Tuesday 1 December 2020

नूरी: रणथंबोरची देखणी वाघीण !

  

ही नूरी ! २०१९ च्या मे महिन्यात आम्हांला रणथंबोरच्या जंगलात ही दिसली होती. आपल्याला जसा आधार नंबर असतो तसा वन खात्याच्या सरकार दरबारी हिची नोंद फक्त एका आकड्याने झालेली आहे !तो आकडा आहे T-105! हे किती रुक्ष वाटतं.  पण आपल्याकडील बऱ्याच जंगलांत वाघांचं बारसं करण्याची पद्धत आहे. जंगलांमधले गाईड किंवा वाहनचालक तो वाघ ओळखण्यासाठी ती नावं देतात. बहुदा नूर या वाघिणीपासून जन्मलेली म्हणून नूरी असं या वाघिणीच्या नावामागचं कारण असावं. नूरी हे नाव ऐकल्यावर नितीन मुकेशच्या आवाजातलं  'ओ  नू..... री!' हेच गाणं आठवतं. पण हिला प्रत्यक्ष बघितल्यावर हे नाव अगदी चपखल वाटतं. 

मे महिन्याच्या सकाळच्या कोवळ्या उन्हात पालापाचोळ्यात निवांत बसलेली नूरी एका गाईडला लांबून दिसली आणि मग सगळ्या गाड्यांचा तिथे गराडा पडला. आम्ही तिच्यापासून साधारण ६०-७० फुटांवर होतो. सगळ्यांचे कॅमेरे सज्ज झाले. वर्गात विद्यार्थ्यांना शांत बसवण्यासाठी जसा शिक्षकांना मोठ्या आवाजात ओरडावं लागतं तसं इथे कोणीतरी सगळ्यांना गप्प केलं. हे सगळं होईपर्यंत ही मात्र शांतपणे जिभेने आपलं अंग चाटत होती. या सर्व कलकलाटाचा, गर्दीचा, गाड्यांच्या आवाजाचा तिला काहीच फरक पडत नव्हता. तिच्या मनासारखं अंग स्वच्छ करून झाल्यावर यथावकाश ती उठली आणि हळूहळू चालू लागली. ती कुठल्या दिशेने जाणार याचा अदमास वाहनचालक बांधू  लागले आणि गाडीत बसलेल्या पर्यटकांना सर्वोत्तम अँगलने फोटो काढण्यासाठी गाडी कुठे नेली पाहिजे यासाठी त्यांची लगबग सुरु झाली. ती जशी चालू लागली तशी कॅमेऱ्यांमधून बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे खटखट खटखट असा आवाज येऊ लागला. एखाद्या सौंदर्यवती प्रमाणे ती डौलदार ऐटबाज चालत होती.ऐन भरात असलेलं ते देखणं रूप नेत्रसुखद होतं. तिच्यातला तो बेफिकीर अटीट्युड तिला शोभून दिसत होता. ती एखादी सिनेतारका आणि आम्ही तिचे फोटो काढण्यासाठी आसुसलेले पापराझी असंच जणू ते दृश्य होतं. 

सुदैवाने आमची गाडी अगदी योग्य ठिकाणी होती. म्हणूनच आम्हांला तिचा समोरून फोटो घेता आला. फोटोग्राफर्सच्या परिभाषेत याला Head On shot असं म्हणतात. काही वेळा वाघाचा फोटो side view मध्ये मिळतो पण त्यात काही मजा नाही. आमच्या गाड्यांना वळसा घालत, अगदी जवळून तोऱ्यात जाऊन ती निघून गेली. आधी डोळ्यांत आणि मग कॅमेऱ्यात तिचं सौंदर्य टिपून आम्ही अगदी धन्य झालो. आमच्यापासून ती आता १००-१५० फुटांवर बसली असेल. तिची नजर अचानक स्थिर झाली. श्वासाचा वेग वाढला. आम्ही बघितलं तर सांबर हरणांचा एक कळप तिच्या नजरेच्या टप्प्यात होता. ती एकटक त्यांच्याकडे बघत होती. उन्हाळ्याच्या दिवसात कमी कमी श्रमात सावज हेरून त्याला बेसावध गाठायचं कसं याच गणित ती करत असावी.  मात्र  त्यांनीही तिला पाहिलं असावं आणि म्हणूनच तो कळप एकदम सतर्क झाला आणि तिच्या दिशेने बघू लागला. काही वेळाने नूरीला हा नाद सोडून द्यावा लागला. सांबरांचा कळपही  निर्धास्त झाला पण आम्हां फोटोग्राफर्सचा खटखटाट आणि क्लिकक्लिकाट मात्र चालूच राहिला !  

No comments: