Saturday, 19 November 2016

सलील चौधरी: एक अभिजात संगीतकार !

आज सुप्रसिद्ध संगीतकार सलील चौधरी यांचा जन्मदिवस !(१९.११.१९२५) खरं तर ते केवळ संगीतकारच नव्हते तर कवी, कथाकार, पटकथाकारही होते. हिंदी, बंगाली, मल्याळम आणि इतर दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं . शिवाय ते काही चित्रपटांना फक्त पार्शवसंगीत देत. 
लोकसंगीत आणि पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचा हिंदी चित्रपट संगीतात सुंदर मिलाफ करणारा हा संगीतकार !(मोझार्टच्या ४० नं सिम्फनीवरून 'छाया' चित्रपटातले 'इतना ना मुझसे तू प्यार बढा' हे गाणे त्यांनी तयार केले होते हे आपल्याला माहीत असेलच!) त्यांच्या गाण्यांमध्ये त्यांनी गिटार, बासरी, सतार,सॅक्सोफोन सारख्या वाद्यांचा वापर केला आणि कॉयरचं अतिशय वैशिष्ठयपूर्ण मिश्रणही !
जरी त्यांनी बिमल रॉय( 'दो बिघा जमीन','मधुमती','नौकरी','परख','बिराज बहू', 'प्रेम पत्र'),हृषिकेश मुखर्जी('मुसाफिर','छाया','मेम दीदी','आनंद','सबसे बडा सुख'),आर के फिल्म्सच्या  'जागते रहो' या सारख्या अव्वल बॅनरच्या चित्रपटांना संगीत दिलं असलं तरी तुलनेने कमी प्रसिद्ध दिग्दर्शक(उदा- डी डी कश्यप यांचा 'माया', कालिदास यांचा 'हाफ टिकिट') तसंच नामांकित दिग्दर्शकांच्या उतरत्या काळात(उदा-असित सेन यांचा 'अन्नदाता','अनोखा दान') आणि त्या काळच्या नवख्या दिग्दर्शकांबरोबरही (उदा-गुलजार यांचा- 'मेरे अपने', बासू चॅटर्जी यांचे 'रजनीगंधा', 'छोटीसी बात') त्यांनी तेवढ्याच उत्कृष्ठ दर्जाचं काम केलेलं आहे. काहीवेळा असंही झालंय की असे चित्रपट विस्मृतीत गेले आहेत पण त्यातील सलील चौधरींची सुमधुर गाणी मात्र लक्षात राहिलेली आहेत. 
अशीच काही गाणी इथे देत आहे-
१) 'प्रेमपत्र' या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांचं हे युगुलगीत- 'सावन की रातों में ऐसा भी होता है'. यात गद्य आणि पद्याचा छान मेळ आहे. तसंच लता मंगेशकर यांचा तिन्ही सप्तकांत फिरणारा आवाजही! तलत मेहमूद यांच्या काहीशा पडत्या काळातलं गाणं आणि तेही शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं! 

२) हे 'संगत' या चित्रपटातलं गाणं- पुन्हा एकदा युगुलगीत- लता मंगेशकर आणि मन्ना डे यांनी गायलेलं! 'कान्हा बोले ना' ! काय सुंदर चाल आहे! कुठल्याही वाद्याच्या साथीशिवाय लता मंगेशकर यांनी गायलेला मुखडा लाजवाब ! एवढ्या चांगल्या गाण्याचं दुर्दैव हे की ते राकेश पांडे आणि कजरी यासारख्या अपरिचित नटांवर चित्रित झालं आहे. इथेच दुर्दैव संपत नाही. हा चित्रपट त्यावेळी प्रसिद्धच होऊ शकला नव्हता! त्यातल्या त्यात चांगली गोष्ट ही की निदान गाण्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे. 

