Friday, 9 July 2021

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा श्री.विवेक पाध्ये

(डिस्क्लेमर : या लिखाणातील  व्यक्ती अर्थातच खऱ्या आहेत पण प्रसंग मात्र काल्पनिक आहे. या लिखाणाचा  कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. पण नकळत/अनवधानाने कोणी दुखावले गेल्यास क्षमस्व ! तसंच या लिखाणात जर तुमचा उल्लेख आला नसल्यास ती मर्यादा माझ्या कल्पनाशक्तीची आहे असे समजावे)

तारीख: ९ जुलै २०२१

स्थळ: आपल्या 'प्रतिभा आणि प्रतिमा' व्हॉट्स अँप  समूहाची भिंत

वेळ सकाळचे साडे सहा-

भल्या पहाटेपासून आज समूहावर लगबग सुरू आहे. आणि का नसावी? आज आपले ऍडमिन श्री. विवेकजी पाध्ये यांचा वाढदिवस आहे ना! आपसूकच सगळे उत्साहाने समूहावर व्यक्त होत आहेत. सुरवातीला सुकन्या जोशी यांनी सुंदर निसर्गचित्राचा एक फोटो पाठवला आहे. शिवाय त्याला जोडून स्वरचित कविता सुद्धा आहे.त्यामागोमाग इंद्रनील बर्वे यांनी पावसाच्या थेंबाचा फोटो आणि त्याबरोबर- 

'Behind every atom of this World hides an infinite Universe' - हा रूमी यांचा quote शिवाय त्यांच्याकडील instrumental music मधल्या मोठ्या ठेवणीतून पं रवीशंकर यांच्या सतारवादनात राग बैरागी भैरव पोस्ट केला आहे. 

मग श्री. प्रकाश पिटकर यांनी सह्याद्री कड्याचा पावसाळ्यातला हिरवा शालू ल्यालेला फोटो आणि त्याखाली नलेश पाटील यांची निसर्ग कविता पाठवली आहे-

'ह्या हिरव्या वस्तीमध्ये

हे प्राणवायूचे घर,

मज इथे निवारा मिळतो

अन् इथेच हिरवा सूर'...

त्यावर श्री. चंद्रशेखर जोशी यांनी आणखी एक निसर्गकवी द. भा. धामणस्कर यांची एक कविता पोस्ट केली आहे.-

परिपक्व झाडे-

रात्री सुचलेली गाणी झाडांना

सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून

पाखरांनी एकच धरलंय :

झाडांना जाग येण्यापूर्वीच

आकाशवाटांनी निघून जायचं आणि

दिवस मिटल्यानंतरही झाडांत

लवकर परतायचं नाही …

मुकी झाडे अनाग्रहीपणे

पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज

त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे

वाट पाहावयास तयार आहेत…

तर श्री. चंद्रशेखर पुसाळकर यांनी माऊथ ऑर्गनवर त्यांनी वाजवलेल्या ' आती रहेंगी बहारे' या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

असा सगळा साद-प्रतिसादाचा उत्स्फूर्त उत्सव सुरू आहे. प्रत्येक जण वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने शुभेच्छा देत आहे. 

पण श्री. विवेक पाध्ये मात्र आज समूहावर गैरहजर आहेत. 

वेळ सकाळचे दहा-

यावेळेपर्यंत समूहावर दररोज-

रोज सकाळी एक गाणे

करी मनास ताजेतवाने 

या सदरातील गाणं पोस्टविवेकजींनी पोस्ट करून झालेलं  असतं.पण आज आत्तापर्यंत तरी त्याचा पत्ता नाही. इतक्यात सुकन्या जोशी, लायबेरियामधून सुधांशू नाईक आणि पुण्यातून श्री विश्वास नायडू यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेल्या 'मनात रूजलेली गाणी' या सदरातील पुढचं गाणं पोस्ट होत आहे- श्री विवेकजी यांचं आर डी बर्मन यांचं ऑल  टाइम फेवरेट- 

' नाम गुम जायेगा

चेहरा ये बदल जायेगा

मेरी आवाज ही पहचान है

गर याद रहें...'

