कुठल्याही आजारी व्यक्तीला पेशंट म्हटलं जातं यामागे ती व्यक्ती त्या आजाराच्या (किंवा काहीवेळा उपचारांच्या देखील!) वेदना भोगत असते हे कारण तर आहेच, पण माझ्या मते याबरोबरच ती व्यक्ती आजारपणामुळे भेटीला आलेल्या स्वघोषित हितचिंतकांचा अतिशय धीराने आणि संयमाने सामना करत असते हे सुद्धा आहे ! कित्येकदा तर पेशंटला असंही वाटून जात असावं की एकवेळ हे आजारपण परवडलं पण भेटायला येणारे तऱ्हेवाईक लोक नकोत ! इतकं नको नको करून सोडतात हे लोक! आजारपणात सगळ्यात कुठली गरज असते तर ती विश्रांती आणि मन:शांतीची ! पण भेटायला येणाऱ्या लोकांना नेमक्या याच गोष्टींचा विसर पडतो आणि ते भेटायला येऊन पेशंटचं हित कितपत साध्य करू शकतात असा विचार मनात येऊन जातो.
सर्वसाधारणपणे अशा लोकांचे काही प्रकार असतात. माझ्या निरीक्षणात पुढील प्रकार दिसून आले आहेत. आणखीही काही नक्कीच असतील-
१) सर्वज्ञ - या प्रकारच्या लोकांना सगळ्या विषयांमधलं सगळंच कळतं आणि आपल्याला किती कळतं हे इतरांना दाखवून देण्यात यांची बरीच शक्ती खर्च होत असते. बहुतांशी गुगल वरून वा व्हॉट्सअँप विद्यापीठातून प्राप्त झालेले ज्ञानकण उधळायची यांना खुमखुमी फार ! बद्धकोष्ठता असो की त्यामुळे उद्भवणारं अवघड जागेचं दुखणं, हृदयविकार असो वा संधिवात ! सर्व आजारांचं निदान आणि त्यावरील उपचार यांच्याकडे उपलब्ध असतात !
२) फिरतं मोफत सल्ला केंद्र - प्रकार क्रमांक १ ची ही पुढची पायरी ! कोणी यांचं मत/सल्ला मागो अथवा न मागो, हे सल्ला दिल्याशिवाय राहणारच नाहीत ! आणि हा सल्लाही इतका आत्मविश्वासपूर्वक देतात की एखादा पेशंट गांगरून जायचा - 'मी उगाच हॉस्पिटलमध्ये येऊन पडलो की काय! यांनाच आधी भेटायला हवं होतं! ' कारण हे अगदी छातीठोकपणे सांगत असतात - "तुम्ही फक्त माझं ऐका ! बाकी काही करू नका - रोज सकाळी एक ग्लास दुधीचा रस घ्या! बस्स !सगळे आजार पळून जातील की नाही बघाच!"
३) प्रश्नांचा भडीमार करणारे वार्ताहर/उलट तपासणी करणारे पोलीस - या प्रकारच्या लोकांना अगदी सगळ्या गोष्टी 'क्रोनॉलॉजी' ने समजल्याच पाहिजेत असं वाटत असतं. जणू काही या लोकांना या पेशंटच्या आजाराची एखाद्या ऐतिहासिक बखरीत नोंद करायची जबाबदारी देण्यात आली आहे अशा थाटात प्रश्न एकामागोमाग विचारून ते अगदी पेशंटला भंडावून सोडतात- "नेमकं काय झालं? कसं झालं?किती वाजता? म्हणजे तुमचा अपघात तुम्ही मार्केटला जाताना झाला की येताना? कुठल्या गाडीची धडक बसली? ज्युपिटर होती की ऍक्टिवा?" वगैरे वगैरे... काही वेळाने हेच लोक टीव्ही चॅनेलच्या रिपोर्टर प्रमाणे असंही विचारतील असं वाटतं - "अपघात झाला त्यावेळी तुम्हांला नेमकं काय वाटलं होतं ?" यावरून मला आमच्या कॉलेजच्या काळातला एक किस्सा आठवला. माझ्या एका सिनिअरचा अपघात होऊन त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला होता आणि त्याला कॉलेजच्याच आवारातील हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तो सिनिअर कॉलेजमध्ये खूप लोकप्रिय होता त्यामुळे त्याला भेटायला येणाऱ्यांची (आणि येणारींची !) संख्या खूपच होती आणि आलेला प्रत्येक जण त्याला 'काय झालं? कसं झालं' हेच विचारत होता. या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन वैतागलेल्या त्या सिनिअरने शेवटी फ्रॅक्चर झालेल्या हाताच्या प्लास्टरवर मार्कर पेनाने त्याच्या अपघाताचा इतिहास मुद्देसूद लिहून काढला. त्यानंतर आलेल्या प्रत्येकाला तो फक्त डावा हात पुढे करून दाखवे !
