
‘चैतन्य’मध्ये दाखल होण्यासाठी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पेशंटला प्रवेश
देण्याचे हक्क संस्थेच्या आधीन आहेत. या प्रकारची संस्था चालवताना अनेक परवाने, सरकारी
परवानग्या हे सोपस्कार आलेच! त्यांची पूर्तता वेळोवेळी केली जाते.
‘चैतन्य’चा सर्व खर्च पेशंटकडून मिळणार्या फी मधूनच भागवला जातो. ‘चैतन्य’ला
कोणीही देणगी देण्यास पुढे येत नाही,
अशी खंतही श्री. जॉर्ज यांनी व्यक्त केली. दहा
वर्षांपूर्वीच कामशेत येथे जागा घेऊनही,
त्यावर बांधकाम करण्याइतका पैसा जमा होऊ न शकल्याचंही श्री.
जॉर्ज यांनी बोलून दाखवलं. देणगीअभावी गरीब आणि गरजू पेशंट ‘चैतन्य’मध्ये
राहू शकत नाहीत कारण इथला खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे असेही ते म्हणाले.
श्री. जॉर्ज यांच्याशी बोलणं झाल्यानंतर आम्ही ‘चैतन्य’ बघायला
गेलो. ऑफिसच्या वरचे 2 मजले स्त्री पेशंटसाठी राखीव होते. समोरची संपूर्ण इमारत पुरुष पेशंटसाठी
होती. प्रत्येक मजल्यावर बर्यापैकी संख्येने कर्मचारी दिसत होते. पेशंटही
इकडे-तिकडे फिरत होते. पेशंटना कुठलाही गणवेश नव्हता. प्रत्येक खोलीत 3 पेशंट
अशी व्यवस्था होती. श्री. जॉर्ज म्हणाले होते तसंही इमारत जनरल वॉर्डसारखी होती.
कात्रज येथील दुसर्या केंद्रात तसेच वारजे येथे स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था आहे.
इथल्या खोल्यांमध्ये स्वच्छता,
हवेशीरपणा आणि उजेड जाणवला. व्यसनमुतीच्या स्वतंत्र कक्षात
भिंतींवर वेगवेगळे फलक तसेच Serenity Prayer लावण्यात आले आहेत. प्रत्येक
मजल्यावर टी.व्ही. आणि काही ठिकाणी जेवणासाठीची टेबलं मांडली होती.
एकूण व्यवस्थेत एक प्रकारची शिस्त जाणवत होती.
संस्थेतून बाहेर पडताना लक्षात राहिला कर्मचारी वर्गाचा अदबशीरपणा, दिसून
आली त्यांची कामातील गुंतवणूक आणि 520 पेशंटना सेवा देणारे,
ही संस्था स्थापन करून त्यात कालानुरूप सुधारणा करून ती
वाढवणारे जॉर्ज दांपत्य!
(या लेखासाठी डॉ. सदानंद चावरे,
डॉ. विवेक गोवंडे,
डॉ. प्रसाद जोशी आणि डॉ. राजेश पुसाळकर यांनी ‘चैतन्य’ला
व्हिजिट दिली.)