या गाण्याच्या बरोबरच तिघांचे विवेकजींबद्दलचं मनोगत सादर होत आहे. विवेकजींच्या baritone आवाजाचा उल्लेख या निमित्ताने समूहावर होत आहे.त्यावर बोलताना ज्येष्ठ अभिनेते श्रीराम पेंडसे म्हणत आहेत - "आमच्या नाटकाच्या परिभाषेत बोलायचं तर विवेकच्या आवाजाचा थ्रो असा आहे की हा आवाज माईक शिवाय रंगमंचावरून थेट प्रेक्षकांच्या शेवटच्या रांगेपर्यंत सहज पोचेल ! "

श्री पेंडसे यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या कैवल्य रिसॉर्ट ट्रिपचे अनुभव आणि विवेकजी यांच्या अगत्याचा आवर्जून उल्लेख केला आहे. 

विवेकजींनी चालू केलेला शिरस्ता मोडणार कसा आणि तेही त्यांच्या वाढदिवशी? म्हणून श्री. शेखर वगळ यांनी आशा भोसले यांचं वक्त सिनेमातलं ' आगे भी जाने न तू' हे गाणं पोस्ट केलंय. मग या गाण्यावर धनंजय कुरणे, उस्मान शेख, वंदना कुलकर्णी, कौस्तुभ आजगांवकर आणि स्वतः श्री वगळ यांच्यात एक माहितीपूर्ण, उद्बोधक आणि रंजक चर्चा होत आहे. यातून या गाण्याची सौंदर्यस्थळं उलगडून दाखवली जात आहेत. यात श्री कुरणे यांचा focus संगीतकार रवीवर, वंदना कुलकर्णी यांचा साहिरवर, श्री शेख यांचा साहिरने गाण्यातून सांगितलेल्या तत्त्वज्ञानावर, कौस्तुभजी यांचा या गाण्याच्या ताल-लय-सुरावर आणि श्री वगळ यांचा या सिनेमाच्या आणि त्या अनुषंगाने त्या वर्षीच्या सिनेमांच्या इतिहासावर आहे. तसंच उमेश सोनटक्के यांचीही एक्सपर्ट कॉमेंट आलेली आहे. 

या चर्चेतही विवेकजी यांचा सहभाग नाही. मग कोणीतरी त्यांना मेसेज पाठवला आहे, कोणी फोन केला आहे. पण दोन्हीला उत्तर नाही! 

दरम्यान समूहावर शुभेच्छांचा खच सुरूच आहे. विवेकजींच्या बहिणी, शाळेपासूनचे मित्र(प्रसाद टिळक यांच्यासारखे) यांनी विवेकजींचे फोटो पोस्ट केले आहेत आणि त्या फोटोबरोबर जोडल्या गेलेल्या रम्य आठवणीदेखील! सर्व शुभेच्छांबरोबर विवेकजींबद्दल जे काही लिहिलं जातंय त्यात एक विलक्षण सातत्य आहे- प्रत्येक जण विवेकजींचा अफाट लोकसंग्रह, त्यांचं माणसं जोडण्याचं कौशल्य, दुसऱ्यांमधले गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देण्याची हातोटी तसंच व्हॉट्सअँप समूह व्यवस्थित चालण्यासाठी केलेली पद्धतशीर नियमावली आणि नियम पाळण्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारे पण संयमितपणे सगळ्यांना समजावून सांगणं  वगैरेंबद्दल भरभरून बोलत आहे. तर श्री शेख आणि वंदना कुलकर्णी राजलक्ष्मी सभागृहात झालेल्या गाण्याच्या कार्यक्रमांबद्दलच्या आठवणी सांगत आहेत. राजलक्ष्मी सभागृह हे समूहातील अनेकांचं भेटीचं आणि अनौपचारिक गप्पा रंगवण्याचं हक्काचं ठिकाण आहे याबद्दल सगळ्यांचं एकमत होत आहे. तिथल्या चविष्ट, रुचकर जेवणाचा अनुभव ज्यांनी घेतलाय त्यांना तिथे पुन्हा पुन्हा जायचंय आणि सध्या अजूनही लॉक डाऊन असल्यामुळे तिथे जात येत नसल्याबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. 

वेळ दुपारचा एक-

अर्चना बापट यांनी विवेकजींचे आवडते लेखक जयवंत दळवी यांच्या 'निवडक ठणठणपाळ' या पुस्तकाचे सुंदर रसग्रहण त्यांच्या 'पुस्तक परिचय' या सदरात केलंय. तर श्री. कौस्तुभ आजगांवकर यांनी सकाळच्या निसर्ग कवितांचा धागा पकडत इंदिरा संत आणि कवी बाकीबाब बोरकर यांच्या कविता यावर त्यांच्या नेहमीच्या ओघवत्या शैलीत वर्णन केलंय. 

