(आमच्या बीकन फौंडेशन या होमिओपथी च्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थेतर्फे २००६ सालापसून आम्ही 'पर्याय' हा दिवाळी अंक काढत आहोत. सर्वसामान्य लोकांमध्ये होमिओपथी विषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा अंक काढला जातो. पर्याय २०२० च्या ऑनलाईन अंकातील माझा हा लेख ब्लॉग स्वरूपात देत आहे )
सिनेमा हा समाजात
घडणाऱ्या इष्ट/अनिष्ट गोष्टींचं प्रतिबिंब असतो
की सिनेमा समाजाला एवढा प्रभावित करतो
की त्यामुळे समाजात
इष्ट/अनिष्ट गोष्टी
घडत राहतात हा
एक चिरकालीन वाद
आहे. यात दोन्ही
बाजूंनी बोलायला बराच वाव आहे.
यातली कुठलीही एकच
बाजू वरचढ ठरेल
असं नाही. अगदी जसं
लता मंगेशकर श्रेष्ठ की आशा भोसले हा वाद अनिर्णित राहण्याचीच शक्यता जास्त
तसंच याही विषयाच्या बाबतीत
म्हणता येईल.
सध्या सगळं जग कोव्हिड आजाराच्या वैश्विक साथीमधून संक्रमण करत आहे. या
साथीचा परिणाम आपल्या
शारीरिक, मानसिक, आर्थिक इ
सर्वच आघाड्यांवर झाला
आहे. कोव्हिडचा काळ
ही काळाची एक
घुसळण आहे. त्यातून गेल्या
महिन्यांत आपण कधीही कल्पनासुद्धा न
केलेले वैयक्तिक आणि
सामाजिक पातळीवरील अनुभव गाठीशी बांधत
आहोत. या अनुभवांना वाचा
फोडणारं माध्यम हे केवळ
समाज-माध्यम यापुरतंच सीमित
राहणार नाही. कोव्हिडची साथ
ही मध्यवर्ती संकल्पना घेऊन
त्याभोवती गुंफलेले कथा-कविता-नाटक-सिनेमा हेही हळूहळू
पण निश्चितपणे आपल्याला बघायला
मिळतील.
ते आपसूक होईलच.. पण तोवर आपण थोडा कल्पनाशक्तीला ताण देवू या ...थोडं टाइम मशीन वापरून मागे जाऊ या ... म्हणजे कोव्हिडचा हाच काळ जर ५०-६० वर्षांपूर्वी असता तर आपले हिंदी सिनेमे कसे बनले असते? सिनेमावर कोव्हिडची सावली कशी पडली असती? कोव्हिडच्या कॅनव्हासवर त्या त्या कालानुरूप कोणता विचार करून सिनेमे तयार झाले असते?शिवाय जे सिनेमे त्या काळाचा लँडमार्क ठरले ते सिनेमे कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर कसे वेगळे झाले असते? हे थोडंसं आत्याबाईला जर मिशा असत्या तर... असं वाटेल पण विचार केला तर हा प्रवास मनोरंजकही होईल...
तर मग सुरु करूया हा प्रवास! आपले सगळ्यांचे परिचित सिनेमे कोव्हिडमुळे कसे प्रभावित झाले असते ते बघूया ... अर्थातच यात लेखाला जागेच्या मर्यादा असल्यामुळे सगळ्या सिनेमांचा आढावा घेणं शक्य नाही तसंच यात मला आवडणाऱ्या सिनेमांचा विचार प्रामुख्याने होणार हेही खरंच! जर हा लेख वाचून तुम्हांला आवडलेल्या सिनेमांचा यादृष्टीने विचार तुम्ही करू लागला तरी हा लेख लिहिण्याचा उद्देश सफल झाला असं म्हणता येईल.
आपला पहिला सिनेमा
हा मूकपट होता
'राजा हरिश्चंद्र' जो १९१३
साली प्रदर्शित झाला
तर पहिला बोलपट,
'आलम आरा' १९३१ साली
आला. सुरुवातीच्या काळातील सिनेमांवर पौराणिक कथांचा
प्रभाव होता. तेव्हा
त्या काळात कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर सिनेमा
काढायचा असता तर नक्कीच
तशा कथानकांचा आधार
घेतला गेला असता.