४) पेशंटची शाळा घेणारे - प्रकार क्रमांक २ आणि या प्रकारच्या लोकांमध्ये थोडा फरक आहे. या प्रकारचे लोक पेशंट म्हणजे किती निष्काळजी, बावळट, वेंधळा, अज्ञानी इ आहे हे दाखवून देतात ! "त्रास होतोय हे तुम्हांला आधी कळलं कसं नाही? एवढं दुर्लक्ष कसं केलं तुम्ही? आधी कुठे दाखवलं का नाही? इतके दिवस अंगावर काढलं ना दुखणं म्हणून आता इतका त्रास होतोय !" आधीच बिचारा पेशंट दुखण्यामुळे त्रस्त असतो. आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय याची त्याला जाणीव होऊन तो संकोचलेलाही असतो. त्यात अशा बोलण्याने पेशंटला आपण आजारी पडून कुठलातरी मोठा गुन्हाच केला आहे की काय असं वाटू शकतं.
५) निराशावादी/ नको ते बोलणारे - याबाबतीतले माझे दोन वैयक्तिक अनुभव सांगतो आणि योगायोगाने दोन्ही अनुभव भेटायला आलेल्या दोन डॉक्टरांचे आहेत. माझ्या बाबांना १९९७ साली हार्ट अटॅक आला होता. त्याकाळच्या प्रोटोकॉलप्रमाणे आधी काही दिवस आयसीयू त्यानंतर अँजिओग्राफी आणि मग अँजिओप्लास्टी असं सगळं महिनाभराच्या काळात करण्यात आलं. सुरुवातीला आयसीयूमध्ये असतानाच बाबांना भेटायला आमचे एक परिचित डॉक्टर गेले होते. बाबांचं हार्ट डॅमेज बऱ्यापैकी होतं. त्या डॉक्टरांनी बाबांच्या देखत फाईल बघितली आणि मान हलवत एक मोठा सुस्कारा सोडत म्हणाले - "अवघड आहे !"
अँजिओप्लास्टी करायच्या आधी बाबा घरी असताना आणखी एक परिचित डॉक्टर आले होते. त्यांनी वेगळ्या प्रकारे बाबांना घाबरवलं. ते म्हणाले -"अहो तुम्ही एक टाइम बॉम्ब घेऊन जगत आहात. कधी काय होईल सांगता येणार नाही. तेव्हा तुम्ही सतत तुमच्या जवळ सॉर्बिट्रेटची गोळी ठेवा. अगदी संडासला जाल तिथेसुद्धा गोळी बरोबर ठेवा !" दोघा डॉक्टरांचं म्हणणं कदाचित बरोबरही होतं पण ते सांगण्याची पद्धत जरा विचित्रच होती !
६) थोर(!) समीक्षक - यांच्यासारख्या सिनिकल लोकांना चांगलं काही दिसतच नाही. म्हणून मग ते संधी मिळेल तशी हॉस्पिटल, डॉक्टर, हॉस्पिटल-स्टाफ, बिलिंगला लागणारा वेळ आणि महत्त्वाचे म्हणजे हॉस्पिटल बिल आणि सध्या सगळीकडे कशी लूट चालू आहे हे सांगतात.
