Saturday 19 January 2019

'भाई : व्यक्ती की वल्ली' (सिनेमा)च्या निमित्ताने....



'भाई' सिनेमा येऊन दोन आठवडे झाले तरीही अजून त्यावरील (बहुतांशी नकारात्मक) चर्चा/वाद  थांबत नाहीत. म्हणून अजूनही माझे मत मांडायला खूप काही उशीर झाला आहे असं मला वाटत नाही. 
सर्वप्रथम हे सांगतो की माझ्या पिढीतल्या सगळ्यांप्रमाणेच माझे देखील पु. ल. देशपांडे हे अत्यंत आवडते लेखक आहेत. माझा एक मोठा काळ त्यांच्या लिखाणामुळे खूप आनंदात गेला याचं ऋण कायमच माझ्या मनात राहील. (माझा ब्लॉग नंबर १०२ हा पुलंवर त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लिहिलेला आहे. तो ही आपण वाचू शकता.)


आता सिनेमाविषयी आणि त्यावर घेतल्या गेलेल्या आक्षेपांविषयी-

१) बऱ्याच जणांना सिनेमात पु. ल. देशपांडे सिगरेट ओढताना (तेही त्यांच्या आई समोर !) आणि दारू पिताना दाखवले आहेत हे खूपच खटकलं आहे. मला दारू सिगरेटचं समर्थन करायचं नाही (स्वतः चे कौतुक म्हणून नाही पण तरीही सांगतो -आजवर मी या गोष्टी कधीच शिवल्या नाहीत) पण जर पु ल स्वतः या गोष्टी करत होते तर ते दाखवण्यात गैर काय आहे हे मला कळलेलं नाही. आणि मुख्य म्हणजे याबाबतीत पु ल मोकळेपणे बोलत/ लिहीत असत. त्यांच्या 'अंतू बर्वा' या कथाकथनाच्या ऑडिओ मध्ये त्यांनी सुरुवातीलाच हे सांगितलं आहे की ते बापू हेगिष्टेच्या दुकानात सिगरेट आणायला गेले होते तिथे त्यांना पहिल्यांदा अंतू बर्वा भेटले. त्यांनी हे इतकं सहज सांगितलं आहे की असं वाटावं की ते एखाद्या किराणा मालाच्या दुकानात काही सामान आणायला गेले होते! म्हणजे या सांगण्यात काही चोरी-छुपेपणाचा अंशसुद्धा नाही !कथाकथन ऐकणाऱ्या श्रोत्यांसमोर तेव्हा ही गोष्ट उघडच झाली ना ! म्हणजेच जी गोष्ट सगळ्यांना माहीत आहे ती लोकांसमोर मांडल्याने असा काय फरक पडतो?
 ('अंतू बर्वा'ची लिंक देत आहे. कृपया २.१४ मि ऐकावे)
https://www.youtube.com/watch?v=JRs0PxdLC6o

तसंच पु. लंनी मदिरा आणि मदिरापान याविषयी त्यांच्या प्रवासवर्णनांत रसिकतेने लिहिलेलं आहे. त्यांनी आयुष्याचा मनमुराद आस्वाद घेतला. पण मला नाही वाटत या गोष्टींमुळे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडतात वा त्यांच्या लिखाण किंवा इतर क्षेत्रांतील कर्तृत्व आणि मुशाफिरीवर या गोष्टींमुळे उणेपणा येतो. 

२) मला असं वाटतं की इतर कुठल्याही चित्रपटापेक्षा या सिनेमाच्या बाबतीत खूपच चिकित्सा केली जात आहे. छोट्यातल्या छोट्या तपशिलाच्या चुका दाखवून दिल्या जात आहेत.याचं मुख्य कारण लोकांच्या मनांत अजूनही पुलं हे आराध्यदैवतच आहेत ! आणि मराठी माणूस त्याच्या दैवताबद्दल काहीही 'वावगं' ऐकायला/बघायला तयार होण्याची शक्यता तशी कमीच! आपल्याला महात्मा गांधी किंवा नेहरूंविषयी चर्चा करण्यात काहीही प्रॉब्लेम नसतो(अगदी त्यांच्या खाजगी आयुष्यासकट!) पण पुलं (आणि इतर काही मराठी व्यक्तिमत्वे यांच्या) बद्दल आपण नको इतके हळवे होतो. या सगळ्याच (मराठी) व्यक्तिमत्वांची चिकित्सा करता येत नाही. अजून आपण दारू/सिगरेट यातच अडकलो आहोत तर पुलंच्या साहित्याविषयी आणि ते कालातीत आहे की  नाही यावर  साधकबाधक चर्चा/समीक्षा होणार तरी कधी आणि कशी? 