कदाचित कोव्हिड आजार
ही एका राक्षसाची मायावी
जादू आहे ज्यामुळे अचानक
लोक मरून पडत
आहेत असंही दाखवण्यात आलं
असतं. अशा दुष्ट
प्रवृत्तींवर सुष्ट शक्तींचा विजय
अशा काहीशा त्या
कालानुरूप भोळ्याभाबड्या
कथा सिनेमांतून दाखवण्यात आल्या
असत्या. याच काळात
प्रभात फिल्म कंपनीच्या वतीने
दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी
काही सामाजिक आशयाचे आणि समाजात सकारात्मकता रुजवणारे चित्रपट निर्माण केले
होते. त्या काळात
कोव्हिडची साथ असती तर व्ही शांताराम यांनी
कोव्हिडच्या आजारातून मृत्यूच्या दाढेपर्यंत जाऊन सुखरूप बाहेर
आलेल्या एखाद्या पेशंटचा प्रवास दाखवून समाजातली साथीबद्दलची भीती
कमी करण्याचा प्रयत्न केला
असता. त्यांचा 'पडोसी'(मराठीत 'शेजारी')(१९४१) हा सिनेमा हिंदू-मुस्लिम शेजाऱ्यांवर न बनता कोव्हिडच्या साथीतही एकमेकांची साथ
न सोडणाऱ्या शेजाऱ्यांची कथा
मांडून गेला असता.
तर सुप्रसिद्ध गायक कुंदनलाल सैगल यांनी गायलेलं-
दुख के अब
दिन बितत नाही
सुख के दिन
एक स्वप्न था
अब दिन बितत नाही-
'देवदास'(१९३५) या चित्रपटातलं हे गाणं कोव्हिडच्या काळात एक वेगळाच अर्थ घेऊन आलं असतं.
१९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि देशभर एक नवी उमेद, नवा उत्साह, आदर्शवाद आणि ध्येयवाद यांचं वातावरण तयार झालं. याच काळात हिंदी सिनेमात तीन नायकांचा उदय झाला- चार्ली चॅप्लिनच्या शैलीशी मिळताजुळता अभिनय आणि प्रेमकथांना थोडीशी सामाजिक पार्श्वभूमी असणारे चित्रपट देणारा राज कपूर, रोमँटिक चॉकलेट बॉय देव आनंद आणि ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं.या तिन्ही दिग्गज कलाकारांच्या ऐन बहराच्या काळात कोव्हिड सारख्या साथीने थैमान घातलं असतं तर तिघांचेही या पार्श्वभूमीवरचे सिनेमे नक्कीच आले असते आणि तेही त्यांच्या त्यांच्या प्रकृतीला अनुसरून! म्हणजे राज कपूरने त्याच्या 'आवारा' (१९५१) किंवा 'श्री ४२०' (१९५५) या सिनेमात कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी आणि त्यात नायक बेरोजगार होणे आणि त्यानंतर त्याने पाकिटमारी किंवा फसवाफसवीच्या उद्योगांना लागणे असं कथानक घेतलं असतं. तर तिकडे देव आनंदने कोव्हिडच्या साथीच्या काळात नायक नायिकेमध्ये निर्माण होणारं, फुलत जाणारं प्रेम दाखवणारा, त्यात काही अनपेक्षित वळणं येऊनही and they lived happily ever after असा सुखान्त दाखवणारा सिनेमा काढला असता. दिलीपकुमार अभिनित 'नया दौर'(१९५७) या चित्रपटात शहरीकरणामुळे मानव विरुद्ध मशीन असं द्वंद्व निर्माण होणं आणि त्यात त्या गावातल्या सर्वांच्या एकत्रित सहभागामुळे आलेल्या संकटावर मात करणं असं कथानक होतं. तर कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा एकमेकांच्या सहमतीने आणि सहकार्याने गाव कसा सामना करतं असं हा सिनेमा दाखवून गेला असता आणि
'नया दौर'
साथी हाथ बढाना
एक अकेला थक जायेगा
मिलकर बोझ उठाना
असं गावकरी श्रमदानाने कोव्हिड हॉस्पिटल उभारताना गाणं गात आहेत असं दाखवण्यात आलं असतं.
