Wednesday 23 January 2019

'शम्मी कपूर... तुमसा नहीं देखा' अनुवादक :मुकेश माचकर

Shammi Kapoor

"शम्मी कपूरचा पडद्यावर स्फोट होण्याच्या आधीचे नायक अगदीच शामळू होते. मिळमिळीत,गुळमुळीत,अतिआदर्शवादी आणि मचूळ. बिचारे नायिकेशी प्रणयही असा करायचे जणू नाइलाजाने एरंडेल पितोय. ... ज्याच्याकडे पाहून बहकावं, उधळावं, घुसळावं असा कोणी नायकच नव्हता तरुणांच्या डोळ्यांसमोर...." हा ब्लर्बवरचा मजकूर वाचून 'शम्मी कपूर... तुमसा नहीं देखा' हे रौफ अहमद लिखित (मूळ पुस्तकाचं नाव- Shammi Kapoor- The Game Changer) आणि श्री. मुकेश माचकर अनुवादित पुस्तक लायब्ररीतून लगेच घेतलं आणि जवळजवळ एका बैठकीत वाचून संपवलं.  ब्लर्बवर असलेली भाषा ज्यांना मुकेश माचकरांची 'म.टा' पासूनची लिखाणाची खमंग  शैली माहित आहे त्यांच्यासाठी नवी नाही. अर्थात या पुस्तकाच्याबाबतीत बोलायचं तर मुकेश माचकर स्वतंत्र लेखक नसून एका अनुवादकाच्या भूमिकेत आहेत. पण तरीही या पुस्तकाच्या लिखाणाला  एक ओघ आहे आणि त्यामुळे ते खाली ठेवावंसं वाटत नाही.

