फोटोग्राफीच्या नियमांप्रमाणे बघितलं तर हा काही खूप चांगला फोटो आहे असं नाही. पण तरीही हा फोटो मनात रूतून बसला आहे आणि आज जवळपास दहा वर्षांनी जरी त्या फोटोकडे पाहिलं तरी तो फोटो काढला होता तेव्हाची आठवण ताजी होते. हा फोटो आहे चितळ जातीच्या हरणाच्या पाडसाचा आणि हा जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मधला आहे.
प्रत्येक जंगलाचं एक वैशिष्ट्य असतं. तसंच जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचंही आहे. उत्तराखंडमध्ये नैनीताल जवळ हिमालयाच्या कुशीत असलेलं, छोटे-मोठे डोंगर, विस्तीर्ण पठार आणि त्यावरील गवताची कुरणे, प्रामुख्याने साल या पानगळीच्या झाडाचं जंगल आणि मुख्य म्हणजे मोठा तलाव आणि जंगलातून जाणारी प्रवाह बदलणारी मोठी रामगंगा ही नदी!
या फोटोमधल्या पाडसाचा ड्रोनने फोटो काढला असता तर तो पाडसाच्या भोवतीचं वातावरण अधिक गडद करून गेला असता. फोटो थोडासा जवळून पाहिला असता त्या पाडसाच्या आगे मागे दगड गोटे दिसतील. नदीच्या कोरड्या ठाक पात्रात हे असे लहान मोठे दगड होते. ते पाडस किनाऱ्यावर झाडाझुडुपांमध्ये लपून होते. नदीपात्रावरून जाणारया रस्त्यावरून जाताना आम्हांला हे पाडस दिसलं आणि आम्हांला बघताच आधीच घाबरलेला तो कोवळा जीव आणखी भेदरला, त्याचवेळी काढलेला हा फोटो! जवळपास वीस पंचवीस मिनिटं आम्ही तिथे थांबलो होतो. तिथल्या त्या नीरव शांततेत त्या पाडसाकडे बघत होतो. एवढ्या भव्य, भयावह वातावरणातही सगळ्यात जास्त कशाने लक्ष वेधून घेतलं असेल तर त्या पाडसाच्या निरागस, असुरक्षित भाव असलेल्या डोळ्यांनी! ते पाडस एकटंच होतं. आम्हांला आजूबाजूला कुठेही त्याची आई किंवा चितळाचा कळप दिसला नाही. आणि त्या पाडसाच्या देहबोलीवरून असं वाटत नव्हतं की याची नुकतीच त्याच्या कळपापासून फारकत झाली आहे. आदल्याच दिवशी आम्ही एक हत्तीण आणि तिचं पिल्लू स्वछंदपणे चरताना आम्ही बघितले होते.
त्या पार्श्वभूमीवर हे असं एकटं, एकाकी पाडस बघून कसंसं वाटलं.
हे कशामुळे झालं असेल यावर आमची सफारी मधल्या गाईड आणि ड्रायव्हर बरोबर चर्चा चालू होती. त्यांच्या मते आदल्या दिवशी एका वाघाने या पाडसाच्या आईला मारून फस्त केलं होतं. खरं खोटं कोणाला माहित होतं? आणि त्याची खातरजमा करणंही केवळ अशक्य होतं. स्वसंरक्षणासाठी पळायची वेळ आली तर तेवढं पळण्यासाठी पायांत बळही नसलेल्या या प्राण्याचं भवितव्य तसं कठिणच वाटत होतं. आईवर सर्वस्वी अवलंबून असलेल्या वयाचा पण आता आईविना पोरका झालेला हा जीव या जंगलाच्या एकंदर उतरंडीत टिकणं अवघडच होतं. अशा कमकुवत, परावलंबी, कमजोर प्राण्यांवर शिकारी श्वापदांची नजर जाते आणि ते त्यांचं खाद्य होतात. हा आपल्याला माणूस म्हणून कितीही क्रूर वा निष्ठुरपणा वाटला तरी तो एक निसर्ग नियमच आहे.
साधारण अर्धा तास तिथे थांबल्यावर तिथून पुढे जाणे आम्हांला भाग होते. त्या पाडसाचे पुढे काय झाले हे अर्थातच कळलं नाही. कदाचित ते एकटं जगायला शिकलंही असेल का? अशक्य कोटीतील ती गोष्ट होती पण तसं व्हावं अशी मनोमन इच्छा मात्र होती. या पाडसाच्या गोष्टीने अपूर्णतेची हुरहूर लावली एवढं मात्र नक्की! जंगलाच्या उदरात अशा अनेक कथा रोज जन्माला येत असतात. आपण जंगल सफारीला गेल्यावर फक्त वाघ बघण्याचाच हट्ट ठेवला तर आपण तो वाघ दिसेपर्यंत गाड्या सुसाट पळवत राहू पण त्याचवेळी वाटेत येणारे हे छोटे अनुभव मात्र आपल्या हातून निसटून जातील.
जाता जाता एवढंच सांगेन की जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या आमच्या सहा सफारींमध्ये आम्हांला एकदाही वाघ दिसला नाही पण तरीही या पाडसामुळे आमची ट्रिप संस्मरणीय ठरली!
1 comment:
Post a Comment