३) आता पुढच्या गाण्यात सलील चौधरींच्या संगीतातील बरीचशी वैशिष्ट्ये आहेत (अगदी कॉयर सकट!) शिवाय या गाण्यातला नाजूकसा ठहराव खूपच छान आहे. गाणं आहे- 'रातों के साये घने'. चित्रपट 'अन्नदाता'. या चित्रपटांत जरी जया भादुरी असली तरी तो फारसा काही चालला नव्हता. 

४) पुढचं गाणंही त्याच 'अन्नदाता' चित्रपटातलं आणि पुन्हा एकदा ठहराव असलेलं! पण गायलंय मुकेश यांनी-'नैन हमारे सांज सकारे देखे लाखों सपने'. अनिल धवन सारख्या ठोकळेबाज नटाच्या तोंडी असं सोन्यासारखं गाणं देऊन दिग्दर्शकांनी गाण्यावर खरोखरंच अन्याय केला आहे. 

५) हे गाणं आहे 'बिराज बहू' चित्रपटातलं- 'मेरे मन भूला भूल काहे डोले' ! पूर्णतःबंगाली संगीताची छाप असलेलं! या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे तीन संगीतकारांचं गाणं आहे- याचे गीतकार आहेत प्रेम धवन( ज्यांनी 'पवित्र पापी', 'शहीद' यासारख्या चित्रपटांना संगीत दिलं आहे.) गायक आहेत हेमंतकुमार( यांचे संगीतकार म्हणून अनेक चित्रपट गाजलेले आहेत हे वेगळं सांगायला नकोच!) आणि संगीतकार अर्थातच सलील चौधरी! आपल्या मराठीत तीन संगीतकारांनी मिळून केलेलं एक सुप्रसिद्ध गाणं आहे- स्वर आले दुरुनी(गीतकार यशवंत देव, संगीतकार प्रभाकर जोग आणि गायक सुधीर फडके!)
https://www.youtube.com/watch?v=2DsZAVyEOnY

६) हे पुढचं गाणं आहे 'आनंद महल' चित्रपटातलं! 'नि सा ग म प नी सा रे ग .. आ आ रे मितवा' हे येसूदास यांनी गायलेलं गाणं ! या गाण्याचा व्हिडिओसुद्धा उपलब्ध नाही.चित्रपटांत विजय अरोरा हिरो आहे त्यामुळे गाण्याचा व्हिडिओ नाही हे चांगलंच आहे म्हणायचं ! या गाण्यात ईसराज हे वाद्य ऐकू येतं. सलील चौधरी स्वतः ते वाजवत. या गाण्यात त्यांनी ते वाजवलंय का हे माहित नाही. 
https://www.youtube.com/watch?v=NjziC6b_zJc

७) आणि हे शेवटचं गाणं आहे 'हनिमून' चित्रपटातलं- 'मेरे ख्वाबो में खयालो में छुपे'! मुख्य स्वर आहे मुकेश यांचा. पण प्रत्येक अंतऱ्यात लता मंगेशकर यांनी अफलातून आलापी गायली आहे. त्यावरून नायिकेचा उत्फुल्ल, आनंदी मूड सहजच लक्षात येतो.
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwj-o5GHw7LQAhVCQY8KHakyBBoQtwIIGzAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DXVHD0S4gMrY&usg=AFQjCNH8BRPr8gWlUUn8cwIDPtqwAla1Rw&sig2=GUOVGDDYDGa1CGVdBIk4Sw


Tuesday, 15 November 2016

'पोस्टमेन इन द माउंटन्स' : मनात वस्तीला आलेला सिनेमा !



'पोस्टमेन इन द माउंटन्स' हा मँडरिन भाषेतला १९९९ सालचा सिनेमा ! म्हणजेच तब्बल १७ वर्षांपूर्वीचा ! त्यावर बऱ्याच जणांनी लिहिलंही आहे. सुप्रसिद्ध लेखक आणि समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी त्यांच्या 'साप्ताहिक साधना' मधल्या - 'पडद्यावरचे विश्वभान' या सदरात या सिनेमावर सुंदर लेख लिहिला होता. मी मात्र हा सिनेमा नुकताच पाहिला.(आमच्यापर्यंत कुठलीही क्रांती पोचायला तसा उशीरच होतो !) त्यावर आता मी आणखी वेगळं (आणि सिनेमा येऊन इतकी वर्षं झालेली असताना) काय लिहिणार ? पण या सिनेमाने मनात अक्षरश: घर केलं आणि लिहिल्याशिवाय मला राहावलं नाही. म्हणून हे टिपण !