१९५०-६० आणि
त्यानंतरची काही वर्षे या
काळात भारतातील (विशेषतः उत्तर
भारतातील) ग्रामीण भागातील सामाजिक वातावरण, कृषिप्रधान देशाच्या समस्या, शहर-गाव
यातील संघर्ष यावर
प्रकाश टाकणारे अभिजात
सिनेमे जेवढे निघाले
तेवढे त्यानंतर क्वचितच बघायला
मिळाले. त्याची काही
ठळक उदाहरणे म्हणजे
-'दो बिघा जमीन',(१९५३) 'मदर इंडिया'(१९५७) 'गंगा जमुना'(१९६१), 'जिस देश
में गंगा बहती
है' (१९६०) आणि 'तीसरी कसम' (१९६६). या सर्वच सिनेमांमधून आपल्याला खेडेगावांत या
कोव्हिडच्या साथीमुळे तिथल्या नातेसंबंधांवर
होणाऱ्या
१९५०-६० दशकाचा विचार
करत असताना 'प्यासा'
या १९५७ सालच्या क्लासिक आणि
लँडमार्क सिनेमाचा ठळक उल्लेख करावाच
लागेल. 'प्यासा' ही लौकिक अर्थाने अयशस्वी पण
मनाने संवदेनशील असलेल्या एका
कवीची तरल भावकथा
आहे.
बदनाम वेश्यावस्तीतून जात असताना तिथलं चित्र बघून ज्या कवीला-
ये सदियों से बेखौफ सहमीसी गलियां
ये मसली हुई
अधखिली जर्द कलियां
ये बिकती हुई
खोखली रंगरलियां
जिन्हें नाराज है हिंद पर वो कहां हैं
असं मर्मभेदक काव्य(मूळ काव्य- साहिर लुधियानवी) सुचतं, त्याला तर कोव्हिड आजार आणि त्यामुळे समाजात निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवर तेवढंच हृदयद्रावक काव्य सुचलं असतं यात काहीच शंका नाही !
या कालखंडातून पुढे जाता जाता 'वक्त'(१९६५) या सिनेमाचा उल्लेख करावा लागेल. हिंदी सिनेमात लॉस्ट अँड फाऊंड या थीमला प्रतिष्ठा किंवा राजमान्यता देणारा हा सिनेमा! मूळ सिनेमात भूकंप झाल्यामुळे परिवाराची ताटातूट होते आणि सगळ्यांची बऱ्याच काळानंतर भेट होते त्यामुळे शेवट अर्थातच गोड होतो. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर भूकंपाऐवजी हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर सगळ्यांची ताटातूट होते असंही कदाचित दाखवण्यात आलं असतं.
पुढच्या काळात कथानकाइतकंच महत्त्व अभिनेत्यांना मिळू लागलं. तसंच या अभिनेत्यांचे संवादही गाजू लागले. एक सुपरस्टार पद्धतही रुजली. त्याचे पहिले मानकरी होते राजेश खन्ना! त्यांच्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर जर कोव्हिडची साथ असती तर त्यांच्या 'आनंद' या सिनेमात नायक आनंद याला Lymphosarcoma of the intestine हा भलं मोठं नाव असलेला कॅन्सर न होता आधी कोव्हिड आणि कोव्हिड पश्चात एखादी गुंतागुंत होऊन त्याचा मृत्यू असं दाखवलं असतं. आनंदचं हसतखेळत मृत्यूला सामोरं जाणं आणि शिवाय त्याचा अचानक होणारा मृत्यू आणखी चटका लावून गेलं असतं.
'आनंद' सिनेमातले - "बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहिये...लम्बी नहीं " किंवा "बाबूमोशाय... जिंदगी और मौत उपरवाले के हाथ है... उसे ना तो आप बदल सकते हैं ना मैं.. हम सब रंगमंच की कठपुतलिया हैं जिनकी डोर उपरवाले की उंगलियों में बंधी है !" हे संवाद किंवा
जिंदगी कैसी है
पहेली हाय
कभी तो हसाये
कभी ये रुलाये
हे गाणं कोव्हिडच्या संदर्भातही अगदी चपखल बसलं असतं.