समूहातील ज्येष्ठ सदस्य श्री. दिवाकर बुरसे यांनी विवेकजींचे आवडते जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर यांच्या एका खाजगी मुशायऱ्याचे रसभरीत आणि जिवंत वर्णन करणारा लेख पोस्ट केला आहे. 

विवेकजी सगळ्यांचे मेसेज बघत आहेत पण कुठल्याही चर्चेत सहभागी होत नाहीत, शुभेच्छांना उत्तरं येत नाहीत हे एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलंय. ते आपल्या सगळ्यांची मजा तर करत नाही ना? असं कोणालातरी वाटलंय.  यातून म्हणा किंवा एका विचित्र  अस्वस्थतेतून म्हणा कोणाकडून तरी एक आगळीक घडलीय. आता कोणाकडून तरी असं मोघम कशाला म्हणू? आगळीक माझ्याकडूनच घडलीय. मी 'प्रतिभा आणि प्रतिमा' समूहाचं प्रोफाइल पिक बदललं आहे आणि तिथे विवेकजींचा फोटो लावलाय ! थोडी वाट बघितली. काहीच प्रतिक्रिया आली नाही म्हणून समूहाचं नाव बदलून-वाढदिवसाच्या शुभेच्छा विवेक पाध्ये असं नामकरण केलंय ! तरीही विवेकजींचा काही प्रतिसाद येईना म्हणून एक कुठलं तरी फुटकळ फॉरवर्ड टाकलंय  ! शाळेतल्या वर्गावर शिक्षक आले नाहीत  तर वर्गात जसं वातावरण होईल तसंच काहीसं वातावरण समूहावर आहे.  त्यामुळे मी जे काही केलं त्याला फारसा कोणी आक्षेपही  घेतलेला नाही. 

पण आता हद्द झाली ! इतकं होऊनही विवेकजी मात्र शांत!

काही काळ समूहावर देखील एक नि:शब्द शांतता पसरली आहे ! 

वेळ: संध्याकाळचे पाच-

समूहावर आज जसे विवेकजी गैरहजर होते तशा ज्येष्ठ सदस्य सुलभाताई तेरणीकर देखील अनुपस्थित आहेत . समूहावर कोणीतरी ही बाब बोलून दाखवली आहे. इतक्यात सुलभाताई समूहावर अवतीर्ण झाल्या  आहेत - 

'मी इथेच आहे. एक महत्त्वाचं काम करत होते. त्यातून आत्ता मोकळी झाली आहे. आज विवेकजींच्या वाढदिवसानिमित्त विवेकजींना आणि समूहातील आपल्या सर्वांसाठी एक अनोखी भेट मी घेऊन आले आहे.'

असं म्हणत त्यांनी एक ऑडिओ फाईल पोस्ट केली आहे. सगळ्यांनी ती लगेच डाउनलोड केली आहे. सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोचली आहे. आणि अहो आश्चर्यम! क्षणभर कोणाचाही आपल्या कानांवर विश्वासच बसत  नाही ! आपण स्वप्न तर बघत नाही ना? कारण ती ऑडिओ फाईल म्हणजे साक्षात लता मंगेशकर यांचा व्हॉइस मेसेज आहे! त्या मेसेजचा प्रत्येक शब्द अन शब्द सगळेच भान हरपून ऐकत आहेत- 