या सिनेमात खून, हाणामाऱ्या, चोरी- डाका, अत्याचार, हेराफेरी, अफरातफरी, कट-कारस्थानं  असलं नाटयमय काहीही नाही. बॉलीवूड सिनेमांत असतात तशी गाणीही नाहीत. आणि तरीही तो एक उत्कृष्ठ सिनेमा आहे. त्याची गोष्टही तशी साधीच. चीन मधल्या एका प्रांतात एका पोस्टमनला पायदुखीमुळे सक्तीची निवृत्ती घ्यावी लागते. त्याच्या जागी त्याचाच मुलगा कामावर रुजू होतो. मुलाला सगळं काम समजावून सांगण्यासाठी वडील शेवटचं म्हणून त्याच्याबरोबर त्या प्रांतात जातात. या तब्बल २२३ किलोमीटरच्या पायपिटीच्या दरम्यान घडणारे प्रसंग आणि त्यातून वडील आणि मुलगा यांचं उलगडत जाणारं नातं हाच या सिनेमाचा गाभा!

हा संपूर्ण प्रवास होतो तो अतिशय हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत! भातशेती,चहाचे मळे, बांबूची वने, डोंगर-दऱ्या, नदीचा शांत प्रवाह अशा कॅनव्हासवर हा नेत्रसुखद सिनेमा घडतो. ही सगळी वाट दूरची आहे, गावागावांमधून जाणारी आहे, पण कष्टाची आहे.  वाट अवघड आहे, काही ठिकाणी तर अतिशय खडतर आहे पण निसर्ग रौद्र नाही. सतत त्या दोघांची साथ करणारा आहे.

सिनेमातले मला आवडलेले प्रसंग-
१) घरातून वडील, पाठीवर टपालाची जड बॅग घेतलेला मुलगा आणि त्यांच्याबरोबर वडिलांच्या नेहमीच बरोबर राहणारा त्यांचा इमानी कुत्रा लाओ असे तिघे निघतात. खरं तर मुलाला वाटत असतं की पाय दुखत असताना वडिलांनी त्याच्याबरोबर येऊ नये. पण वडील त्याला त्याची जबाबदारी समजावून सांगायला येतात. त्यात कुत्रा पण बरोबर असणं मुलाला पटत नाही . पण वडील सांगतात की  ते जिथे जिथे जातात तिथे त्याच्या भुंकण्याने लोकांना वर्दी मिळते की  पोस्टमन आला आहे. काहीशा अनिच्छेने मुलगा लाओला घेऊन जायला तयार होतो. तिघांचा प्रवास सुरू होतो. डोंगराची चढण सुरू होते. पाठीवर जड बॅग असल्यामुळे मुलाला सुरवातीला चढण चढणे अवघड जाते. समोरून येणाऱ्या लोकांना वाट देण्यात तो अडखळतो. वडील त्याला त्याबद्दल समजावून सांगतात- जे त्याला अर्थातच आवडत नाही. पुढे गेल्यावर मुलगा एके ठिकाणी थांबतो. मागून वडील येत आहेत असं त्याला वाटतं. पण बराच वेळ झाला तरी ते येत नाहीत. बॅग तिथेच ठेवून तो त्यांना शोधायला परत फिरतो. थोडा मागे गेल्यावर त्याला ते आणि लाओ दिसतात. पण वडील मात्र त्याला रागावून विचारतात की बॅग कुठे आहे? बॅग सुरक्षित असते पण या प्रसंगातून वडिलांची त्यांच्या कामाबद्दलची निष्ठा दिसून येते. आणखी एका छोट्याशा प्रसंगातूनही ती दिसते. ते तिघे दमून एका झोपडी वजा घरात विश्रांती घेत असतात. वडील पाय दुखतो म्हणून चक्क स्वत:च पायावर हलकेच बुक्का मारत असतात. अचानक जोराचा वारा येतो आणि त्या टपालाच्या बॅगेतली पत्रं वाऱ्याने उडून जाऊ लागतात. हे दिसताच वडील आपल्या पायाच्या दुखण्याचा विचार न करता अक्षरश: धावत जातात आणि ती पत्रं गोळा करतात.