राजेश खन्ना यांचा काळ संपून त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलं. साधारण 'आनंद' सिनेमापासूनच त्यांची कारकीर्द बहराला आली आणि पुढे कितीतरी सिनेमे केवळ अमिताभ बच्चन या नावावरच चालले. त्यामुळेच कितीही अकल्पित गोष्टी असल्या तरी त्या अमिताभ बच्चन सिनेमात आहे म्हणून त्या खपून जात. उदाहरणच द्यायचं झालं तर मनमोहन देसाई यांचा १९७७ साली आलेला एक मसाला सिनेमा- अमर अकबर अँथोनी. या आधी वक्त सिनेमाच्या निमित्ताने लॉस्ट अँड फाऊंड या थीमचा उल्लेख केला होता. मनमोहन देसाई यांनी अमर अकबर अँथोनी मध्येही याच थीमचा उपयोग केला आहे
अमर अकबर अँथोनी : आद्य प्लाज्मा थेरपी
आपण सध्या कोव्हिडच्या उपचारांमध्ये प्लाज्मा थेरपीचा वापर
होतो हे ऐकलं
आहे. पण त्या
सिनेमाच्या वेळी कोव्हिड असता
तर मनमोहन देसाईंनी नक्की निरुपा
रॉय (तिघा हिरोंची आई )
यांना हे तिघे
भाऊ कोव्हीड मधून
बरे होऊन प्लाज्मा देत
असल्याचं दाखवलं असतं ! म्हणजे
मनमोहन देसाई हे
काळाच्या किती पुढे होते
पहा !
असं म्हणतात की अमिताभ बच्चन यांच्या १९७५ सालच्या 'शोले' या सुप्रसिद्ध सिनेमात गब्बरसिंग या खलनायकाच्या भूमिकेसाठी अमजदखान यांच्या आधी अभिनेते डॅनी डेंगझोपा यांचा विचार झाला होता. कोव्हिड आजाराचं मूळ चीनमध्ये आहे आणि हा आजार कोणीतरी मुद्दाम पसरवला आहे असा एक मोठा मतप्रवाह आहे. हा आजार म्हणजे थोतांड किंवा एक षडयंत्र आहे असं मानणारे आजही आहेत. जर 'शोले' च्या काळात याच षड्यंत्राची थेअरी प्रचलित असती तर अमजदखानऐवजी डॅनी यांचीच वर्णी 'शोले'मध्ये लागली असती आणि सिनेमाचा बाज पूर्ण बदलून गेला असता. गब्बरसिंग हा रांगडा, राकट, गावठी दरोडेखोर नसता तर एक पाताळयंत्री, आधुनिक आणि धूर्त व्हिलन दाखवला गेला असता ज्याने भारतात हा विषाणू पसरवून देशाचं नुकसान केलं असतं.
१९७०-८० च्या दशकात बऱ्याच सिनेमांमध्ये खलनायकाच्या अवैध कामांमध्ये महत्त्वाचं काम म्हणजे तस्करी (स्मगलिंग) हे असे. त्यातही सोन्याची तस्करी हा मुख्य धंदा कारण वैध मार्गांनी तेव्हा सोनं आणायला परवानगी नव्हती ! कोव्हिडचा तेव्हा प्रभाव असता तर सोन्याऐवजी कोव्हिडच्या औषधांचा
"मेरे पास ….”
काळाबाजार, तस्करी असं काहीतरी दाखवलं गेलं असतं. असाच काहीशा गैरमार्गांनी श्रीमंत झालेला विजय (चित्रपट- दीवार,१९७५) मग त्याच्या मूल्यांशी प्रामाणिक राहणाऱ्या रवी या भावाला चिडून म्हणाला असता - "आज मेरे पास रेमडेसेव्हिर है, अझिथ्रोमायसिन है, डेक्सा है आयव्हरमेक्टीन है टोसिलीझूमब है ... क्या है तुम्हारे पास?" आणि मग रवीने शांतपणे उत्तर दिले असते- "मेरे पास व्हॅक्सिन है" किंवा "मेरे पास मास्क है !"
याच प्रकारे 'शान' (१९८०) मधला शाकाल(कुलभूषण खरबंदा ) किंवा १९८६ सालच्या कर्मा चित्रपटातला 'डॉ डांग'(अनुपम खेर) आणि १९८७ सालच्या 'मिस्टर इंडिया' मधला मोगॅम्बो ( अमरीश पुरी) या सिनेमांमधले खलनायक हे कोव्हिडचा विषाणू भारतात सोडणे, मुलांपर्यंत कोव्हिडची लस पोचू न देणे वा लसीच्या नावाखाली नकली औषध देणे यासारखी क्रूरकर्मे करून देशावर संकटांची मालिका लावून वर परत "मोगॅम्बो खुश हुआ" या सारखे संवाद विकट हास्य करत म्हणते झाले असते. आणि अर्थात सिनेमातले सर्व नायक या दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवून देशाचे तारणहार झाले असते. म्हणजे जो दुष्ट-सुष्ट प्रवृत्तींमधला सिनेमाच्या सुरवातीच्या काळातला दाखवला गेलेला लढा याही काळात दाखवला गेला असता. फक्त तो एका भव्य स्वरूपात आणि प्रेम-विरह-नाच-गाणी-मारामारी-हिंसा या सर्व मालमसाल्यासह !