" नमस्कार! माझ्या मैत्रीण आणि ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि हिंदी चित्रपट संगीताच्या जाणकार अभ्यासक सुलभाताई तेरणीकर यांनी मला सांगितलं की आज आमच्या समूहाचे ऍडमिन विवेकजी यांचा वाढदिवस आहे.खरं  तर मी विवेकजींना प्रत्यक्ष भेटलेली नाही. पण असं का कोण जाणे मला वाटतं की आमची खूप जुनी जान-पहचान आहे. कारण तिकडे विवेकजी तुमच्या समूहावर माझी हिंदी सिनेमाच्या सुवर्णयुगातली गाणी पाठवायचे आणि इकडे लगेच ती गाणी सुलभाताई मला पाठवत असत.सगळी गाणी मी मनापासून ऐकली आहेत.  मला असं वाटायचं की माझी स्मरणशक्ती चांगली आहे आणि मी गायलेली सगळीच गाणी मला आठवतात. पण विवेकजींच्या गाणी पाठवण्याच्या सिलसिल्यानंतर काही वेळा मला वाटलं -हे गाणं आपण गायलंय? कधी गायलंय? काही वेळा माझी गाणी मला आकाशातल्या ताऱ्यांसारखी वाटतात. त्या ताऱ्यांचा प्रकाश खूप लांबून आल्यासारखा वाटतो. पण अशी कोणी गाणी पाठवली की अचानक एकेका  गाण्याचा तारा चमकतो आणि माझा संपूर्ण दिवस उजळून टाकतो.  मग  त्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगशी  जोडल्या गेलेल्या आठवणी पुन्हा जाग्या होतात . तेव्हाचे दिवस आठवतात -ते कष्ट आणि ती मजा तो आनंद मी पुन्हा अनुभवते ! यासाठी विवेकजी मी तुमची आभारी आहे ! तुमच्यासारखे दर्दी, रसिक आहेत म्हणून आम्हां कलाकारांचं गाणं अजूनही टिकून आहे ! विवेकजी तुम्हांला माझ्याकडून वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! तुमचं काम असंच चालू ठेवा!" 

समूहावर पुन्हा एकदा शांतता! एका अविस्मरणीय क्षणाचे आपण साक्षीदार आहोत अशी प्रत्येकाची भावना! ही शांतता सुलभाताईंनी विवेकजींना समूहावर आमंत्रित करून भेदली आहे. "विवेकजी...या आता समूहावर! इतकं काय संकोचून जायचं ते !" 

विवेकजी ऑनलाईन आहेतच! एकदम भारावलेले!

विवेकजी: काय बोलू ?इतके दिवस एवढे परिश्रम घेऊन लताजींची गाणी मी टपालत  

होतो. कधी कोणी प्रतिसाद द्यायचे. कधी अपेक्षेइतका प्रतिसाद मिळायचा नाही. पण व्रतस्थाप्रमाणे मी माझं काम चालू ठेवलं. त्याचं इतकं चीज होईल याची मी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती! साक्षात लता मंगेशकर यांच्याकडून शाबासकीची थाप! आणखी काय पाहिजे! एखाद्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारापेक्षा याचं मोल जास्त आहे. सुलभाताई तुमचे आभार कसे मानू? मी या ऋणात राहणेच पसंत करेन. 

खरं तर मी समूहावर आज अजिबात यायचं नाही असंच ठरवलं होतं. आजच्या दिवशी माझे आवडते तीन रेगे- सदानंद, पु शि आणि मे पुं यांचं वाचावं, तसंच समूहात परीक्षण करण्यात आलेलं  'नदीष्ट' पुस्तक आणून वाचावं असं ठरवलं. तुम्हां सगळ्यांच्या शुभेच्छांचे मेसेज मी वाचतही होतो. डॉ पुसाळकरांनी जे काही केलंय ते काही माझ्या नजरेतून सुटलेलं नाही. मी रागाने काहीतरी लिहणारही  होतो एवढ्यात सुलभाताईंची पोस्ट समूहावर येऊन पडली. त्यामुळे डॉ पुसाळकरांना खरं तर लता मंगेशकरांनीच वाचवलं आहे!

समूहातील सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार ! या निमित्ताने बरेचजण समूहावर व्यक्त झाले हे चांगलं झालंय. असेच सगळे व्यक्त होत राहा आणि हो.. फक्त आजच्या दिवशी मी डॉ पुसाळकरांसारख्यांचं नियम मोडणं खपवून घेतलंय. इथून पुढे असं पुन्हा करू नका! का परत समूहाची नियमावली सर्वांसाठी देऊ? 





2 comments:

Shreepad SM Gandhi said...

मी तुझ्याशिवाय आणि लताबाईंशिवाय कोणालाही ओ का ठो ओळखत नाही... पण मजा आली वाचायला...
*टपालत* हा: हा: हा: ��
कहानी भाग १ मधे विद्या बालन त्या लॉज वरच्या गरम पाणी आणून देणा-या पिंट्याला एकदा म्हणत नाही का गंमतीने "मै लॉंड्री दीदी नहीं हूँ...मैं बिद्या दीदी हूँ... हा: हा: हा: हा: ����
असं म्हणत हसत नाही का तसं मला टपालत शब्द वाचल्यावर विकट हसावंसं वाटलं...
��

Mugdha said...

कल्पनाविलास अतिशय बोलका... जणू आपण त्या समूहात असल्यासारखं वाटावं असा! मस्त!