(२२ मे रोजी ज्येष्ठ नाट्य-चित्रपट- मालिका अभिनेते श्री. श्रीराम पेंडसे यांचा वाढदिवस !. त्यानिमित्त हे लिखाण... )
घाशीराम कोतवाल नाटकात डावीकडून दुसरे श्रीराम पेंडसे |
केवळ मराठी नाटकच नव्हे तर संपूर्ण आधुनिक मराठी संस्कृतीचा इतिहास लिहायचा किंवा त्याचा अभ्यास करायचा विचार कोणी केला तरी त्यात 'घाशीराम कोतवाल' ( लेखक- विजय तेंडुलकर दिग्दर्शक- डॉ जब्बार पटेल) या नाटकाचा स्वाभाविक समावेश करावाच लागेल असं माझं मत आहे. आपले पूर्वग्रह थोडेसे बाजूला ठेऊन एक स्वतंत्र कलाकृती म्हणून या नाटकाकडे बघितलं तर लक्षात येईल की खरं तर हे नाटक एक लयबद्ध कविताच आहे ! मराठी लोककलेतील खेळे हा फॉर्म नाटकासाठी वापरण्यात आला आहे. नाटकातील संवादातही गेयता आहे तसंच वेगवेगळ्या प्रकारे गाणी वापरण्यात आली आहेत. 'श्री गणराय नर्तन करी' या पारंपरिक गणापासून ते लावणी पासून ते अगदी शास्त्रीय संगीतावर आधारित रचना हे सगळं काही नाटकात आहे. मी हे नाटक माझ्या वयाच्या १७-१८ व्या वर्षी बघितलं पण आजही माझ्या लक्षात आहेत त्यातल्या कलाकारांच्या सिन्क्रोनाईज्ड आणि विलोभनीय हालचाली ! नाटकातील कलाकारांची एनर्जीही अव्दितीय ! मला आणखी एक गोष्ट चांगली लक्षात राहिली आहे ती म्हणजे रंगमंचावर प्रेक्षकांच्या उजव्या बाजूला गायक रवींद्र साठे( रवींद्र साठे यांनी या नाटकात काम केलं आहे) यांच्यावर स्पॉट लाईट आहे आणि ते सकाळचा राग गात आहेत आणि डावीकडे त्यानुरूप प्रसंग दर्शवण्यात येत आहे! आणि साठे यांचे गायन अगदी तब्येतीत चालू राहतं ! अतिशय रोमांचित करणारा हा अनुभव!
मी 'घाशीराम कोतवाल' बघितल्याच्या आठवणींना उजाळा श्री. पेंडसे यांच्या पोस्टमुळे मिळाल्याचं मेसेजवर मी त्यांना कळवलं तसं त्यांनी मला आपण याविषयी फोनवर बोलू असं उत्तर दिलं आणि ३-४ दिवसांनी चक्क त्यांनीच मला फोन केला! फोनवर सुरवातीचा विषय अर्थात 'घाशीराम कोतवाल' हाच होता! या नाटकामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला, ज्यात मला जायची इच्छा नाही. पण हे नाटक एक सार्वकालिक सत्य सांगतं - आपल्याला उपयोग असेपर्यंत एखाद्याचा वापर करून उपयोग संपला की त्याकडे दुर्लक्ष करणे! श्री.पेंडसे यांनी सांगितलं की 'घाशीराम'चे युरोपातल्या जवळपास प्रत्येक देशात प्रयोग झाले, तसंच अमेरिकेतही झाले. पण प्रेक्षकांना भाषेची अडचण कुठेही जाणवली नाही. कारण तेही त्यांच्या देशांतील राज्यकर्त्यांच्या अशाच अनुभवांशी नाटकाचं नातं जोडू शकले. प्रेक्षक नाटक संपल्यावर यावर भरभरून चर्चा करत. यावरून कलाकारांना आपलं नाटक परक्या संस्कृतीतील लोकांपर्यंतही पोचलं याचा वेगळा आनंद आणि समाधान देऊन गेलं असणार!
'घाशीराम' नंतर श्री. पेंडसे हे 'थिएटर अकॅडेमी' या नाट्यसंस्थेचा अविभाज्य भागच बनून गेले. पु ल देशपांडे लिखित जब्बार पटेल दिग्दर्शित 'तीन पैशांचा तमाशा' , सतीश आळेकरांचे 'महानिर्वाण' अरुण साधूंचे ' पडघम' यासारख्य दर्जेदार आणि वेगळ्या धाटणीच्या नाटकांतून त्यांनी काम केलं . 'तीन पैशांचा तमाशा' या नाटकाच्या तालमीच्या निमित्ताने त्यांना पु ल देशपांडे यांचा तीन महिने सहवास लाभला! काय मंतरलेले दिवस असतील ते !
महानिर्वाण नाटकात डावीकडून दुसरे श्रीराम पेंडसे |
डॉ जब्बार पटेल यांच्या वेगळ्या वाटेवरच्या 'जैत रे जैत' 'सिंहासन' 'एक होता विदूषक' या सिनेमांतही श्री. पेंडसे यांनी भूमिका केल्या. त्यानंतर अर्थात त्यांनी इतर अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलं .
जैत रे जैत चित्रपटात श्रीराम पेंडसे |
यात विशेष उल्लेख करायचा झाला तर 'अवंतिका', 'वादळवाट' तसंच अलीकडच्या नितीन देसाई निर्मित 'छत्रपती शिवाजी' आणि 'बाजीराव मस्तानी' शिवाय 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिका तसंच महेश मांजरेकर दिग्दर्शित 'काकस्पर्श' 'कोकणस्थ' या चित्रपटांचा करावा लागेल. श्री. पेंडसे यांनी खऱ्या कलाकाराला आनंद नाटकात काम करून मिळतो असं सांगितलं. नाट्य-सिने-मालिका या क्षेत्रातली ही सगळी मुशाफिरी श्री. पेंडसे यांनी 'बँक ऑफ महाराष्ट्र' मधील नोकरी सांभाळून केली आणि सर्व मॅनेजर आणि बँकेतील सहकारी यांनी त्यांना संपूर्णपणे सहकार्य केलं याचा ते आवर्जून उल्लेख करतात.
मला श्री.पेंडसे यांच्याशी किती बोलू आणि काय काय बोलू असं झालं होतं. तेही बोलता बोलता म्हणाले आपण एकदा भेटूया. इतक्या सगळ्या गप्पा फोनवर मारणे शक्य नाही ! त्यांच्या या अनौपचारिकपणामुळे मला आता खरंच वाटू लागलंय की आमची प्रत्यक्ष भेट होईलही आणि मला त्यांना माझ्या मनातले 'घाशीराम' आणि इतर काही कलाकृतींबद्दलचे प्रश्न विचारता येतील.
1 comment:
राजेश, नाटक असो किंवा गाणी तुझा अभ्यास आणि अधिक जाणून घेण्याची आस ही मला अचंबित करते. लेखक, कलावंत ज्यांच्याशी तू संपर्क साधतो, त्यांना हा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच असणार. आवडत असणार . मग तेही प्रतिसाद देतात.
Post a Comment