१९९०-२००० या दशकातले दोन प्रमुख सिनेमे कोव्हिडची साथ त्याकाळात असती तर खरोखरंच निर्माण तरी झाले असते का असा प्रश्न आहे. १९९५ साली आलेल्या 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या सिनेमात नायक नायिका राज आणि सिमरन हे लंडनहून युरोप प्रवास करतात, तिथे प्रेमात पडतात, नंतर परत लंडन आणि त्यानंतर डायरेक्ट एकदम पंजाबमधली मोहरीची शेतं.. तिथली भाषा.. वगैरे वगैरे... जिथे कोव्हिडसाठी निर्बंध घातलेल्या लॉकडाऊनमुळे साधा पुणे-मुंबई प्रवाससुद्धा दुरापास्त झाला आहे तिथे हा सगळा जगप्रवास करणं केवळ अशक्यच!
एकवेळ 'दिलवाले..' कालानुरूप बदल करून
बनवता येईल, पण
१९९४ सालचा 'हम
आपके हैं कौन’
हा सिनेमा कोव्हिडच्या प्रभावामुळे किती
बदलावा लागला असता
याची कल्पनासुद्धा करता येणार नाही.
अहो इथे यांच्या सध्या
घरगुती क्रिकेटच्या डावातसुद्धा आयपीएल
पेक्षा जास्त प्रेक्षक असतात..
'हम आपके
हैं कौन": अबब…एवढी माणसं
!
कुठलीतरी फुटकळ नटी शिरा करते(तोही फ़सलेलाच !) तो खायला घरात गावजेवणाला असते त्यापेक्षा जास्त गर्दी असते.. साखरपुड्यापासून बारश्यापर्यंत (व्हाया लग्न -डोहाळजेवण) सगळ्या समारंभांना हजारोंची उपस्थिती असते... सोशल डिस्टंसिंग वगैरे पाळून हे कसं काय करता आलं असतं? उलट यातला प्रत्येक समारंभ एक सुपर स्प्रेडर इव्हेन्ट झाला असता! सरकारकडून प्रत्येक समारंभाची परवानगी काढायला मामाजींना(अजित वाच्छानी) जावं लागलं असतं तेव्हा सरकारने उदार अंतःकरणाने यांच्या घराबाहेर परवानगीसाठीचा एक कायमस्वरूपी काऊंटरच उघडला असता ! कोव्हिडचे दोन फायदे या सिनेमासाठी झाले असते. यातला एक फायदा समस्त भारतीयांसाठी झाला असता असं गृहीत धरायला हरकत नाही! पहिला सिनेमापुरता फायदा म्हणजे जेठानी पूजा (रेणुका शहाणे) पायऱ्यांवरून पडून मरते असं दाखवण्याऐवजी ती कोव्हिडमुळे दगावते असं दाखवलं असतं तर ते जास्त पटलं असतं. दुसरा जगभरातील समस्त भारतीयांसाठीचा फायदा म्हणजे कोव्हिडमुळे गर्दीवर नियंत्रण आलं असतं तर या लग्नाआधीचा नवरदेवाचे बूट लपवण्याचा विधी होऊच शकला नसता आणि पुढे प्रत्येक लग्नात होणारा बूट पळवापळवीचा अगदी रग्बीच्या तोडीसतोड होणारा खेळ तरी वाचला असता !