श्री माचकर प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणेच माझाही शम्मी कपूर यांच्याबरोबर कधीच वास्ता नाही आला. आता विचार करता लक्षात येतंय की मी त्यांचा एकही सिनेमा थिएटर मध्ये पाहिलेला नाही. कारण मीही ७० च्या पिढीचा म्हणजेच राजेश खन्ना-अमिताभ च्या पिढीचा प्रतिनिधी! पण पुस्तक वाचताना माझ्या लहानपणी आमच्या सोसायटीत त्यावेळी राहणाऱ्या रोहित दंडवते या आमच्या परिचिताची खूप आठवण आली. तो माझ्याहून ६-७ वर्षांनी मोठा असेल. अतिशय हुशार पण तरीही पुस्तकी किडा वगैरे नव्हता. एकदम मिश्किल, मार्मिक बोलायचा. त्याला शम्मी कपूर खूप आवडायचा आणि तो आम्हांला शम्मीच्या 'जंगली', 'काश्मीर की कली', 'तीसरी मंझिल' मधले प्रसंग, त्यातली गाणी वगैरेंबद्दल छान रंगवून सांगायचा. (त्याने तेव्हा असंही सांगितलं होतं की शम्मी कपूरच्या प्रत्येक सिनेमात एक गाढव दाखवतातच! खरं खोटं माहित नाही ) तेव्हा पहिल्यांदा शम्मी कपूरबद्दल कळलं. आणि हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे हे ही लक्षात आलं. त्यानंतर दूरदर्शनवर पाहिलेले शम्मी कपूरचे सिनेमे आणि त्याच्या समकालीन नटांचे सिनेमे यांच्यात कळत-नकळत तुलना होऊ लागली. शम्मी कपूरचा सळसळता उत्साह, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्यशैली आणि हिरॉईनला पटवण्यासाठी त्याने केलेले नटखट प्रयत्न आवडून गेले. त्यातुलनेत बाकीचे अभिनेते मेंगळट, शेळपट किंवा 'यांना जाऊन कोणीतरी गदागदा हलवा रे'या प्रकारचे वाटले.
पुस्तकात शम्मीचा संपूर्ण जीवनपट उलगडून मांडलेला आहे. म्हणजे त्याचा फक्त वैभवशाली काळच नव्हे तर त्याचा 'तुमसा नहीं देखा' येण्याच्या आधीचा स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा संघर्षाचा काळ आणि 'अंदाज' नंतरचा पडता काळ याबद्दलही सविस्तरपणे लिहिण्यात आलं आहे. राज-दिलीप-देव या त्रिकुटासमोर आपलं स्वतंत्र स्थान निर्माण करणं आणि ते सुमारे दशकभर टिकवून ठेवणं ही खरं तर एक अद्भुत गोष्ट आहे. ती सहजसाध्य गोष्ट नव्हे. एक प्रकारे कालसुसंगत बंडखोरीच ती ! त्याकाळाबद्दल, शम्मीच्या त्यावेळच्या सिनेमांबद्दल, त्या सिनेमांच्या निर्मितीप्रक्रियेबद्दल पुस्तकात सुंदर वर्णन आहे. शम्मी कपूरसह वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखतींमधून हा चरित्रपट उलगडतो. त्यामुळे पुस्तकाला एक अनौपचारिक संवादाची शैली आहे. मुख्य म्हणजे पुस्तकात कुठेही शम्मी कपूरचे दैवतीकरण करण्यात आलेले नाही. त्याच्या अभिनयाबद्दल पुस्तकात उदात्तीकरण नाही, त्याच्या फ्लर्टींग, बायकांच्याबाबतीतला रंगेलपणा, दारू इ बद्दलचे संदर्भ वेळोवेळी येत राहतात आणि त्यातून शम्मी कपूरही एक माणूसच होता हे ठसत राहतं. पण एक आहे की त्याने या कुठल्याही गोष्टी नाकारल्या, लपवल्या असं दिसत नाही. जे काही आहे ते त्याने खुलेपणाने मांडलं आहे. तो एक रसरशीत आयुष्य जगला. निवृत्तीनंतरचं  अध्यात्म आणि त्यानंतर इंटरनेट फारसं कोणाला माहित नसण्याच्या काळात त्याने या क्षेत्रात घेतलेला रस आणि केलेलं काम विस्मयकारक आहे.
शम्मी कपूरचा थिएटर मध्ये सिनेमा पहिला नसला तरी त्यांना 'पंचममॅजिक' च्या पुण्याच्या कार्यक्रमात मी प्रत्यक्ष पाहिलं होतं हे पुस्तक वाचताना आठवलं. आपल्या स्वतंत्र नृत्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेला, चैतन्यमयी अभिनेता व्हील-चेअर वर बघून कसं तरीच वाटलं होतं. आदल्याच दिवशी ते डायलिसीस घेऊन आले होते. पण चेहरा मात्र प्रसन्न होता. डोळ्यात चमक होती आणि छान मूडमध्ये ते गतस्मृतींना उजाळा देत होतो. पुण्यात १९५० च्या आगेमागे मधुबालाच्या सिनेमाचं शूटिंग चोरून बघायला ते आले होते. आणि त्यांच्याबरोबर होते झुल्फिकार अली भुट्टो! 'तीसरी मंझिल' च्या रेकॉर्डिंगचा प्रसंग, जो पुस्तकातही आहे, तो त्यांनी अगदी 'दिवाना मुझसा नहीं' हे गाणं गाऊन आणि ते ज्यावर आधारित आहे ते मूळ गाणं गाऊनही दाखवलं होतं. याच सुमारास पत्नी गीता बालीच्या मृत्यूनंतर तीन महिने बंद केलेलं शूटिंग पुन्हा चालू केल्यावर लगेचच 'तुमने मुझे देखा' हे अतिशय भावस्पर्शी गाणं शूट करताना कोणत्या भावावस्थेतून ते गेले असतील याबद्दलही ते बोलले होते.
पुस्तकाचा अनुवाद माचकरांनी चांगला केला आहे. आपण अनुवादित पुस्तक न वाचता एक स्वतंत्र पुस्तक वाचत आहोत असं वाटतं हे त्या अनुवादकाचं यश! काही ठिकाणी त्यांनी स्वतःची मतं देखील मांडली आहेत.
शेवटेसरती पुस्तकात काही गोष्टी खटकतात. काही वेळा काही प्रसंगांची किंवा वाक्यांची पुनरावृत्ती होते जी रसभंग करते. तसंच काही तपशिलाच्या चुका आहेत. 'चायना टाऊन' या सिनेमाची नायिका पद्मिनी नसून शकीला आहे तर त्याच सिनेमाचे संगीतकार शंकर- जयकिशन नसून रवी आहेत. पुस्तकाच्या शेवटी शम्मी कपूरची चित्रसंपदा देण्यात आली आहे. मात्र त्यात १९८७ सालच्या गुलझार दिग्दर्शित 'इजाजत' या सिनेमाचा उल्लेख नाही. त्यात शम्मी कपूरने महेंदर( नासिरुद्दीन शाह) च्या आजोबांची छोटीशी पण महत्त्वाची भूमिका केली होती.

हे पुस्तक सर्वांनी जरूर वाचावे असं मी निश्चितच सांगेन...

2 comments:

Mugdha said...

शम्मी कपूर ज्यांना आवडतो ते तर नक्कीच तुझा review वाचून पुस्तक हातात घेतील! Otherwise neutral ones will also be inclined to do so!

Unknown said...

सहज वाचला. मजा आली. इंटरनेट बद्दल शम्मीचे विचार वाचले होते आणि त्याच्या त्याबद्दलच्या कामाची माहिती होती थोडीफार. खऱंतर याबद्दल त्याचं खरंच कौतुक वाटतं.
शम्मीने दिग्दर्शन सुध्दा केलं हे मात्र मला खूप उशीरा समजलं. दोन्ही सिनेमे मनोरंजन आणि बंडलबाज तेव्हा आपटले पण यथावकाश त्यांना लौकिक मिळाला. बॉलिवूड मध्ये हा एक नवीन विषय आहे खरा. म्हणजे यांत बरेच सिनेमे मोडतील. नांव घेतली की मला म्हणायचंय याचा अंदाज येईल. मेरा नाम जोकर, कागज के फूल, कुदरत, गाईड (याबद्दल दूमत होऊ शकते), द ग्रेट गॅम्ब्लर वगैरे...सगळे म्हणावे असे सुपरडुपर हिट नाही झाले पण काही वर्षांनंतर गौरवप्राप्त झाले.
असो. धन्यवाद.
श्रीपाद मे. गांधी