२) सिनेमात वडील आणि मुलाचे नाते उलगडत जाते. काही वेळा फ्लॅशबॅक तंत्राने तर काही वेळा या प्रवासादरम्यान घडणाऱ्या प्रसंगांमधून! वडील सतत घराबाहेर राहिलेले! महिन्यातून फक्त एकदाच घरी येणारे! त्यामुळे मुलगा आणि वडील यांच्यात फारसे काही नाते निर्माण होऊच शकलेले नसते. मुलाच्या मनात कायम त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती! त्यांच्या जायच्या आणि यायच्या वेळी मुलगा आणि आई घराबाहेर उभे राहून त्यांची वाट पाहणार वा त्यांना मूक निरोप देणार! दोघांमध्ये एक प्रकारचे अदृश्य अंतर ! आणि तरीही मुलगा वडिलांचेच काम निवडतो. यात माझ्यामते त्याच्या आईने बजावलेली buffer/catalyst ची भूमिकाही तेव्हढीच महत्त्वाची असणार ! तिने दोघांचे नाते सांधायचा प्रयत्न केला असणार. म्हणूनच मुलाच्या मनात वडिलांविषयी राग नाही. मुलाला आपल्या आईचा एकटेपणा माहीत आहे कारण तो तिच्याजवळच राहिला/वाढला आहे. पण आपले वडील कसे आहेत हे समजण्याएवढा त्यांचा सहवासही त्याला मिळालेला नाही.  हा सध्याचा प्रवास करता करता मात्र आपले वडील कोणत्या खडतर परिस्थितीत कशा प्रकारे काम करत होते हे त्याला उमगू लागते.पोस्टमन म्हणून त्यांनी फक्त टपाल वाटणे एवढेच रूक्ष काम केलेले नसते. तर तो गावोगावच्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालेला असतो. एक अंध आजी त्याच्या येण्याच्या दिवशी घराच्या दारात त्याची वाट बघता असते. कारण तिच्या नातवाचे पत्र हा घेऊन येणार हे तिला माहीत असते. शिवाय पैसेही ! पैसे तर आलेले असतात पण पत्र मात्र नसते. तिला वाईट वाटू नये म्हणून वडील नातवाचे पत्र म्हणून कोरा कागदच वाचतात. मुलाला आधी काही लक्षातच येत नाही. पण थोडंसं वाचल्यावर वडील मुलाला पुढचं वाच असं सांगतात. मुलगा वेळ निभावून नेतो.
३) वडील जिथे जातील तिथल्या लोकांना आता यापुढे त्यांचा मुलगा त्यांचं काम करायला येईल हे सांगतात. तेव्हा गावातल्या लोकांच्या कौतुकमिश्रित नजरा, त्यांचं निरागस हसणं वडिलांनी आजपर्यंत जोडलेल्या संबंधांची पावतीच दर्शवतात.
४) एकमेकांच्या सहवासामुळे दोघांमधले अंतर कमी होऊ लागते. मुलगा सहजपणे वडिलांना 'पा' म्हणून जातो. आपला मुलगा आपल्याला पा म्हणाला याचा वडिलांना विलक्षण आनंद होतो. ते लाओ कुत्र्याला म्हणतात- 'ऐकलंस का लाओ? माझा मुलगा मला 'पा' म्हणाला !'
५) वाटेत एका ठिकाणी नदी लागते. ती चालत ओलांडून पुढे जायचं असतं. पाणी खूप गार असतं. वडिलांचे पाय दुखतील म्हणून तो त्यांना पाण्यात उतरू नका असं सांगतो. आधी बॅग घेऊन मुलगा एक फेरी करतो. आणि परत येऊन वडिलांना चक्क पाठीवर घेतो आणि नदी ओलांडू लागतो. मुलाच्या मनात आनंद दाटलेला असतो कारण त्याच्या गावाकडची माणसं म्हणत -मुलगा मोठा केव्हा होतो? जेव्हा तो आपल्या वडिलांना पाठीवर घेऊन जाऊ शकतो तेव्हा ! म्हणजे आपण आता मोठे झालो याचा आनंद मुलाला होतो. त्याचवेळी वडिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. कदाचित संमिश्र भावनांनी ! मुलगा मोठा झाला याचा आनंद, आपण आता या रस्त्याने परत येणार नाही आणि आपलं आता वय झालं याचं दु:खही !