अलीकडच्या काळात हिंदी सिनेमांमधून राष्ट्रवादाची लाट बघायला मिळते. पूर्वी तशी ती मनोजकुमार यांच्या सिनेमांमधून बघायला मिळाली होतीच. पण आता मनोजकुमार यांच्यकडून हा वारसा मिळवून सनी देओल, अक्षयकुमार, अजय देवगण, विकी कौशल, जॉन अब्राहम या सारख्या नटांनी ही परंपरा पुढे चालवली आहे. या प्रकारच्या सिनेमांवर कोव्हिडचा कसा परिणाम झाला असता? यातल्या कोणीतरी कोरोना योद्धे म्हणून गौरवलेल्या डॉक्टरांवर सिनेमा काढला असता का? जरा शंकाच वाटते. कारण डॉक्टरांच्या या फ्रंटलाईन कामगिरीला काही ग्लॅमर नाही. त्यामुळे बॉक्स ऑफिस नाणं खाणखाणेल याची शाश्वती नाही. शिवाय डॉक्टरांच्या त्या कामगिरीमुळे तुमचं रक्त उसळेलच, तुमच्यात वीरश्री संचारेल असं नाही.
कदाचित डॉक्टरांवर याआधी आलेल्या सिनेमांतून कोव्हिडच्या काळात त्यांनी केलेल्या कामाची वेगळ्या प्रकारे दखल घेतली गेली असती. मग तो १९६० सालचा 'अनुराधा' असेल अथवा अलीकडचा(२००३ सालचा) 'मुन्नाभाई एमबीबीएस' असेल!
तसंच 'नायक' (२००१) या सिनेमाचा उल्लेख करावासा वाटतो. यात पत्रकार शिवाजी (अनिल कपूर) च्या प्रश्नांच्या सरबत्तीला कंटाळून मुख्यमंत्री बलबीर चौहान (अमरीश पुरी ) त्याला आव्हान देतो की तू एक दिवस मुख्यमंत्री होऊन दाखव मग तुला कळेल की सरकार चालवणं किती अवघड गोष्ट आहे. पत्रकार हे आव्हान स्वीकारतो आणि एका दिवसात कामाचा झपाटा लावून अनेक लोकोपयोगी निर्णय घेतो. कोव्हिडच्या काळात याच मुख्यमंत्र्याने( किंवा हाच मुद्दा पुढे नेऊन औटघटकेच्या पंतप्रधानाने) लोकांच्या समस्यांकडे सहृदयतेने बघितलं असतं.. तसंच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले असते. आज भारतात दर १०,००० लोकसंख्येमागे हॉस्पिटलच्या फक्त ८ खाटा उपलब्ध आहेत आणि फक्त ८ डॉक्टर्स आहेत. हे चित्र बदलण्यासाठी देशाने आरोग्यसेवेवर सध्यापेक्षा (जीडीपीच्या सुमारे १.२९ % ) कितीतरी जास्त पटीने गुंतवणूक करणं अत्यावश्यक आहे. कोव्हिडमुळे आपल्या आरोग्यव्यवस्थेमधल्या त्रुटी प्रकर्षाने दिसून आल्या. त्या दूर करण्याचा प्रयत्न सिनेमात का होईना बघणे आश्वासक ठरले असते !
आपण इतका वेळ टाइम मशीन वापरून पूर्वीच्या सिनेमांवर कोव्हिडचा कसा प्रभाव झाला असता याचा धावता आढावा घेतला असता. पण हेच टाइम मशीन वापरून आपण भविष्यात किंबहुना कोव्हीडोत्तर काळात सिनेमांवर काय परिणाम बघितलं तर ते चित्र कसं असेल? कोव्हिडमुळे आपलं आयुष्य कायमचंच बदललं आहे आणि आणखी बदलत जाणार आहे. मग आपले सिनेमे देखील त्याला कसे अपवाद ठरतील? त्यामुळे सिनेमाच्या कथानकापासून ते कलाकारांपर्यंत, वेशभूषेपासून ते गाण्यांपर्यंत सर्व काही बदलणार आहे. पूर्वीच्या सिनेमांत डोळे, चेहरा, केशसंभार, भुवया, पापण्या, ओठ इ सौंदर्याची वर्णनं करणारी गाणी असायची. आतापासून हे सगळं बादच होणार! संपूर्ण चेहरा मास्कने झाकला गेल्यावर गाण्यांमधून कुठल्या सौंदर्याचं वर्णन केलं जाणार? की हिरो म्हणणार- " हाय तुम्हारे लाल मास्कने मेरा दिल ले लिया"? हल्लीच्या प्रत्येक सिनेमात आयटम सॉन्ग असतंच. या कोव्हिडमुळे त्यात असे काही बदल होतील -
"क्यों करते
हो covid covid
मेरा heart beat करे है rapid rapid
आजा जल्दी बुलेटपे होके सवार
सोशल डिस्टंसिंग को
धक्का मार"
"इश्क का
व्हायरस
है फैला इस
जहाँ में
दिल की इकॉनॉमी है
डाऊन
ना दवासे ना vaccine से
इसका ट्रीटमेंट तू
कर सिर्फ प्यार
से" वगैरे...