३) सिनेमाबद्दल लोकांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात सिनेमा वेगळा असणं यात एक तफावत आहे याचं एक कारण मला वाटतं की सिनेमात बऱ्याचवेळा सुनीताबाई देशपांडे यांच्या 'आहे मनोहर तरी' चे संदर्भ/प्रसंग  येतात किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून सिनेमातील  प्रसंग दिसतात. खरं तर सिनेमात पुलं आणि सुनीताबाई यांचं उमलत जाणारं नातं खूप छान पद्धतीनं मांडलंय. पुलंचा वेंधळेपणा,विसरभोळेपणा,एखाद्या लहान मुलाप्रमाणे स्वतः मध्ये रममाण असणं, त्यांच्यातली निरागसता हे छान दाखवलं आहे. पुलं आणि सुनीताबाई यांच्या पती- पत्नी या नात्यामध्ये मूल आणि आई या नात्याचा पोत दाखवणं हे खरं तर अवघडच! पण तेही सहजपणे येतं.उदा - 'अंमलदार' नाटक लिखाणाच्या प्रसंगात लहान मुलाला कसं -तू अमुक अमुक केलंस तर तमुक तमुक देईन- सांगतात, त्याच पद्धतीनं सुनीताबाई पुलंकडून एका रात्रीत नाटक लिहून घेतात. 

४) 'आहे मनोहर तरी' मुळे सर्वप्रथम लोकांना पु ल या त्यांच्या प्रिय दैवताची मानवीय बाजू समजली आणि धक्का बसला. (पहिल्यांदा वाचल्यावर त्यावेळी मलाही तो बसला होता) पण आजही लोकांना तसाच धक्का बसत आहे  हे बघून सखेद म्हणावं लागेल की 'आहे मनोहर तरी' कदाचित शहरो-शहरी (वा गावो गावी) गेलं, लोकांनी वाचलं पण लोकांच्या मनापर्यंत पोचलं नाही. ते म्हणावं तसं स्वीकारलं गेलं नाही. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं. या पुस्तकाची आवृत्ती संपली असेल तर ती नव्याने उपलब्ध व्हावी असं वाटतं. 

५) सिनेमाच्या शेवटी दाखवण्यात आलेल्या मैफिलीबद्दलही बरेच आक्षेप घेण्यात आले आहेत. पण मला तर हा प्रसंग पटकथाकार- संवादलेखक आणि दिग्दर्शकाचा खास टच म्हणून अफलातून वाटतो. बायोपिकमध्ये जुना काळ फक्त केशभूषा, वेशभूषा, नेपथ्य यातूनच उभा करायचा नसतो तर तो काळ, त्यामधील लोकांचे नातेसंबंध हे देखील लोकांसमोर आणायचं असतं. काय काळ असेल पुलं आणि भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व यांचा ! सगळेच ऐन उमेदीत... बहरत असणारे ! आणि जिवाभावाचे मित्र देखील! त्यांच्यात निखळ मैत्री होती आणि निकोप स्पर्धाही ! आपल्याला कोणालाच हा काळ प्रत्यक्षात अनुभवता आलेला नाही. पण या सगळ्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न या शेवटच्या मैफिलीतून करण्यात आला आहे. आणि हा केवळ दृक अनुभव नाही तर श्राव्य अनुभवसुद्धा आहे ! त्या तीन दिग्गज कलाकारांच्या आवाजाशी साधर्म्य असणारे जयतीर्थ मेवुंडी, राहुल देशपांडे आणि भुवनेश कोमकली यांच्या बहारदार गाण्याने या प्रसंगात आणखी रंगात निर्माण होते.(यासाठी संगीतकार अजित परब यांनाही श्रेय जाते !) सिनेमात हा प्रसंग बघताना मंगेश पाडगांवकर यांचे शब्द उसने घेऊन म्हणावंसं वाटतं- 'भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा' ! त्यामुळे हा प्रसंग बघत असताना हिराबाई टाळ्या कशा वाजवतील, त्यांच्या घरात दारूच्या बाटल्या कशा? या गोष्टी मनात आल्यासुध्दा नाहीत ! 
बरं या मैफिलीचा पुलंच्या लेखक म्हणून जडणघडणीशी काही संबंध आहे का? नक्कीच आहे. सर्जनशीलतेसाठी समृद्ध अशा वातावरणात पुलं राहिले त्याचा त्यांच्या लिखाणावर नक्कीच सकारात्मक परिणाम झाला असेल.