६) सिनेमात लाओ कुत्रा हे पण एक महत्त्वाचं पात्र आहे. वडील-मुलगा यांच्या संपूर्ण प्रवासात हा एक मूक साथीदार त्यांच्याबरोबर आहे. त्याच्या भुंकण्याने गावाला समजतं की पोस्टमन आला आहे. एका ठिकाणी ते येतात तर एक उंच कडा लागतो. तो चढून गेल्यावरच पुढचं गाव येणार असतं. लाओ भुंकतो आणि अचानक कड्यावरून एक मोठी दोरी खाली फेकली जाते.तिच्या साहाय्याने रॉक  क्लाइंबिंग करून दोघे वर येतात. ती दोरी त्या गावातल्या एका तरुणाने फेकलेली असते. हा जणू त्यांचा नेहमीचा शिरस्ताच असावा !
७) सिनेमाचा शेवट खूपच सुंदर आहे. सगळा प्रवास करून दोघे घरी परत येतात. नंतर पुन्हा जायची वेळ येते तेव्हा मुलगा एकटा बॅग घेऊन निघतो. वडील दारात बसलेले असतात. आधीच्या प्रवासातला अनुभव गाठीला असल्यामुळे मुलगा आत्मविश्वासाने झपझप पावले टाकत चालू लागतो. वडिलांकडे तो मागे वळून बघतही नाही. लाओ गोंधळून जातो. मुलाबरोबर जावं की वडिलांबरोबर थांबावं हे त्याला समजत नाही. तो घुटमळून वडिलांपाशी येतो. वडिलांचं लक्ष मुलाकडे असतं. आपलं काम मुलगा नीट सांभाळेल याची खात्री, मुलाबद्दलचे कौतुक हे भाव तसंच लाओच्या आजपर्यंतच्या साथी  बद्दलची कृतज्ञता ही त्याच्या चेहऱ्यावर दिसते. मुलाबरोबर आपण जाऊ शकणार नाही पण आपला विश्वासू साथीदार त्याची तशीच साथ करेल म्हणून तो लाओला कुरवाळतो आणि मुलगा जातो त्या दिशेने लाओला पाठवतो!

तर असा हा नितांतसुंदर सिनेमा ! या सिनेमात वडिलांची भूमिका केली आहे तेन रुजून यांनी तर मुलाचे काम लिऊ ये ने ! दोघांचीही कामे अतिशय सुरेख आणि नैसर्गिक !
या सिनेमाच्या ट्रेलर ची लिंक इथे देत आहे. A must see movie...
https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=3&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjEg9SovarQAhUFMY8KHT3KC3MQtwIIKDAC&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DI-5jtrc3vvo&usg=AFQjCNG28hTxxmTb4-j2LhUx6kriJmmG4w&sig2=8bok2cnOTs9Tseil357YJw