आजपर्यंत सिनेमांमध्ये सत्य-असत्याचा, चांगल्या विरुद्ध वाईटाचा सामना
होत असे. आणि
दोन्ही प्रवृत्ती तुम्हांला प्रत्यक्ष बघायला
मिळत. पण यात
येणाऱ्या सिनेमांमध्ये शत्रू जास्त चलाख/धूर्त झालेला बघायला
मिळेल. तो अदृश्य
असेल आणि तरीही
लोकांना मारेल/नामोहरम करेल
आणि हिरो, नव्हे
अशा शत्रूचा नाश
करायला सुपरहिरोच लागेल,
वेगवेगळ्या युक्त्या/क्लुप्त्या वापरून शेवटी या
शत्रूवर विजय मिळवेल. हा
हिरो कदाचित डॉक्टरही असेल
जो आधी सर्वसामान्यांसाठी काम
करणारा असेल पण
अशा व्हायरसचं संकट
आल्यावर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी तो
हे आव्हान स्वीकारेल. त्याची
लढाई रक्तरंजित नसेल.
म्हणून अशा हिरोची
हत्यारं पिस्तूल/रॉकेट लॉन्चर,बॉम्ब
वगैरे नसतील तर
ती असतील गोळ्या/इंजेक्शन, व्हेंटिलेटर इ. सध्याच्या राष्ट्रवादाच्या सिनेमांच्या काळात
शत्रूराष्ट्र म्हणून पाकिस्तान दाखवलं
जातं. पण आता
ते बदलून शत्रूराष्ट्र चीन
होईल तसेच तिथल्या हायटेक
लॅबोरेटरीचे शास्त्रज्ञ व्हिलन असतील जे
असे प्राणघातक व्हायरस निर्माण करतील
आणि लोकांमध्ये सोडतील.
पूर्वी आपल्या पृथ्वीला धोका
अणुयुद्धाचा होता. पण कोव्हीडोत्तर काळात
हा धोका जैविक
युद्धांचा असेल असं सिनेमांमधूनही दाखवलं
जाईल. म्हणजेच येणाऱ्या काळातले सिनेमे हे युद्धपट किंवा
साय-फाय (Science fiction) या प्रकारचे असतील.
सिनेमांमध्ये साहस दृश्यं तर
असतीलच.. अगदी चीनपर्यंत जाऊन
तिथल्या लॅबोरेटरीमधल्या शास्त्रज्ञांना
पकडणे आणि त्यांचा कट
उघडकीस आणणे वगैरे
हेही दाखवण्यात येईल.
. फक्त या साहसपटांमध्ये हिरोईनचं स्थान
आक्रसलेलंच असेल की काय
अशी शंका येते.
संपूर्ण सिनेमात हिरोईनचं काम हे फक्त
कथानकातील ताण सैल करण्यासाठीच की
काय असंही वाटतं.
मग त्यासाठी एखाद्या स्त्रीवादी दिग्दर्शिकेनं सिनेमा
बनवला तर हिरोईनला हिरोच्या बरोबरीने स्थान
मिळेल. ती त्याला
भक्कम साथ देईल...
कदाचित ती डॉक्टर असेल
किंवा समाजासाठी झटणारी
एक प्रामाणिक कार्यकर्ती अथवा
एखादी कमांडो देखील!
कोव्हिडोत्तर काळात भय आणि
असुरक्षिततेचं
वातावरण कायम राहणार आहे.
एक अनिश्चितता असणार
आहे. निदान सिनेमांमधून या
प्रश्नावर काल्पनिक उत्तर, शत्रूवर मात
आणि एक सकारात्मकता निर्माण होईल
जी आपलं वास्तवातलं आयुष्य
थोडा काळ का
असेना सुसह्य करेल!
सिनेमांकडून नाहीतरी आपल्याला आणखी काय हवं
असतं ?!
No comments:
Post a Comment