७) अवाजवी अपेक्षा बाळगणारे - हे अनुभव एक डॉक्टर म्हणून मला काही वेळा आले आहेत. पेशंटबरोबर असे स्वघोषित हितचिंतक /नातेवाईक भेटायला येतात आणि ते आपल्याशी जे बोलतात त्यावरून वाटतं - पेशंट यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आपल्यावर गोळीबार तर करत नाही ना? एखाद्या लहानपणापासून दमा असलेल्या पेशंटला औषध घेऊन महिनाही झालेला नसतो. तरी बरोबर आलेली व्यक्ती तुम्हांला प्रश्न विचारते - ह्यांचा त्रास अजून कमी कसा होत नाही ? अजून किती दिवस लागतील बरे व्हायला? किंवा एखादा त्रास कमी झाला तर दुसरा कमी का नाही झाला असाही प्रश्न विचारतात. अशावेळी मग त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली की त्यांना ते पटतं देखील आणि मग तेच बाजू पालटतात आणि म्हणतात-मीही याला हेच म्हणत होतो!
इथपर्यंत वाचून कोणालाही प्रश्न पडेल की या माणसाला चांगलं कधी काही दिसतच नाही का? कोणी चांगली माणसं याच्या नजरेस दिसून आलीच नाहीत का? तर तसं काही नाही. काही चांगले अनुभव देखील आले.
८ ) आश्वासक बोलणारे - पुन्हा एकदा बाबांच्या आजारपणाचा संदर्भ देतो. बाबांच्या त्या आजारपणाच्या काळात त्यांना खास भेटायला मुंबईहून माझ्या मावशीचे मिस्टर (म्हणजे बाबांचे साडू) आले होते. त्यांनी बाबांना खूप धीर दिला होता. कारण ते स्वत:सुद्धा या अनुभवातून गेले होते आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांची तब्येत चांगली झाली होती. तसंच माझ्या एका मानलेल्या बहिणीचे मामा सुद्धा आले होते ज्यांची सुद्धा अँजिओप्लास्टी झाली होती. या आजाराचा आणि त्यावरील उपचारांचा अनुभव घेतलेल्या लोकांना प्रत्यक्ष भेटल्यामुळे बाबांच्या शंका दूर झाल्या आणि त्यांचं टेन्शनही कमी झालं होतं.
एकूण विचार करता असं का होत असावं की पेशंटला भेटायला आलेले लोक आवश्यक ते आणि तेवढंच म्हणजेच प्रसंगानुरूप बोलू शकत नाहीत? म्हणजे तसं पाहता मुद्दाम कोणी असं वागत असेल असं नाही. लोकांचा हेतू चांगलाच असतो पण प्रत्यक्ष घडतं वेगळंच असं का होत असावं? मला असं वाटतं की पेशंटला भेटायला जाणं बऱ्याचदा एक केवळ सामाजिक जबाबदारी समजून त्यात एक केवळ औपचारिकता पाळली जाते. जिथे फक्त कर्तव्य भावनेने गोष्टी केल्या जातात तिथे असे प्रकार घडायची शक्यता जास्त! दुसरं म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी आपला 'मी' घेऊन वावरत असतो. 'मला कसं सगळं माहित ! मी कसे उपचार घेतो! (आणि जर कोणाच्या आजारपणाबद्दल कळलं नाही तर-) मला कसं सांगितलं नाही ?' खरी गरज असते अशावेळी हा 'मी' सोडून समोरच्या माणसाच्या (म्हणजेच पेशंटच्या) बाजूने विचार करण्याची ! हे खूप काही अवघड आहे असं नाही. त्यासाठी हवी थोडी संवेदनशीलता आणि सहृदयता ! कधीकधी काय बोलावं हे जर सुचत नसेल तर कमी बोलावं/ प्रसंगी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन द्वारे पेशंटला त्याच्या या कठीण काळात आपण त्याच्याबरोबर आहोत हे फक्त जाणवून द्यावं. तसंच आपला या सगळ्यात कितपत उपयोग आहे किंवा होणार आहे याचंही भान असणं आवश्यक आहे.आणि उपयोग होणार नसेल तर आपला निदान उपद्रव तरी होऊ नये याची मात्र काळजी घ्यावी.