६) ज्यांनी या सिनेमावर इतके आक्षेप घेतले आहेत त्यांनी हेही विचारात घ्यावं की हा सिनेमा एक बायोपिक आहे. म्हणजे या दिग्दर्शकाला पु ल जसे उमगले/ भावले तसे त्याने ते मांडायचा प्रयत्न केला आहे. ही पुलंवरची डॉक्युमेंटरी नव्हे! त्यामुळे सिनेमात अपेक्षित असतं तसं नाट्य निर्माण करण्यासाठी थोडीफार सिनेमॅटिक लिबर्टी घेणं स्वाभाविक आहे. त्यात काही गैर नाही. या सगळ्याचा हेतू(intent) महत्त्वाचा ! आणि दिग्दर्शक आणि सगळ्याच टीमचा हेतू प्रामाणिक आहे यात काहीच शंका नाही. 

७) मला असं वाटतं की 'भाई' हा सिनेमा एक स्वतंत्र कलाकृती म्हणून बघितला जावा. त्याचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत आणि त्यांचे आधीचे चित्रपट कसे वाईट होते. म्हणून हाही सिनेमा वाईट आहे असे निष्कर्ष काढू नयेत. किंवा या सिनेमाची तुलना 'आणि डॉ काशिनाथ घाणेकर' शीही  करू नये. कारण असं करणं म्हणजे या सिनेमाकडे पूर्वग्रह दूषित नजरेने बघण्यासारखं आहे आणि ते सिनेमावर अन्यायकारक आहे.
(ज्यांनी अजून 'भाई : व्यक्ती की वल्ली'(पूर्वार्ध) हा सिनेमा पाहिलेला नाही त्यांच्यासाठी सिनेमाच्या ट्रेलरची लिंक देत आहे )-
https://www.youtube.com/watch?v=FbcKVZ1IPDw

1 comment:

Unknown said...

From Shreepad M Gandhi

मी हा सिनेमा बघितला नाही. आणि बघण्याइतका 'ड्राईव्ह' नाहीये...बघणारच नाही असंही नाही... कदाचित जमून जाईल...कदाचित नाही... असो.
व्यक्ती आणि वल्ली यांतील प्रत्येक व्यक्तीचित्रण मला खूप आवडतं. इतकं की बरेचसे संपूर्ण पाठ आहेत. यांत काही मोठेपणा सांगायचा अजिबात हेतू नाही. पण जे आपल्याला आवडतं ते लक्षांत ठेवायला अजिबात कष्ट घ्यावे लागत नाहीत एवढं खरं. (न आवडणारे लोक मात्र विसरले का जात नाहीत हा एक वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. हा: हा: :) :)

धूम्रपान याबद्दल बोलायचं तर पुलंच्या सवयीबद्दल सर्वश्रुत आहे. बरेच कलाकार कसलीन् कसली 'हौस' करतातच...त्याच्या वर एक स्वतंत्र लेख लिहीता येईल (म्हणजे तूच लिही...मी कमेंट टाकेन 😂😂)...गंमत राहू दे...पण राजकपूर, शम्मीकपूर, मीनाकुमारी, फिरोझखान, किशोरकुमार आणि आणखीहि बरेच 'फिल्लम लाईन' मधले महारथी यांच्या एक एक सवयी सुध्दा वाचकांची यथेच्छ करमणूक करतात.
ती देवयानी चौबळ बिनधास्त लिखाण करायची याबद्दल पूर्वी. असो. मला पंचमची नावडणारी गोष्ट म्हणजे धूम्रपान. पण काय करणार? दुर्लक्ष करायचं झालं. म्हणजे मग जसा पु.लं.च्या काही चाहत्यांना हा सिनेमा बघून त्रास झाला तसा होणार नाही. असो.