6 comments:
हा हा. मजा आली वाचताना. खूप छान निरीक्षण आणि वर्गीकरण. 😊
खूप छान निरीक्षण. आपल्या पैकी जवळपास प्रत्येकाला हा अनुभव आला असेल. As patient or their relative! पण असं लिहिण्याचे सुचले नाही! खरंच नको अशी माणसं असं वाटून जातं! शेवटी लिहिल्या प्रमाणे न बोलून/ नुसतं आश्वासक स्पर्शाने सुद्धा बरं वाटत असेल पेशंट ला!
एकदम खुमासदार आणि खरेही. यातील तिस-या मुद्द्याचा मला हल्लीच अनुभव आला. सुदीपचा ॲक्सिडंट झाला तेव्हा आम्हांला दोघांनाही लोकांनी काळजीचा सूर असलेला प्रश्न विचारला,"तुम्हांला धडक दिली त्या गाडीचा नंबर लिहून घ्यायचा.म्हणजे पोलिसात देता आलं असतं." काहींनी तर त्यांच्यावर असा प्रसंग आल्यावर किती स्मार्टली हँडल केलं करुन ते किती हुशार याचे वर्णन केले.
तुझा ब्लाॅग पटण्यासारखा आहेच आणि पुन्हा एकदा पु.ल.देशपांडे यांच्या लेखनशैलीची आठवण करुन देतो.
सुनील, मुग्धा आणि अंजली.. ब्लॉग वाचून त्यावर कॉमेंट केल्याबद्दल मनापासून आभार!
फार नेमकी निरीक्षणं खुमासदार तरीही प्रामाणिक शैलीत 👌👌👌
राजेश, नेहमीप्रमाणेच मस्त आणि खरे लिहिले आहेस. माझा नुकताच New Zealand मध्ये car accident झाला आणि तेव्हा झालेल्या hospitalisation च्या वेळी असे बरेच अनुभव आले. 😃😃.
१. पहिल्या ८ दिवसात भेटायला येणारे-'अरे आपको इतने fractures हुए फिर भी surgery नही की? आप आपके reports India भेजकर second opinion लिजीए. यहाँ doctors को कुछ समझता नहीं.'
२. १५ दिवसांनी भेटायला येणारे-'India मध्ये असतीस तर आत्तापर्यंत surgery होऊन घरी पण गेली असतीस. इकडचे doctors बरोबर लक्ष नाही देत.'😇.
हल्लीच मी crutches घेऊन थोडे चालायला लागले आहे. परवाच आमच्या ओळखीचे एक जण supermarket मध्ये भेटले होते. आनाहूत सल्ले सुरू झाले. 'आपको compensation नहीं मिला? आप lawyer ke through जाइए.' 'नहीं हमें इसमें कुछ interest नहीं है. इसकी जान बच गई, internal organs को कुछ injury हुई नहीं, यही हमारे लिये काफी है.'इति माझा नवरा. 'अरे ऐसे कैसे, आपको psychologically कितनी तकलीफ हुई. Hospital आने जाने में petrol का, parking का कितना खर्चा हुआ, सब claim करना. अगर आपको 'बैठे बैठे' 😳😳 10-20 हजार मिल जाए तो अच्छाही होगा ना.' हे सगळं चालू असताना, मी अर्धा तास crutches घेऊन उभी होते. ज्या व्यक्तीला compensation claim करण्यासाठी आमची psychological 'तकलीफ' दिसली, त्याला समोर उभी असलेल्या माझी physical 'तकलीफ' दिसत नव्हती. 'शेवटी मला त्रास होतोय, मी गाडीत जाऊन बसते' असे सांगून मी माझी सुटका करुन घेतली. असो. एकूणच आपल्या आजूबाजूला वावरणारे असे महाभाग पाहीले की, हसावे कि रडावे कळत नाही. 🙏🙏
Post a Comment